कुणाला फासावर न चढवताही प्रेमाशी संबंधित गुन्हे रोखता येतात!

१४ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


कथित एकतर्फी प्रेमातून होणारे गुन्हे थांबवणं हा सध्या आपल्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुन्हेगाराला कडक शिक्षा केली तर असे गुन्हे होणार नाहीत असं काहींना वाटतं. तर, संपुर्ण समाजाचंच प्रबोधन झालं पाहिजे असा लाँग टर्म प्लॅन काही जणांना पटतो. पण या दोन्ही गोष्टींसोबत तातडीने करायच्या सोप्या गोष्टीही असू शकतात, हे आपल्याला कधी कळणार?

प्रेम हे एकट्याने करायची गोष्ट आहे. आपण करतोय म्हणून समोरच्यानेही आपल्यावर करायला हवं याला व्यवहार म्हणतात. आपण प्रेम करतो म्हणजे समोरच्यानेही आपल्यावर प्रेम करावंच अशी अट प्रेमात थोडीच असते?

मी तुझ्यासाठी इतकं काही करतोय तरीही तू मला रिटर्न रिस्पॉन्स देतच नाहीस याला प्रेम नाही तर हक्क गाजवणं म्हणतात. प्रत्येक प्रेम हे एकतर्फीचं असतं. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असेल तर नातं तयार होतं. आपण प्रेम करतोय की आपल्याला नातं हवंय हा महत्वाचा प्रश्न आहे.

हे प्रेम नाहीच!

नातं हवंय म्हणजे त्या नात्यातून मिळणारे फायदे हवेत. भावनिक आर्थिक सुरक्षितता, गोड गोड गप्पा, शरीरसंबंध वगैरे वगैरे सगळं या फायद्यात येतं. नातं तुटलं तरी प्रेम टिकून असतं. अर्थात ज्यांनी प्रेम केलेलं असतं त्यांचं! जे प्रेम करतात ते नातं तुटलं तरी समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याचं आपल्यामुळे वाटोळं होणार नाही याची काळजी घेतात. भलेही एकत्र असताना त्यांचं तितकं पटलं नसेल तरीही!

जे नातं तुटताच समोरच्याला इजा पोचवतात किंवा नातं तयार होण्याआधी समोरचा आपल्या प्रेमाला रिस्पॉन्स देत नाहीये म्हणून त्या व्यक्तीला छळतात ते मुळात प्रेम करतच नसतात. त्यामुळे अशा गोष्टींना मुळात प्रेमातून वगळणं योग्य राहील.

हेही वाचा : समलैंगितकेलाही आपलंसं करणारं प्लेटोनिक लव

व्यवहार फिसकटतो तेव्हा बदला घ्यायचा असतो

हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे एकतर्फी प्रेम या कॅटेगरीत नेमकं काय येतं आणि काय येत नाही हे स्पष्ट करणं. सध्या 'एकतर्फी प्रेम' या टॅग खाली जे गुन्हे घडतात त्याकडे बघण्याची नजर आपण स्पष्ट करून घ्यायला हवी.

स्त्रीचं सामर्थ्य हे तिच्या सुंदरतेत असतं असा सार्वत्रिक समज आहे. त्याबद्दल मतमतांतरं होऊ शकतीलही. पण हा समज समाजात आहे एवढं निश्चित! तिच्या सामर्थ्याला हादरा देणं म्हणजे एकतर तिच्या सौंदर्यावर हल्ला करणं किंवा चारित्र्यावर. या दोन गोष्टींचा एखाद्या टूलसारखा वापर होतो. हा हल्ला फक्त पुरुषच करतात का? तर नाही! एक स्त्री देखील स्त्रीवर असा हल्ला करते. हल्ला करण्यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. प्रत्येकवेळी प्रेमभंग एवढं एकच कारण असतं असं नाही.

मुळात व्यवहार फिसकटतात तेव्हा माणसं एकमेकांचा बदला घेण्यासाठी उतावळी होतात. खासकरून आर्थिक किंवा प्रेमाचा व्यवहार फिसकटणं माणसाच्या जिव्हारी लागतं! बदला घ्यायची भावना जागरूक होते. बदला घ्यायची म्हणजे काय करायचं तर समोरच्या माणसाच्या सामर्थ्याला धक्का द्यायचा. त्याला कमीपणा वाटेल असं काहीतरी करायचं. त्याला हतबल करून टाकायचं. आपल्यासमोर नाक घासेल, मान तुकवेल असं काहीतरी करायचं.

गुन्हेगारांची मानसिकता काय?

