दिल्लीवाली आतिशी: सावित्रीमाईलाही वाटलं असतं हीच माझी लेक

०८ मार्च २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


दिल्लीच्या सरकारी शाळेचा सर्वत्र बोलबाला चालूय. या सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्याचं खरं श्रेय आपच्या नवनिर्वाचित आमदार आतिशी मार्लेना यांना जातं. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्या भारतात परतल्या ते इथल्या शिक्षणव्यवस्थेवर काम करता यावं यासाठी. तशी संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनंही केलं. म्हणूनच स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाईंची खरी लेक म्हणून आतिशी यांचं नाव घ्यावं लागतं.

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेला आम आदमी पक्ष दिल्लीत दणदणीत विजय मिळवित तिसऱ्यांदा सत्तारूढ झाला. विकासाचं राजकारण करत गेल्या पाच वर्षांत केलेल्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांतल्या मूलभूत कामांच्या जोरावर आपनं मत मागितली. दिल्लीकरांनीही त्यांच्या मागणीला भरघोस प्रतिसाद देत ‘आप’ला आपलंसं केलं.

दिल्लीतल्या सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आप सरकारनं केलेले प्रयत्न हेच आपच्या दैदिप्यमान यशामागचं कारण होतं. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हेच तिथले शिक्षणमंत्रीही आहेत. दिल्लीच्या सरकारी शाळांची स्थिती सुधारण्याचं श्रेय मनीष सिसोदिया यांना जात असलं तरी पडद्यामागे त्यांचा शैक्षणिक सल्लागार म्हणून काम करणारी व्यक्तीही तितकच महत्त्वाची आहे. आणि ही व्यक्ती म्हणजे आपच्या या नवनिर्वाचित आमदार आतिशी मार्लेना.

शिक्षण आणि धोरणात्मक बदल हे आतिशी यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. पक्षाच्या जाहीरनाम्याचं लेखनकार्यही त्याच करतात. खुद्द सावित्रीबाई फुल्यांनाही अभिमान वाटावी अशा आजच्या काळातल्या प्रभावशाली बायकांची यादी करायची वेळ आली तर त्यात आतिशी मार्लेना यांचं नाव निर्विवादपणे घालावंच लागेल.

हेही वाचा : जागतिक महिला दिन ८ मार्चलाच का साजरा केला जातो?

गलेलठ्ठ पगाराला रामराम ठोकला

आतिशी या विजय सिंग आणि तृप्ती वाही या दिल्ली युनिवर्सिटीत शिकवणाऱ्या प्रोफेसर दांपत्यांचं कन्यारत्न. आतिशीचे आईवडील दोघंही डाव्या विचारांचे. आगीतही जळून खाक होत नाही अशा अर्थाचं आतिशी हे नाव त्यांनी आपल्या मुलीसाठी निवडलं. वर मार्क्स आणि लेनिनच्या नावामधली दोन अक्षरं जोडून ‘मार्लेना’ हेही नाव त्यांनी आतिशीला जोडून दिलं. या नावाचा आतिशीला सार्थ अभिमान होता. मोठी झाल्यावर आपलं पिढीजात आडनाव सोडून त्यांनी आतिशी मार्लेना हे नाव स्वीकारलं.

प्रखर बुद्धिमत्ता, समाजासाठी काही करण्याची प्रेरणा आणि सुविद्य आईवडलांचा प्रभाव यामुळे आतिशी विचाराने डाव्या होणं साहजिकच होतं. सेंट स्टिफन्स कॉलेजमधून त्यांनी इतिहास या विषयाची पदवी घेतली. आणि पुढे ऱ्होड्सची शिष्यवृत्ती मिळवून हॉर्वर्ड युनिवर्सिटीतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. या पदव्युत्तर शिक्षणानंतर परदेशातल्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचा आणि आपलं आयुष्य सहज सुखात घालवण्याचा सोपा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध होता. पण तसल्या सुखवस्तू आयुष्याला लाथ मारून त्या भारतात परतल्या.

भारतात परत आल्यानंतर आपल्या चळवळी वृत्तीला साजेसा सेवाभावी संस्थांमधे काम करणं त्यांनी सुरू केलं. ‘संभावना इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी’ या संस्थेत त्यांनी काही काळ काम केलं. त्यानंतर काही वर्ष आंध्र प्रदेशातल्या ऋषी वॅली शाळेत शिक्षिका म्हणूनही त्या काम करत होत्या.

