अयोध्या दौऱ्यामुळे शिवसेनेला काय मिळालं? 

०७ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ४ मिनिटं


उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजला. आज ६ डिसेंबरच्या निमित्ताने रामजन्मभूमीची पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याचं श्रेय उद्धव ठाकरेंना आहे. पण या दौऱ्याने शिवसेनेला खरंच काही मिळालंय का? या मार्गाने शिवसेनेचं भलं होईल का?

२६ नोव्हेंबर हा संविधान दिन. या दिवशी देशाने राज्यघटना स्वीकारली. घटनेने देशाला जगण्याचं भान दिलं. इतका महत्त्वाचा दिवस आज आपल्या डोक्यात आधी येतो तो २६/११ म्हणून. आपण मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं श्राद्ध दरवर्षी घालत राहतो.  

६ डिसेंबरचंही तेच झालंय. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाचा दिवस. त्यांच्या महान विचारांपासून प्रेरणा घेऊन पुन्हा पुन्हा उभं राहण्याचा दिवस. पण १९९२पासून गेली सव्वीस वर्षं तो बाबरी मशीद पाडण्याची आठवण करून देतो. धर्माच्या नावावर देश विभागला गेल्याची आठवण करून देतो. पण त्या दिवसापासून धडा घेता येतो. कारण तो पुन्हा एकदा जातिधर्माच्या पलीकडे माणूस जोडण्याचीही गरज सांगत असतो. 

पण निवडणुका आल्या की माणसांचे मतदार करण्याचा धंदा जोरात होतो. त्यासाठी रामजन्मभूमीसारखा दुसरा मुद्दा नाही. लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर असल्यामुळे तो अचानक तापवला जातोय. यंदा त्याचं श्रेय शिवसेनेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. 

कारसेवकांमधे शिवसेनेविषयी कुतुहल होतं

६ डिसेंबरच्या निमित्ताने कोलाज डॉट इनने दोन लेख अपलोड केलेत. २६ वर्षांपूर्वी बाबरी मशीद पाडली जात असताना आंखो देखा हाल टिपत रिपोर्टिंग करणाऱ्या मराठीतल्या दोन दिग्गज पत्रकारांचे रिपोर्ट त्यात आहेत. ज्ञानेश महाराव आणि प्रताप आसबे या दोघांच्याही रिपोर्टमधे शिवसेनेचा उल्लेख आहे. त्यातून शिवसेनेची तेव्हा असलेली चर्चाही समोर येते. 

अयोध्येत कारसेवेसाठी देशभरातून हिंदुत्ववादी कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यांच्यात शिवसेनेविषयी कुतुहल होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः बॉम्ब घेऊन अयोध्येत येतील आणि बाबरी मशीद उडवतील, अशासारख्या अफवा त्यांच्यात पसरवलेल्या होत्या. उत्तर प्रदेशमधले शिवसेनेचे एक नेते पवनकुमार पांडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिक अयोध्येत मिरवणुका काढत होते. प्रताप आसबे यांनी तर म्हटलंय, बजरंग दलाच्या लोकांनी करायचं आणि शिवसैनिकांवर आरोप ढकलायचा, असा संघाचा डाव असल्याची चर्चा होती. 

प्रत्यक्षात तसं झालंही. दंगलीचे आणि कोर्टाचे दणके बसू लागताच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बाबरी मशीदीच्या पापापासून काखा वर करायला सुरवात केली. त्यासाठी शिवसैनिक जबाबदार असल्याचे आरोपही भाजपच्या एका मोठ्या नेत्याने केले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या बेगुमान स्टाईलमधे सांगून टाकलं, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल, तर त्या सैनिकांचा मला अभिमान आहे. 

शिवसेनेची टीम अयोध्येत पोचली  नव्हती 

दंगलीच्या वातावरणात धार्मिक तेढ वाढलेली असताना बाळासाहेब या वाक्याने देशभरातल्या हिंदुत्ववाद्यांचे हिरो झाले नसते तर नवलच. खरंतर `सामना`मधे  `अयोध्येकडे` हा अग्रलेख लिहून त्यांनी शिवसैनिकांनी अयोध्येच्या `मुक्तिसंग्रामात` विजयी होण्याचं आवाहनही केलं होतं. 

