टीम इंडियाच्या कोचसाठी दोन हजार अर्जांतून सहा नावं शॉर्टलिस्टमधे

१४ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


क्रिकेट वर्ल्डकपमधे टीम इंडियाला फायनलमधे धडक मारता आली नाही. न्यूझीलंडने पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियामधे मुख्य प्रशिक्षकाच्या बदलाची चर्चा सुरु आहे. जाहिरात देऊन अर्जही मागवण्यात आले. जवळपास २००० अर्जातून सहा नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलीत.

वर्ल्डकपमधल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी शोध सुरु झाला. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडे जवळपास २००० पेक्षा जास्त अर्ज आले. सल्लागार समितीनं त्यातली सहा नावं सोमवारी शॉर्टलिस्ट केलीत. सध्याचे कोच रवी शास्त्री यांच्या नावाचाही यात समावेश आहे. या प्रक्रियेला काहीसा उशीर होतोय. त्यामुळे बीसीसीआयनं वेस्ट इंडिजच्या दौऱ्यापर्यंत प्रशिक्षक रवी शास्त्री तसंच इतर कोचिंग स्टाफचा कार्यकाळ वाढवलाय.

कोचसाठी निवड समिती

मुख्य प्रशिक्षक पदासाठी क्रिकेट सल्लागार समिती स्थापन करण्यात आली. कपिल देव त्याचे अध्यक्ष आहेत. माजी मुख्य प्रशिक्षक अंशुमान गायकवाड आणि भारतीय महिला संघाच्या माजी प्रशिक्षक शांता रंगास्वामी यांचाही समावेश आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या नावातून एकाची प्रशिक्षकपदासाठी निवड केली जाईल. पण ही समिती आता वादाच्या भोवऱ्यात सापडीलय.

बीसीसीआयने मुख्य कोचसह सपोर्ट स्टाफसाठीही अर्ज मागवलेत. मुख्य कोच, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, फिजिओथेरेपिस्ट, स्ट्रेंथ एन्ड कंडिशनिंग कोच आणि प्रशासकीय व्यवस्थापक या पदांचा या भरतीमधे समावेश आहे. संबंधित पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ३० जुलै २०१९ पर्यंत अर्ज पाठवायचे होते. २० ऑगस्टपर्यंत नव्या कोचची निवड होणं अपेक्षित आहे.

विराट कोहली काय म्हणतोय

वेस्ट इंडिजच्या दौऱ्याआधी कर्णधार विराट कोहलीनं प्रशिक्षक पदाबाबत आपलं मतं मांडलंय. कोहलीला वाटतंय की रवी शास्त्री कोच असावेत. रवी शास्त्री हे खूप चांगल्या पद्धतीनं टीममधे ताळमेळ साधतात असं त्याला वाटतं. टीममधे रवी शास्त्रींना सन्मान आहे. त्यामुळे ते कोच झाले तर खुप आनंद होईल असं कोहली म्हणाला.

पण बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतलाय. कोच निवडीच्या प्रक्रियेतून विराटला बाजूला केलंय. त्यामुळे यंदा नवा कोच निवडताना विराटच्या पसंतीचा विचार केला जाणार नाही. अनेक दिग्गजही स्पर्धेत आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक कोण? हा उत्सुकतेचा विषय बनलाय. प्रशिक्षकपदाचा हा ‘खेळ’ चुरशीचा असेल हे नक्की. जी नावं शॉर्टलिस्ट करण्यात आलीत त्यात ३ भारतीय तर ३ परदेशातली आहेत.

रवी शास्त्री अजून मैदानात

८० टेस्ट आणि १५० वनडे खेळण्याचा मोठा अनुभव रवी शास्त्रींकडे आहे. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही पातळ्यांवर त्यांनी भारतीय क्रिकेट विश्वावर आपला प्रभाव पाडला होता. क्रिकेटपटू म्हणून निवृत्ती झाल्यावर ते पंधराहून अधिक वर्ष कॉमेंटेटर आहेत. ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. २००७ मधे बांगलादेश दौऱ्यासाठी काही काळ टीम इंडियाचं प्रशिक्षकपद सांभाळलं होतं.

रवी शास्त्री हे २०१४ ते २०१६ या दरम्यान टीम इंडियाचे संचालक होते. २०१७ मधे अनिल कुंबळे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर शास्त्रींची निवड झाली. कॅप्टन कोहलीचा भरभक्कम पाठिंबा शास्त्रींना आहे. कोहली-शास्त्री या जोडगोळीनं टीम इंडियाला टेस्टच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोचवलं. तसंच ऑस्ट्रेलियातही भारतानं टेस्ट सीरिजमधे ऐतिहासिक असा विजय मिळवला होता.

हेही वाचा: टीम इंडियाला यशाचा टीळा लावणारे रवी शास्त्री मैदानावर आल्यावर गो बॅकचे नारे लागायचे

न्यूझीलंडचे कोच माइक हेसनही स्पर्धेत

न्यूझीलंडच्या टीमचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक म्हणून माइक हेसन यांचं नाव घेतलं जातं. ते सध्या कोचच्या स्पर्धेत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली २०१५ मधे न्यूझीलंड वर्ल्डकपच्या फायनलमधे पोचला. सहा वर्ष ते न्यूझीलंडचे कोच होते. २०१८ मधे त्यांचा करार संपला. याआधी हेसन यांनी आयपीएलमधे किंग्ज इलेवन पंजाब संघासाठीही कोच म्हणून काम केलंय.