सरकारी शाळांचा चेहराच बदलला

२०११ मधे अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाकडे आतिशी अतिशय साशंकतेनं पाहत होत्या. त्यानंतर हजारेंपासून वेगळं होऊन केजरीवालांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. आतिशी यांना शिक्षण क्षेत्रात पॉलिसी बनवण्यात रस होता. ही संधी त्यांना केजरीवालांनी सुरू केलेल्या आम आदमी पक्षात मिळत होती. म्हणून एक प्रयोग म्हणून त्या आम आदमी पक्षात सामील झाल्या. याच संधीचं त्यांनी पुढे सोनं केलं.

आतिशीची गुणवत्ता आणि शिक्षण क्षेत्रातला अभ्यास पाहता विकासाचं राजकारण करणारे अरविंद केजरीवाल फारच प्रभावित झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांची शैक्षणिक सल्लागार म्हणून आतिशी यांची नियुक्ती केली. सरकारी शाळांची गुणवत्ता वाढवण्याचं काम आतिशी यांच्यावर सोपवलं गेलं. त्यांनीही हे काम आव्हान म्हणून स्वीकारलं.

सगळ्या बाजुंचा, अभ्यास करून त्यांनी एक पाच सूत्री धोरण आखलं. हे धोरण मिशन मोडमधे राबवून शिक्षणमंत्र्यांचा पाठिंब्याने त्यांनी दिल्लीच्या सरकारी शाळांचा चेहरा मोहराच बदलून टाकला!

हेही वाचा : आपले आमदार महिलांविषयी सात तास काय बोलत होते? 

असमानता शाळेपासून सुरू होते

सरकारची शैक्षणिक गुंतवणूक वाढवणं, शाळांच्या भौतिक आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारणं हे आतिशी यांच्या पंचसूत्री शैक्षणिक विकासाचं पहिलं सूत्र होतं. थोडक्यात सांगायचं तर, शाळेत मुलांना चांगल्या सुखसोयी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करायचे. आणि सोबतच शिक्षकांनी मुलांना चांगलं शिकवावं, सगळा अभ्यासक्रम पूर्ण करावा यावर भर द्यायचा. या पहिल्या सूत्रामागचा त्यांचा विचार फार खोल होता.

आपल्याकडच्या सरकारी शाळांची स्थिती पाहिली तर त्यांचं म्हणणं समजून घेता येईल. मोडलेले बाक, तुटलेले पंखे, अस्वच्छ बाथरूम अशा अवस्थेत सरकारी शाळांमधली मुलं शिकत असतात. निमसरकारी शाळांमधे ही स्थिती जराशी बरी असते. पण खासगी शाळांमधे म्हणेल त्या सोयी असतात. पिण्याच्या पाण्यापासून मुलांना आपली पुस्तकं ठेवायला कपाट असं सगळं मिळतं. त्यामुळेच फक्त श्रीमंतांची मुलं अशा खासगी शाळेत जातात. असमानतेची सुरवात ही अशी शाळेपासून होत असते. म्हणूनच ‘देशाच्या सरकारी शाळांची स्थिती सुधारेल तेव्हाच समाजात समतेच्या सुरवात होईल’ असं आतिशी म्हणतात.

पण फक्त भौतिक सुविधा देणं आतिशी यांना पुरेसं वाटलं नाही. ‘शाळेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं काहीच समजत नसेल तर त्याचा विद्यार्थांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतोच. सोबतच देशाचं मोलाचं मनुष्यबळ वाया जातं.’ असं आतिशी यांना वाटतं. म्हणूनच शाळेत सगळ्या भौतिक सुविधांसोबत चांगल्यातला चांगला शिक्षकवर्ग कसा निर्माण करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे हेही आतिशी यांनी अधोरेखित केलं.

हेही वाचा : मुलगी जगणं शिकली, तरच प्रगती होणार ना!

शिक्षण ही तर एक गुंतवणूक!

