बंदसम्राट जॉर्ज फर्नांडिस यांच्याविषयीच्या इंटरेस्टिंग गोष्टी

३० जानेवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


जॉर्ज फर्नांडिस गेले. मंगळुरूमधे जन्मलेला हा नेता मुंबईचा सम्राट बनला. नंतर बिहारमधून निवडणुका जिंकून हरून त्यांनी देशाच्या राजकारणावर ठसा उमटवला. जॉर्ज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते ठरले. मतं देताना मतदारांनी आणि टीका करताना विरोधकांनीही त्यांचा धर्म पाहिला नाही, इतके ते धर्मनिरपेक्ष होते. पण भाजपच्या नादी लागल्याने शेवटी ते कुणाचेच उरले नाहीत.

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी दिल्लीत निधन झालं. समाजवादी नेते, कामगार चळवळीतील नेता, एका आवाजावर ६०च्या दशकात मुंबई बंद करायची ज्याच्या शब्दांत ताकद होती, तीन दशकांहून अधिक काळ देशाच्या राजकारणात सक्रीय सहभाग अशी त्यांचे राजकीय, सामाजिक जीवनाचे विविध पैलू आहेत.

धर्मगुरूऐवजी बनले धर्मनिरपेक्ष

कट्टर काँग्रेस विरोधक म्हणूनही त्यांची ओळख होती. ३ जून १९३० ला कर्नाटकातल्या मंगलोर इथे त्यांचा जन्म झाला. घरातली लोक त्यांना धर्मगुरू, पाद्री होण्याचा आग्रह करत होते. पण जॉर्ज मुंबईला आले. कामगार पुढारी झाले. धर्मनिरपेक्ष विचारांसाठी लढले. कालांतराने जॉर्ज संयुक्त समाजवादी पक्षात दाखल झाले. १९६०च्या दशकात त्यांनी मुंबईत कम्युनिस्ट कामगार चळवळ उभी केली.

वैयक्तिक अत्यंत साधी राहणी, प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व, संवादाची उत्तम हातोटी, उत्कृष्ट भाषण शैली, रक्तात मुरलेला समाजवादी दृष्टीकोन यातून त्यांची कामगारांवर प्रचंड छाप पडली. एवढंच नाही तर मंत्री झाल्यावरही ते स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचे.

संघर्षाने उभं केलेलं नेतृत्व

प्रतिकूल परीस्थितीत प्रचंड संघर्ष करून जॉर्ज फर्नांडिस यांनी आपलं व्यक्तिमत्व उभं केलं. एक संपूर्ण पिढी त्यांचा संघर्ष आणि वाटचाल पाहत, अनुभवत मोठी झालीय. आदराने ही पिढी त्यांचा उल्लेख एकेरीने करते. भारतात असे बोटावर मोजण्याइतके नेते असतील ज्यांचा उल्लेख लोक आदराने एकेरी करतात.

संरक्षण मंत्री असतानाही बिन इस्त्रीच्या पायजमा शर्टमधे वावरणारा, मोठे कपाळ, जाड चष्मा आणि आपल्या साध्या राहणीमानातून जॉर्ज प्रभाव पाडत. त्यांच्या या व्यक्तिमत्वाची अनेकांना भुरळ पडली.

हेही वाचाः वीपी सिंग : मंडल आयोगासाठी पंतप्रधानपद पणास लावणारा नेता

पण वाजपेयींसोबत का गेले?

समाजवादी विचारांची पक्की बैठक असलेला हा नेता जातीच्या, धर्माच्या राजकारणाचा कट्टर विरोधक. पण अटल बिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारमधे सामील झाल्याने त्यांच्यावर खूप टीका झाली. जॉर्ज अनेक वर्ष एनडीएचे निमंत्रक होते. कट्टर काँग्रेसविरोधामुळे हे घडलं. पण त्याचा अतिरेक केल्याची टीका त्यांच्यावर झाली.

जॉर्ज यांच्या वैचारिक परिवर्तनाचे अनेक पदर साऱ्या देशाने पाहिले. त्यावर उलटसुलट चर्चा, तर्ककुतर्कही लावले गेले. परस्पर विरोधी भूमिका घेण्यात जॉर्ज यांचा हातखंडा होता. आपल्या विक्षिप्त वागण्यानेही जॉर्ज नेहमीच चर्चेत राहिले. अनेक मोठंमोठी पदं त्यांच्याकडे चालत आली. आणि आपल्य अगम्य भूमिकेमुळे त्यांनी ती पदं गमावलीदेखील.

अनेक चढउतारांचं मोठं करियर

जनता पक्षात असताना मधु लिमये यांच्यासोबत दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा नको तितका ताणून धरताना पक्ष फुटला आणि सरकारही पडलं. कुठपर्यंत ताणायचं याचं भान त्यांना शेवटपर्यंत आलं नाही. मोरारजी देसाई सरकारला समर्थन देताना लगेच दुसऱ्या दिवशी त्याविरुद्ध मतदानही केलं. मंत्री म्हणून समर्थन तर कार्यकर्ता म्हणून विरोधात मतदान केलं, असं त्यांचे त्यावर स्प्ष्टीकरण होतं, ज्याचा आजही कुणाला नीट उलगडा झाला नाही.

