तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ

०८ मे २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


शेती आणि औद्योगिक क्रांतीनंतरची सगळ्यात मोठी क्रांती म्हणून जगभरात डिजिटल यूग अवतरतंय. या क्रांतीचा मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होतोय. एवढंच नाही तर माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही डिजिटल यंत्राच्या मदतीने कंट्रोल मिळवण्याचा खटाटोप सुरू आहे. डिजिटल युगातल्या माणसाच्या वाटचालीचा हा वेध.

माणसाच्या इतिहासात दोन मुख्य क्रांती झाल्या. भटका आदिमानव शेती करायला लागला ही पहिली, शेतकी क्रांती आणि शेती पशुपालन करणार्‍या मानवाला यंत्रांचा, ऊर्जेचा, कारखान्यांचा शोध लागला ही दुसरी, औद्योगिक क्रांती. या दोन्ही क्रांतींचा मानवी समाजावर, त्याच्या जीवनमानावर, नातेसंबंधांवर कमालीचा आणि दूरगामी परिणाम झाला. मानवी आयुष्य आमूलाग्र बदललं. शेतकी क्रांती साधारणत: बारा हजार वर्षांपूर्वी झाली. तिचा परिणाम दोनेकशे वर्षांपूर्वीपर्यंत राहिला. औद्योगिक क्रांती दोनेकशे वर्षांपूर्वी झाली, तिचा परिणाम म्हणून आजचं जग आपल्या भोवती आहे.

तिसऱ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर

सध्या आपण तिसर्‍या विलक्षण क्रांतीच्या उंबरठ्यावर आहोत. माणसाच्या आयुष्यात तिसरी क्रांती, ‘डिजिटल क्रांती’ घडतेय. आपण ती घडवून आणत आहोत. ही क्रांती शेतकी आणि औद्योगिक क्रांतीइतकीच व्यापक, दूरगामी आणि महत्त्वाची असेल, अशी लक्षणं दिसताहेत.

पन्नासेक वर्षांपूर्वी लागलेल्या ‘मायक्रोचिप’च्या शोधाने या क्रांतीची सुरवात झाली. ‘सिलिकॉन’ या पदार्थाच्या बोटभर किंवा नखभरही लांबीच्या तुकड्यात माहिती साठवण्याची, त्यावर प्रक्रिया करण्याची, गणितं आणि कोडी सोडवण्याची क्षमता माणसानं निर्माण केली आणि तिथून डिजिटल क्रांतीची सुरवात झाली.

संगणकापासून मोबाईलपर्यंत आणि आपल्या घरातल्या स्मार्ट इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून यंत्रमानवांपर्यंत सर्व आधुनिक उपकरणं, यंत्रं निर्माण करणं हे या मायक्रोचिपमुळे शक्य झालंय. या ‘डिजिटल’ उपकरणाचं आपल्या आयुष्यातलं अस्तित्व, वापर आणि महत्त्व प्रचंड वेगानं वाढत आहे. याचा आपल्या आयुष्याच्या बहुसंख्य आयामांवर कमालीचा परिणाम होतोय. डिजिटल युगामुळे माणूस बदलतोय!

हेही वाचाः आहे रे, नाही रे, हीच डिजिटल युगाचीही भाषा

माहितीचं झटपट दळणवळण

जगभरातल्या कोणत्याही घटनेची बातमी, घटना घडत असतानाच क्षणार्धात उपलब्ध होऊ लागलीय. ती बातमी जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात राहून मिळवता येणं शक्य झालंय. कोणत्याही घटनेची, विषयाची किंवा व्यक्तीची माहिती सहजपणे शोधणं आणि तपासणं शक्य झालंय. बातम्या आणि माहितीच्या प्रसाराच्या वेगामुळे आणि उपलब्धतेमुळे कोणतीही घटना किंवा माहिती दडवणं, लपवणं अशक्य होत जाणार आहे. 

माणसाच्या संपूर्ण इतिहासामधे, जगभर सगळीकडेच, ज्ञानाची निर्मिती आणि वितरण हे मूठभर लोकांच्या हातामधे एकवटलेलं असायचं. सर्वसामान्य माणसाला ज्ञान मिळवण्याचा अधिकार तरी नसायचा किंवा उपलब्धता नसायची. इंटरनेटमुळे संपूर्ण जग हे एक खुलं ज्ञानभांडार झालंय. जगातल्या कुणालाही कोणत्याही विषयामधलं शिक्षण मिळवणं सहज शक्य झालंय. हे ज्ञानभांडार दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध, अधिकाधिक खुलं होतंय. ज्याला जे हवं ते, हवं तेव्हा जाणून घेण्याचा, शिकण्याचा अधिकार आणि संधी डिजिटल युगामधे उपलब्ध झालीय.

