२०१४ला पंजाबमधल्या अजनाला शहरातल्या एका विहिरीत काही मानवी सांगाडे आढळून आले होते. पंजाब सरकारने त्याचा अभ्यास करण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञ जे. एस. सेहरावत यांच्या नेतृत्वात एक रिसर्च टीम तयार केली. हे मानवी सांगाडे १८५७ला ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांचे असल्याचं या नव्या संशोधनातून समोर आलंय. अतिशय क्रूर पद्धतीने या सैनिकांना संपवण्यात आल्याचं या अभ्यासावरून कळतंय.
अजनाला पंजाबमधलं शहर. पंजाबचं दुसरं मोठं शहर असलेल्या अमृतसरपासून २५ किलोमीटरवर असलेलं. या शहरातल्या एका गुरुद्वारामधे एक जुनी विहीर होती. या विहिरीला लोक 'कालियाँ वालां कुआँ' म्हणायचे. २८ फेब्रुवारी २०१४ला इथं उत्खनन झालं. त्यावेळी या विहिरीतून २००पेक्षा अधिक मानवी सांगाडे बाहेर काढले गेले.
१९४७ला भारत-पाकिस्तान फाळणी झाली. त्यावेळी झालेल्या हिंसेत बळी गेलेल्यांचे हे सांगाडे असावेत असं काही इतिहासकारांचं त्यावेळी म्हणणं होतं. 'फ्रंटियर्स इन जेनेटिक' या जगप्रसिद्ध जर्नलनं २६ एप्रिलला या संदर्भातला एक रिसर्च प्रकाशित केलाय. १८५७ला ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या उठावात मारल्या गेलेल्या २४६ भारतीय सैनिकांचे हे सांगाडे असल्याचं हा रिसर्च सांगतोय.
हेही वाचा: पुण्याचे पेशवे: किती होते? कोण होते? कसे होते?
१७५७मधे ईस्ट इंडिया कंपनीनं बंगाल नेटिव इन्फ्रंट्री बटालियनची स्थापना केली. या बटालियनमधे पूर्व भारतातल्या वेगवेगळ्या भागातल्या सैनिकांना घेतलं जायचं. १८५७पर्यंत या बंगाल नेटिव इन्फ्रंट्रीच्या ७४ रेजिमेंट तयार झालेल्या होत्या. प्रत्येकामधे ८०० सैनिक, १२० हवालदार, २० सुभेदार आणि जमादार असायचे. तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ ब्रिटिश अधिकारी असायचे.
१८५७च्या बंडावेळी फ्रेडरिक कूपर या ब्रिटिश अधिकाऱ्याकडे अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरपदाची जबाबदारी होती. कूपर यांनी 'द क्रायसिस इन द पंजाब, फ्रॉम टेंथ ऑफ मे अनटील द फॉल ऑफ दिल्ली' नावाचं पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी गोमांस आणि डुकराचं मांस लावलेल्या काडतुसांविरोधात लाहोरमधल्या सैनिकांनी कसं आंदोलन केलं होतं याचा उल्लेख केलाय. त्या संघर्षातून एका ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती.
अधिकाऱ्याची हत्या केल्यावर हे सैनिक लाहोरमधून पंजाबच्या दिशेनं पळाले. पंजाबच्या अजनाला इथं त्यांना पकडलं गेलं. १०-१० सैनिकांना बोलावून त्यांना रांगेत उभं करून कसं संपवलं गेलंय याचं वर्णनही कूपर यांनी आपल्या पुस्तकात केलंय. पंजाबच्या अजनालामधे सापडलेले मानवी सांगाडे या २८२ बंडखोर सैनिकांचे होते. पुढं कुठला उठाव होऊ नये म्हणून ते मृतदेह विहिरीत टाकल्याचा उल्लेखही कूपर यांच्या पुस्तकात आढळतो. या पुस्तकाचा संदर्भ इंडियन एक्सप्रेसच्या एका लेखात वाचायला मिळतो.
पंजाबच्या अजनालामधे २०१४ला हे मानवी सांगाडे आढळून आले. पण त्यासाठी वापरलेली पद्धत ही अशास्त्रीय होती. त्यामुळे तत्कालीन पंजाब सरकारनं पंजाब युनिवर्सिटीचे मानववंशशास्त्रज्ञ जे. एस. सेहरावत यांच्या नेतृत्वात एक रिसर्च टीम तयार केली. लखनौच्या 'बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेवोसायन्स', बनारस हिंदू युनिवर्सिटी, हैदराबादमधल्या 'सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉडेक्यूलर बायोलॉजी' याचीही यात मदत झालीय.
