स्मॉग टॉवर: हवा प्रदूषण रोखणारं पर्यायी मॉडेल

२७ ऑगस्ट २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


दिल्लीच्या स्मॉग टॉवरची सध्या देशभर चर्चा होतेय. हिवाळ्यामधे दिल्ली धूळ-धुराने माखलेली असते. हवेच्या प्रदूषणामुळे हे राजधानीचं शहर जगातलं टॉपचं प्रदूषित शहर बनलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं स्मॉग टॉवरचं मॉडेल दूषित हवेवर प्रक्रिया करून स्वच्छ हवा लोकांपर्यंत पोचवेल. यानिमित्ताने हवा प्रदूषणामुळे जीव कोंडलेल्या दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येईल.

स्वित्झर्लंडची 'आयक्यू एयर' ही प्रदूषणावर काम करणारी संस्था आहे. दरवर्षी ही संस्था जगभरातल्या वेगवेगळ्या देशांचा 'हवेचा गुणवत्ता निर्देशांक' जाहीर करत असते. यावर्षीच्या रेटिंगनुसार प्रदूषणामधे जगातल्या ५० पैकी शहरांपैकी ३५ शहरं भारतातली आहेत. तर जगातल्या सगळ्यात प्रदूषित राजधानीमधे दिल्ली शहर मागची तीन वर्ष टॉपला आहे.

संस्थेनं केलेल्या अभ्यासातून या हवेच्या प्रदूषणामुळे २०२० मधे दिल्लीत ५४ हजार मृत्यू झाल्याचं समोर आलंय. तसंच दिल्लीकरांमधे फुफ्फुसाशी संबंधित आजारही मोठ्या प्रमाणात वाढतायत. लॉकडाऊन आणि इतर प्रयत्न करूनही दिल्लीचं प्रदूषण  कमी झालेलं नाही. त्यामुळेच त्याची दखल दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला वेळोवेळी घ्यावी लागलीय.

'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन' अर्थात डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक वर्षी हवेच्या प्रदूषणामुळे जगभरात ८० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. यातले १२ लाख भारतीय असतात. दिल्लीकरांना या हवेच्या प्रदूषणाचा फटका सगळ्यात जास्त बसतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरमधे तर दिल्ली धूर-धुळीने माखलेली असते. या प्रदूषित हवेलाच स्मॉग म्हणतात.

हेही वाचा: जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट

एअर प्यूरिफायरचं मोठं वर्जन 

प्रदूषित हवा म्हणजेच स्मॉग दोन प्रकारे तयार होत असल्याचं 'द क्विंट'च्या एका लेखात वाचायला मिळतं. पहिलं म्हणजे पीएम १० ते पीएम २.५ या धुळीमुळे तयार झालेल्या हवेतल्या कणांनी. आणि दुसरं म्हणजे नायट्रोजन ऑक्साइड, ओझोनमुळे. पीएमचा आकार २.५ आणि १० मायक्रॉन एवढा असतो. ते इतके लहान असतात की ते आपल्या नजरेला दिसत नाहीत. हे कण अगदी सहजपणे नाकातून शरीरात जातात. फुफ्फुसावर परिणाम करतात. वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो.

धुळीच्या कणांना घराबाहेर ठेवण्याचं काम एअर प्यूरिफायर करत असतात. घरी एखादी व्यक्ती अस्थमा किंवा श्वसनाच्या इतर कोणत्या कारणाने आजारी असेल तर हल्ली घरच्या घरी एअर प्यूरिफायर बसवले जातात. हवेला स्वच्छ करणारी ही मशीन असते. या प्यूरिफायरमधे हेपा फिल्टर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. खोलीतली हवा या मशीनमधे ओढली जाते. आणि लगेच बाहेरही सोडली जाते.

स्मॉग टॉवर हा एअर प्यूरिफायरच असतो. पण त्याचा आकार मोठा असतो. त्याचं कामही तसंच असतं. प्रदूषित कण स्मॉग टॉवरपर्यंत पोचल्यावर त्यांना आतल्या आत प्रक्रिया करून स्वच्छ केलं जातं. हवा शोषण्यासाठी म्हणून त्यात एअर फिल्टर बसवला जातो. हा एअर फिल्टर हवा शोषल्यावर स्वच्छ हवा वातावरण सोडतो.