या भौतिक आणि शैक्षणिक सुधारणा, गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांना द्यायचं तर त्यासाठी पैसा लागणार! म्हणूनच दिल्लीच्या वार्षिक उत्पन्नातला २६ टक्के म्हणजे जवळपास एक चतुर्थांश भाग हा शिक्षणावर कर्च केला जातो. संपूर्ण भारतात शिक्षणावर सगळ्यात जास्त करणारं हे राज्य आहे. इतकंच काय, तर केंद्रीय अर्थसंकल्पातही शिक्षणासाठी आजपर्यंत तीन टक्क्यांपेक्षा जास्त तरतूद केलेली नाही. गेल्या ७० वर्षांची ही कटू वस्तुस्थिती आहे.

हा नुसता शैक्षणिक खर्च नाहीच तर मनुष्यबळ विकासासाठी आणि पर्यायाने सुजाण समाज घडवण्यासाठी केलेली ही महत्त्वाची गुंतवणूक आहे, असं यामागचं मूलभूत तत्त्वज्ञान आतिशी यांनी मांडलं. यांच्या आग्रहामुळे दिल्ली सरकार शिक्षणावर एवढा खर्च करण्यास तयार झाली.

आनंद शिकवणारा वर्ग

आतिशीच्या शैक्षणिक क्रांतीचा दुसरा भाग होता मिशन बुनियाद. ही संकल्पना अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या डॉ. अभिजीत बॅनर्जी यांच्या मॉडेलवर आधारीत आहे. विद्यार्थांची गळती म्हणजे विद्यार्थाचं शाळा सोडण्याचं प्रमाण थांबवायचं असा या मिशन बुनियादचा हेतू आहे.

शाळेत काही शिकवलं जात नसेल किंवा शिकवलेलं समजत नसेल तर विध्यार्थ्यांना शाळा आवडेनाशी होते. शिवाय, सरकारी शाळेत येणाऱ्या बहुतेक मुलांची अर्थिक परिस्थितीही चांगली नसते. त्यामुळे लहान वयातच चार पैसे कमवण्यासाठी त्यांना शाळा सोडावी लागते. हे थांबवण्यासाठी दिल्लीच्या शाळेत आतिशी यांनी मिशन बुनियाद लागू केला. इयत्तेनुसार अभ्यास न करणाऱ्या मुलांवर लक्ष केंद्रित केलं गेलं. त्यांचे एक्स्ट्रा क्लास घेतले गेले. त्यासाठी शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होतं. या सगळ्याचा परिणाम आश्चतर्य वाटावं इतका चांगला होता.

हॅपीनेस क्लास अर्थात आनंदाचा वर्ग हा आतिशी यांच्या पंचसूत्रांमधलंच एक सूत्र आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बायको मिलेनिया ट्रम्प यांनी या हॅपीनेस क्लासला भेट दिल्यामुळे सध्या सगळीकडे त्याचा बोलबाला चालू आहे. आतिशी आणि मनिष सिसोदियांनी शिक्षणतज्ज्ञ आणि सरकारी शिक्षकांच्या मदतीनं कल्पकतेने बनवला हा हॅपीनेस क्लास २०१८ पासून दिल्लीतल्या एक हजार सरकारी शाळेत सुरू झालाय.

हेही वाचा : ट्रम्प यांच्या बायकोला का बघायचाय केजरीवालांच्या शाळेचा हॅपीनेस क्लास?

शिक्षकांनाही दिलं ट्रेनिंग

या आनंददायी पूरक अभ्यासक्रमावर महात्मा गांधींच्या शैक्षणिक विचारांचा प्रभाव पडलेला दिसतो. ‘विद्यार्थ्यांमधलं जे सर्वोत्तम आहे त्याचा विकास करत त्याचं मन, बुद्धी आणि शरीराचा सर्वांगीण विकास करणं म्हणजे शिक्षण.’ असं गांधीजींनी म्हटलं होतं. प्राथमिक शिक्षणाचा प्रधान हेतू आनंदी, आत्मविश्वाहसू आणि परिपूर्ण नागरिक घडविणं आहे. त्यासाठी शिक्षण ही आनंदी प्रक्रिया बनली पाहिजे. 