या सांगाड्यांच्या वेगवेगळ्या भागांचा या टीमने अभ्यास केला. यात दात, हाताची हाडं, जबड्याचा भाग, पाठीचा कणा, हात आणि पायाची बोटं, कवटी यांचा समावेश होता. या संशोधनासाठी त्यांनी विशेषकरून दातांचे नमुने अभ्यासले. हाडांच्या तुलनेत दातांची कुजण्याची किंवा विघटनाची क्षमता फार कमी असल्याचं या संशोधकांचं म्हणणं होतं. त्यासाठी विहिरीतून ९,६४६ दातांचे नमुने आढळून आले. आजपर्यंतच्या पुरातत्व उत्खननातलं हे दातांचं सगळ्यात मोठं सॅम्पल असल्याचं टीमचे प्रमुख जे. एस. सेहरावत यांनी इंडियन एक्सप्रेसला म्हटलंय.
५० दातांच्या सॅम्पल घेऊन त्याची डीएनए टेस्ट करण्यात आलीय. तर ८५ दातांच्या सॅम्पलचं विश्लेषण आयसोटोप पद्धतीनं करण्यात आलं. म्हणजेच या सैनिकांनी केलेल्या आहाराचं विश्लेषण करण्यात आलंय. दातांमधे जे खाण्याचं सॅम्पल मिळालंय त्यावरून हा अंदाज लावण्यात आलाय.
हेही वाचा: पानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं?
उत्खननात आढळून आलेल्या सांगाड्यांपैकी बहुतेक लोक सर्व प्रकारचा आहार घेत होते. महत्वाचं म्हणजे दातांमधे जे खाण्याचं सॅम्पल मिळालंय त्यावरून अशाप्रकारचे नमुने हे किनारपट्टी भागात आढळून येतात असं या संशोधनात म्हटलंय. या सैनिकांच्या आयुष्याच्या शेवटच्या १० वर्षांमधे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती केली असावी असाही एक निष्कर्ष या संशोधनातून पुढे आलाय.
अजनालामधे हे मानवी सांगाडे आढळून आल्यामुळे या व्यक्ती तिथल्याच असाव्यात असा एक कयास बांधण्यात येत होता. तसंच भारत-पाकिस्तान फाळणीवेळी मारली गेलेले हे लोक होते असाही एक अंदाज बांधला जात होता. पण हे सैनिक गंगेच्या मैदानी भागातले विशेषतः उत्तरप्रदेश, बिहार, बंगालमधले असल्याचं मानववंशशास्त्रज्ञ जे. एस. सेहरावत यांचं म्हणणं आहे.
अजनालामधे अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी थेट ऐतिहासिक संदर्भ तपासायचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी ब्रिटिश सैन्याच्या नेटिव बंगाल इन्फ्रंट्री बटालियनमधली भर्ती ओरिसा, बंगाल, मेघालय, बिहार, ईशान्य भारत आणि किनारपट्टी राज्यातून झाल्याचं निरीक्षण नोंदवलंय. सांगाड्यांवरून त्यांचं सर्वात जवळचं भौगोलिक स्थानही भारताच्या पूर्वेकडच्या म्हणजे गंगेच्या मैदानी भागातलं असल्याचं स्पष्ट होतंय.
डीएनएचं विश्लेषण केल्यावर या सैनिकांचं वय हे २१ ते ४९ दरम्यान असल्याचं आढळून आलंय. पॉईंट ब्लँक रेंजमधून या सैनिकांच्या भुवयांच्या मधोमध गोळी झाडण्यात आली. त्याआधी त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले होते. तसंच अतिशय क्रूर पद्धतीने या सैनिकांना संपवलं गेल्याचं त्यांच्या हाडांच्या अभ्यासावरून कळतंय.
या सैनिकांना दफन करण्याऐवजी त्यांना थेट विहिरीत टाकण्यात आलं. अनेक ठिकाणी फॅक्चर आढळून आलंय. ब्रिटिशांच्या क्रूर इतिहासाची साक्ष देणारा हा सगळा घटनाक्रम आहे. पंजाबच्या अजनालामधल्या या संशोधनातून हा इतिहास समोर येतोय. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून अधिक अभ्यास करता येणं शक्य आहे.
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने लोकांसमोर येतोय. या सैनिकांची नावं कळावीत म्हणून इंग्लंडमधल्या संशोधकांशी बोलणं सुरू केल्याचं जे. एस. सेहरावत यांनी 'द क्विंट'ला म्हटलंय. त्यासाठी ब्रिटिश दूतावाशीही संपर्क केला जातोय.
हेही वाचा:
पेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा
भीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय?
बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?
पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?
नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?