शिवाजी पार्कवर निळा समुद्र भरून आला होता तेव्हा

०७ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


६ डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जाग्या करत अनेक भीम अनुयायी या दिवशी शिवाजी पार्कच्या मैदानावर येतात. खरेदीसाठी अनेक स्टॉल इथं लागतात. पुस्तकं, कपड्यांसोबतच अनेक महत्वाच्या गोष्टी या स्टॉलवर दिसतात. सध्याचा धम्म नेमक्या कोणत्या मार्गावरुन चाललाय याचाही अंदाज या स्टॉलवरुन बांधता येईल.

भारताचा प्राण आहे संविधान
तयाला जाणून घेई घेई

तयाला जाणता जाणशी स्वतःला
तव अस्तित्वाला अर्थ येई

होते येथे सारे वेगवेगळे मी
आता झालो आम्ही भारतीय

संविधानाच्या अभंगाचे हे बोल, ताल देत दुमदुमणारा डफ आणि गाणाऱ्याच्या सुरात सूर मिळवणाऱ्या स्टॉलवरच्या माणसांचे आवाज मनात साठवत शिवाजी पार्कचा निरोप घेतला. दादर स्टेशनच्या दिशेनं पावलं चालू लागली. फक्त १५ मिनिटांचं अंतर. पण त्या १५ मिनिटात गेल्या ५ तासात अनुभवलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोरून जात होता. सिनेमातल्या फ्लॅशबॅकसारखं सगळं आठवत होतं.

कष्टकरी समाजाला परवडणारी पुस्तकं

सिनेमासारखंच मनातलं काळं पांढरं दृश्य हळूहळू रंगीबेरंगी होऊ लागलं. शिवाजी पार्कच्या मैदानावर पहिलं पाऊल ठेवलं आणि समोरच पंचरंगी झेंडा दिसला. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना माणसं जागा मिळेल तिथं झोपली होती. मी पंचरंगी झेंड्याकडे मोर्चा वळवला. एका पुस्तकाच्या स्टॉलवर तो झेंडा लावला होता. वर सुधीर प्रकाशन अशी पाटी होती. विक्रेत्याला त्या झेंड्याबद्दल विचारलं.

झेंड्यातले पाच रंग म्हणजे बुद्धाची पंचशील तत्त्व. कोलंबोच्या एका बुद्धिस्ट समितीनं एकोणिसाव्या शतकात हा झेंडा डिझाईन केला होता. तेव्हापासून तो बुद्धिस्ट फ्लॅग म्हणून ओळखला जातो, अशी माहिती त्यांनी मला दिली.

त्यांच्या स्टॉलवरच्या पुस्तकांवर नजर फिरवली. बुद्धाचा विचार सांगणारी आणि बाबासाहेब आंबेडकरांवरची मराठी पुस्तकं तिथं होती. काही हिंदी पुस्तकंही दिसली. शुद्र पूर्वी कोण होते हे पुस्तक खास दिसेल असं ठेवलं होतं. दोन-चार पुस्तकं चाळल्यावर लक्षात आलं की पुस्तकांची किंमत ५० ते ६० रुपयांपेक्षा जास्त नाही. तिथं जमणाऱ्या कष्टकरी समाजाला परवडतील, ते विकत घेतील अशीच पुस्तकं तिथल्या सगळ्या स्टॉल्सवर ठेवलेली.

‘आंबेडकर आणि हिंदू कोड बिल’, ‘ख्रिश्चन धर्मांतरीत ब्राम्हण आणि दलित यांचे नाते काय?’, ‘संघाचा असली चेहरा’, ‘फॅसिझम संघटीत भांडवलशाही’, ‘काळ्या स्त्रीयांचा इतिहास’ अशी काही पुस्तकं सगळ्याच स्टॉलवर होती. महात्मा फुल्यांची, सावित्रीबाईंची पुस्तकं अभावानेच एखाद्या स्टॉलवर दिसत होती. कथा, कांदबऱ्या तर नव्हत्याच.

