जगभरातल्या तरुणांना दोस्ती शिकवणारी फ्रेंड्स पंचविशीत

०६ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


‘फ्रेंड्स’ या लोकप्रिय इंग्रजी मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित होऊन २५ वर्ष पूर्ण झाली. १९९४ ला सुरू झालेली ही मालिका आजच्या तरूणांनाही आकर्षित करते. १९ व्या शतकातील कवी खलील जीब्रान यांच्या मैत्रीवर लिहीलेल्या कवितेची प्रत्येक ओळ फ्रेंड्सशी जोडता येते. भूतकाळ आणि भविष्यकाळाचे असे धागेदोरे घेऊन ‘मी कायम तुझ्या सोबत असेन’ असं आपल्या मित्राला सांगणारं फ्रेंड्सचं शीर्षक गीत आजही कानात वाजत राहतं. 

रॉस, रेचेल, मोनिका, चॅन्डलर, फिबी आणि जोई अशी सहा तरुण मुलं. यांची एकमेकांशी घट्ट मैत्री. अमेरिकेतल्या मॅनहाटन शहरात हे राहतात. ज्या क्षेत्रात काम करायला आवडतं त्यातलं काहीबाही काम करून चार पैसे कमावतात. 

हे मॅनहाटन शहर म्हणजे भारतातली मुंबईच! अशा शहरात करियर घडवण्यासाठी ही मुलं घेत असलेली मेहनत, माणूस म्हणून चांगलं असण्यासाठी त्यांची चाललेली धडपड, कोणावर तरी नितांत प्रेम करून आयुष्याचा जोडीदार मिळवण्याची इच्छा याभोवती फिरणारी, विनोदबुद्धीचा अफलातून वापर करून तयार केलेली ही एक कथा म्हणजेच इंग्रजीतला प्रसिद्ध टीवी शो ‘फ्रेंड्स’! 

फ्रेंड्सचं रौप्य महोत्सवी वर्ष

अमेरिकेतल्या नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनी या चॅनलवर फ्रेंड्सचा पहिला एपिसोड २३ सप्टेंबर १९९४ ला प्रदर्शित झाला. हा शो संपला ६ मे २००४ ला. जवळपास १० वर्ष ‘फ्रेंड्स’ने अमेरिकन लोकांच्या मनावर राज्य केलं. अमेरिकेतील आत्तापर्यंतचा सर्वात प्रसिद्ध टीवी शो म्हणून ‘फ्रेंड्स’ने ओळख कमावली. पण शो संपल्यावरही त्याचं वेड कमी झालं नाही. 

उलट शो संपल्यावर अमेरिकेच्या सीमा ओलांडत फ्रेंड्स जगभरात पोचला. त्यातले कॅरेक्टर्स जगातल्या सगळ्या तरुण मुलांना आपलेसे वाटू लागले. या भूमिका निभावणारे अभिनेते आणि अभिनेत्रींना सारं जग ओळखू लागलं. यंदा हे अभिनेते, अभिनेत्री आणि शोची संपूर्ण टीम फ्रेंड्सचा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करतायत.

५० लेखकांनी लिहिले एपिसोड्स

डेव्हीड क्रेन आणि मार्टा कॉफमॅन या दोन मित्रांनी मिळून या शोची निर्मिती केली. गंमत म्हणजे, या शोमधे रॉसची भूमिका साकारलेला डेविड श्विमर याच्यासकट २८ मोठ्या दिग्दर्शकांनी या शोचे एपिसोड दिग्दर्शित केलेत. 

शोचे एकूण २३६ एपिसोड प्रसिद्ध झालेत. ५० वेगवेगळ्या लेखकांनी या एपिसोड्सचं लेखन केलंय. यातली विशेष गोष्ट म्हणजे, पहिल्या एपिसोडपासून शेवटपर्यंत ही मालिका शिस्तीत पाहत गेलं तर या संपूर्ण मालिकेला चित्रपटासारखी एक कथा आहे असं लक्षात येतं. पण तरीही ही शिस्त न पाळता मधुनच कोणताही एपिसोड पाहिला तर त्या एपिसोडची लिंक लागणार नाही असं होत नाही. 

शोचा मधूनच कोणताही एपिसोड पाहायला बसलं तरीही त्यातले विनोद व्यवस्थित कळतात. त्या त्या एपिसोडला असणारी थीम व्यवस्थित लक्षात येते. एक कथा असूनही फ्रेंड्स अशाप्रकारे तुकड्यातुकड्यातही बघता येतं हेच या शोचं मोठं यश आहे असं म्हणायला हवं.   

मध्यवर्ती भूमिका एकच! 

फ्रेंड्समधे ६ भूमिका मध्यवर्ती असल्याचं म्हणलं जातं. एका बिल्डींगमधे शेजारी शेजारी राहणारे चार जण – रेचेल, मोनिका आणि चॅन्डलर, जोई हे चार मित्र आणि मोनिकाचा सख्खा भाऊ रॉस आणि या सगळ्यांची मैत्रीण फीबी या सहा जणांची ही भूमिका.

