असा झाला शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा

१८ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


एकच पक्ष शिवसेना. एकच नेता बाळासाहेब ठाकरे. एकच मैदान शिवसेना. एकच कार्यक्रम दसरा मेळावा. पंचेचाळीस वर्षांपेक्षा हे समीकरण कायम राहिलं. आजही शिवसेनेचा दसरा मेळावा गर्दी खेचतो आणि बातम्याही. अशावेळेस पहिला दसरा मेळावा कसा झाला असेल, याची उत्सुकता उरतेच.

मुळात पत्रकार असणारे हर्षल प्रधान हे शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख म्हणून काम पाहतात. त्यांनी विजय सामंत यांच्या सहकार्याने `सुवर्ण महोत्सवी शिवसेना` हे पुस्तक लिहून शिवसेनेचा सरळ रेषेतला इतिहास मांडला आहे. या पुस्तकातलं पहिल्या दसरा मेळाव्याचं सविस्तर वर्णन आहे. अर्थातच हे वर्णन एका शिवसैनिकाच्या नजरेतून आलंय. पण ते महत्त्वाचं आहे. त्याचा हा संपादित भाग.

१९ जून १९६६ ला श्रीफळ वाढवून शिवसेनेची रितसर स्थापना झाल्यावर शिवसेनेच्या सदस्यत्वाचे अर्ज मिळवण्यासाठी मराठी युवकांची झुंबड उडाली. महिन्याभरातच २० हजारांच्यावर सैनिकांची नोंदणी झाली. आपण काय करायला चाललो आहोत याची पक्की जाणीव चाळीशीत आलेल्या बाळ ठाकरे यांना होती.

पहिल्या दसरा मेळाव्याचं निमंत्रण

शिवसेना संघटनेचे आचार विचार स्पष्ट करणारी तसेच मुंबई परिसरातील अवघा मराठी समाज आपल्या मागे उभा आहे, हे मुंबईसहित महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून देण्यासाठी बाळ ठाकरे यांनी शिवाजीपार्क इथे शिवसेनेचा मेळावा घेण्याचं ठरवलं त्या मेळाव्याचे निमंत्रण असं होतं.

मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या

शिवसेनेचा भव्य मेळावा

 

फोन:-४५२८९२

मार्मिक कचेरी,

७७ ए-रानडे रोड,

शिवाजी पार्क,

मुंबई-२८.

दि.२७ ऑक्टोबर १९६६

जय महाराष्ट्र वि.वि.

महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्फूर्तीदायक चरणांवर प्रतिज्ञेचा माथा ठेवून, महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सिद्ध झालेल्या शिवसेना सैनिकांचा मेळावा रविवार दि. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी सांयकाळी ५.३० वाजता, शिवाजी पार्क, दादर येथे भरणार आहे. आपण महाराष्ट्राचे निष्ठावंत अभिमानी या मेळाव्याला जातीने हजर रहावे, अशी शिवसैनिकांच्या वतीने मी आपणास विनंती करीत आहे.

हा मेळावा भरवतानाही बाळासाहेबांनी आपली बेधडक वृत्ती दाखवीली होती. शिवसेना नवी आहे. लोक जमले नाहीत तर फज्जा उडेल म्हणून हा मेळावा मैदानात न घेता एखाद्या सभागृहात घेण्यात यावा असं सहकारी सुचवत होते. मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढू इच्छिणाऱ्या शिवसेना संघटनेच्या स्थापनेचा पहिला मेळावा, तोही बंदिस्त हॉलमध्ये, ते शक्यच नाही, असं म्हणत बाळ यांनी या सल्ल्यांना केराची टोपली दाखविली. जे करायचे ते भव्यदिव्य उघड्या मैदानातच. तेथे लपवाछपवी नाही. जे काही होईल ते मोकळ्या मैदानात जगाला दिसेल, असा प्रचंड आत्मविश्वास ठेवून बाळ ठाकरे यांनी रविवार ३० ऑक्टोबर १९६६ला सांयकाळी साडेपाच वाजता शिवाजी पार्कवरच शिवसेनेचा पहिला मेळावा घेण्याचं पक्कं केलं.

आपला महाराष्ट्र सेवक म्हणून निमंत्रण प्रसिद्ध केलेल्या बाळ ठाकरे यांच्या आवाहनाला मुंबईतील मराठी समाजाने भरभरुन प्रतिसाद दिला. शिवाजी पार्क तुडुंब भरलं. चार लाखांच्यावर मराठी जनता शिवाजी पार्कवर गोळा झाली होती. मुंबईतील मराठी तरुणाईचा उत्साह फसफसून वहात होता.

ठाकरे कुटुंबाचा बाळ मी महाराष्ट्राला दिला

तरुणाईने भरलेल्या या जनसमूहाला संबोधित करण्यासाठी ८१ वर्षाचे प्रबोधनकार ठाकरे उभे राहात कडाडले, `पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राला साक्षी ठेवून आपण महाराष्ट्र देशाच्या मायलेकरांचा खराखुरा दसरा साजरा करीत आहोत. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करतात; आणि सीमोल्लंघन केल्यानंतर तिथून सोनं लुटून आणत असत. आज आपल्याभोवती इतक्या तऱ्हेतऱ्हेच्या भानगडींच्या, अडचणींच्या, निराशेच्या सीमा पडलेल्या आहेत की, आपल्या पूर्वीच्या प्रथेप्रमाणे नुसती गावची एक सीमा उल्लंघून आपल्याला जमणार नाही.

