शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर आज भाजपसोबत युती करणार असल्याची घोषणा केलीय. युतीच्या या घोषणेचा निव्वळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. देशभरातले राजकीय विश्लेषक, पत्रकार या युतीचं विश्लेषण करायलेत. पण एका सामान्य मराठी माणसाच्या, शिवसेनेला मतदान करणाऱ्या तरुणाच्या नजरेतून या युतीचं दिलखुलास विश्लेषण.
कुठलीशी एक हॉलीवूड नटी होती. लीझ टेलर बहुदा. तिने अकरा लग्नं केली. १० घटस्फोट घेतले आणि नवरे एकुण दहा केले. टोटल लागत नाही. कारण एकदा डीवोर्स घेतलेल्याशी पुन्हा लग्न केलं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे स्वबळाच्या फुशारक्या मारत घटस्फोटाच्या बाता मारत साडेचार वर्ष लिव इनमधे राहून आणि तेही सतत आदळआपट करून आता शिवसेना पुन्हा भाजपशी पाट लावायला तयार झालीय.
वर्षभरापूर्वी आपल्याच राष्ट्रीय कार्यकारिणीत एकमताने 'स्वबळा'चा ठराव करणाऱ्या आणि दिलेल्या शब्दाशी ठाम राहणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची फक्त एका वर्षात एवढी घसरण का झाली असेल? लढाईआधीच तह करावा लागणं हे 'मर्द' पक्षाला शोभा देणारं आहे का? स्वबळाची भाषा, तसा ठराव केल्यावर राज्यातल्या सर्वच शिवसैनिकांनी केलेला जल्लोष मातोश्रीची सुरक्षा भेदून आत गेला नसेल का?
स्वखर्चाने आणि हिरीरीने सोशल मीडियावर आणि रस्त्यावरही सेनेची बाजू घेत भाजप आणि मोदीभक्तांना अंगावर घेणाऱ्या सामान्य शिवसैनिकाला शिवसेनेत शून्य महत्व आणि स्थान आहे हेच या सगळ्याचं सार आहे.
बाळासाहेब म्हणायचे, ‘शिवसैनिक आहेत म्हणून मी आहे आणि शिवसेना आहे.’ आज त्याच सैनिकाला गृहीत धरून आपण काहीही केलं तरी सैनिक 'आदेश' म्हणून ते सांभाळून घेतील असा समज करून घेणारे पक्षाला आणि पर्यायाने पक्ष म्हणून राज्याला काय नेतृत्व देतील? कालपर्यंत स्वबळाची भाषा करून आज युती करणं हा राजकीय शहाणपणा असूच शकत नाही.
देशभरात, खासकरून शेतकरी आणि कष्टकरी वर्गात मोदी सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. आणि हाच वर्ग सेनेचा मतदार असताना युती करून पायावर धोंडा मारून घेण्याची दुर्बुद्धी उद्धव ठाकरेंना कशी काय सुचली असेल?
गेली जवळपास साडेचार वर्ष सत्तेत राहून विरोध आणि सतत 'सत्तेला लाथ मारेन' आणि 'राजीनामे खिशात घेऊन फिरतो' या भूमिकेमुळे शिवसेना प्रचंड चेष्टेचा विषय झालीच होती. पण स्वबळाच्या ठरावामुळे सेनेचं केडर अजूनही सेनेशी बांधील होतं. २०१४ च्या विश्वासघाताचा बदला घ्यायची संधी २०१९ ला मिळणार म्हणून त्वेषात आणि जोशात लढायला तयार झालं होतं.
आता युतीची झाल्याने या केडरची जी मानसिक फसवणूक झाली त्याचा परिणाम म्हणून सेनेला संघटना म्हणून जे प्रचंड नुकसान भोगावं लागणार आहे त्याचा अंदाज लोकसभेला इतका दिसून येईल न येईल पण विधानसभेला मात्र सेना क्रमांक ४ वर जाईल यात शंका नाही.
नेतृत्वाने संघटनेत विश्वास निर्माण करायची गरज असते इथे नेमकं उलट करत आहे. इथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतःचीच विश्वासहर्ता गमावून बसलेत. युतीची घोषणा झाल्यावर सोशल मीडियावर आणि रस्त्यावरही शिवसैनिकांशी बोलल्यावर दिसून आलं की, पक्ष आणि पक्षप्रमुखांवरचा त्यांचा विश्वास उडालाय.
‘खैसाला नाही बायकू न हडळीला नाही नवरा’
‘शब्द बदलणे म्हणजे बाप बदलणे’
‘स्वबळावर कुंथुन कुंथुन आता काहीही होत नाही म्हणून गुजरातमधील शेठचं कायमचूर्ण घ्यावं लागलं’
‘अफझल खानाला मिठी मारली’
‘हा बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे’
‘युतीच करायची होती तर मनसेशी करायला काय अडचण होती?’
‘बाळासाहेब म्हणायचे आपल्या शब्दांवर ठाम राहा... आज त्यांचाच मुलगा ठाम नाही तर आम्ही का आंधळेपणाने प्रचार करायचा?’
