जळगाव जिल्ह्याचा कंट्रोल कुणाकडे हे ठरवणारी निवडणूक

२२ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर या मतदारसंघात मतदान होतंय. या भागात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या या समाजातून आपल्या नेत्याच्या खच्चीकरणाच्या विरोधात नाराजी आहे. गिरीश महाजनांचं नवं नेतृत्व उभं राहतंय. मात्र त्याचा असंतोष अमळनेरमधल्या फ्रीस्टाईल हाणामारीतून उघड झाला होता. यापुढे जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल.

उत्तर महाराष्ट्रातल्या आठ जागांपैकी सध्याच्या क्षणी भाजपला हमखास यशाची अपेक्षा बाळगता येऊ शकेल, अशी जागा एकमेव जागा म्हणजे रावेर. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आणि विद्यमान खासदार रक्षा खडसे येथून भाजपाकडून पुन्हा रिंगणात आहेत. समोर त्यांच्याच लेवा पाटील समाजाचे डॉ. उल्हास पाटील हे काँग्रेसकडून रिंगणात आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घातला घोळ

जळगावमधे भाजपनं जसा उमेदवारीचा घोळ घातला तसाच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं शेवटपर्यंत रावेरची जागा कुणी लढवायची यावर घोळ घातला. ‘भाजपमधील एखादा मोठा नेता गळाला लागेल’ या आशेवर त्याच्या कुटुंबीयांसाठी ही जागा शेवटपर्यंत राखून ठेवली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भुसावळला घेतलेल्या जाहीर सभेत रक्षा खडसे याच रावेरमधून उमेदवार असतील याचे स्पष्ट संकेत दिल्यानं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची पंचाईत झाली. या जागा वाटपात राष्ट्रवादीचेही तुल्यबळ उमेदवाराच नाही अशी स्थिती.

हेही वाचाः भावा बहिणींनो, चौकीदार चोर नसूही शकतो!

राष्ट्रवादीने खडसेंचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, मराठा उद्योजक श्रीराम पाटील असे पर्याय चाचपून पाहिले. शेवटचा पर्याय म्हणून डॉ. उल्हास पाटील यांना राष्ट्रवादीत घेण्याची चाल खेळली गेली. त्यात यश आलं नाही. भुसावळचे संतोष चौधरी लढायला तयार नाहीत. म्हणून शेवटी ही जागा काँग्रेसला बहाल करण्यात आली. त्याबदल्यात विधानसभेसाठी जामनेर, अमळनेर राष्ट्रवादीला दिले जाणार आहे.

रक्षा खडसेंच्या विजयाचा मार्ग मोकळा

आघाडीच्या घोळामुळे रक्षा खडसे यांना सुरुवातीपासून दिलासा मिळाला. कोथळीच्या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते खासदार म्हणून चुणूक दाखवताना त्यांनी मतदार संघातील संपर्क कायम राखला. सासऱ्यांची पुण्याई, त्यांच्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून लेवा समाजाचा एकगठ्ठा पाठींबा या कारणांनी रक्षा यांना लढत तुलनेने सोपी आहे. जोडीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे मनापासून मदत करत असल्याचं चित्र आहे.

दुसरीकडं, जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व नसल्यानं उल्हास पाटील यांना स्वत:च्या मेहनतीवर ही लढाई लढावी लागणार. आपला विजय सोपा नाही, हे पाटील यांनीही ठाऊक आहे. त्यामुळे ते आपल्या ताकदीने प्रचारात उतरले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच भाजप शिवसेनेचे नाराज पाटलांच्या बाजूने उभे राहिले, तरच त्यांना आव्हान उभं करता येईल.

हेही वाचाः जळगावात भाजपचे नेते पक्षाच्या व्यासपीठावर WWF का खेळले?

यानिमित्ताने उल्हास पाटील चर्चेत आले, मुख्य प्रवाहात आले. विधानसभेसाठी ते पक्षाला साकडं घालू शकतात, हीच त्यांना मोठी बक्षिसी राहील. या स्थितीत, वंचित बहुजन आघाडीचे नितीन कांडेलकर हे डॉ. पाटील यांच्या हक्काच्या दलित आणि मुस्लीम मतात वाटेकरी होऊ शकतात. रक्षा खडसे या किती मताधिक्य  घेतात, एवढाच फक्त आता रावेरमधे औत्सुक्याचा विषय आहे.

