कितीही टाळा फ्रॉइडने सांगितलेला सेक्स आडवा येणारच!

०६ मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


मानवी मनाचं गूढ उकलणाऱ्या सिग्मंड फ्रॉइड यांचा आज ६ मेला बड्डे. आजही आपल्याला स्वप्नांचा, लैंगिक भावनांचा नेमका अर्थ कसा लावावा हे कळत नाही. पण एकोणिसाव्या शतकामधे फ्रॉइड यांनी मानवी स्वप्नांचा अर्थ लावून खळबळ उडवून दिली. एवढंच नाही तर अनेक आजार हे शरीरापुरते मर्यादित नसतात तर त्यांचं कनेक्शन मनाशी जोडलेलं असतं, असं डॉक्टर असलेल्या फ्रॉइडने सांगितलं.

मानवी शरीर करत असलेली प्रत्येक कृती पहिलं आकार घेते ती आपल्या मनात. अनेक गोष्टी, विचार, कृतींची पूर्वतयारी आपल्या मनामधे सुरु असते. मनात आलेल्या हजारो गोष्टी आपण करतोच असं नाही. आपण शेकडो गोष्टी मनाच्या तळघरात टाकून देतो. मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे त्याच्या मनात दबलेल्या असंख्य गोष्टींशी निगडित आहेत. म्हणूनच मनाचं गूढ उकलण्यासाठी जगभरातले शास्त्रज्ञ झटताहेत.

मनाचा वेध घेणाऱ्या सिद्धांताची मांडणी

पण अंतर्मनाचा वेध घेणारं निश्चित असं उपकरण आज एकविसाव्या शतकातही उपलब्ध नाही. तरीही मानवी मनातल्या घालमेलीचा वैज्ञानिक मागोवा घेण्याचे जे प्रयत्न झाले त्यात सर्वांत प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे सिग्मंड फ्रॉइड. जगभरातले असंख्य विचारवंत, अभ्यासकांना झपाटून टाकणाऱ्या सिद्धांताची मांडणी करणारं हे व्यक्तिमत्व.

मानवी अंतर्मनाचा वेध घेण्याचा कोणताही शाश्वत सिद्धांत उपलब्ध नसताना त्याचा शास्त्रीय वेध घेण्याचा सर्वात प्रभावी प्रयत्न ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड यांनी केला. आपल्या या प्रयोगातून त्यांनी जगभरातले विचारवंत, तत्त्वज्ञ, लेखक, कवी, चित्रकार आणि वाचकांना झपाटून टाकलं.

हेही वाचाः काँग्रेसच्या हातातून संधी निसटून जातेय का?

मनोविश्लेषणाच्या अभ्यासकांचं कुलदैवत

ऑस्ट्रियाच्या फ्रायबर्ग गावातल्या एका गरीब ज्यू कुटुंबात ६ मे १८६५ ला सिग्मंड फ्रॉइड यांचा झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. फ्रॉइड ३ वर्षांचा असताना त्याचं कुटुंब राजधानी व्हिएन्नाला स्थलांतरित झालं. तिथेच फ्रॉइडने आयुष्याची ७५ वर्ष घालवली. १९३८ मधे जर्मन सैन्याने ऑस्ट्रियाचा ताबा घेतला तेव्हा फ्रॉइड व्हिएन्ना सोडून लंडनला गेले. 

ज्यू विरोधाचा कटू अनुभव त्यांना आला. लंडनला जाताना ते आपल्यासोबत आपल्या तीन बहिणींना नेऊ शकले नाहीत. त्यांच्या तीनही बहिणींचा नाझी फौजेच्या छळछावणीत मृत्यू झाला. 

विसाव्या शतकाच्या पहिल्या पन्नास वर्षांत सिग्मंड फ्रॉइड हे मनोविश्लेषणाचा अभ्यास करणाऱ्यांचं कुलदैवत होतं. वेळ आणि काळाच्या कसोटीवर सिग्मंड फ्रॉइडने मांडलेले सिद्धांत कदाचित चुकीचे ठरले असतील. त्याला पर्याय म्हणून आधुनिक सिद्धांत अधिक प्रभावीपणे पुढे आले. पण त्यामुळे फ्रॉइडचं महत्त्व तुसभरही कमी झालं नाही. त्याने मांडलेली उत्तरं कदाचित चूक असतील, पण त्याने मांडलेल्या प्रश्नावलीतून मात्र अजूनही जगाची सुटका झालेली नाही.

हेही वाचाः विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन

मनात दडलेल्या लैंगिक भावनांचा शोध

फ्रॉइडने मानवी मनाचा वेध घेणारा नव क्रांतिकारक सिद्धांत मांडला. या सिद्धांतामुळे मनात खोलवर दबल्या गेलेल्या लैंगिकतेचा, स्त्री पुरुषांना परस्परांबद्दल वाटणाऱ्या गूढ शारीरिक आकर्षणाचा, लिंगभेदामुळे त्यांच्या मानसिकतेत पडलेल्या फरकांचा आणि एकूणच सेक्सविषयी भास आभासांचा, स्वप्नांचा, मनातील सुप्त विचारांचा वेध घेणं सोप्पं झालं.