पण खरतंर सहा नाही तर फक्त एकच भूमिका फ्रेंडसमधे मध्यवर्ती आहे आणि ती म्हणजे या सहा जणांची ‘मैत्री’. कोणत्याही जाणिवेच्या आणि नेणिवेच्या पलिकडे असणारी यांची फ्रेंडशीप पडद्यावर मूर्त स्वरूपात दिसत नसली तरी हीच या शोमधली मध्यवर्ती भूमिका! 

अमुक प्रसंगी अमुक वागलं पाहिजे अशी नैतिकतेची शिकवण देण्याच्या फंदात फ्रेंड्स पडत नाही. आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या अंगी अमुक अमुक गुण असावेत किंवा अमक्या अमक्या प्रकारच्या व्यक्तीशी मैत्री करावी असली सल्लेगिरीही फ्रेंड्स करत नाही. या सहा मित्रांनी एकमेकांना ते जसे आहेत तसं स्वीकारलेलं असतं आणि मैत्रीची हीच परिपक्व परिभाषा ‘फ्रेंड्स’ शो आपल्यासमोर ठेवतो. 

हेही वाचा ः वाडा जागा झाला: अनागर समूहाचं जगणं मांडणारा कथासंग्रह

पडद्यामागच्या मैत्रीचा किस्सा 

फ्रेंड्समधल्या या भूमिकांची मैत्री फक्त पडद्यावरच दिसते असं नाही तर ही भूमिका साकारणारे अभिनेते आणि अभिनेत्री पडद्यामागेही एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. त्यांच्या पडद्यामागच्या मैत्रीचा एक किस्सा फार प्रसिद्ध आहे. संपूर्ण शोदरम्यान या सहा भूमिकांना एकसारखंच महत्व मिळावं अशी काळजी घेतली होती. त्यामुळे फ्रेंड्सच्या पहिल्या भागापासून सहा जणांना त्यांच्या भूमिकेसाठी एकसारखंच मानधन मिळायचं. पण दुसऱ्या भागापासून रॉस आणि रेचेल या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना इतर कलाकारांपेक्षा जास्त मानधन मिळू लागलं. 

तेव्हा हे सहाजण एकत्र आले आणि सगळ्या कलाकारांना समान मानधन मिळाल्याशिवाय शोमधे काम कऱणार नाही असा आपला निर्णय निर्मात्यांना कळवला. त्यानंतर वाटाघाटी करायची वेळ आली तेव्हा सगळ्या कलाकारांना समान मानधन मिळावं यासाठी रेचेल आणि रॉस यांनी स्वतःहून आपलं मानधन कमी करून घेण्याचा निर्णय घेतला. याचा धसका घेऊन प्रत्येक भागानंतर त्यांचं मानधन वाढवण्याची वेळ येई तेव्हा निर्मात्यांनी त्यांचं मानधन एकसमानचं राहिल याची विशेष काळजी घेतली. 

हेही वाचा ः एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

फ्रेंड्स आणि जिब्रान एकच सांगतायत 

कॅमेराच्या काचेवर काळं टोपण बसवल्यानंतरही हे सहा जण एकमेकांचे मित्र असतात. फ्रेंड्स शो सुरू व्हायच्या ११० वर्ष आधी अमेरिकेच्याच भूमीत खलील जिब्रान नावाचे कवी अवतरले होते. फ्रेंड्सचे असे किस्से ऐकताना, वाचताना आणि प्रत्यक्ष हा शो बघताना प्रत्येक क्षणाला खलील जिब्रान आठवत राहतात.

‘तुमचा मित्र हा तुमच्या सगळ्या गरजांचं उत्तर असतो’ या वाक्याने मैत्री वरच्या कवितेची सुरूवात करणारे जिब्रान आणि रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या अडचणीतही आपल्या मित्राचं आपल्यासोबत असणं किती छान असतं हे दाखवणारा ‘फ्रेंड्स’ शो यांना खरंतर समांतर ठेवूनच पहायला हवं. जिब्रानचीही कविता त्याच्या द प्रोफेट या पुस्तकातली. 

सांभाळून घेणाऱ्या मित्रांसाठी थँक्सगिविंग

अमेरिकन संस्कृतीत थँक्सगिविंग नावाचा एक फार मोठा सण असतो. टर्की आणि पाय नावाचा गोड पदार्थ बनवून आपल्या जवळच्यांना थॅंक्यू म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. ‘मैत्रीच्या नात्यात आपण प्रेम पेरत जातो आणि त्याचं फळ म्हणून आपल्या या शेतात दोस्तांच्या कृतज्ञतेचं फळ मिळत जातं.’ असं जिब्रान म्हणतात. 

