शेअर बाजार प्रचंड वाढतो किंवा कल्पनेपलीकडं कोसळतो. अशा दोन वेळेलाच सर्वसामान्य माणसाचं शेअर बाजाराकडं लक्ष जातं. नेमकं याचवेळी शेअर्समधे गुंतवणूक करण्या, न करण्याचा विचार सुरू होतो. सध्याही शेअर बाजारानं कोसळण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडलाय. प्रचंड उलथापालथच्या या काळात गुंतवणूक करण्याची हीच ती वेळ आहे का?
कोरोना वायरसच्या जागतिक साथीमुळे जगभरातल्या शेअर बाजारावर अवकळा पसरलीय. आपला मुंबई शेअर बाजार म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजदेखील याला अपवाद नाही.
गेल्या सहा महिन्यांपासून अमेरिका आणि चीन यांच्यात ट्रेड वॉर सुरू आहे. या व्यापार युद्धाच्या फटक्यानं जगभरातलं मार्केट अनेकदा नकारात्मक बातम्यांच्या गर्तेत सापडलं. असं असताना १ जानेवारी २०२० म्हणजे नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजेच 'सेन्सेक्स' आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजेच 'निफ्टी' यांनी नवा उच्चांक गाठला.
मार्केट इतक्या प्रचंड प्रमाणात वाढल्यानंतर नफारुपी विक्री अर्थात प्रॉफिट बुकिंग स्वाभाविक समजली जाते. त्यामुळे मार्केट खाली येणार हेदेखील तितकंच स्वाभाविक असतं. किंबहुना, एका विशिष्ट पातळीपर्यंत किमती 'करेक्ट' होणं हे शेअरच्या मूल्यांकनाच्या दृष्टीनं आवश्यक असतं. पण त्याच दरम्यान कोरोना नावाच्या वायरसने अवघ्या जगाला कवेत घेतलं आणि त्यामुळे जो 'डाऊनट्रेण्ड' सुरू झाला तो अजून सुरूच आहे.
हेही वाचा : कोरोनाने शेअर बाजार पावसासारखा कोसळतोय, १२ वर्षांतला वाईट दिवस
शेअर बाजारात डाऊनट्रेण्ड सुरू झाला की अनेक गुंतवणूकदारांना याच खालच्या पातळीवर शेअर खरेदी करण्याची संधी आहे, असं वाटायला लागतं. कारण मार्केटचा अपट्रेण्ड ट्रेंड सुरू असताना म्हणजेच शेअरच्या किमती वाढत असताना चांगला परतावा देणाऱ्या कंपन्यांचे शेअर फार महाग असतात. डाऊनट्रेण्ड सुरू झाला की हेच शेअर आपल्या उच्चांकापासून जवळपास ३० ते ४० टक्के उतरतात.
त्यामुळे 'शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची हीच ती वेळ!' हे वाक्य एकाच वेळी प्रश्न आणि उत्तर म्हणून आपल्या कानावर येत राहतं. पण खरंच शेअर बाजारातल्या गुंतवणूकीची हीच ती योग्य वेळ आहे का, हे पाहण्याआधी आपण निर्देशांकाचा प्रवास बघूया.
सध्या बाजारात सुरू असलेल्या घसरणीचं मुख्य कारण कोरोना वायरस आहे. या वायरसने जगभरातल्या उद्योगांना टाळं लावलेत. त्यामुळे जगभर महामंदीचं वातावरण आहे. या महामंदीची तुलना २००८ मधल्या मंदीसोबत होतेय. खरंतर २००८ मधल्या आणि या मंदीचं कारण प्रचंड वेगळं आहे. तरीही बाजारात घसरण होत असताना ती कुठवर होऊ शकते हे तपासण्यासाठी आपल्याला २००८ मधल्या घसरणीकडे बघावं लागतं. काहीजण तर आताच्या परिस्थितीची १९३० मधल्या जागतिक मंदीहीशी तुलना करतात.
नवख्या गुंतवणूकदारांना लेख वाचताना आकड्यांचा भडिमार होऊन आकलन कठीण होऊ नये म्हणून इथं फक्त 'निफ्टी'च्या लेवल्स सांगत आहोत. सेन्सेक्सचा ट्रेंड तसाच गृहीत धरावा. तर, १ एप्रिल २००४ ला निफ्टीमधे सुरू झालेली तेजी चार वर्षात अनेक चढ-उतार पचवून १ जानेवारी २००८ ला संपुष्टात आली. या दिवशी निफ्टीची बंद पातळी होती ६३५७.१० इतकी. बंद पातळी म्हणजे दिवसभरातल्या चढउतारानंतर निर्देशांक थांबतो ती पातळी. या मंदीची तीव्रता इतकी की या एकाच महिन्यात निफ्टी १९०० अंकांनी घसरला. ही घसरण थांबली ती ऑक्टोबर महिन्यात २२५२.७५ वर. टक्केवारीमधे ही घसरण ६४.५० च्या आसपास आहे.
