सहा जिल्हा परिषद निकालांचे सहा अर्थ

१० जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात देत धुळ्यात भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली. तरीही सारी चर्चा भाजपच्या अपयशाचीच होतेय. सहा जिल्हा परिषदेच्या निकालाचे सहा वेगवेगळे पॅटर्न आहेत. 

राज्यातल्या सहा जिल्हा परिषदांचा निकाल काल ८ जानेवारीला लागला. राज्यातल्या नव्या सत्ता समीकरणानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. एका अर्थाने ही या सत्ता समीकरणासाठी लिटमस टेस्ट होती. स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या भाजपला फक्त धुळ्यात सत्तेचं गणित जमवता आलंय. 
दुसरीकडे भाजपच्या बालेकिल्ल्यांत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवलीय. शिवसेना आणि राष्ट्रवादीला कुणाच्या तरी मदतीशिवाय सत्ता मिळणार नाही.

भाजप सगळ्यांत मोठा पक्ष, तरीही

जिल्हा परिषदेच्या एकूण ३३२ पैकी १०६ जागांवर विजय मिळवत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरलाय. त्याखालोखाल काँग्रेस ७५, शिवसेना ४८, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४३ जागा मिळाल्या. अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना ६० जागा मिळाल्या. यामधे वंचित बहुजन आघाडीच्या ३२ जागा आहेत.

जिल्हा परिषदेपाठोपाठ पंचायत समिती निवडणुकीतही सर्वाधिक जागा जिंकण्याचा मान भाजपच्याच नावावर आहे. ५३६ पैकी १९४ जागा जिंकत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. त्याखालोखाल काँग्रेस १४५, शिवसेना ११७ तर राष्ट्रवादीला ८० जागा मिळाल्या. असं असलं तरी धुळे वगळता दुसऱ्या कुठल्या ठिकाणी भाजपला सत्ता मिळताना दिसत नाही.

हेही वाचाः एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था?

१. नागपूरः भाजपवर लोक नाराज आहेत

८० तासांच्या मुख्यमंत्रीपदाने देवेंद्र फडणवीस यांचं हसं झालं. पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांच्या ते टार्गेटवर आले. त्यातच विधानसभा निवडणुकीत भाजपची आपल्या नागपुरी होमग्राऊंडवरच पीछेहाट झाली. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषद भाजप राखणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ही फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रभावाची परीक्षा होती. 

सगळ्यात धक्कादायक निकाल आला तो नागपूरमधून. राष्ट्रवादीसोबत आघाडी करून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसने गडकरी आणि फडणवीस यांच्या जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली. ५८ पैकी ३० जागा जिंकत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेसचे नेते, मंत्री सुनील केदार यांनी आपल्या सावनेर मतदारसंघातल्या जिल्हा परिषदेच्या सर्व नऊ गटांसह पंचायत समितीच्या १८ जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी भाजपला केवळ १५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस १० तर स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेला एक जागा मिळाली. अपक्षांना दोन जागा मिळाल्या.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गडकरी यांचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा इथे काँग्रेसचा उमेदवार जिंकला. तसंच भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गावातही भाजप उमेदवाराचा पराभव झाला. नागपरकरांनी हा एका अर्थाने गडकरी आणि फडणवीस यांच्या कामगिरीवर आपण नाराज असल्याचा निकाल दिला.

२. पालघरः आदिवासी पट्ट्यात राष्ट्रवादी फोफावतेय

नागपूरपाठोपाठ भाजपला मुंबईजवळच्या पालघर जिल्हा परिषदेतल्या सत्तेलाही मुकावं लागलं. पालघरमधे भाजपचा गेल्यावेळचा सत्तासोबती असलेल्या शिवसेनेने ५७ पैकी ४६ जागा लढवत स्वबळावर १८ उमेदवार निवडून आणलेत. चार जागा असलेल्या राष्ट्रवादीने १५ जागांवर मुसंडी मारली. राष्ट्रवादीने बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी पक्षासोबत मिळून निवडणूक लढवली. यात बविआला ४ तर माकपला ५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी, बविआ आणि माकप या आघाडीने सर्वाधिक २६ जागा जिंकल्या. 

