सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू, हृदयाची काळजी घ्यायचा धडा

१३ सप्टेंबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


आजच्या सेल्फी युगात चांगलं, आकर्षक दिसण्यासाठी स्त्रियाच नाही, तर पुरुषांमधेही स्पर्धा आहे. त्यात जर ती व्यक्ती मॉडेलिंग, सिरीयल, सिनेमा क्षेत्रात असेल तर मग शरीर हेच त्यांचं भांडवल असतं. मुळात शरीर हे भांडवल असेल तर ते निरोगी असणं अधिक महत्त्वाचं. निरोगी शरीर आकर्षक दिसतं आणि अधिक टिकतं. पण आकर्षक शरीर निरोगी असेलच असं नाही.

हिंदी सिरीयलमधला लोकप्रिय अभिनेता, यशस्वी मॉडेल आणि बिग बॉसचा विजेता सिद्धार्थ शुक्ला या जिममधे जाणार्‍या चाळिशीतल्या दणकट शरीरयष्टीच्या तरुणाच्या मृत्यूमुळे ‘आकस्मिक हृदय मरण’ हा विषय चर्चेत आला आहे. गेल्याच महिन्यात मुंबईतल्या डॉ. दिप्तीमन रॉय या एक्सरे तज्ज्ञाला जिममधे व्यायाम करताना आपला जीव गमवावा लागला. डॉ. विजय घोरपडे या नवी मुंबईतल्या मराठमोळ्या डॉक्टरला अगदी सकाळीच ऑफिसमधे काम करताना मृत्यूने गाठलं.

जिमबाहेर अस्वस्थ होऊन जिन्यावर बसल्याजागी अचानक मृत्युमुखी पडलेल्या एका तरुणाचा वीडियो गेल्याच आठवड्यात वायरल झाला होता. हृदयाच्या आरोग्यासाठी एका खाद्यतेलाची जाहिरात करणार्‍या सौरभ गांगुलीलाच जिममधे व्यायाम करताना हार्ट अटॅक आल्याची आणि त्यानंतर तातडीने अँजिओप्लास्टी केल्याची घटना फार जुनी नाही.

यानिमित्ताने काही युवकांचा जिममधला अतिरेकी व्यायाम, झटपट सिक्स पॅकचा हव्यास, बाजारू फिटनेस प्रोटिनचा वापर, स्टेरॉईडसारख्या औषधांचा शरीरसौष्ठवासाठी मारा आणि या सर्व पार्श्वभूमीवर आकस्मिक हृदय मरणाची चर्चा सुरू आहे. अशा व्यक्ती किंवा घटना, काही अघटित घडण्यापूर्वीच ओळखता येतील का? येतील तर त्या कशा? आणि यशाच्या शिखरावरचे असे मृत्यू टाळता येतील का? या प्रश्नांचा विचार आवश्यक ठरतो.

हेही वाचाः सारं काही चांगलं असूनही डिप्रेशन येतंय ना, मग दीपिकाची ही गोष्ट वाचा

आकस्मिक हृदय मरणाची कारणं

'आकस्मिक हृदय मरण' म्हणजे हृदयाच्या एखाद्या आजारामुळे अचानकपणे - ध्यानीमनी नसताना होणारा मृत्यू. हृदयाचा हा सर्वात गंभीर आणि धोकादायक आजार. कारण यात उपचाराला वेळच मिळत नाही. ‘प्रिवेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ हा मंत्रच अनेकांचा जीव वाचवू शकतो. अतिव्यायाम करणारे युवक आणि अ‍ॅथलेटसमधे असे मृत्यू अधिक होतात.

छातीत दुखणं, अस्वस्थ वाटणं अशा तक्रारी सुरू झाल्यानंतर एका तासात मृत्यू म्हणजे ‘आकस्मिक हृदय मरण’. स्त्रियांपेक्षा पुरुष खेळाडूंमधे नऊपट असणारा हा आजार युवावर्गात शक्यतो अनुवंशिक कारणांमुळे येतो. चाळीशीनंतर मात्र याच्या मुळाशी रक्तवाहिन्यांचं काठिण्य हे कारण असतं. चाळिशीनंतरसुद्धा आकस्मिक हृदय मृत्यूचं प्रमाण खूप आहे.