जळगावात कोणाचं पारडं जड? 

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना युतीचे उन्मेष पाटील आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे गुलाबराव देवकर यांच्यात थेट लढत आहे. या मराठा बहुल मतदारसंघात दोन्ही उमेदवार मराठा आहेत. देवकर यांची कर्मभूमी जळगाव असली, तरी ते चाळीसगाव तालुक्याातले रहिवासी. तर भाजपचे उन्मेष पाटील चाळीसगावचे आमदार आहेत.

हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?

देवकर हे मागील विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचे प्रतिस्पर्धी. देवकर लोकसभेत पोहोचले तर पुढे गुलाबराव पाटील यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीत ताकदवान उमेदवार राहणार नाही, यामुळे गुलाबराव पाटील यांचा पुढचा राजकीय मार्ग सुकर करण्यासाठी जळगावमधल्या सेनेच्या एका गटानं आपली ताकद राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवकर यांच्या पाठीशी उभी केल्याचं मानलं जातंय. 

लोकसभेचा पेपर भाजपला कठीण

धरणगावात तर शिवसैनिकांनी बैठक घेऊन भाजपचं काम न करण्याची जाहीर भूमिका घेतली होती. अशी स्थिती अनेक ठिकाणी आहे. जळगाव ग्रामीण आणि पाचोऱ्यात शिवसेनेचे अमादार आहेत. मात्र शिवसैनिक मनापासून काम करताना दिसत नाहीत. खासदार एटी पाटील यांचे तिकीट कापल्याचा राग पारोळ्यात आणि त्यांच्या नात्यागोत्यातल्यांना आहे. 

स्मिता वाघ यांना तिकीट जाहीर करून त्या प्रचाराला लागल्यानंतर, अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचाही पत्ता कापला गेला. पक्षांतर्गत गट-तट, शह-काटशहाच्या राजकारणाच्या त्या बळी ठरल्या. वाघ पती-पत्नीने सारी हयात अभाविप आणि भाजपसाठी घालविली. मात्र, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मर्जीतील उमेदवार डावलून त्यांना तिकीट दिलं गेल्यानं असंतोष उफाळेल, असं चित्र पक्षश्रेष्ठींना दाखवून तिकीट बदलून घेतलं.

हेही वाचाः महिलांना उमेदवारी देतानाही घराणेशाहीचंच कार्ड

उन्मेष पाटील हे महाजन गटातले मानले जातात. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर जल्लोषाची क्लिप जळगावात, विशेषतः लेवा समाजात वायरल करून पाटील यांना अडचणीत आणलं जातंय. शिवाय राजपूत समाजाचीही पत्रकबाजी सुरू आहे. प्रचारात धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर थेट खंडणीवसुलीचे गंभीर आरोप केलेत.

विधानसभेच्या तयारीत असणाऱ्या उन्मेष पाटील यांना ऐनवेळी सोपवला गेलेला लोकसभेचा पेपर अत्यंत अवघड झालाय. त्यात अमळनेरातल्या हाणामारीने पक्षाची पार छी-थू झाली आहे. अमळनेरात पाडळसे हा महत्त्वाचा धरण प्रकल्प प्रलंबित आहे. या तालुक्यातून भाजपा उमेदवाराला किमान ५० हजार मतांनी पिछाडीवर ठेवण्याचा संकल्प सोडला गेलाय. 

जळगाव शहर वगळता, सर्वत्र भाजपापुढे आव्हानांचा डोंगर उभा आहे. जळगावात सुरेशदादा जैन यांच्या सक्रीयतेमुळे होणारा फायदा लेवा समाजाच्या नाराजीने मिळणार नाही, अशी स्थिती आहे. भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या मर्जीतील अनेक पदाधिकारी पक्ष संघटनात आहे. ही सारी मंडळी हातचं राखून काम करताना दिसतेय. सर्व प्रमुख सत्तास्थानं भाजपच्या हाती आहेत, कार्यकर्त्यांची पक्षाकडे कमतरता नाही; पण प्रचारात जान दिसत नाही.

कोणत्या पक्षाचं काय चाललंय?