गेल्यावेळी २१ जागा जिंकणाऱ्या भाजपला केवळ १२ जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसला गेल्या वेळेसारखीच एक जागा मिळाली. तीन अपक्षही जिंकले. विशेष म्हणजे, भाजपला जिल्ह्यातल्या आठपैकी सात पंचायत समित्यांमधे पराभव झाला, तर एका ठिकाणी काठावर पास होता आलं. मे २०१८ मधे लोकसभेच्या पोटनिवणुकीत शिवसेनेचा पराभव करून स्वबळावर पालघर जिंकणाऱ्या भाजपच्या वाट्याला आता हाराकीरी आलीय.

हेही वाचाः दिल्ली निवडणूक जाहीरः नरेंद्र मोदी नाही तर केजरीवालांभोवती फिरणार प्रचार

३ . अकोलाः वंचित फॅक्टर जिंदा हैं

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चर्चेत आलेला वंचित फॅक्टर जिल्हा परिषदेतही चालला. ५३ जागा असलेल्या अकोल्यात वंचित बहुजन आघाडी २२ जागा जिंकत सगळ्यात मोठा पक्ष ठरला. जिल्हा परिषदेवर गेल्या २० वर्षांपासून भारिप बहुजन महासंघ म्हणजेच आताच्या वंचित आघाडीची सत्ता आहे. एकत्र निवडणूक लढवलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीला केवळ ७ जागा मिळाल्या. काँग्रेसच्या दोन जागा कमी झाल्यात. शिवसेनेने १३ जागा जिंकल्या. इतरांना चार जागांवर समाधान मानावं लागलं.

दुसरीकडे भाजपचं संख्याबळ १२ वरून सातवर घसरलंय. जिल्ह्यात भाजपचे चार आमदार आहेत. तसंच केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. लोकमतावर धोत्रेंच्या केंद्रीय मंत्रीपदाचा कोणताही प्रभाव पडताना दिसत नाही. उलट भाजपच्या जागा कमी झाल्यात.

४. वाशिमः फाटाफुटीचा काँग्रेसला फटका

एकूण ५२ जागा असलेल्या वाशिममधे सत्ताधारी काँग्रेसला पक्षांतर्गत बंडाळीचा झटका बसला. १७ जागा जिंकलेल्या काँग्रेसला यंदा केवळ ९ जागा मिळाल्यात. ८ जागा असलेल्या राष्ट्रवादीने मात्र १२ जागा जिंकत सगळ्यात मोठ्या पक्षाचा मान मिळवलाय. तर भाजपकडे ७ आणि शिवसेनेकडे ६ जागा आल्यात. भारिपने दोनवरून सातवर मजल मारलीय.

काँग्रेसने निलंबित केलेले माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीचे रिसोड, मालेगाव तालुक्यात सहा उमेदवार निवडून आलेत. रिसोड मतदारसंघातल्या या दोन्ही तालुक्यांत काँग्रेसला मोठा झटका बसलाय. यंदा काँग्रेसच्या जागा ८ ने कमी झाल्यात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक, तर अपक्षांना तीन जागा मिळाल्या. 

विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भाने खूप मोठा झटका दिला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत सारी प्रतिष्ठा पणाला लावत फडणवीसांनी प्रचार केला. पण आता झेडपीच्या निकालातही भाजपच्या हातात अपयश आलंय. लोकांची भाजपबद्दलची नाराजी अजूनही दूर झाली नसल्याचंच या निकालावरून म्हणता येतं. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात विदर्भाचा दबदबा होता. पण जिल्हा परिषदेच्या निकालाने या दबदब्याचा लोकांना फायदा झाला नसल्याची बाब अधोरेखित होते.

हेही वाचाः आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती

५. धुळेः भाजपच्या मेगाभरतीचं यश

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आल्यावर आता भाजपचं काय होणार असा प्रश्न केला जात होता. त्या प्रश्नाचं उत्तर धुळे जिल्हा परिषदेच्या निकालानं दिलंय. धुळ्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन जिल्ह्याच्या राजकारणातही महाविकास आघाडीची मोट बांधली. तरीही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना ५६ पैकी केवळ १४ जागांवर विजय मिळवता आला.

भाजपने तिन्ही पक्षांचा दणदणीत पराभव केला. गेल्यावेळी ३० जागा असलेल्या काँग्रेसला यंदा केवळ ७ जागांवर समाधान मानावं. लागलं. राष्ट्रवादीचं संख्याबळही सहा वरून तीनवर आलं. शिवसेनेची सदस्यसंख्या मात्र दोनने वाढून यंदा चारवर पोचलीय. 

