भारतीय कलेला व्यापून टाकणारा श्रीकृष्ण

३० ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्णाने जनमानसाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत सहजतेने कलेच्या ज्ञानाचा वापर केला. कलाविश्व श्रीकृष्णाशिवाय अपूर्ण आहे. केवळ कथक नृत्यच नाही, तर भारतात ज्या अन्य नृत्यशैली आहेत, त्या सर्व शैलींमधे श्रीकृष्णाचं महत्त्व मानलं आहे. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून कृष्ण प्रेम व्यक्त केलं.

भारत आणि भारतीय कलांशी भगवान श्रीकृष्णाचं घनिष्ट नातं आहे. हे पवित्र कलात्मक संबंध आध्यात्मिकही आहेत आणि व्यावहारिकही! वाद्यांचा विचार केला तर श्रीकृष्ण हाच त्यांचा आधार आहे. बासरीचा उपयोग एक वाद्य म्हणून सुरू झाला तो श्रीकृष्णापासूनच.

कन्हैयाचा संबंध भारतीय कलांशी

६४ कलांची देवता मानल्या जाणार्‍या श्रीकृष्णाच्या बासरीच्या माध्यमातून संगीताचा प्रसार झाला. संगीताबरोबरच भगवान श्रीकृष्णाचा नृत्याशी घनिष्ट संबंध आहे. प्रेम आणि भक्तीने परिपूर्ण अशा श्रीकृष्णाच्या महारासक्रीडेत संगीत आणि नृत्य या दोघांचा मिलाफ होता. शास्त्रामधे म्हटलंय की, संपूर्ण गोकुळात श्रीकृष्णाच्या सौजन्यानेच संगीत-नृत्याचा सोहळा सुरू झाला आणि आजही होतो.

गोकुळातल्या कन्हैयाचा संबंध भारतीय कलांशी दीर्घकाळापासून चालत आला आहे आणि ऋषिमुनींनीही भक्तिभावाने तो पुढे नेला. ऋषिमुनी जेव्हा श्रीकृष्णाचे ध्यान करत, तेव्हा स्वतःहून नाचायला-गायला प्रवृत्त होत. श्रीकृष्णाच्या प्रेमळ छायेतच संगीत, नृत्याची अनेक पदं आणि ग्रंथांचं लेखन झालं.

नंतरच्या काळात सूरदासांसारखे कवी झाले आणि त्यांनी श्रीकृष्णाचा महिमा सांगणारी एकाहून एक श्रेष्ठ पदं लिहिली. त्यांच्या पदांमधे श्रीकृष्णाचं मोहक बालरूप आणि वृंदावनातल्या कुंजवनाची चर्चा अत्यंत सुंदररीतीने साकारलेली दिसते. सूरदास त्यांच्या पदांमधे श्रीकृष्णाचं प्रेरक स्वरूप साकार करतात.

कथकचा श्रीकृष्णाशी दृढ संबंध

आपल्या परंपरेत नृत्य करणार्‍या देवतांमधे श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांचाच समावेश आहे. पुराणांमधे या दोन्ही देवतांचं वर्णन ‘नर्तक’ म्हणून केलेलं दिसतं. श्रीकृष्णाला भगवान शिवाकडूनच नृत्याचं ज्ञान मिळालं असावं, हेही शक्य आहे. श्रीकृष्णाने जनमानसाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत सहजतेने आपल्या कलेच्या ज्ञानाचा वापर केला.

कलाविश्व श्रीकृष्णाविना अधुरं आहे आणि त्यातल्या त्यात कथकचा श्रीकृष्णाशी अत्यंत दृढ संबंध आहे. आमचे इष्टदेव श्रीकृष्णच आहेत. आम्ही कलावंत प्राचीन काळापासून त्याची पूजा करत आहोत. पूजेचे विधी आजही जसेच्या तसे आहेत. आम्ही आजही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भक्तिभावाने श्रीकृष्णाची पूजा करतो.

हेही वाचा: मुंह मे राम, बगल में वोट

कलाकारांना एकत्र आणणारा कृष्णजन्मोत्सव

आता काळ बदलला आहे. मला आठवतं, पूर्वी लखनौमधे माझ्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमीचं आयोजन धूमधडाक्यात केलं जायचं. सध्या एकच दिवस कृष्णजन्मोत्सव साजरा केला जात असला, तरी लखनौमधे पूर्वी श्रीकृष्ण जन्मोत्सव सहा दिवस निरंतर चालायचा. पंडितजींसोबत आम्ही रोज मनोभावे श्रीकृष्णाची पूजा करायचो.

या सोहळ्यात मोठमोठे कलाकार, संगीतकार, नर्तक येत असत आणि आपली कला सादर करत असत. श्रीकृष्णाप्रति प्रेमाचं दर्शन घडवण्यासाठी तो कार्यक्रम व्हायचा. माझे वडील, आजोबा यांची या सोहळ्यात खूप धावपळ चालायची. सहा दिवस केवळ श्रीकृष्ण जन्मोत्सवाचीच धामधूम असायची.

जो या सोहळ्याला यायचा तो रिकाम्या हाताने कधीच गेला नाही. जाताना तांदूळ, आटा, डाळ, तूप घेऊन जायचा. बाहेरून जे कलाकार यायचे त्यांनाही त्यांची गायन-वादन कला सादर करावी लागायची. मला आठवतं, खूप मोठमोठे कलाकार यायचे. पण आता तो सोहळा राहिला नाही.

