श्याम बेनेगलांच्या ‘वंगबंधू’मधून उलगडतोय महानायकाचा जीवनपट

२७ मार्च २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


इतिहासाच्या विशिष्ट कालखंडावर प्रभाव टाकणार्‍या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा वेध सिनेमाच्या माध्यमातून घेणं तसं आव्हानात्मक काम असतं. बांगलादेशचे राष्ट्रपिता ‘वंगबंधू’ शेख मुजीबूर रेहमान यांचं जीवनही त्याला अपवाद नाही. लवकरच नामांकित दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या आगामी सिनेमातून हा इतिहास अनुभवता येणार आहे.

बांगलादेश सध्या आपल्या देशाच्या निर्मितीचा सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबूर रेहमान यांचं जन्मशताब्दी वर्ष २०२०मधे साजरं केलं गेलं. ‘वंगबंधू’ शेख मुजीबूर रेहमान यांच्याशी आणि बांगलादेशाशी भारताचं एक वेगळं नातं आहे.

शेख मुजीबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने शेख मुजीबूर रेहमान यांचा जीवनपट म्हणजे बायोपिकची निर्मिती करण्यात येतेय. सिनेमाचं दिग्दर्शन श्याम बेनेगल करत असल्यामुळे त्याविषयी अपेक्षा उंचावल्या आहेत.

भारत-बांगलादेश मैत्रीचं प्रतिक

इतिहासाच्या विशिष्ट कालखंडावर प्रभाव टाकणार्‍या कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा वेध सिनेमाच्या माध्यमातून घेणं तसं आव्हानात्मक काम असतं. अशा व्यक्तींचा जीवनपट निर्माण करणं तर त्याहून कठीण काम. जीवनपट निर्माण करताना दिग्दर्शक व पटकथा लेखकांनी साहित्यातल्या चरित्रात्मक लेखनविषयक नियमांचं पालन करणं अपेक्षित असतं. एका तटस्थ भूमिकेतून त्यांनी चरित्रनायक किंवा नायिका यांच्या जीवनाचा घेतलेला वेध सिनेमाला वेगळीच कलात्मक उंची प्राप्त करून देतो.

अतुल तिवारी आणि शमा जैदी यांनी या सिनेमाची पटकथा लिहिलीय. शंतनू मोईत्रा यांचं संगीत आणि नितीश रॉय यांचं कलादिग्दर्शन ‘वंगबंधू’मधे अनुभवता येणार आहे. ‘वंगबंधू’त अभिनय करणारे सर्व कलाकार बांगलादेशी आहेत, हे सिनेमाचं आणखी एक वेगळेपण सांगता येतं.

आरफिन शुवू हा ‘वंगबंधू’ शेख मुजीबूर रेहमान यांची भूमिका साकारत असून, नुसरत इमरोस तिशा ही शेख फाजिलतुन्नेसाची भूमिका साकारतेय. नुसरत फरिया सध्या बांगलादेशच्या पंतप्रधान असलेल्या आणि ‘वंगबंधूं’च्या कन्या शेख हसीना यांची भूमिका साकारणार आहेत. तौकिर अहमद हे सोहरावर्दी यांच्या भूमिकेत आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व इतर समकालीन व्यक्तिरेखा कोण साकारणार आहेत, याविषयी अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

जीवनपटाच्या निर्मिती व दिग्दर्शनासह सर्व महत्त्वाचे पैलू भारतीय कलावंत सांभाळणार आहेत, तर अभिनयाची बाजू बांगलादेशी कलावंत! हे या जीवनपटाचं एक वेगळेपण अधोरेखित करावं लागेल. भारत व बांगलादेश यांच्यातल्या मैत्रीचा भाव वृद्धिंगत होण्यासाठी हा जीवनपट एक सेतू म्हणून काम करू शकतो.

हेही वाचा: सर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं!

एका पर्वाचा प्रवास

‘वंगबंधू’ शेख मुजीबूर रेहमान यांचं जीवन सिनेमाच्या अवकाशात बसवणं तसं आव्हानात्मकच म्हणावं लागेल. १७ मार्च १९२० रोजी ढाक्याजवळच्या फरिदपूर जिल्ह्यातल्या ‘टांगीपाडा’ गावात एका सामान्य न्यायालयीन कर्मचार्‍याच्या पोटी जन्मलेला आणि कोलकात्याच्या इस्लामिया महाविद्यालयातून बी.ए. पदवी घेतलेला एक मुलगा ते नव्याने जन्माला येऊ घातलेल्या राष्ट्राचा सर्वमान्य नेता हा त्यांचा प्रवास दक्षिण आशियातल्या एका पर्वाचा प्रवास आहे.