२००८ मधली घसरण विस्तृतपणे यासाठी सांगितली की 'खूप झालं मार्केटचं कोसळणं, आता मार्केट वाढणार' असं ज्यांना आज वाटत असेल, त्यांनी हा 'फ्री फॉल' एकदा बघावा.
आता आपण सध्या सुरू असलेल्या घसरणीबद्दल बोलू. १ जानेवारी २०२० ला निफ्टीने १२४३०.५० चा सार्वकालिक उच्चांक नोंदवला. त्यानंतर केवळ ३ महिन्यात म्हणजेच परवा २४ मार्चला ७५११.१० चा निच्चांक नोंदवला. म्हणजेच ४९०० अंकांची जबरदस्त घसरण झाली. तब्बल ४० टक्के घसरण झाली! २० फेब्रुवारीपासून निफ्टी १२१३४ असताना घसरणीला सुरवात होत गेली तेव्हा दरवेळी मीडियानं त्याचं वर्णन 'ब्लडबाथ' असं केलंय. घसरणीची तीव्रता इतकी घातक आहे.
हे कोरोना स्पेशलही वाचाः
कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया
विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव
जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर
२५ आणि २६ मार्चला निफ्टीमधे जवळपास १२०० अंकांची वाढ झाली. ही वाढ बघून मार्केटने तळ गाठला आणि तेजी परतणार आहे, असं कुणाला वाटू लागलं तर हा केवळ अंदाज असू शकतो. खरोखर तशी परिस्थिती आहे का हे आज कुणीच सांगू शकत नाही.
त्याचं प्रमुख कारण म्हणजे कोरोना वायरसचं संकट अजूनही नष्ट झालेलं नाही. काही बिझनेस चॅनल आणि पोर्टलच्या बातम्यांनुसार अजूनही वायरसमुळे होणारं नुकसान पीक पॉईंटवर पोचलेलं नाही. याचाच अर्थ असा की हे संकट जगापुढे आणि आपल्या देशापुढे कायम आहे. कोरोनाविषयीची एक निगेटिव बातमी मार्केटला खाली खेचायला पुरेशी आहे.
तांत्रिक विश्लेषकांच्या दृष्टीनंही बाजारानं अजून तळ गाठलेला नाही. मार्केटमधे खरेदीची संधी शोधताना मार्केट 'बॉटम आउट' झालंय का, हे महत्वाचं असते. २६ मार्चला ८७०० च्या पलीकडे गेलेला निफ्टी दिवसअखेर ८६५३ वर बंद झाला. खरंतर दोन दिवसात तेजी येतच नसते पण गेल्या दोन दिवसात आलेली तेजी ही 'शॉर्ट कवरिंग'मुळे आली असेल तर मार्केटमधे आणखी घसरण अपेक्षित आहे. विश्लेषकांच्या मते, सध्या बाजाराची चाल ही पूर्णपणे कोरोना या एका फॅक्टरवर अवलंबून आहे.
गेल्या १२ वर्षात झालेल्या या सर्वात मोठ्या पडझडीमधे खरेदी करायची संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
सर्वात आधी आपण एक गोष्ट ठरवली पाहिजे. ती म्हणजे, आपण गुंतवणूकदार आहोत की ट्रेडर. ट्रेडर म्हणजे अल्पावधीसाठी, आज खरेदी करून आजच किंवा एका आठवड्यात विकणारे लोक. मध्यम अवधीसाठी म्हणजे किमान ३ महिने ते एक वर्ष गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअरची खरेदी करतात ते मिड टर्म इन्वेस्टर असतात. लाँग टर्म इन्वेस्टर म्हणजे दीर्घकालीन, किमान एक वर्षापेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक करणारे.