शिवसेनेला भाजपची सत्ता असलेल्या जिल्हा परिषद, महापालिकेत सत्तेतील वाटा देण्याचं आश्वानसन दिलं गेलंय. तरीही त्यांचा सहभाग वरवरचाच राहिलाय. वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर या दलित मुस्लिमांची किती मतं खातात, यावर उन्मेष पाटील यांची भिस्त आहे. नाराजी, अंतर्गत धुसफूस असलेल्या भाजपात उन्मेष यांचे सारे काही तसे एकट्याच्या बळावरच सुरू आहे. 

अशा स्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचा सध्या एकच आमदार असतानाही प्रचारात देवकर यांची आघाडी अखेरपर्यंत दिसली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर कुठेच काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व नसल्यानं देवकर यांच्या प्रचारात राजकीय पदाधिकाऱ्यांची संख्या तशी कमीच दिसली. मात्र, त्यांनी कुणालाही दुखावलेलं नाही, सर्वांना सहकार्याची भूमिका, मराठा कार्ड, दलित-मुस्लीम मतं अशी देवकरांची स्थिती भक्कम दिसते. 

हेही वाचाः दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

भाजपनं त्यांच्या जामिनावर असण्याचा मुद्दा करून पाहिला पण मतदार त्यांना या आर्थिक घोटाळ्यात गुन्हेगार म्हणून पाहत नाही. त्यांनी जळगाव ग्रामीणमधे जोरदार काम केलं आहे, मजूर फेडरेशन आणि शैक्षणिक संस्था नात्यागोत्यांचे नेटवर्क आहे. दोन्ही काँग्रेस एकदिलाने प्रचारात उतरल्याचा फायदा आहे. 

शेवटी विजय मतदारांवरच अवलंबून

राष्ट्रवादीनं रावेर मतदारसंघ काँग्रेसला दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमधेही उत्साह आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली सभा मतदारसंघात एरंडोल येथे झाली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे देवकरांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पहिल्या टप्प्यातच वाढलेला उत्साह शेवटपर्यंत टिकून होता. देवकरांनी नियोजनबद्ध प्रचार केलाय. त्यांचे पारडे तूर्तास निश्चितच जड आहे. 

निवडणुका जिंकण्याचा अनुभव असलेला भाजप शेवटच्या दिवशी आणि रात्री काय करामती करतो, यावर अंतिम चित्र ठरू शकतं. भाजपच्या करामतीमुळं देवकरांच्या हक्काच्या पॉकेट्समधील मतदारांच्या अपेक्षा उंचावल्या आणि त्या पूर्ण करण्यात देवकर कमी पडलं तर निवडणुकीचं चित्र बदलू शकतं. जितके जास्तीत जास्त हक्काचे मतदार मतदानाला बाहेर पडतील तितका देवकर यांचा विजय सुकर होत जाईल. हा मतदार तटस्थ राहिला, मतदानाला बाहेर पडला नाही तर देवकारांनी डोकेदुखी वाढेल.

जळगाव लोकसभा मतदारसंघ :

उन्मेष पाटील (भाजप)
गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) 
१४ उमेदवार रिंगणात
एकूण मतदान केंद्रं : १९६० 
सहाय्यकारी मतदान केंद्रं : ५३ 
एकूण मतदार : १९ लाख ९ हजार ७३५ 
पुरुष मतदार : १० लाख १ हजार २४९ 
महिला मतदार : ९ लाख ८ हजार ४२७ 
इतर मतदार : ५९ 

रावेर लोकसभा मतदारसंघ :

रक्षा खडसे (भाजप)
डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस)
१२ उमेदवार रिंगणात
एकूण मतदान केंद्रं : १८७२ 
सहाय्यकारी मतदान केंद्रं : ८७ 
एकूण मतदार : १७ लाख ६० हजार १७५ 
पुरुष मतदार : ९ लाख १७ हजार ४८८ 
महिला मतदार : ८ लाख ४२ हजार ६६१ 
इतर मतदार : २६ 

हेही वाचाः 

भवरलालजींनी माळरानावर साकारले गांधीविचार

ऐसी कैसी जाहली साध्वी!

साध्वी प्रज्ञा ठाकूर खरंच साधू की फक्त दिखावा?

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत. )