दुसरीकडे भाजपने स्वबळावर सर्व जागा लढवत ३९ जागांवर विजय मिळवला. यंदा २५ जागा वाढल्यात. यात काँग्रेसमधून आलेल्या अमरीश पटेल यांच्या शिरपूर तालुक्यातल्या १४ जागांचा समावेश आहे. १४ पैकी चार गटांमधे याआधीच पटेल गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. गेल्यावेळी भाजपला शिरपूरमधे एक जागा जिंकता आली होती. शिंदखेडचे भाजप आमदार, माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या मतदारसंघात भाजपला दहापैकी आठ जागा मिळाल्या.

धुळे तालुक्यात प्रभाव असलेले आणि काँग्रेसमधून भाजपमधे आलेले सुभाष देवरे यांनीही आपल्या सुनेला लामकानी गटातून बिनविरोध निवडून आणलंय. काँग्रेसमधे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर कार्यकर्ते विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी देवरे यांच्या कार्यालयासमोर गुलाल उधळायचे. आता भाजपमधे गेल्यावर निकालानंतर कार्यकर्ते देवरे यांच्या पेप्सी कार्यालयासमोर जमून जल्लोष केला.

काँग्रेसमधून आलेले शिवाजी दहिते यांनीही साक्री तालुक्यावरचा आपला प्रभाव अजून कायम असल्याचं सिद्ध केलं. भाजपने इथे १५ पैकी दहा जागा जिंकण्याची कामगिरी केली. धुळ्याच्या विजयाचं श्रेय मीडियाने खासदार आणि माजी मंत्री सुभाष भामरे आणि जयकुमार रावल यांना दिलंय. पण भाजपच्या एकहाती विजयाचे खरे शिल्पकार हे अमरीश पटेल आहेत. धुळ्याचं यश हे एका अर्थाने भाजपच्या मेगाभरतीला आलेलं गोड फळ आहे.

नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यातल्या १० पैकी सात पंचायत समित्यांवर भाजपने एकहाती सत्ता मिळवलीय. यामधे धुळे जिल्ह्यातल्या चारही पंचायत समित्यांचा समावेश आहे.

हेही वाचाः निर्भया: बलात्काऱ्यांचं डेथ वॉरंट ते फाशी दरम्यान काय होणार?

६. नंदूरबारः सत्तेला आधार देण्यासाठी शिवसेना हवी

नंदूरबारमधे गेल्यावेळी एक जागा असलेली भाजप आता २३ वर पोचलीय. दुसरीकडे सत्ताधारी काँग्रेसचं संख्याबळ २९ वरून २३ वर घसरलंय. त्यांच्या हातातली सत्ता गेलीय. शून्यावरून शिवसेना ७ वर पोचलीय. राष्ट्रवादी काँग्रेस २५ वरून तीन वर आलीय. शिवसेनेच्या हातात सत्तेची दोरी आहे. इथे भाजप नेते डॉ. विजयकुमार गावित हे शिवसेनेच्या चंद्रकांत रघुवंशी यांच्यासोबतचे मैत्रीसंबंध वापरून सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

डॉ. गावित यांचे भाऊ शरद गावित हे भाजपमधे गेल्याने राष्ट्रवादीच्या वाट्याला एवढं अपयश आलंय. सहा जिल्हा परिषदांमधे नंदूरबारमधलं अपयश हे राष्ट्रवादीला चिंता आणि चिंतन करायला लावणारं आहे.

नंदूरबारचं काँग्रेसचं सारं राजकारण माणिकराव गावित आणि सुरुपसिंह नाईक या आदिवासी नेत्यांसोबतच बिगर आदिवासी नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्याभोवती फिरायचं. पण यापैकी गावित यांनी आता पक्षाची साथ सोडली. त्यांचा मुलगा भाजपमधे गेलाय. दुसरीकडे रघुवंशी हे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत गेलेत. याचा काँग्रेसला मोठा फटका बसलाय.

हेही वाचाः 

तर वंचितला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं असतं

सिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!

फुलेंनी मुलींची पहिली शाळा भरवलेला भिडेवाडा इतका दुर्लक्षित का?