हृदयाच्या रचनेमधले आनुवंशिक दोष, हृदयस्पंदन बिघाड, हृदयाच्या स्नायूतला विद्युत वहन बिघाड, हृदय स्नायूदोष, झडपांचे विकार, जंतुसंसर्ग,  मुका मार, घातक रसायनं, औषधं किंवा बाजारू अन्नघटक ही आकस्मिक हृदय मरणाची कारणं आहेत.

हार्ट अटॅकमधे फरक

आकस्मिक हृदय मरण म्हणजे हार्ट अटॅक नाही. रक्तवाहिन्यांमधे गुठळ्या होऊन हृदयाच्या स्नायूचा रक्तपुरवठा बंद होऊन तो स्नायू मृतवत होणं म्हणजे हार्ट अटॅक. अनेक आकस्मिक हृदय मृत्यूचं हे कारण असलं तरी, ते ‘आकस्मिक हृदय मरण’ नाही. या आजारात हृदयातल्या विद्युत आवेगामधे बिघाड निर्माण होतो नि हृदयाचं धडधडणं थांबतं. सर्व शरीराला रक्त पाठवण्याचं पंपिंग करण्याचं कामच थांबतं.

रक्तदाब कमी होतो. सर्व शरीराचा आणि मेंदूचा रक्तपुरवठा बंद पडतो. शुद्ध हरपते. श्वसन प्रक्रिया थांबते. मनुष्य जागच्या जागी कोसळतो. असा अचानक मृत्यू होण्यापूर्वी काही व्यक्तींमधे काही लक्षणं जाणवतात. व्यायाम करताना हलकीशी चक्कर येते. छातीत मध्यभागी किंवा डावीकडे बारीक दुखतं. छातीत अस्वस्थ वाटतं, धडधडतं, नाडीचे ठोके अनियमित होतात.

श्वास घ्यायला त्रास होतो. त्वचा पांढरट पडते. हातपाय थंड होतात. थोड्याशा श्रमानं खूप थकायला होतं. दम लागतो. अशावेळी तातडीने विश्रांती घ्यावी. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असं केलं नाही तर व्यक्तीची शुद्ध हरपते आणि मृत्यू येतो. काही व्यक्तींच्या बाबतीत वरीलपैकी एकही तक्रार दिसून येत नाही. व्यायाम करताना अचानक हृदय थांबतं. अशा व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाच्या बाबतीत अशी घटना घडलेली असू शकते.

हार्ट अटॅक आला तर रक्ताची गुठळी विरघळणारी औषधं देऊन किंवा अँजिओप्लास्टी करून जीव वाचवता येतो. पण आकस्मिक हृदय मरणाच्या बाबतीत हृदयाचा विद्युत आवेग सुरू करण्यासाठी तातडीने हृदयासाठीचा विद्युत शॉक देऊन उपचार करावे लागतात.

हेही वाचाः मानसिक ताणतणावांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही

हृदयाचे ठोके अनियमित होणं

पुष्ट हृदयस्नायू विकार हे खेळाडूंमधल्या आकस्मिक हृदय मरणाचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. या आनुवंशिक विकारात हृदयाचे स्नायू पुष्ट, म्हणजे आकाराने मोठे आणि कठीण होतात. त्यामुळे डाव्या जवनिकेचं आकारमान कमी होतं.

डावी जवनिका आणि उजवी जवनिका यांच्यामधली भिंतही पुष्ट होते. यामुळे हृदयाच्या आकुंचन-प्रसरणात - रक्त पंप करण्यात अडथळा येतो. हृदय स्नायूतून होणारं विद्युतवहन अनियमित होतं. हृदयाचे ठोके अनियमित होतात. याला ‘वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन’ म्हणतात. यामुळे हृदयाचे ठोके अचानकपणे थांबतात आणि ‘आकस्मिक हृदय मरण’ येतं.