स्थानिक-आंतरराष्ट्रीय परिस्थिती, प्रवृत्ती, धारणा, राजकीय महत्त्वाकांक्षा, गरज अशा अनेक पैलंमधून ‘वंगबंधूं’चं चरित्र निरपेक्षपणे साकारण्यासाठी दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची कसोटी लागणारच, यात शंका नाही. ‘वंगबंधूं’च्या जीवनातल्या प्रत्येक प्रसंगामागे विविध स्तरातल्या घटना, व्यक्ती आणि परिस्थिती यांच्यासोबतच एक व्यक्ती व एक नेता म्हणून त्यांची बलस्थानं आणि मर्यादा ते कशा पद्धतीने पडद्यावर उतरवतात, हे पाहणं खरोखरच औत्सुक्यपूर्ण राहणार आहे.

कोणताही महान नेता हा त्या काळाचं अपत्य असतो. तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थिती नेमकेपणाने मांडत, दिग्दर्शकाला प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जाता आलं तरच एखादा नेता ‘महान’ का ठरला? हे समजू शकतं. ब्रिटिशांची धोरणं, दक्षिण आशियात त्यांनी द्विराष्ट्र सिद्धांतासाठी केलेले प्रयत्न, धार्मिक ध्रुवीकरण, फाळणी, पूर्व-पश्चिम पाकिस्तान अशी विचित्र भौगोलिक रचना अशा अनेक घडामोडी आपल्याला बांगलादेश निर्मितीच्या इतिहासात दिसतात.

त्याचबरोबर पश्चिम पाकिस्तानचा पूर्व पाकिस्तानकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन, पूर्व पाकिस्तानची धर्मापेक्षा आपल्या बंगाली संस्कृती व भाषेविषयी असलेली अस्मिता, त्यामुळे त्याचा भारताकडे असलेला स्वाभाविक कल, ब्रिटन-अमेरिकेचे राजकीय डावपेच, भारताचं धोरण, पूर्व पाकिस्तानकडे भारताचा असलेला नैसर्गिक कल अशा कितीतरी तथ्यांच्या पायावर उभा राहून शेख मुजीबूर रेहमान या सामान्य माणसाचा बांगलादेशाचा ‘जातीर जनक’ अथवा ‘राष्ट्रपिता’ होण्यापर्यंतचा प्रवास श्याम बेनेगल यांना दाखवायचाय.

महानायकाची जीवनगाथा

बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतर देशाची सत्ता सांभाळलेल्या शेख मुजीबूर रेहमान या महानायकाच्या संघर्षगाथेचा सुखांत होणं अपेक्षित होतं. तसं होऊ शकलं नाही. या कथेत पाकिस्तानची सुडबुद्धी आणि बांगलादेशचा सेनाध्यक्ष जनरल शफीउल्लाह याची सत्तालालसा चरित्रनायकाचा घात करते.

१५ ऑगस्ट १९७५ रोजी सैन्याची एक तुकडी पंतप्रधान शेख मुजीबूर रेहमान यांच्या ‘३२ घनमंडी’ या निवासस्थानी घुसवून त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची निर्घृण हत्या केली जाते. त्यांची पत्नी, दोन मुलं, सुना, एवढंच नाही, तर दहा वर्षांच्या सर्वांत लहान मुलाचीही हत्या होते. या हत्याकांडाला लष्कराचा उठाव कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं.

१६ ऑगस्टला शेख मुजीबूर रेहमान यांचं शव सोडून इतरांच्या शवाला एकाच खड्ड्यात दफन केलं जातं. त्यांचं शव त्यांच्या गावी म्हणजे ‘टांगीपाडा’ इथं आणलं जातं. कोणी अंत्ययात्रेत सहभागी होऊ नये म्हणून गावाला सैन्याचा घेराव घातला जातो. दफनविधी करणारा काजी सांगतो, स्नान घातल्याशिवाय दफन शक्य नाही. गावात अंघोळीचा साबण उपलब्ध होत नाही म्हणून कपडे धुण्याच्या साबणानं अंघोळ घातली जाते.

अखेर पित्याच्या कबरीशेजारी या महानायकाला एका बेवारस माणसाप्रमाणे दफन केलं जातं. परदेशात शिक्षणासाठी असल्यामुळे वाचलेल्या त्यांच्या दोन कन्यांपैकी शेख हसीना वाजेद या भविष्यात देशाच्या पंतप्रधान बनतात. आज त्यांच्या नेतृत्वात बांगलादेश प्रगती करतोय. एखाद्या उत्तम सिनेमासाठी आवश्यक सगळा ऐवज या महानायकाच्या जीवनगाथेत आहे. तो श्याम बेनेगल त्यांच्या जीवनपटात अभिजातपणे कसा उतरवतात, याविषयी उत्सुकता आहे.

हेही वाचा:

गांधीजींना तुकोबा भेटले होते

बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं 

खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी

सरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)