दिल्ली सरकारच्या ‘हॅपीनेस’ अभ्यासक्रम याच शैक्षणिक तत्वज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून ठरवण्यात आला. विद्यार्थ्यात स्वभान निर्माण करणं, त्याचं मानसिक आरोग्य सुधारणं, त्याची ज्ञानात्मक क्षमता म्हणजेच कॉग्निटीव ऍबिलिटी विकसित करणं, प्राप्त परिस्थितीशी सामना करत जीवनातली आव्हानं स्वीकारण्यासाठी विध्यार्थ्यांना सज्ज करणं यासाठी हा अभ्यासक्रम बनवला गेलाय.

आतिशींच्या प्रयत्नातून अनेक शिक्षकांना सिंगापूर आणि इतर देशात पाठवून त्यांनी कसं शिकवलं पाहिजे, याचं प्रशिक्षण दिलं गेलं. तसंच ५० हजार सरकारी शिक्षकांना तज्ज्ञांच्या मदतीनं उत्तम प्रशिक्षण देऊन अधिक सक्षम बनवलं. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक वेगाने वाढत असल्याचं सुखद चित्र दिल्लीकरांना पाहायला मिळालं. दहावीला उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण पाच वर्षांत ४८ टक्क्यांवरून ८४ टक्क्यांपर्यंत गेलं. महत्त्वाचं म्हणजे पालकांनी आपल्या मुलाचं खासगी शाळेत घातलेलं नाव काढून सरकारी शाळेत प्रवेश घ्यायला सुरवात केलीय.

म्हणून आतिशी सावित्रीची लेक!

आतिशी आणि दिल्ली सरकारनं खासगी शाळांच्या मनमानी फी आकारण्याच्या प्रवृत्तीला वेसण घातली. जास्तीची फी विद्यार्थ्यांना परत करण्याची अवघड कामगिरी त्यांनी केली. यामुळे सामान्य नागरिकांना सुखद धक्काच बसला.

दिल्लीत घडलेल्या या शैक्षणिक क्रांतीच्या आतिशी मार्लेना या एकमेव शिल्पकार आहेत. स्त्रीशिक्षण हा देश आणि समाजाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे, हे आतिशी यांना माहीत होतंच. सोबतच सरकारी शाळा स्त्री शिक्षणाची हक्काची जागा आहे, हेही त्यांनी ओळखलं. सरकारी शाळा गुणवत्तापूर्ण बनवून मुलींच्या स्वप्नांना पंख देत त्यांना उंच भरारी मारण्यासाठी वातावरण निर्माण केलं गेलं. म्हणूनच सावित्रीलाही अभिमान वाटावी अशी ही आजची आधुनिक लेक आहे, असं म्हणावं लागतं.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आतिशीचा गौरव करताना ती ज्या सावित्रीची लेक आहे, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे स्मरण होणे साहजिक आहे. आतिशीचं काम हे मुलंमुली दोघांसाठी तेवढंच महत्त्वाचं असलं तरी मुलींसाठी अधिक महत्त्वाचं आहे. पुरुषप्रधान मानसिकतेत मुलींपेक्षा मुलांना चांगल्या सोयी, चांगल्या दर्जाच्या वस्तू पुरवल्या जातात. अनेक पालकही आपल्या मुलग्यांना खासगी शाळेत आणि मुलींना सरकारी शाळेत घालतात. पण यामुळे मुलींचं कुठेही नुकसान होऊ नये याची काळजी दिल्लीच्या सरकारी शाळेत घेतली जातेय.

स्त्री शिक्षणासाठी काम करत अनेक थोर महिलांनी भक्कम पाया तयार करून दिलाच होता. त्याच पायावर दिल्लीत आतिशी यांनी सरकारी शाळांचा कायापालट करून गरीब आणि तळागाळातल्या वर्गाच्या मुला मुलींसाठी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून दिलंय. यापेक्षा भरीव आणि महत्त्वाचं काम अतिशी यांच्याकडून भविष्यात होईल. त्या सर्वार्थाने सावित्रीची आधुनिक कर्तबगार लेक आहेत.

हेही वाचा : 

लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

बड्डे गर्ल हरमनप्रीत: बदलत्या इंडियाची डॅशिंग कॅप्टन

सिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!

ही १३ मिनिटांची शॉर्टफिल्म बघण्यासाठी कुठल्याही समीक्षकाची गरज नाही

 

(लेखक हे माजी सनदी अधिकारी असून ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.)