बीसीसीआयनं आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाला प्रशिक्षण देण्याच्या ज्या अटी घातल्या तसा अनुभव हेसन यांच्याकडे आहे. तसंच टीम इंडियातल्या लोकेश राहुल, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन यासारख्या खेळाडूंसोबत काम करण्याचा अनुभवही हेसन यांच्या गाठीला आहे.

ऑलराऊंडर रॉबिन सिंग

भारताचे माजी ऑलराऊंडर रॉबिन सिंग यांचं नावही शॉर्टलिस्टमधे आहे. त्यांच्याकडे १३६ वनडे आणि एका कसोटी सामन्याचा अनुभव आहे. वनडेत २५.९५ च्या सरासरीनं २३३६ रन्स केलेत. तर ६९ विकेट त्यांच्या नावावर आहेत. रॉबिन सिंग हे २००७ ते २००९ पर्यंत टीम इंडियाचे फिल्डिंग कोच होते. फिल्डिंग कोच असताना टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वात २००७ ला पहिलावहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता.

अनेक वर्ष ते आयपीएलमधल्या मुंबई इंडियन्स संघाचे असिस्टंट कोचही आहेत. तसंच कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत बार्बाडोस ट्रायडेंट्स संघाचे कोच होते. 

वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स

फिल सिमन्स हे वेस्ट इंडिजचे माजी ऑलराऊंडर आहेत. सिमन्स यांनी झिम्बाब्वेच्या टीमसाठी कोच म्हणून काम केलंय. आयर्लंडच्या टीमलाही मजबूत करण्याचं काम त्यांनी केलंय. काही काळ वेस्ट इंडिजच्या टीमलाही मार्गदर्शन केलं. त्यामुळे वेस्ट इंडिज हा ट्वेन्टी-20 वर्ल्डकप विजेता ठरला.

अफगाणिस्तानच्या टीमसाठीही कोच म्हणून जबाबदारी पार पाडलीय. सिमन्स यांच्याकडे २६ टेस्ट आणि १४३ वनडेंचा अनुभवही आहे. फिल सिमन्स कोच असताना आयर्लंड आणि अफगाणिस्तानने चांगली कामगिरी केली होती.

हेही वाचा: स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट

ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी

मूडी हे ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलराऊंडर आहेत. १९९९ मधे ते वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन टीमचा भाग होते. ऑस्ट्रेलियातल्या वेस्टर्न वॉरियर्स टीमचे कोच म्हणून त्यांनी काम केलंय. तसंच ते इंग्लंडच्या वूस्टरशायर काऊंटी क्रिकेटचे संचालक होते. कॅरेबियन प्रीमिअर लीगचे आंतरराष्ट्रीय संचालक आणि ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेतल्या मेलबर्न रेनेगेड्स टीमचेही ते संचालक होते.

आयपीएलमधल्या सनरायझर्स हैदराबाद टीमचेही कोच होते. जवळपास सहा वर्ष त्यांच्याकडे हे पद होतं. २०१६ मधे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सनरायझर्स टीम आयपीएलचा जेता ठरला. टॉम मूडी हे कॉमेंट्रीसुद्धा करतात. त्यांना क्रिकेटमधल्या बारीकसारीक गोष्टींची उत्तम जाण आहे. त्यामुळे त्यांचं नाव शॉर्टलिस्टच्या यादीत आहे. 

लालचंद राजपूत पुन्हा रिंगणात

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांनीही अर्ज केलाय. ५७ वर्षांच्या राजपूत यांच्याकडे २ टेस्ट आणि ४ वनडेचा अनुभव आहे. याआधी त्यांनी अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन टीमचं प्रशिक्षकपद सांभाळलंय.

२००७ मधे टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तेव्हा राजपूत हे कोच होते. मे महिन्यापासून राजपूत झिम्बाब्वे टीमच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत आहेत. कॅनडात नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-ट्वेंटी लीग स्पर्धेत विजेत्या विनीपेग टीमचे ते कोच होते. टीम इंडियाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचा अनुभवही त्यांच्याकडे आहे.

फील्डिंग कोचसाठी या नावांची चर्चा

दुसरीकडे, फील्डिंग कोचसाठी मुंबई इंडियन्सचे माजी कोच तसंच दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू राहीलेले जॉन्टी रोड्स यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्यासोबतच न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग, वीवीएस लक्ष्मण, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग, तसंच दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कालीस यांचीही नावं चर्चेत आहेत.

हेही वाचा: 

आज डावखुऱ्यांचं उजवेपण समजून घेण्याचा दिवस

मुंबईचा श्रेयस अय्यर टीम इंडियात चौथ्या नंबरची जागा घेईल?

आपल्याला वर्षही मोजता येणार नाहीत एवढा जुना पोपट सापडलाय

मिशन मंगल सिनेमातल्या त्या ५ महिला वैज्ञानिक आहेत तरी कोण?