सुरवातीच्या टप्प्यात पुष्ट हृदयस्नायू विकाराची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे मुद्दाम टेस्ट करून घेतल्याशिवाय त्याचं निदान होत नाही. इको कार्डिओग्राफी करावी लागते. अशा व्यक्तींनी खेळात भाग घेऊ नये.

रोगाच्या पुढच्या टप्प्यात, थोड्या श्रमानं थकवा येणं, दम लागणं, छातीत धडधडणं, हृदयाचे ठोके अनियमित वाटणं, श्वासाची लय बिघडणं, सौम्य खोकला येणं, पित्त - मळमळणं, चक्कर, धाप लागणं, पायावर सूज येणं अशा तक्रारी दिसतात.

मानसिक ताणतणाव

मानसिक ताणतणाव हे कारण पुष्ट हृदयस्नायू विकार गंभीर करतं. सभोवतालच्या वातावरणातला ताण आजाराची तीव्रता वाढवतो. उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉईड विकार, मूत्रपिंडविकार, मद्यपान - धूम्रपानाचं व्यसन असेल तर ही समस्या गंभीर होते.

याचं निदान करण्यापूर्वी कौटुंबिक इतिहासाची नोंद करून छातीचा एक्स-रे, ब्लड टेस्ट, ईसीजी, इको कार्डिओग्राफी, आवश्यक तर  अँजिओग्राफी, न्यूक्लियर स्कॅन आणि जेनेटिक चाचणी केली जाते.

हृदयाची गती आणि नियमितता यांच्या टेस्टसाठी  'इंप्लान्टेबल कार्डिओवर्टर डिफिब्रिलेटर' नावाचं यंत्र छातीच्या त्वचेखाली बसवलं जातं. वेंट्रिक्युलर असिस्ट डिवाइजचाही फायदा होतो. काही व्यक्तींमधे शस्त्रक्रिया करून स्नायूचा काही भाग काढल्यामुळे हृदयाचे ठोके नियमित व्हायला मदत होते.

हेही वाचाः आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच

तर पेशंटचा जीवही वाचतो

कमोसीयो कॉर्डिस या विकारात अचानक कोणी छातीवर मोठा ठोसा दिला तर हृदयाचे ठोके अनियमित होऊन आकस्मिक हृदय मरण येऊ शकतं. याशिवाय आनुवंशिक किंवा इतर कारणांमुळे हृदयाच्या नैसर्गिक विद्युत वहनात अडथळा येतो. त्यामुळे हृदयाचं तालबद्ध आकुंचन-प्रसरण कोलमडतं आणि हृदयाचं धडधडणं अनियमित होतं.

अशी व्यक्ती चक्कर येऊन बेशुद्ध होते. नशिबाने काही वेळा हे दुरुस्त होतं आणि हृदय पूर्ववत होतं. पण काहींच्या बाबतीत हे ‘आकस्मिक हृदय मरणा’पर्यंत जाऊन पोचतं. त्यामुळे एखादी चक्कर - भोवळ - अस्वस्थ वाटणं याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या. हृदयाच्या अनियमिततेच्या  टेस्टसाठी इलेक्ट्रोफिजिऑलॉजिकल मॅपिंग उपयुक्त ठरतं.

वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन झालं तर हृदयाच्या जवनिका ताकदीने रक्त पंप करण्याऐवजी केवळ थरथरतात. त्यामुळे हृदय थांबतं. अशावेळी तातडीने सीपीआर ही उपचार पद्धती अवलंबली, ऑक्सिजनचा सलग पुरवठा केला, हृदयासाठीच्या विद्युत शॉकचा उपयोग केला तरच पेशंटचा जीव वाचतो. पुढे मूळ कारण शोधून हृदयाच्या स्नायूशी किंवा झडपाशी संबंधित शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि इतर औषधोपचार दिले जातात.