फ्रेंड्स मधले फ्रेंड्स दर वर्षी हा थँक्सगिविंग साजरा करतात आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा एकही शब्द न बोलता एकमेकांना थॅंक्स म्हणतात. हे थॅंक्स अडचणीत सोबत राहण्यासाठी म्हणलेलं नसतं. तर वर्षभर एवढं वेड्यासारखं वागूनही आपले मित्र आपल्याला सांभाळून घेतात, घेणार आहेत यासाठीचं हे थॅंक्स असतं. 

फ्रेंड्स जिब्रानचाच शब्द पाळत असतात. जिब्रान म्हणतात आपल्या मित्राच्या सगळ्या गरजा, त्याच्या सगळ्या इच्छा, त्याचे विचार आणि त्याच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा हे सगळं आपला मित्राने सांगितलं नाही तरी आपल्याला माहीत हवं. तरच मैत्रीचं नातं आनंदमय होऊ शकतं. ‘फ्रेंड्स’ पदोपदी हीच अक्षरं गिरवत राहतं. 

हेही वाचा ः साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का?

फ्रेंड्स शीर्षक गीत आणि जिब्रानचा अध्यात्म

फ्रेंड्सचं शीर्षक गीत ही अशीच एक अजब गोष्ट. जिब्रान म्हणतात, आपल्या आत्म्याला खोली मिळावी आणि नात्यामधील आत्मीयता वाढावी म्हणून आपण मैत्री करावी. इतर कोणताही स्वार्थ असू नये, असं जिब्रान सांगतात. 

‘चारचाकी गाडी दुसऱ्या गियरवर अडकून पडावी तसं आयुष्याचंही होईल हे कोणाला माहीत होतं? पण तरीही मी तुझ्यासोबत असणार आहे’ असं आपल्या मित्राला सांगणारा फ्रेंड्सचं शीर्षक गीत जिब्रानच्या याच आध्यात्मिकतेची आठवण करून देतं. ‘मी तुझ्यासोबत असणार आहे’ या वाक्याच्या पुढे मागे, बाजुला, कुठेही स्वार्थाचा लवलेशही दिसत नाही. 

आपला मित्र जेव्हा आपल्यासमोर त्याचं मन मोकळं करतो तेव्हा आपल्याला न पटलेल्या गोष्टी त्याला स्पष्टपणे सांगताना आपल्याला भिती वाटू नये असं जिब्रान म्हणतात. फ्रेंड्समधे चॅन्डलरची सिगारेट प्यायची सवय वाईट आहे हे सांगताना, जोई अभिनेता म्हणून लोकप्रिय होऊ लागतो तेव्हा त्याचं बदललेलं वागणं लक्षात आणून देताना, मोनिकाच्या अतिशिस्तप्रियतेवर टीका करताना, सुखवस्तू घरातून आलेल्या रेचेलच्या पैसे उधळण्याच्या सवयी मोडताना कधीही कोणात्याही‘फ्रेंड’ला भिती वाटत नाही.   

फ्रेंड्समधुन जिब्रान परावर्तित होतात

कारण, त्यांची मैत्री निखळ आहे. म्हणूनच या सहा जणातलं कोणीही दुसऱ्या शहरात जाण्याचा विचार करू लागतं तेव्हा कोणी निराश होत नाही. उलट आपला मित्र लांब असतो त्या काळात हे सहाजण त्याच्या कोणत्या गोष्टीची सगळ्यात जास्त आठवण येते याचा विचार करतात. हुबेहूब जीब्रानंच! त्यांच्या कवितेत जिब्रानही असंच म्हणतात – 

आपण आपल्या मित्रापासून दूर होतो तेव्हा दुःखी व्हायचं नाही.
कारण, त्याच्यातली जी गोष्ट तुम्हाला अत्यंत प्रिय वाटते ती त्याच्या अनुपस्थितीत कदाचित तुम्हाला अधिक स्पष्ट दिसू लागेल. – पर्वतावर चढणाऱअयाला मैदानावरून तो पर्वत अधिक स्पष्ट दिसतो, तसं!

फ्रेंड्समधले असे अनेक प्रसंग. व्यक्तिरेखा, माणसं, जागा, परिस्थिती आणि मैत्रीची केलेली परिपक्व व्याख्या हे सगळं एकत्र केलं तर खलील जिब्रानची कविता तयार होते. फ्रेंड्सचे एपिसोड लिहिलेल्या प्रत्येक लेखकात खलील जिब्रान हा कवी म्हणून असा परावर्तित होत असतो.

हेही वाचा ः 

शेवटी राज्य कुणाचं, भाजपचं की आयारामांचं?

इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते?

किसान सन्मान निधीतून पाच कोटी शेतकऱ्यांची नावं गाळली, तुम्हाला तिसरा हप्ता मिळाला?