वास्तविक महाराष्ट्रातून गेलेली शिवसैनिकांची टीम गुजरातपर्यंत पोचण्याआधीच बाबरी पडली. तिथे मनोहर जोशी आणि इतर नेत्यांनी काही कारण नसताना कोलकात्याचं विमान पकडलं. तिथून अयोध्येला पोचेपर्यंत ७ डिसेंबर उजाडला होता. माजी खासदार मोरेश्वर सावे हे शिवसेनेचे एकमेव पुढारी बाबरी पडताना अयोध्येत होते. तरीही भाजपचे नेते करून सवरून नामानिराळे राहत असताना बाळासाहेब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. 

महाराष्ट्रात भाजपचं यश मर्यादित राहिलं 

लोकांची नाडी नीट माहीत असणाऱ्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं चलनी नाणं नीट ओळखलं होतं. नोव्हेंबर १९८५च्या महाड अधिवेशनात त्यांनी `गर्व से कहो हम हिंदू हैं`ची भगवी शाल ओढली होती. त्यानंतर शिवसेना मुंबईतून महाराष्ट्रात पसरली ती हिंदुत्वाच्या मार्गानेच. १९८६ला भगवा सप्ताह हा त्या संघटनाबांधणीतला महत्त्वाचा टप्पा होता. त्यानंतर विलेपार्ले पोटनिवडणुकीतला विजय, रिडल्सवरून झालेला वाद, औरंगाबाद दंगल या मार्गानेच शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष म्हणूनच राज्यभर पसरली. मराठीवादी पक्ष म्हणून नाही. 

मुळात संघपरिवाराने तापवलेल्या रामजन्मभूमीच्या मुद्द्याचा फायदा घेत बाळासाहेबांनी महाराष्ट्रातलं हिंदुत्ववादाचं राजकारण हायजॅक केलं. केवळ भाषणांच्या जोरावर ते बाबरी मशीद पडायच्या आधीच हिंदुहृदयसम्राट बनले. ९२ आणि ९३च्या दंगलीने तर त्यांना देशपातळीवरचा हिंदूंचा नेता बनवलं. भाजप हिंदुत्ववादाच्या नावाने गुजरातपासून उत्तर प्रदेशपर्यंतची राज्यं ताब्यात घेत असताना, महाराष्ट्रात मात्र सर्वात जुनं आणि मोठं संघटन असतानाही त्यांच्या वाढीला आजपर्यंत मर्यादा राहिली. त्याचं कारण बाळासाहेबांचा करिश्मा आहेच. पण बाबरी पाडण्याचं बालंट शिवसेनेवर ढकलण्यासाठी संघपरिवाराने तयार केलेल्या खड्ड्यात बाळासाहेबांनी त्यांनाच ढकलून दिलं, हेदेखील आहे. 

राजकीय नेता म्हणून हे बाळासाहेबांचं मोठं यश होतं. पण दुसरीकडे रुद्राक्षाच्या माळेत गुरफटलेलं हिंदुत्व त्यांना स्वीकारावं लागलं, हे त्यांचं अपयश होतं. `देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं` या पुस्तकातून प्रबोधनकार ठाकरेंनी देवळं ही बहुजनसमाजाला गुलाम बनवण्याची दुकानं असल्याचं सडेतोड सांगितलं होतं. त्या खऱ्या हिंदुत्वावरचा हक्क त्यांनी गमावला. आदित्य ठाकरे यांचं ट्विटर अकाऊंट एकदा पाहिलं की त्यांना अयोध्येच्या मुद्द्यावर फारसा इंटरेस्ट नसल्याचं जाणवतं. अहमदनगरच्या निवडणूक प्रचारसभेत त्यांनी मशिदीतली अजान सुरू झाल्यामुळे सभा थांबवून सन्मान दिला, अशा बातम्या छापून आल्यात. ही वाट प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाच्या दिशेने जाणारी आहे.

आता नेमकं उलट झालंय

आज २६ वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा मेलेला मुद्दा जागवला. शिवसेनेची हिंदुत्ववादाच्या मैदानातली आतापर्यंतची पुण्याई पणाला लावत त्याची देशभर चर्चा घडवून आणली. आता त्याचा फायदा संघपरिवारातल्या संघटना घेत आहेत. तेव्हा संघाच्या मुद्दयावर बाळासाहेबांनी अतिशय चलाखीने राजकारणाची पोळी भाजून घेतली होती. आता शिवसेनेचा कोंबडा आरवल्यामुळे जागा झालेला संघपरिवार रामजन्मभूमीच्या भुपाळ्या गाऊ लागलाय. 

