गेल्या चारेक महिन्यात कोरोना जगभर फिरून आला. त्यामुळं गेला महिनाभर सारं जग कुलुपबंद आहे. चीनच्या वुहान शहरातून लॉकडाऊनची सुरवात झाली. पण चीननं काही अख्खा देश लॉकडाऊन केला नाही. ज्या देशानं पहिल्यांदा अख्खा देश लॉकडाऊन केला तेच आता सर्वात आधी लॉकडाऊनमुक्त झालेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे भारतातला लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार होता. पण भारतातली गंभीर स्थिती पाहता लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आलीय. आता ३ मेपर्यंत संपूर्ण भारत लॉकडाऊन असणार आहे. भारताप्रमाणेच कोरोनाची लागण झालेल्या जवळजवळ सगळ्याच देशांनी लॉकडाऊन जाहीर केलाय.
बीबीसीच्या एका इंग्रजी बातमीनुसार, जगातल्या १०० देशांनी अख्खा देश किंवा देशातल्या काही भागात लॉकडाऊन लागू केलाय. यात आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिकेतल्या देशांचा समावेश आहे.
लॉकडाऊन म्हणजे देशातली सगळी हॉटेलं, खासगी आणि सार्वजनिक वाहतुक सेवा, दुकानं, शाळा, ऑफिस, थिएटर, मॉल्स, नाट्यगृह, बागा सगळं सगळं बंद ठेवायचं. लोकांनी कमीतकमी एकमेकांच्या संपर्कात यायचं. काही आवश्यक कारणासाठी संपर्कात यायची गरज असेल तर फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजेच शारीरिक अंतर पाळायचं, अशी स्थिती. असं केल्यानं कोरोनाचे नवे पेशंट तयार होत नाहीत आणि आधीच लागण झालेल्या पेशंटची संख्या मर्यादित होऊन त्यांच्यावर उपचार करणं सोपं जातं. थोडक्यात, संपूर्ण देशाला कोरोनाची लागण होऊ द्यायची नसेल तर लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय आहे, असं डब्लूएचओनंही सांगितलंय.
ही गरज ओळखून जगातल्या अनेक सरकारांनी आपला संपूर्ण देश किंवा देशातले काही भाग लॉकडाऊन केलेत. त्यातल्या बऱ्याचशा देशात लॉकडाऊन यशस्वी झालं. कोरोनाचे नवे पेशंट तयार होणंही कमी झालंय. म्हणूनच हे देश आता हळूहळू लॉकडाऊन शिथिल करतायत. येत्या महिन्याभरात संपूर्ण लॉकडाऊन बंद करून हे देश पुन्हा पुर्ववत होतील, अशी आशा आहे.
हेही वाचा : एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
लॉकडाऊन लागू करणारा पहिला देश म्हणजे चीन. डिसेंबरच्या अखेरीस चीनमधे कोरोना या नव्या वायरसचे पेशंट सापडू लागले. हा नवा वायरस कोण, कुठला, तो कसा आला हे कळायच्या आधीच त्याची लागण झालेले अनेक लोक देशातल्या वेगवेगळ्या भागात गेले होते.
‘डेली एक्सप्रेस’च्या वेबसाईटवर उपलब्ध बातमीनुसार, चीनमधल्या ज्या शहरात हा वायरस सापडला ते वुहान शहर चीन सरकारने सगळ्यात पहिले म्हणजे २३ जानेवारी २०२० ला लॉकडाऊन केलं. त्यानंतर काही दिवसांनी राजधानी बीजिंगवरही मर्यादा घालण्यात आल्या. ही दोन शहरं जवळजवळ २ महिने लॉकडाऊनमधे ठेवल्यानंतर मार्चमधे चीनमधे कोरोनाचे नवीन पेशंट तयार होणं थांबलं. त्यानंतर या दोन शहरांवरचा लॉकडाऊन काढून टाकण्यात आला.
लॉकडाऊनमधे देशातले सगळे उद्योगधंदेसुद्धा बंद ठेवले जातात. लोकांना कामावर जायला बंदी घातली जाते. महत्त्वाचं म्हणजे बाजारपेठा बंद पडतात आणि वस्तूंची खरेदी विक्री थांबते. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं फार मोठं नुकसान होतं. म्हणूनच चीनप्रमाणेच अमेरिकेनंही देशातल्या थोड्याच भागात लॉकडाऊन घोषित केलाय. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अमेरिकेतल्या अनेक राज्यांनी हॉटेल्स आणि क्लब बंद ठेवले होते. पण अमेरिकेतली परिस्थिती चिघळत गेली तसं लॉकडाऊनाच्या अटी कडक करण्यात आल्या.