मूर्तीसोबत बाबासाहेबांचं चरित्र फ्री

बिहारवरुन आलेला एक माणूस मुंबईच्या दमट हवेत बनियन आणि पॅन्ट घालून, मुलाला सोबत घेऊन कितीतरी वेळ कसलंस हिंदी पुस्तक शोधत फिरत होता. मुळातच हिंदी आणि इंग्रजी पुस्तकं कमी होती. त्यातही मुलांना वाचता येईल, अशी पुस्तकं दिसत नव्हतं. एखादं प्रेरणादायी पुस्तकही नव्हती.

काही ठिकाणी युवाल नोह हरारी या नव्या लेखकाची पुस्तक ठेवली होती. नोम चोमस्की यांचं जीवनकार्य सांगणारा परिवर्तनाचा वाटसरू या मासिकाचा दिवाळी अंक, वारली पेंटींगसाठी प्रसिद्ध असणारे जिव्या सोमा माशे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर निघालेली मासिकं, काही मासिकांचे दुर्मिळ अंक असं बरच होतं. पण त्याला ग्राहक नव्हता.

बुद्धाच्या, बाबासाहेबांच्या मूर्त्या विकणाऱ्या एका स्टॉलवर बुद्धाच्या मूर्तीसोबत धनंजय कीर यांनी लिहिलेलं बाबासाहेबांचं चरित्र फ्री देत होते. नागपूरवरून सगळा माल घेऊन ते तीन दिवसांपूर्वीच इथं आलेले. मूर्ती तयार करणं, त्याच्या ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आणि होलसेलमधली पुस्तकं या सगळ्याचा विचार केला तर प्रत्येक मूर्तीमागे ५० रुपये खिशातून घालावे लागत होते. तरीही बाबासाहेबांचं चरित्र वाचलं जावं यासाठी सगळा आटापिटा चालला होता.

हेही वाचा : झाडाखाली अडकलेल्या माणसाला सोडवायचं कुणी?

महिलांना मोकळीक देणारी जयभीम वारी

मूर्त्यांचे असे अनेक स्टॉल होते. घरपोच मूर्ती पोचवण्याची व्यवस्था केली जाईल अशी पाटी लावलेल्या स्टॉलवर सुटाबुटातल्यांची गर्दी असायची. सोबत असलेल्या माणसाशी विचार विनिमय करुन कोणती मूर्ती घ्यायची हे ठरत होतं. त्याच्याच पुढे विचारवंतांच्या फोटो फ्रेमचा स्टॉल होता.

तिथं साध्या साडीतल्या दोन बायका होत्या. बुद्धाची आणि आंबेडकरांची मोठ्ठ्या फोटो फ्रेमची खरेदी चालली होती आणि अजून ५० रुपये कमी करण्यावर त्या अडून बसल्या होत्या. काय करावं हा प्रश्न मनात घेऊन दोघी एकमेकींकडे पहात होत्या. ‘जरा बघा की ओ. आत्ता सागरच्या लग्नात एक फ्रेम केली होती. पण ती लगेच खराब झाली. म्हणून ही दुसरी.’ त्या गळ घालत होत्या. सागर त्यांचा मुलगा असावा. 

फ्रेमची खरेदी झाल्यावर त्यांना विचारलं, ‘तुम्ही मैत्रिणी आहात?’

‘नाही. नणंदा-भावजया आहोत. आमच्या यांची बहीण आहे ही. पण आम्ही राहतो मैत्रिणीसारख्याच. वर्षातल्या या दिवशी आम्ही दिवसभर घराबाहेर राहतो. इथं येतो. आणि दोघी खूप फिरतो. आता परत जाताना हॉटेलात खाऊन घरी जाणार. आज स्वयंपाक पण बनवत नाही घरी.’ कविताताई म्हणाल्या. महिलांना सामील करुन घेणाऱ्या, घरातल्या चार भिंतीपासून त्यांची सुटका करणाऱ्या आषाढीच्या वारीचं कौतूक होतं. घरातल्या बाईला एक दिवस का होईना पण आपल्या मनासारखं बाहेर पडून खरेदी करण्याची मुभा देणारी ही जयभीम वारी होती.