जिमला जायच्या आधी हे करा

तुम्ही जर तरुण असाल, म्हणजे वयाची चाळिशी - पन्नाशी अजून पार केली नसेल आणि जर तुम्ही नियमितपणे जिममधे जात असाल तर आधी तुमचं हेल्थ चेकअप करा. तुमचं वजन, हृदयाचे ठोके, त्यांची नियमितता, रक्तदाब, रक्तातली साखर, कोलेस्टेरॉल, थायरॉईड, ईसीजी आणि इको कार्डिओग्राम या टेस्ट करा.

दर वाढदिवसापूर्वी या टेस्ट आवर्जून करा. कारण हे आजार कधी सुरू होतील सांगता येत नाही. जिममधल्या प्रवेशासाठी या टेस्ट कायद्याने सक्तीच्या व्हायला हव्यात. जिममधल्या ट्रेनरला या उपचार पद्धतीची माहिती हवी. तातडीचे वैद्यकीय उपचार आणि अ‍ॅम्ब्युलन्स सेवा जिमशी संलग्न हव्यात.

हेही वाचाः सोशल मीडियाच्या फोडणीसाठी अॅक्सिडेंटलचा मसाला

हृदयासाठी हानीकारक गोष्टी

आजच्या सेल्फी युगात चांगले - आकर्षक दिसण्यासाठी केवळ स्त्रियाच नाही तर, पुरुषांमधे सुद्धा जणू स्पर्धा आहे. त्यात जर ती व्यक्ती मॉडेलिंग - फॅशन - सिरियल - अल्बम - सिनेमा वगैरे ‘दिसण्याच्या’ क्षेत्रात असेल तर, मग शरीर हेच त्यांचं त्या अर्थाने भांडवल असतं आणि मग त्या शरीराला घाईगडबडीने धष्टपुष्ट करण्यामागे अनेक जण लागतात. मुळात शरीर हे भांडवल असेल तर ते निरोगी असणं अधिक महत्त्वाचं. निरोगी शरीर आकर्षक दिसतं आणि अधिक टिकतं. पण आकर्षक शरीर निरोगी असेलच असं नाही.

मित्रहो, सिक्स पॅकच्या नादी लागून नको त्या प्रमाणात प्रथिनांचा ओवरडोस घेऊ नका. अतिप्रमाणातल्या प्रोटिनमुळे हृदयविकार बळावतो. स्टेरॉईडसारख्या औषधांचा परिणाम केवळ हृदयावर नाही तर मूत्रपिंडावर आणि सार्‍या शरीरावर होतो. बाजारातलं, रस्त्यावरचं, वाट्टेल ते खाणं, जंक फूडस, कोल्ड्रिंक, धूम्रपान, मद्यपान, ड्रग्ज हे धोकादायकच आणि अतिचरबीयुक्त आहार, तेलकट तुपकट - गोड पदार्थ हृदयासाठी हानीकारकच असतात.

कायमचे झोपी जाण्यापूर्वी

आजच्या धकाधकीच्या जीवनात, गळाघोटू स्पर्धेत टिकण्यासाठी अनेक जण नाना क्लृप्त्या करतात. धाव धाव धावतात. तरुण वयात ना खाण्या-पिण्याची फिकीर, ना पुरेशा शारीरिक विश्रांतीची भ्रांत. स्वत:च्या मनाविरुद्ध, काही वेळा मनासारखं बेबंद वागणं. नैतिक - अनैतिकच्या सीमारेषा धूसर.

मूल्य कुणाचं, किती कशाचं? जो तो ‘सेल्फि-श ’. कामात नाटक - जगण्यात नाटक. खरीखुरी माणसं डिजिटल दुनियेत कुठं? वर्च्युअल जगात दु:ख जाणणारं - अश्रू पुसणारं कुणी मिळालं नाही तर, ती जागा कोण भरून काढणार? गोळ्या, पिल, ड्रिंक्स, ड्रग? मित्रांनो जागे व्हा. अचानक कायमचे झोपी जाण्यापूर्वी. जागे व्हा.

हेही वाचाः 

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

टोमॅटो फ्रिजमधे ठेवणं योग्य नाही, असं शास्त्रज्ञ का म्हणतात?

हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?

करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस : मानसिक आरोग्य मोजण्याचा थर्मामीट

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)