संबंध महाराष्ट्राचा एकजात मराठा, छत्रपतींची शपथ घेऊन, मी महाराष्ट्राचा अभिमानी लेक आहे. यापुढे कोणाच्याही प्रतीटोल्याची तमा न ठेवता समोर येईल ती सीमा तुडवित निघण्याइतकी ताकद येईल, अशी हिंमत बांधली पाहिजे. अहो सामोपचाराच्या गोष्टी गांडूनी सांगाव्या, मर्दाचं ते काम नाही. समर्थ रामदास म्हणतात, मारिता मारिता मरावे| मरोनि अवघ्यास मारावे| महाराष्ट्र हा काही लेच्यापेच्यांचा देश नाही. ही वाघाची अवलाद आहे; आणि या वाघाला कोणी डिवचलं तर त्याचा परिणाम काय होईल, याचे इतिहासामध्ये दाखले आहेत. भविष्य काळात पहायचे असतील तर पहायला मिळतील.

अजून आमचं रक्त भ्रष्ट झालेलं नाही. शिवाजीचं नाव आम्हाला सांगायचं आहे. भवानी आमच्या पाठीशी उभी आहे. काळ बदलला, आचार बदलले, सगळे बदलले, तरी मराठी जो मंत्र आहे, जो छत्रपतीनी आम्हाला दिलेला, ती शिवरायची मूर्ती आमच्या देहातून काढून टाकणारा माणूस अजून जन्मास आलेला नाही.

आजवर ठाकरे कुटुंबियांचा असलेल्या बाळ मी तुम्हाला या महाराष्ट्रातील मराठी माणसाला आज देऊन टाकला. आता त्याच्या पाठीशी उभे राहण्याचं कार्य तुम्हाला पार पाडायचं आहे. शिवसेना वाढवायची आहे.`

राजकारण हे गजकरण

प्रबोधनकारांच्या या भाषणाचा सूर धरतच प्रा. स. अ. रानडे, पद्माकर अधिकारी, बळवंत मंत्री, भालचंद्र ठाकूर, गोविंदराव शिर्के, अॅड. रामराव आदिक यांनी भाषणं केली. त्यानंतर शिवसेनेचे संस्थापक, महाराष्ट्र सेवक बाळ ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना सुस्पष्ट विचार मांडले...

`महाराष्ट्राला आज खरी गरज महाराष्ट्रवादाची आहे. आज मराठी माणूस जागा झाला आहे. यापुढे तो अन्याय सहन करणार नाही. राज्य सरकारला याची दखल घ्यावीच लागेल. जे आमच्यावर आरोप करताहेत त्यांना मला सांगायच आहे, की जर मराठी माणूस जातीयवादी, प्रांतीयवादी, संकुचित मनोवृत्तीचा असता तर ही मुंबई कॉस्मोपोलिटिन झालीच नसती. कारण आम्ही विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिलं की आपण सगळे भारतीय आहोत.

काही महाभाग असा आरोप करतात की, शिवसेना हे नाव देऊन आपण शिवाजी महाराजांना प्रांतियतेचं कुंपण घालत आहात. पण महाराजांच्या बाजुला जे कुंपण आहे ते प्रांतीयतेचं नसून आमच्या श्रद्धेचं आहे. ही संघटना जातीय नाही, कारण मराठी माणसाशी संकटकाळातही जो मैत्री करतो, तोच मराठी. आज महाराष्ट्राला राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज आहे. त्यामुळे शिवसेना राजकारणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकारण हे गजकरणासारखं आहे.`

शिवाजी पार्कमधे जमलेले चार लाख मराठी भाषिक समूह बाळ ठाकरे यांचा एक एक शब्द आपल्या कानात साठवत होता. बाळ यांच्या शब्द मोहिनीने तो संमोहित झाला होता. भूमिपुत्रांच्या हक्कांची नवी संकल्पना मांडणारा मराठी नायक मुंबईच्या शिवाजी पार्कच्या मैदानात चार लाख मराठी जनसमूहांच्या साक्षीने आकाराला येत होता. हे मुंबई शहर आपल्या मालकीचं आहे. हा मराठी माणूस त्याचा पहिला अधिकारी असून या शहरात त्याचा मान पहिला आहे, हे सर्व ऐकताना मराठी माणूस सुखावला गेला.

सभा संपली, दगडफेक झाली

गेली अनेक वर्षे मुंबईत दुय्यम, उपेक्षित आणि रामागडी म्हणून अवहेलना झेलणाऱ्या सर्व सामान्य मराठी तरुणांना हे सगळ वेगळच वाटत होत. एका सभेने चार तासात त्यांचे भावविश्व बदलत होतं. आम्हीही कोणीतरी आहोत, या शहराचे स्वामी आहोत, या विचाराने त्यांचा आत्मविश्वास दुणावला. अंगात चेतनेचा झरा फुटला आणि सभा संपताच घरी परतताना आपल्या नव्या नायकाला पहिली सलामी देण्यासाठी अनेक ठिकाणी दगडफेक करुन हिंसाचार घडवण्यात आला. मुंबईत रात्रभर तणावाचं वातावरण राहिलं.

या सभेनंतर बाळ ठाकरे आणि शिवसेना यांचा डंका मुंबईत वाजू लागला. शिवसेनेची ही सभा ऐतिहासिक झाली होती. मार्मिकचे संपादक व्यंगचित्रकार एका संघटनेचे प्रमुख झाले होते. मराठी अस्मितेचा जागर करताना बाळ ठाकरे स्वत:चा उल्लेख महाराष्ट्र सेवक असा करत. शिवाजी पार्कमधील सभेपासून शिवसैनिकांचं आणि त्यांचं नातं जुळलं. मोठ्या श्रद्धेने शिवसैनिकांनी आपल्या नायकाला शिवसेनाप्रमुख ही उपाधी लावायला सुरुवात केली.