असं अजबगजब पद्धतीचं त्यांचं वागणं होतं. त्यामुळेच राष्ट्रीय राजकारणात त्यांच्याकडे कायम संशयाने पाहिलं गेलं. ‘याचा काहीही भरवसा नाही’ हीच भावना त्यांच्याबद्दल कायम राहिली. पण त्यांच्या अशा वागण्यातच त्यांचं राजकीय यशापयश दडलेलंय.

१९६७ मधे दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री स. का. पाटील या राजकारणात बडं प्रस्थ असलेल्या नेत्याचा पराभव करून जॉर्ज प्रकाशझोतात आले. १९७४ मधे रेल्वे कामगार युनियनचे नेते झाले. भारताच्या इतिहासातल्या एकमेव रेल्वे संपाचं नेतृत्व जॉर्ज यांनी केलं.

हेही वाचाः अनंत कुमारः उत्तर दक्षिणेला जोडणारा दुवा

तुरुंगातून लढवली निवडणूक

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधातला आवाज जोर पकडत होता. त्याच दरम्यान आणीबाणी लागू झाली. जॉर्ज  कट्टर कॉंग्रेसविरोधी असल्याने त्यांनी आणीबाणीस विरोध केला. त्याबद्दल त्यांना कारावासही झाला. आणीबाणीनंतर १९७७ मधे जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली.

तुरुंगातून निवडणूक लढवत तीन लाखांहून अधिक मताधिक्याने ते बिहारच्या मुजफ्फराबाद मतदारसंघातून निवडून आले. साऱ्या देशाचं लक्ष तेव्हा त्यांनी वेधून घेतलं. काँग्रेसेतर उमेदवार तेव्हा क्वचित इतक्या मताधिक्याने निवडून येत. मोरारजी देसाईंच्या सरकारमधे जॉर्ज उद्योग मंत्री झाले.

हेही वाचाः जयंतराव साळगावकरः स्वप्नं पाहणारा आणि प्रत्यक्षात आणणारा बापमाणूस

मंत्री बनले, रेल्वे आणली

आणीबाणी संपल्यावर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. समाजवाद्यांचं जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं. त्याला जनसंघाचीही साथ होती. भारतीय समाजाकडे पाहण्याचा जनसंघ आणि समाजवादी नेत्यांचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. पण इंदिरा विरोधामुळे दोन कट्टर विरोध सोबत आले. ही सोबत फार काळ टिकली नाही. जनसंघाचं सदस्यत्व घ्याची की जनता पक्षाचं या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्यावरून जनता पक्षात फाटाफूट झाली. त्याची अनेक शकलं झाली.

या फाटाफुटीत जॉर्ज चौधरी चरणसिंग यांच्या जनता दल एसमधे गेले. काही काळाने जनता दलात गेले. वी. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री झाले. कोकण रेल्वे कोकणातून मंगलोरपर्यंत नेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. नंतरच्या काळात त्यांनी १९९४ मधे ‘समता पार्टी’ हा नवा पक्ष स्थापन केला.

साधारण ८०च्या दशकानंतर बिहार हेच त्यांच्या राजकीय कामाचं क्षेत्र राहिलं. १९९६ मधे अनेक आघाड्यांची सत्ता स्पर्धा सुरु झाली. त्यात जॉर्ज हे विरोधी बाकावर राहिले. १९९८ मधे मध्यावधी निवडणुका झाल्या अन् जॉर्ज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाले. त्या सरकारमधे ते संरक्षणमंत्री झाले. २००१ मधे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने काही काळ ते मंत्रीपदापासून दूर होते.

लढवय्या नेत्याचा शोकात्म शेवट

२००४ पासून जॉर्ज विरोधी पक्षात राहिले. त्यानंतर आपल्याच पक्षातल्या नव्या पिढीचे नेते नितीशकुमार यांच्यासोबत त्यांचा संघर्ष झाला. नितीशकुमार यांच्या हातात पक्षाच्या राजकारणाची सारी सूत्रं गेली. शेवटी त्यांना स्वत:च्याच जनता दल संयुक्त या पक्षात निर्वासितासारखं जीवन वाट्याला आलं. २००९ मधे त्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही. मग ते अपक्ष लढले आणि पराभूत झाले.

जॉर्ज यांच्या एकूण राजकीय प्रवासाबद्दल एका वाक्यात सांगायचं तर त्यांचा राजकीय प्रवास संपला नाही आणि त्यांना मुक्काम देखील सापडला नाही.

जॉर्ज सारखा कडवा समाजवादी, धर्मनिरपेक्ष नेता भाजपच्या गोटात का सामील झाला असेल? भाजपाच्या हिंदुराष्ट्राचा त्यांनी कधी पुरस्कार केला नाही, की निव्वळ सत्तेच्या लालसेपायी ते एनडीएमधे गेले असंही दिसलं नाही. जॉर्जनी एनडीएची पालखी खांद्यावर घेताना आगामी काळाची राजकारणाची दिशा काय असेल, महत्त्वाचे मुद्दे काय असतील, या सगळ्यांकडे काँग्रेस विरोधापायी दुर्लक्ष केलं. म्हणजेच तत्व, व्युहरचना अशा पातळ्यांवर जॉर्ज यांचा पराभव झाला आणि त्यातच या लढवय्या कामगार नेत्याचा शोकात्म शेवट झाला.

हेही वाचाः 

गाडगेबाबा जसे दिसले तसे, सांगताहेत त्यांचे ड्रायवर 

सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही

प्रमोद महाजनांनी मोदींना भाजप हायजॅक करू दिला असता?

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)