याचा अर्थ शिवसेनेला अयोध्या मोहिमेचा फायदा झाला नाही, असंही नाही. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेला देशभरातून आणि महाराष्ट्रातूनही सर्वाधिक मीडिया कवरेज उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातच मिळालं. विश्व हिंदू परिषद खडबडून जागी झाली. त्याचे आंतरराष्ट्रीय वगैरे म्हणवून घेणारे अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली. साक्षात सरसंघचालक मोहन भागवतांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या मुहूर्तावर मैदानात उतरावं लागलं. हे उद्धव ठाकरेंचं मोठं यश म्हणायला हवं.

शिवाय महाराष्ट्रभर आरत्यांच्या निमित्ताने संघटनेवरची धूळ झटकली गेली. लगे हाथो आगामी ठाकरे सिनेमाचंही प्रमोशन होऊन गेलं. हिंदुत्व हातात घेतलं की शिवसेनेचा निवडणुकीत फायदा होतो, हे आजवर वारंवार सिद्ध झालेलं आहेच. हिंदुत्वाच्याम मुद्द्यामुळे कट्टर शिवसैनिक पक्षाशी बांधला जातो. मुंबईतल्या उत्तर भारतीयांच्या मतांमधे यानिमित्ताने सेनेला थोडासा शिरकाव करता येऊ शकेल. पण जवळ आलेली मुस्लिमांचं मतं दूर जाऊ शकतात. शिवाय अयोध्येच्या मुद्द्याशी घेणंदेणंच नसलेली नवी पिढी कायमची दूर जाऊ शकते.

अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेना भाजपच्या जवळ आलीय की लांब गेलीय, हा खरंच संशोधनाचा मुद्दा आहे. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं टार्गेट थेट भाजप आणि मोदी सरकार होतं. आपण मोदींवर जितकी टीका करू तितके मोठे होऊ, हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांनी तो फोकस कायम ठेवलाय. पण दुसरीकडे अचानक ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर युतीचे नगारे वाजवू लागलेत. उद्धव ठाकरे हे मार्गदर्शक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी थेट भरसभेत सांगितलंय. 

युतीच्या बातम्यांमुळे शिवसैनिक अस्वस्थ

युती करायची असेल किंवा नसेल, या दोन्ही गोष्टींसाठी अयोध्या हे शिवसेनेसाठी उत्तम कारण आहे. पण त्यामुळे शिवसैनिक अस्वस्थ आहे. त्याला कळत नाहीय, अयोध्येचा दौरा हा युतीच्या जागावाटपाच्या बार्गेनिंगसाठी होता की विरोधात निवडणूक लढवण्यासाठी?  थेट पक्षाच्या अधिवेशनात ठराव करून निवडणुकीत युती न करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे मागे घेणार का, असं त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिल्याचं शिवसैनिकांशी बोलताना सहज लक्षात येतं. सत्तेचा फायदा हवा असणारी नेतेमंडळी खूश आहेत. पण शिवसैनिक नाहीत. 

अयोध्येच्या चर्चेमुळे देशभर विकासाचा मुद्दा मागे पडलाच आहे. पण महाराष्ट्रात दुष्काळाचा गंभीर मुद्दा अचानक संपलाय. अजून डिसेंबर असतानाच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. दुष्काळाच्या आव्हानाशी मुकाबला करण्यासाठी सरकारकडे धोरणच नाही. जलयुक्त शिवारचं अपयश उघड होतंय. शिवसेनाही गेल्या महिन्यात दुष्काळाच्या प्रश्नावर आक्रमक होत होती. 

अशावेळेस अचानक अयोध्येचा दौरा आला. गाजला. त्यात दुष्काळ वाहून गेलाय. मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर तर दुष्काळाची चर्चाच संपलीय. हे सारं मुख्यमंत्र्यासाठी सोयीचं आहे. पण शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठीही भल्याचं नाही. आता अयोध्येचा मुद्दा संपला असेल तर शिवसेना दुष्काळासारख्या लोकांच्या प्रश्नावर पुन्हा येतेय की नाही, हे बघून त्यांच्या युतीच्या इराद्यांविषयी गणित बांधता येईल.