त्याकाळी श्रीकृष्णच आम्हा कलाकारांना एकत्र आणायचा. बाबा त्या सोहळ्यात स्वतः सगळ्यांची सेवा करायचे. भांडी घासत. त्यांच्या चेहर्‍यावर असे भाव असत की, देवाने बालरूपात अवतार घेतल्याचा भास व्हायचा. लखनौमधून बाहेर पडलो. दिल्लीत स्थायिक झालो. पण, पुन्हा लखनौमधे जाऊन काही तरी करण्याची माझी इच्छा आहे.

वेगवेगळ्या दृष्टिकोनातलं कृष्ण प्रेम

केवळ कथक नृत्यच नाही, तर भारतात ज्या इतर नृत्यशैली आहेत, त्या सर्व शैलींमधे श्रीकृष्णाचं महत्त्व मानलं आहे. आम्ही कलाकार उत्तरेकडचे असू, नाहीतर पूर्व, दक्षिणेकडचे असो, श्रीकृष्णाच्या गाथांचं प्रदर्शन आणि गायन प्रत्येकाने केलंय. आपापल्या भाषेत सर्वजण गात राहिले. पण, कृष्णाला कोणीही विसरू शकलं नाही.

कृष्णाची चर्चा आणि त्याच्याशी संबंधित प्रसंग कलाजगतात सगळीकडे अस्तित्वात आहेत. त्यागराजजींनीही कृष्ण पाहिला, मीराबाईंनी पाहिला, सूरदासांनी पाहिला. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून कृष्ण प्रेम व्यक्त केलं. एवढंच नाही, तर मुस्लिम भक्त कवींनीही कृष्णाच्या प्रेमापायी सुंदर पदं तयार केली. आपल्या देशात गंगा-जमुनी संस्कृती आहे आणि ती निर्माण करण्यात सर्वांचा समान वाटा आहे.

हेही वाचा: प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक

भारतीय विद्या आणि श्रीकृष्ण एकच

श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याच्या पूर्वीच्या पद्धतीत आता बदल झाला आहे. सध्या कार्यक्रम लहान असतो; पण पूजाविधी मात्र शतकांपूर्वी होते त्याप्रमाणेच असतात. षष्ठीच्या दिवशी मुख्य कार्यक्रम असतो. गोडधोड पक्वान्ने केली जातात. सुंठवड्याचे लाडू केले जातात. पूर्वी असे लाडू खूप प्रमाणात बनवले आणि वाटले जायचे. आता शास्त्रापुरतेच थोडेसे लाडू बनवतात.

जुन्या लखनौमधे श्रीकृष्णाला मानणार्‍यांची संख्या आजही प्रचंड मोठी आहे. पूर्वीच्या काळी मथुरा आणि वृंदावन इथं खूप कार्यक्रम व्हायचे. आजही होतात. तिथं कृष्णाची भक्ती करणारी कलावंत मंडळी मोठ्या संख्येने आहेत. भारतीय विद्यांना आणि भारताला श्रीकृष्णापासून वेगळं काढताच येत नाही. श्रीकृष्ण सगळीकडे आहे.

श्रीकृष्णाला न्याहाळून, त्याच्याकडून शिकून, त्याला आपल्या अभिनय आणि नृत्यात उतरवण्याचा प्रयत्न मी अनेक वर्षांपासून करत आहे. प्रत्येकवेळी जेव्हा मी तयार होऊन उभा राहतो, तेव्हा म्हणतो, 'हे भगवान, आता माझ्याकडून नृत्य करवून घे.'

श्रीकृष्णाकडून अजून काय शिकायचं?

श्रीकृष्णाकडून किती तरी शिकायला मिळतं. आज लोकांना विशेषतः तरुण मंडळींना माझं सांगणं आहे की, श्रीकृष्णाचं जे जीवनचरित्र आहे, त्याची माहिती नक्की करून घ्या. श्रीकृष्णाने आपल्या जीवनात खूप छोट्या वयात मोठमोठी कामं केली होती. जीवनात सातत्याने संघर्ष केला, झुंज दिली. पण, सतत हसतमुख राहिले.

आपल्या माता-पित्याला कैदेतून सहिसलामत सोडवलं. कालिया नागासह अगणित असुरांना मार्गातून दूर केलं. गोकुळातल्या लोकांना सुरक्षित केलं. श्रीकृष्णाचं ध्यान जरूर करायला हवं. श्रीकृष्णाची आपल्यासमोर अशी मनमोहक मूर्ती आहे, जी केवळ पाहूनच सर्वांना सुख प्राप्त होतं.

श्रीकृष्णाच्या दर्शनाचा आनंद घ्यायचा असेल तर शांत चित्ताने मुरलीधर कृष्णमूर्तीसमोर जाऊन बसावं आणि श्रीकृष्णाचं चरित्र आणि महिमा आठवावा. श्रीकृष्णाच्या जीवनासंबंधी वाचन करावं. ते समजून घ्यावं. त्यातूनच शक्ती आणि सुख मिळेल.

हेही वाचा: 

वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे 

पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

महाड ते वर्साय, फ्रेंच राज्यक्रांती ते भारतीय राज्यघटना, व्हाया ५ मे

गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कूळकथा?

‘सदानंद मोरे सांगतायत, हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र 

(पंडित बिरजू महाराज प्रसिद्ध नृत्यगुरू असून त्यांचा लेख दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)