धम्मानं कोणता मार्ग निवडलाय ते स्टॉलवरुन कळतं

धम्मातली काही प्रतिकं पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या टी शर्टवर छापून स्वस्त दरात विकायला ठेवण्यात आली होती. मुंबई युनिवर्सिटीच्या पाली भाषा विभागाच्या स्टॉलवर ही विक्री चालू होती. पाली विभागाच्याच मुलामुलींनी हे टी शर्ट्स डिझाईन केले होते. बुद्धाचा चेहरा घ्यायचा नाही. पण धम्मातली प्रतिकं घेऊन त्याचे टीशर्ट करायचे ही त्या मुलांची कल्पना होती. बुद्धाच्या हाताची मुद्रा असलेले टी शर्ट जास्त विक्री होतात असं तिथल्या काकांनी सांगितलं.

त्या स्टॉलवर येणाऱ्या प्रत्येकाला पाली विभागात चालणाऱ्या पाली भाषा कोर्सेसची माहिती दिली जात होती. आपलं काम सांभाळून शनिवार, रविवारच्या मोकळ्या वेळात हे कोर्सेस विद्यापीठात चालतात. समोरच्या माणसानं धम्म स्वीकारलाय हे आधीच ठरवून ते बोलू लागायचे. ‘आपण धम्म स्वीकारलेले लोक जी प्रार्थना म्हणतो ती आपल्याला नीट म्हणता आली पाहिजे. त्यातले उच्चार स्पष्ट हवेत. त्याचा अर्थ कळला पाहिजे’, असं ते सांगत.

हिंदूंनी संस्कृत शिकावं तसं धम्म स्वीकारलेल्यांनी पाली शिकावी, ती आपली भाषा आहे असा सगळा खटाटोप नवे पुरोहित घडवण्याकडे चाललाय का असा प्रश्न विचारता येईल. पाली भाषेतलं साहित्य मराठीत, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत न करता त्यात धर्मासारखी पवित्रता आणण्याचा प्रयत्न चांगला नाही.

या स्टॉलवरून धम्म सध्या कुठल्या रस्त्यावर आहे याचा अंदाज बांधता येतो. पुस्तकांच्या स्टॉलवर फक्त बामसेफी साहित्य उपलब्ध असणं म्हणजे विचारधारेची चौकट घालून देण्याचं पहिलं पाऊल. ‘होय मी बुद्धिस्ट आहे’ असं लिहिलेले टीशर्ट्स आणि जॅकेट्सची विक्री, ब्रेसलेट्स, पुतळे, मूर्त्या हे सगळं चौकट आखून देतंय असं वाटलं.

हेही वाचा : इथे रस्त्यावरच उलगडतात विज्ञानातली रहस्यं

राजकीय बुद्ध सांगणारं पेंटिंग

या निराशावादातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आता फक्त पेंटिग्सचे स्टॉल बघायचे असं ठरवलं. चित्रकाराच्या मनातला बुद्ध रेखाटलेले पेंटिंग ग्राहकांना सहज आकर्षित करत होते. तिथं फार पटकन गर्दी होत होती आणि पेंटिंगची किंमत पाहून लगेगच पांगतही होती. अशाच एका स्टॉलवर बुद्धाची निळ्या रंगाचं चित्र होतं.. नेहमी बुद्धाच्या चेहऱ्यावर दिसतात तसे शांत भाव या पेंटिगमधे नव्हते. दोन तीन स्टॉल सोडल्यावर आणखी एक पेंटिंग लागलं होतं. त्यातही निळ्या रंगाचा वापर केला होता.