फ्रॉइडच्या एका मांडणीनुसार मानवी वर्तनापैकी ८०% वर्तनात सूक्ष्म लैंगिक आकर्षण आहे. ‘मानवी स्वभावाच्या अनेकनेक गुंतागुंतीचा अन्वयार्थ लावण्यासाठी मनाच्या तळघरात घुसून दबल्या गेलेल्या लैंगिकतेचा, सेक्सचा शोध घेण्याची गरज आहे’ असं त्याचं म्हणणं होतं. या सिद्धांताने फ्रॉइडने जगभरातल्या अभ्यासकांना आपल्याकडे खेचून घेतलं. त्याच्या सिद्धांताची जगभर चर्चा सुरु झाली. त्याचे असंख्य चाहते निर्माण झाले.

फ्रॉइड हा मूळचा डॉक्टर. त्यामुळे कित्येक रुग्णांना वैद्यकीय पध्दतीने बरं करता येत नाही. अशा रूग्णांना बरं कसं करणारं याचा शोध तो मानसशास्त्राच्या दृष्टीने घ्यायचा. त्यातूनच फ्रॉइडने बहुतांश आजारांचं मूळ शारीरिक नसून मानसिक आहे, अशी मांडणी केली.

हेही वाचाः १५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे

विज्ञानवादी, स्त्रीवाद्यांनीही केली टीका

आपल्या सिद्धांतांची मांडणी करताना त्यांना मोठ्या टीकेलाही सामोरं जावं लागलं. फ्रॉइडच्या सिद्धांतातला दृष्टीकोन पुरुषवादी, एकांगी आणि विज्ञानावादी आहे, अशी टीका झाली. सर्वात जास्त विरोध केला तो धर्मवाद्यांनी. नानाप्रकारे फ्रॉइडची अवहेलना केली. पुढे तिथली डॉक्टरमंडळी, मानसशास्त्रज्ञ, नाझीवादी, स्त्रीवादी, मार्क्सवादी तसंच समाजवादी मंडळीनी त्यांच्यावर सडकून टीका केली. तीव्र विरोध केला.

‘द फ्युचर ऑफ अन इल्युजन’ या पुस्तकात त्यांनी ‘धर्म हा विज्ञानवादी होत जाईल, तसं तसं धर्माचं आभासरूप नष्ट होऊन केवळ कल्पनांचा एक सांगाडा उरेल’ असं खळबळजनक विधान केलं. या पुस्तकाला युरोपमधल्या झाडून सगळ्या धर्मगुरूंनी तीव्र विरोध केला. त्यांची निर्भत्सना केली.

फ्रॉइडने आपल्या ‘द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम’ या ग्रंथात ‘मानवी स्वप्नात घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावून त्याच्या मानिसक आजारावर उपचार करता येईल’ असा विचार मांडला. या ग्रंथाची तेव्हा जगभर चर्चा झाली. कारण स्वप्नांचा असा ‘वैज्ञनिक’ अर्थ लावायचा प्रयत्न तोपर्यंत झालाच नव्हता.

हेही वाचाः आयोडीनयुक्त मिठामुळे आपण आजारी पडतोय का?

कितीही टाळा, फ्रॉइड आडवा येतोच!

‘एनालिसिस टर्मिनेबल अँड इनटर्मिबेल’, ‘सायकोपॅथोलॉजी ऑफ एवरिडे लाईफ’ (१९०४), ‘थ्री एसेज ऑन द थिअरी ऑफ सेक्युअलिटी’ (१९०५), ‘द ओरीजीन अँड डेवलपमेंट ऑफ सायकोएनालिसिस’ (१९१०), ‘सिविलायझेशन अँड इट्स डिस्कनटेन्स’ (१९३०) इत्यादी लेखांमुळे फ्रॉइडला जगभर अनेक चाहते मिळाले.

वेगवेगळ्या पातळीवर काम करणाऱ्या फॉइडला सिगारेटचं व्यसन होतं. त्यातच त्याला कॅन्सरचं निदान झालं. आजारपण दिवसेंदिवस वाढत असतानाही त्याचं लिखाण चालूच होतं. वेगवेगळ प्रयोग आणि सिद्धांताची मांडणी अखेरच्या श्वासापर्यंत चालूच ठेवली. लंडनला आल्यानंतर वर्षभरातच २३ सप्टेंबर १९३९ ला त्यांचा मृत्यू झाला.

काळाच्या कसोटीवर आजही फ्रॉइडने मांडलेली प्रश्नावली टाळता येत नाही. त्याचे सिद्धांत काळाच्या ओघात, आधुनिक अभ्यास तंत्राने चूक ठरवले. तरीही मानवी मनोविश्लेषणाचा अभ्यास करताना फ्रॉइडच्या थिअरीचा अभ्यास केल्याशिवाय किंवा त्याच्या सिद्धांताना टाळून पुढं जाताच येत नाही. यातच फ्रॉइड थिअरीचं मोठेपण आहे.

हेही वाचाः 

आपण कवी प्रदीपना विसरून चालणार नाही

शाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला

कोल्हापूर ते ऑस्करः भानू अथैय्या यांचा आज ९० वा वाढदिवस

जेटचं विमान बंद का पडलं आणि ते उडणार की नाही?

मोनालिसा चित्राचा पलीकडचे युनिवर्सल तत्त्वज्ञ लिओनार्दो दा विंची

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)