भारतातला पहिला स्मॉग टॉवर

२३ ऑगस्टला दिल्लीच्या कनॉट प्लेस भागात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशातल्या पहिल्या स्मॉग टॉवरचं उद्घाटन केलं. त्यासाठी २० कोटी इतका खर्चही आलाय. दिल्लीतल्या वाढत्या हवेच्या प्रदूषणाचा विचार करून जानेवारी २०२० ला सर्वोच्च न्यायालयाने दोन टॉवर उभे करायचे आदेश केजरीवाल सरकारला दिले होते.

कनॉट प्लेसमधला हा टॉवर 'टाटा प्रोजेक्ट लिमिटेड' या कंपनीने आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली आणि अमेरिकेच्या मिनेसोटा युनिवर्सिटीच्या सहकार्याने बनवलाय. पुढची दोन वर्ष आयआयटीच्या दोन्ही संस्था वेगवेगळ्या ऋतू काळात स्मॉग टॉवर कसं काम करतो त्याचा अभ्यास करतील. 'राष्ट्रीय जैवइंधन समन्वय समिती' आणि 'दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळ' यांची या योजनेत महत्वाची भूमिका आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका रिपोर्टनुसार, २००९ पासून दिल्लीत पीएम १० मधे २५८ ते ३३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचं आढळून आलंय. तर दिल्लीच्या आसपासच्या भागात पीएम २.५ चे कण मोठ्या प्रमाणात आढळून आलेत.

हेही वाचा: `आरे, ऐका ना` हा हॅशटॅग ट्रेंड होण्यामागे अशी गडबड सुरूय

दिल्लीतला टॉवर नेमका कसाय?

दिल्लीतला स्मॉग टॉवर २४ मीटर उंच आहे. यात ४० पंखे असतात. यातून प्रत्येक सेकंदाला १ हजार क्यूबिक मीटर हवा स्वच्छ करून बाहेर सोडली जाईल. टॉवरच्या आजूबाजूच्या ७०० मीटर परिसरातली हवा स्वच्छ करून बाहेर सोडायची क्षमता यात असल्याचं या प्रोजेक्टचे प्रमुख डॉ. अनवर अली खान यांचं म्हणणं आहे.

या टॉवरमधले फिल्टर आणि पंखे अमेरिकेवरून मागवण्यात आलेत. टॉवरच्या २४ मीटर उंचीवर दूषित हवा शोषली जाते. फिल्टर झालेली हवा ही टॉवरच्या तळाशी सोडली जाते. हे अंतर जमिनीपासून १० मीटरवर असतं. १० मायक्रॉन किंवा त्यापेक्षा मोठे कण यामधे अडकतात.

दिल्लीच्या स्मॉग टॉवरमधे हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून एक यंत्रणा बसवण्यात आलीय. त्याने हवेचं तापमान, वेग, हवेची दिशा तपासली जाते. तसंच पीएम २.५, पीएम १० कणांची पातळी नेमकी कितीय हेसुद्धा त्यामुळे समजतं. त्यासाठी टॉवरवर एक बोर्डही बसवण्यात आलाय.

जगातला मोठा स्मॉग टॉवर

चीनमधली बीजिंग आणि सियॉन ही शहरं गेली कित्येक वर्ष हवा प्रदूषणाला तोंड देतायत. यातलं बीजिंग हे तर चीनचं राजधानीचं शहर. या शहरांमधे दोन 'स्मॉग टॉवर' बसवण्यात आलेत. २०१७ ला बीजिंगमधे पहिला टॉवर हा नेदरलँडच्या डॅन रुजगार्ड यांनी बनवला.

चीनच्या सियॉन शहरातला 'स्मॉग टॉवर' जगातला सगळ्यात मोठा टॉवर आहेत. त्याची उंची १०० मीटर इतकी असून प्रत्येक दिवशी यातून १० मिलियन क्यूबेक मीटर इतकी हवा स्वच्छ करून बाहेर पडते. ६ चौरस किलोमीटर क्षेत्रामधे पीएम २.५ १९ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं आढळून आलंय.

बीजिंगमधल्या टॉवरची खासियत म्हणजे इथं हवेच्या शुद्धीकरणावेळी तयार होणाऱ्या कार्बन कचऱ्यावरही प्रक्रिया करता येते. धुराच्या बारीक कणांमधून खडे तयार केले जातात. ज्यांचा वापर रिंगसारख्या वस्तू तयार करताना केला जात असल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसच्या एका लेखात वाचायला मिळते.

हेही वाचा: 

प्लॅस्टिकमुक्त भारताचं स्वप्न कसं शक्य होणार?

आपट्याच्या पानांना नको, प्रथेलाच ऑप्शन हवा

‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!

अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात? 

पुणे, नाशिकमधे आलेला पूर म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली शिक्षाच