पण पहिल्या पेंटिंगमधला बुद्ध वेगळा होता. श्रीकृष्णासारखी निळी त्वचा असणारा हा बुद्ध होता. विष्णुचा अकरावा अवतार वाटावा असा हा बुद्ध होता. तर दुसऱ्या स्टॉलवर बुद्धावर निळा प्रकाश पाडलेला होता. बुद्ध धम्माचं ज्या दोन मार्गांनी राजकीयकरण झालं ते दोन मार्ग म्हणजे या दोन पेंटीग. एकात धम्म हिंदू धर्माचा भाग म्हणून पुढे येत होता. तर दुसऱ्यात बाबासाहेबांच्या क्रांतीचा निळा प्रकाश धम्मावर पडला होता.

या सगळ्यात प्राची या हिजडा समाजातल्या मैत्रीणीने रेखाटलेला बुद्ध फारच आकर्षक होता. कारण तिचा बुद्ध भावनाशील होता. त्याला राजकारणाचे किंवा बाजारीकरणाचे कसलेच मुलामे तिनं लावले नव्हते. चिवर घातलेला, हातात कमळाच्या कळ्या घेतलेला आणि शेजारच्या मोराकडे आत्मीयतेनं पाहणारा प्राचीचा बुद्ध होता. हिरव्या रंगांच्या छटात फक्त बॅकग्राऊंड दिसावी असा तिचा बुद्ध होता. तिला बुद्ध भावला.

समुद्राला लाजवेल इतकी विविधता

स्टॉल माणसांनी फार गजबजून गेले होते. सावित्रीबाई आणि जोतिराव फुले, आंबेडकर रमाबाई यांच्या फ्रेम्स होत्या. गळातले ताईत, ब्रेसलेट, निळ्या रंगाचं जॅकेट, पांढऱ्या मोत्यांच्या माळा, मी बुद्धिस्ट आहे असं लिहिलेले टीशर्ट, आंबेडकरांचा फोटो असलेले टी शर्ट, शांत आवाज करणारा मेडीटेशन कप असं कित्ती काय काय विकायला होतं.

त्यातच माणसंही मिसळून गेली होती. या सगळ्यात दोन तीन स्टॉल सोडलं की ‘बुद्धम शरणं गच्छामी’ सांगणाऱ्या कॅसेट्स ऐकू यायच्या. शेजारच्या अरबी समुद्रालाही लाजवेल असा निळा समुद्र इथं भरून आला होता. खऱ्या समुद्रातही नसेल इतकी विविधता इथं दिसत होती. आणि लहान मुलांसारखं अनुभवांचे शंख शिंपले गोळा करण्याचा माझा अट्टहास चालला होता.

असं बरच काही फिरल्यावर परत जाण्यासाठी स्टेशनला पोचले तेव्हाही डोक्यात तिथले विक्रेते, खरेदी करणारी सामान्य माणसं सगळं सगळं आठवत होतं हा फरक फक्त डोक्यातला आहे हेही जाणवत होतं. विकणारा असो की बाहेरचा, स्टॉलच्या आत उभा असु दे किंवा बाहेर ही सगळी माणसं एकमेक सारखीच आहेत. एकमेकांना भावनेनं जोडली गेली आहेत, हे जाणवत राहतं. स्टॉलच्या बाहेरचा माणूस, स्टॉलच्या आतल्या माणसाला ‘जय भीम’ म्हणतो तेव्हा हे जोडलेपण स्पष्ट दिसू लागतं. सगळं समान पातळीवर येऊन जातं.

हेही वाचा : 

पन्नाशीतला आराधना आज आठवण्याचं कारण काय?

महात्मा गांधी प्रत्येकाला वेगवेगळे उमगतात, त्याची गोष्ट

संविधान ग्रेट भेट : मुलांना संविधान समजावून सांगणारं पुस्तक

हैदराबादेतल्या पोलिस एन्काऊंटरवर टाळ्या वाजवणाऱ्यांनी एकदा हे वाचावं