आता बौद्धिक कामंही यंत्राच्या ताब्यात

औद्योगिक क्रांतीनंतर शारीरिक कष्टाची कामं यंत्रं करायला लागली. डिजिटल क्रांतीनंतर बौद्धिक कामंही यंत्रं करायला लागलीत. साध्या साध्या आकडेमोडीपासून प्रचंड किचकट गणितं सोडवण्यापर्यंतची कामं संगणक करतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात होणार्‍या प्रगतीमुळे, महाकाय माहितीचं विश्‍लेषण करून निष्कर्ष काढणं आणि निर्णय घेण्याचं कामही यंत्रंच करतील, अशी शक्यता निर्माण झालीय. 

रोबोटिक्स क्षेत्रामधल्या प्रगतीमुळे अंगमेहनतीची, कौशल्याची किंवा जोखमीची कामं करण्यासाठी अनेक प्रकारचे यंत्रमानव तयार होऊ लागलेत. यंत्रमानवांच्या प्रकारांमधे आणि ते करत असलेल्या कामांमधे वाढच होत जाण्याची अफाट शक्यता आहे. शारीरिक आणि बौद्धिक अशी दोन्ही प्रकारची कामं नसलेला माणूस नेमका कसा असेल, कसा वागेल हे सांगता येणं अशक्य आहे!

हेही वाचाः सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही

वर्च्युअल नातीगोती

डिजिटल युगाने माणसांना संवाद साधण्यासाठी नवी व्यासपीठं दिली आहेत. प्रत्यक्ष कधीही न भेटणार्‍या, न भेटू शकणार्‍या, जगभर विखुरलेल्या माणसांना एकमेकांशी संवाद साधणं शक्य झालंय. स्वतःची माहिती, स्वतःचे फोटोज, स्वतःचं काम, स्वतःचे विचार, अशी स्वतःविषयी बहुसंख्य माहिती लोक सोशल मीडियावर प्रकाशित करताहेत. यातून माणसं एकमेकांना वर्च्युअली जोडली जाताहेत.

एकमेकांच्या विचारांवर ऑनलाईन चर्चा करताहेत, वाद घालताहेत, भांडतही आहेत. कधीही न भेटलेल्या माणसांशी फक्त त्यांचं वेर्च्युअल प्रोफाईल बघून मैत्री झाल्याने त्यांच्याशी लोक तासंतास ‘चॅटिंग’ करताहेत. माणसं खर्‍या नात्यांइतकं किंबहुना त्याहून जास्त महत्त्व लर्च्युअल नात्यांना द्यायला लागलीत. इतक्या मोठ्या प्रमाणावर घडणारी ‘वर्च्युअल नाती’ ही मानवी इतिहासात प्रथमच होत असलेली घटना आहे. याचा आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होईल, हे आजघडीला कुणालाच माहीत नाही.

इन्स्टंट युगातला शारीरिक, मानसिक बदल

डिजिटल क्रांतीमधल्या माणसांमधे काही लक्षणीय शारीरिक बदल होताहेत. जगभर सर्वत्र लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, पाठीचे आजार, डोळ्यांची कमजोरी यांचं प्रमाण वेगानं वाढत चाललंय. बदलती जीवनशैली, अतिताण, बैठं काम, एकटेपणा, व्यसनाधीनता यांच्यासारख्या गोष्टींमुळे होणार्‍या मानसिक किंवा मनोशारीरिक आजारांचं प्रमाणही भन्नाट वेगानं वाढतंय. डिजिटल क्रांतीमधल्या माणसाच्या शरीरात नेमके काय, कोणते आणि किती बदल होतील, याची कल्पना करणं अशक्य आहे.

डिजिटल युग हे ‘इन्स्टंट’चं युग आहे. जी माहिती पाहिजे ती क्षणार्धात मिळायला पाहिजे. जी वस्तू किंवा सेवा पाहिजे ती क्षणार्धात ऑर्डर करता आली पाहिजे. जे सांगायचंय ते तातडीनं सांगता यायला हवं. ज्याच्याशी बोलायचंय त्याच्याशी लागलीच बोलता यायला हवं. जे समाधान हवं ते क्षणार्धात मिळायला हवं, असं हे सारं तातडीचं, लागलीचं, क्षणार्धातचं युग आहे. त्यामुळे आपल्यातला ‘पेशन्स’ हा या युगाचा पहिला बळी आहे!

कोणाचीही कशाहीसाठी थांबायची, वाट बघायची तयारी नाही. एखादं बी पेरल्यावर त्याचं झाड होऊन त्यापासून फळ यायला वेळ लागतो, कष्ट करावे लागतात, वाट बघावी लागते, हा नैसर्गिक नियम आपण विसरत चाललोय. बी पेरल्याक्षणी फळ येण्याची अपेक्षा करायला लागलोय.