बिझनेस इन्सायडर या वेबपोर्टलवरच्या बातमीनुसार, सध्या अमेरिकेतल्या २२ राज्यात लोकांना घरी राहण्याचे आदेश दिलेत. अमेरिकेतली ४९ टक्के लोकसंख्या सध्या घरी बसलीय. तर उरलेल्या काही राज्यात फारसे महत्त्वाचे नसणारे उद्योग बंद केले गेलेत. पण अमेरिकेने अजूनही संपूर्ण लॉकडाऊन केलेला नाही.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
युरोपियन देशांनी मात्र अमेरिकेचा कित्ता गिरवलेला दिसत नाही. अनेक युरोपियन देशांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मार्चच्या सुरवातीलाच लॉकडाऊन जाहीर केला होता. संपूर्ण देशात कडक लॉकडाऊन जाहीर करणारा डेन्मार्क हा युरोपमधला पहिला देश होता. लॉकडाऊन करून कोरोना वायरसचा प्रादुर्भावावर या देशानं नियंत्रण मिळवलं. आणि आता लॉकडाऊन शिथिल करण्याची घोषणा करणारा युरोपातला पहिला देश डेन्मार्कच आहे.
१५ एप्रिलपासून डेन्मार्कमधल्या शाळा आणि लहान मुलांचे डे केअर सेंटर म्हणजे पाळणाघरं सुरू झालीत. शिवाय, तिथं येणाऱ्या मुलांनीही योग्य ते सोशल डिस्टसिंग पाळावं यासाठी तिथल्या शिक्षकांना ट्रेनिंग देण्यात आलंय, अशी माहिती डेन्मार्कच्या द लोकल या स्थानिक न्यूजपोर्टलवर देण्यात आलीय.
डेन्मार्कच्या पावलावर पाऊल ठेवत ऑस्ट्रियानंही लॉकडाऊन संपवण्याची घोषणा केलीय. १४ एप्रिलपासून देशातली सगळी दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आलीय. पण खरेदी करताना सोशल डिस्टसिंग पाळणं आणि मास्क घालणं बंधनकारक असल्याचं सांगितलं गेलंय. मॉल्स आणि थिएटर १ मे नंतर उघडले जातील तर उरलल्या सगळ्या गोष्टी, हॉटेल्स आणि क्लबना १५ मे नंतर उघडून देशातला लॉकडाऊन संपवला जाईल.
हेही वाचा : लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनानं सगळ्यात जास्त हाहाकार इटली आणि स्पेनमधे माजवला होता. तिथले अनेक पेशंट मृत्यूमुखी पडले होते. आता मृत्यूतांडव थांबवल्यानंतर ऑस्ट्रियाप्रमाणेच या दोन देशांमधेही लॉकडाऊन कमी केल्याची बातमी बातमी बीबीसीनं दिलीय. १३ एप्रिलपासून स्पेनमधले काही उद्योगधंदे विशेषतः कारखाने चालू करण्यात आलेत. कारखान्यात जाण्यासाठी स्पॅनिश नागरिक रेल्वे स्टेशनवर गेले होते, तेव्हा काही पोलिस तिथं फ्री मास्क वाटत होते. ऑफिसेस अजूनही बंद ठेवलेत.
इटलीतला लॉकडाऊन संपूर्णपणे ४ मेला संपेल. मात्र, लहान मुलांच्या कपड्यांची आणि पुस्तकांची दुकानं १४ एप्रिलपासून चालू झालीयत. प्रयोग म्हणून ही दुकानं चालू ठेवल्याचं तिथल्या सरकारचं म्हणणं आहे. मात्र उत्तर इटलीतल्या काही राज्य सरकारांनी अजूनही सगळं काही बंद ठेवण्याचेच आदेश दिलेत.
इस्टर संडे या ख्रिश्चन लोकांच्या सणानंतर युरोपियन युनियन मधल्या अशा काही देशांनी आपापल्या देशातला लॉकडाऊन शिथिल केलाय. यात जर्मनी आणि चेक रिपब्लिक या देशांचाही समावेश होतो. पण लॉकडाऊन कमी करण्याआधी त्यांच्या देशातला कोरोनाग्रस्तांचा आकडा, नव्याने लागण होणाऱ्या पेशंटची संख्या, मृतांचा आकडा या सगळ्याची खात्री करण्यात आलीय. शिवाय, लॉकडाऊननंतर नागरिकांनाही कोणती खबरदारी घ्यावी लागेल याची माहिती देण्यात आलीय.
विशेष म्हणजे, एकदम सगळ्या देशातला लॉकडाऊन कमी करण्याऐवजी हळूहळू एकेएक गोष्ट उघडली जातेय. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांसोबतच महाराष्ट्रातही २० एप्रिलपासून लॉकडाऊनमधून काही जिल्ह्यांना, उद्योगधंद्यांना सूट देण्याच्या हालचाली सुरू आहेत. सध्याच्या घोषणेनुसार, महाराष्ट्र आणि भारतही ३ मे नंतर लॉकडाऊनमुक्त होईल, अशी आशा आहे.
हेही वाचा :
ग्रेट लॉकडाउन: जागतिक महामंदीपेक्षा वाईट आर्थिक मंदी
कोलंबसने नेलेल्या साथरोगांनीच संपवली मूळ अमेरिकी संस्कृती
बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल
अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी
क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती खाण्याची अक्कल कुठून येते?