अगदी स्पष्ट सांगायचं तर मिडटर्म इन्वेस्टरसाठी ही वेळ गुंतवणुकीची म्हणजे शेअर्स खरेदीची नक्कीच नाही. कारण कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. जुलै, ऑगस्ट अथवा दिवाळीपर्यंत आपलं भांडवल नफ्यासहीत किंवा किमान भांडवल तरी परत हवंय त्यांनी मार्केटला मजबूत सपोर्ट मिळण्याची वाट बघणं खूप आवश्यक आहे. मार्केटमधे तेजी परतल्यावर भलेही शेअर आजच्या तुलनेत थोडे वरच्या किमतीत मिळतील. पण तिथून सुरू होणारी तेजी किमान सहा महिने तरी कायम राहील, अशी शक्यता आहे.
मार्केटमधे पुन्हा २००८ प्रमाणे घसरण झाली तर आजच्या किमतीपेक्षा खालच्या स्तरावर शेअर खरेदीची संधी मिळू शकते. त्यामुळे मिड टर्म इन्वेस्टरने थोडी वाट बघणं आवश्यक आहे. अथवा गुंतवणूकयोग्य भांडवलाचे पाच भाग करून प्रत्येक २५० पॉईंट्स घसरणीमागे खरेदी करावी.
हेही वाचा : कोरोनाला हरवण्यासाठी जग वेगवेगळे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?
लॉंग टर्म इन्वेस्टर्ससाठी मात्र बाय ऑन एवरी डीप या नियमानुसार एकूण भांडवलाचे किमान चार तुकडे करून खरेदी करण्याची ही वेळ आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. तुमच्या त्या पैशाला किमान एक वर्ष तरी कोणतंच काम नसावं. पॅनिक न होता होल्ड करणारे गुंतवणूकदार या संधीचा लाभ घेऊ शकतात. सरत्या आर्थिक वर्षाचे रिझल्ट कसे येतात, यावर शेअरच्या किमतीवर मिळणारा परतावा अवलंबून असणार आहे.
अजूनही ही वेळ खरेदीची आहे का, या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसेल तर त्यांनी एक गोष्ट पुन्हा लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे २००८ आणि आजची मंदी याच्या कारणांमधे प्रचंड फरक आहे. देशाचा विचार केल्यास कोरोनामुळे होणारं नुकसान नेमकं किती असणार याचा अंदाज आज कुणालाच नाही. मार्केट लिडर्स कंपन्याचं उत्पादन थांबलेलं आहे.
एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक यासारख्या गुंतवणूकदारांमधे 'डार्लिंग शेअर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेअर्सचा भाव पडलाय. अलीकडच्या काळात मजबूत परतावा देणारे बजाज फायनान्स, एशियन पेंटस कमजोर आहेत. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, ऑटो सेक्टर मंदीच्या गर्तेत असल्यानं बँकिंग सेक्टरचा एनपीए किती वाढेल हे आज सांगता येत नाही. मात्र, ग्राहकोपयोगी वस्तू तयार करणाऱ्या एफएमसीजी सेक्टरमधला आयटीसीचा शेअरही खालच्या पातळीवर आहे.
कोरोनाचा फटका आपल्या अर्थव्यवस्थेला किती बसतो, कोणत्या सेक्टरला सर्वाधित फटका बसतो, कंपन्याचा महसूल आणि नफा नेमका कसा राहील. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारची धोरणं काय असणार यावरही पुढील वाटचाल अवलंबून आहे.
म्हणून गुंतवणूक करताना घाई करण्याऐवजी एकूण गुंतवणुकीचे चार किंवा पाच भाग करून चांगल्या कंपन्यामधे इन्वेस्ट करा. फक्त स्वस्तात मिळतंय म्हणून पोर्टफोलिओमधे कचरा जमा करण्याऐवजी 'जेम्स इन डस्ट' असणारे, 'फंडामेंटली स्ट्रॉंग' असणारे शेअर निवडा.
कधीतरी मळभ हटणार आहे. एक सकारात्मक बातमी मार्केटमधे उसळीसाठी पुरेशी आहे. मात्र तोपर्यंत फसव्या तेजीपासून दूर रहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली होल्डिंग कपॅसिटी म्हणजेच हातातली सध्या गरज नसलेली शिल्लक बघून निर्णय घ्या. नुकसान सहन करून बाहेर पडण्याइतपत पॅनिक होणार नसाल, तरच गुंतवणूक करा.
हेही वाचा :
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया
कोरोनाः जग सारे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?
इतर भारतीय गुंतवणूकदारांप्रमाणे तुम्हीही हायब्रीड फंडमधेच पैसे गुंतवलेत?
(लेखक हे मुक्त पत्रकार असून शेअर मार्केटमधले अनुभवी गुंतवणूकदार आहेत.)