याचं मूळ म्हणजे स्त्रीच्या सामर्थ्याचं खच्चीकरण करायचं. अशाच मानसिकतेतून एसिड अटॅक, जाळणं असे गुन्हे महिलांच्याबाबतीत घडतात तर जमिनीच्या वादातून खून, पूर्ववैमनस्यातून खून, आर्थिक व्यवहारातून खून असे गुन्हे पुरुषांबाबतीत नजरेत येतात. कारण पुरुषाचं सामर्थ्य हे त्याच्या मसल्स पॉवर आणि कर्तृत्वात असतं असा सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे पुरुष सामर्थ्य खच्चीकरण करण्यासाठी त्याच्यावर मसल्स पॉवर वापरली जाते किंवा बदनामी केली जाते जेणेकरून त्याने जे काही नाव कमावलं असेल ते धुळीत मिसळेल.

प्रेमाला नकार देणं आणि नात्यातून समोरच्या माणसाच्या मर्जीविरोधात बाहेर पडणं या दोन गोष्टी 'प्रेम व्यवहारात' बदल्याचं रूप घेतात. दोन्ही ठिकाणी गुन्हेगाराला आपली मानसिक फसवणूक झालीय असं वाटत असतं. त्यामुळे फार कमी लोकांना केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो. 

मी प्रेम करतोय म्हणजे समोरच्याने करायलाच हवं आणि नकार म्हणजे माझ्यात काहीतरी कमी आहे. माझी वॅल्यू नाही. माझ्या प्रेमाची किंमत नाही. समोरच्याला सुंदरतेचा माज आलाय. समोरचा मला समजतो तरी काय! माझं आयुष्य समोरच्यामुळे उध्वस्त झालं अशा अनेक गोष्टींनी डोक्यात थैमान घातलेलं असतं आणि गुन्हे घडतात.

हेही वाचा : आपण स्वतःवर प्रेम करायला कधी आणि कसं शिकणार?

प्रेम एकाचवेळी खासगी आणि सार्वजनिक होतं

आता अशा गोष्टी थांबायला हव्यात यासाठी कठोर कारवाई हा एकच पर्याय असू शकतो का? तो तसा असला असता तर पहिल्या माणसाला खून केल्याबद्दल शिक्षा झाल्यानंतर खून घडलेच नसते. हा तिढा सोडवण्यासाठी प्रेम आणि समाज यांचा छत्तीसचा आकडा पहिले सुटायला हवा. आजपर्यंत संतानी संसार जीवनावर प्रबोधन केलं. पण किती तरुण कीर्तन, प्रवचन ऐकतात? प्रेम या गोष्टीकडे फक्त थिल्लरपणा म्हणून समाजानं बघू नये, याची स्वतः तरुण तरी किती काळजी घेतात? समाज प्रेमाकडे थिल्लरपणा म्हणून बघतो आणि तरुण देखील समाजाने असं बघू नये, याची काळजी घेत नाहीत.

त्यामुळे प्रेम भावनिक लेवलवर अत्यंत खासगी आणि शो ऑफ करण्यासाठी अगदी सार्वजनिक गोष्ट होऊन बसते. भावनिक लेवलवर अत्यंत खासगी झाल्यामुळे घुसमट वाढते. माणसं आतल्या आत विचार करत राहतात. त्या विचारांना आऊटलेटच नसते. आऊटलेट नसल्यामुळे तू चुकीचा विचार करतोय हे कोणी सांगू शकत नाही.

खासकरून पुरुष याबाबतीत ट्रॅप होतात. धड त्यांना मित्रांशी बोलता येत नाही की घरच्यांना काही सांगत नाहीत. प्रेमाबाबतीतच्या भावनिक गोष्टी पुरूष फार क्वचितवेळा मित्रांकडे शेयर करतो. आतल्या आत विचार करुन घुसमटत असतो. आता ज्यांना स्वतःवर विजय मिळवणं जमतं ते मूव ऑन होतात. पुढे जातात. ज्यांना जमत नाही ते गुन्हे करतात नाहीतर स्वतःला संपवून घेतात.

त्यामुळे या विषयाकडे सर्वांगीण नजरेतून बघून प्रत्येकाने आपल्या लेवलवर प्रयत्न करणं गरजेचंय. त्याचबरोबर कायद्याचा धाक असणं हे देखील महत्वाचं. थोडक्यात पुरूषांनी आपल्या मित्राशी मनमोकळ्या गप्पा मारणं, एकमेकांशी गोष्टी शेअर करणं, मनातली घुसमट मित्रासमोर व्यक्त करणं, आपला मित्र ब्रेकअप किंवा तत्सम अवस्थेतून जात असेल तर त्याच्यासोबत वेळ घालवणं, तो मानसिक दृष्ट्या स्थिर होत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी उभं राहणं हे प्रत्येकाने करायला हवं. तरचं आपण या समाजाचा भाग आहोत या विधानाला काही अर्थ आहे.

हेही वाचा : 

‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’

 लवमंत्रः मुलीने दिलेला प्रेमाचा नकार मुलानं कसा पचवावा?

एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय हवं बरं, सांगता येईल तुम्हाला?

( लेखक हे ब्लॉगर आहेत. ते नातेसंबंधांविषयीचा ब्लॉग चालवतात.)