हेही वाचाः डिजिटल युगातही गवर्न्मेंट प्रिंटिंग प्रेसकडे पुढच्या दहा वर्षांचं काम

नव्याने बॉर्डर आखण्याची तयारी

माणसाला सीमारेषा आखून, त्या सीमारेषेच्या आतल्या इतरांसोबत गट करून राहायला आवडतं. शेतकी क्रांतीनंतर गावकूस ही सीमारेषा होती. गावकी ही मानवता होती. औद्योगिक क्रांतीनंतर गावांची शहरं आणि शहरांची राष्ट्रं झाली. शहराराष्ट्रांच्या सीमारेषा आखून माणसं त्यात नांदायला लागली. डिजिटल क्रांतीमुळे या भौगोलिक सीमारेषा पुसल्या जाताहेत.

जगभरातलं कुणीही, कुणाशीही कनेक्ट होऊ शकत असल्याने, विचारांची देवाणघेवाण करू शकत असल्याने, वच्युअल नातं जोडू शकत असल्याने, भौगोलिक सीमारेषा कालबाह्य ठरताहेत. लवकरच पूर्णपणे पुसल्याही जाऊ शकतील. संपूर्ण जग हे एक एकसंध खेडं बनेल, बनू शकेल. सगळ्या मानव जातीची एकच गावकी असेल, असू शकेल.

पण माणूस हा इतका साधासरळ प्राणी नाही! आपल्याला सीमारेषा आवडतातच. डिजिटल युगात भौगोलिक सीमारेषांऐवजी वैचारिक सीमारेषा घातल्या जाताहेत. धर्म, पंथ, लिंग, जात, वर्ण या पारंपरिक भेदभावांच्या सीमारेषा नव्या डिजिटल रूपात आपल्यासमोर येताहेत. समधर्मी, समपंथी, सजातीय, सवर्णीय लोकांच्या नव्या वर्च्युअल टोळ्या तयार केल्या जाताहेत. या टोळ्यांना एकमेकांविरुद्ध भडकवलं जातंय. भांडणं केली जाताहेत.

माणसांमधल्या सीमारेषा नव्यानं आखल्या जाताहेत. माणसाचा हजारो वर्षांचा रक्तरंजित इतिहास बघता हे नवं विभाजन, हे सीमारेषांचं नव्यानं आखणं फार काही शांततामय मार्गानं होईल याची लक्षणं नाहीत.

हेही वाचाः १५० वर्षांपूर्वी २०० शोध लावणारे, भारताचे एडिसन शंकर आबाजी भिसे

माणसाचा निसर्ग बनण्याचा, बदलण्याचा खटाटोप

डिजिटल युग आलंय, हे सत्य आहे. या युगामुळे माणूस बदललाय, बदलतोय हेही सत्य आहे. हे युग कोणत्या दिशेला जाईल अन् यामुळे आपण अजून किती बदलू याचं भाकीत करणं केवळ अशक्य आहे. डिजिटल युगामुळे झालेले काही बदल अफाट सकारात्मक आहेत. आणि काही बदल अफाट नकारात्मक, कदाचित विनाशकारीही आहेत.

शेतकी क्रांतीनंतर आपण जगभर जंगलं तोडून शेती केली. जगभरात पाणी अडवलं, वळवलं, आपल्या मानवजातीसाठी वापरलं, तरीही आपण बरेचसे निसर्गाशी तद्रुप जीवन जगत राहिलो. औद्योगिक क्रांतीनंतर मात्र आपण जगभर खाणी खणल्या, त्यातून धातू काढून यंत्रं बनवली. जगभरातली जंगलं तोडून, तेलखाणी खणून, निसर्ग ओरबाडून, तथाकथित समृद्ध, आधुनिक आयुष्य जगायला लागलो. आपल्या निसर्गदत्त किंवा उत्क्रांत झालेल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण हे केलं.

डिजिटल क्रांतीमधे हे दोन्ही आहेच, वर आपली बुद्धिमत्ता, विचारक्षमताही निर्जीव वस्तूंमधे कोंबून, विचार आणि काम निर्जीव वस्तू करतील असं करून, आपल्याला अत्यंत सुखदायी, आरामात लोळत जगता येईल, असं जग निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतोय.

आपण स्वतः निसर्ग बनण्याचा आणि निसर्गाला बदलण्याचा प्रयत्न करतोय. निसर्गामधे खरोखर योग्य ते बदल करण्याची क्षमता आपल्यात असेल, तर इथे आपण स्वर्ग निर्माण करू शकू आणि नसेल तर हे सगळं भस्मसात करणारा भस्मासूर आपण बनू. आपण काय करतोय, याचा सारासार विचारही करण्याची क्षमता पुढच्या पिढ्यांमधे राहील का, हे माहीत नाही.

कारण विचार करणंही आपण लवकरच डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ.

हेही वाचाः 

डाटाची माती करुया चला!

आयपॉड क्रांतीची सतरा वर्षं

फेसबूकचं भाजपशी झेंगट आहे का?

बॅननंतरही टिक टॉक वाजतं जोरात

(लेखक हे ओपनसोर्स टेक्नॉलॉजीमधे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत.)