‘आत्मघातकी निर्णय’
‘सेनेचं कधीही भरून न येणारं नुकसान’
‘आता 'सामना' हा संध्यानंदपेक्षाही विनोदी पेपर असेल’
या आणि या आशयाच्या अनेक संतप्त प्रतिक्रिया कट्टर सैनिकांकडून उमटत आहेतच. पण विरोधकांकडून सेनेची आणि पक्षप्रमुखांची यथेच्छ खिल्ली उडवली जातेय. राज्यातले सगळेच मतदार 'सामना' वाचत नाहीत, त्यामुळे तिथलं मटेरीयल लोकांनी वाचून तुम्हाला मतं द्यावीत असं तूम्हाला वाटत असेल तर तुम्ही निव्वळ थोर अग्रलेखक होवू शकता, सत्ताधारी नाही.
शिवसेनेला या सगळ्यांची उत्तरं अगोदर स्वतःच्या शिवसैनिकांना द्यावी लागतील आणि त्यानंतर मतदारांसमोर कोणत्या तोंडाने जायचं हेही ठरवावं लागेल. कारण आता नेहमीचे, 'मर्दांची सेना' , 'वाघांची सेना' 'सत्तेवर लाथ', 'नरड़ीचा घोट', 'मर्द मावळे' इत्यादी ऐतिहासिक बडबड म्हणजे केवळ 'चला हवा येउ द्या' टाईप कॉमेडी वाटणार आहे.
सतत इतिहासात रमणाऱ्या आणि संघटनेलाही रमवणाऱ्या बोरुबहाद्दरांनी सेनेचा वर्तमानकाळ आणि भविष्य दोन्ही मोदी आणि शहा यांच्या चरणी वाहिलेत. त्यावरून ते दोघं चालून तो कसा मिटेल याची नीट खात्री करतील यात शंका नाही. वाडवडलांनी कमावलेली इस्टेट फुंकून देणारे अनेक लोक असतात. सेना आता त्यांच्या यादीत टॉपवर असेल. तेही स्वबळावर.
हेही वाचाः हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?
‘युतीमध्ये २५ वर्ष सडली’ असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी उरलेली सगळी वर्ष सडवून टाकण्यासाठीच युतीला होकार दिलाय, यात आता काही शंकाच राहिली नाही. भाजपने कित्येक पक्षांना राजकीय धोका दिलाय. २५ वर्षांचापासूनचा मित्र असलेली शिवसेनाही यातून सुटली नाही. असं असतानाही पुन्हा 'असंगाशी संग' करावा लागणं हे नेतृत्वाचं अपयश आहे.
पंढरपुरात 'महाराष्ट्रातून भाजपाची घाण नष्ट होऊ दे' असं साकडं घालणाऱ्या उद्धव ठाकरेंनी त्या घाणीत बैठक मारून साक्षात विठ्ठलालाही फसवलंय. पण शिवसैनिक ज्यांना दैवत मानतात त्या बाळासाहेबांनाही फसवलंय.
ऐन लढाईच्या वेळी स्वतःच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतला स्वबळाचा ठराव रद्द करून आपल्याच शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारा सेनापती सेनेला मिळावा यासारखं दुर्दैव दुसरं काय असणार?
देशभरात प्रादेशिक पक्षांचं महत्व वाढत असताना पन्नाशी गाठणाऱ्या सेनेला मात्र भाजपच्या दावणीला बांधून मराठी माणसाच्या नजरेतून पक्षाला आणि स्वतःला उत्तरवण्याचं काम राजकारणात संयमी म्हणून गणल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरेंनी केलंय, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
'बोरूबहाद्दरांच्या बुद्धीने पक्ष चालू लागला की त्या पक्षाचं पुढे काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सेना' असं चित्र मराठी माणसाला सुखावणारं नाही हेच खरं. उद्धव ठाकरे खरंच संयमी आहेत की अवसानघातकी आहेत हा प्रश्न त्यांनी स्वतःच निर्माण केलाय. बोरुबहाद्दर आणि दरबारी राजकारण करणाऱ्या चौकडीच्या नादाला लागून उद्धव ठाकरेंनी स्वतःला इतकं हास्यास्पद अवस्थेत आणून ठेवलंय की वॉट्सअपवरच्या एकूण मराठी राजकीय विनोदांमधे ते स्वबळावर किंग ठरलेत.
राज ठाकरेंनी या सगळ्याचा फायदा करून सेनेची सगळी जागा व्यापावी आणि एक सक्षम प्रादेशिक पक्ष निर्माण करावा अशी संधी त्यांना नियतीने दिलीय. आता ते तरी या संधीचं सोनं करतात की निव्वळ ट्विटरपुरती व्यंगचित्रं काढत बसतात, हे येणारा काळच सांगेल.
तूर्तास मराठी माणूस आणि सेनेचा मतदार म्हणून शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र'!
हेही वाचाः
(लेखक हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड इथले रहिवासी असून बेळगावात नोकरीला आहेत.)