मतदान केंद्र, मतदार याद्या, वोटर स्लीप यांच्या अडचणी सोडवा डिजिटली

२१ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज सोमवार, २१ ऑक्टोबर. विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झालं. हे मतदान महाराष्ट्र आणि हरयाणात होतंय. मतदान केलं नसेल तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपण मत करू शकतो. पण मतदानाला जाताना आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागेल. आणि प्रॉब्लेम असला तरी तो आपण घरबसल्या सोडवू शकतो.

२०१८ वर्ष संपत असताना भविष्याचा वेध मीडियातून घेतला गेला. त्यावेळी २०१९ हे वर्ष लोकशाहीच्या महमहोत्सवाचं असेल असं म्हटलं गेले. अर्थात हे निवडणूक वर्ष असल्यामुळे लोकांकडून लोकशाही साजरी केली जाणारच. आज आपल्या महाराष्ट्रात आणि हरयाणात विधानसभा निवडणुकीसाठीच मतदान सुरू आहे.

दिवाळी अगदी तोंडावर आलीय. पण यंदा दिवाळीच्या उत्साहापेक्षा वातावरण निवडणूकमय आहे. आपण मतदानाकडे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीप्रधान देशातला लोकशाहीचा उत्सव म्हणून बघतो. आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरवात झाली पण मतदानाला थंड प्रतिसाद मिळतोय अशा बातम्या आल्या. पण दुपारपर्यंत चित्र बदललं. मतदानासाठी लोकांच्या रांगाच रांगा लागल्या. मुंबई, पुण्यात तर म्हाताऱ्या आजी, आजोबा मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. दिवाळीची सुट्टी असल्यामुळे कॉलेजात शिकणारे आरामात का होईना पण मतदानाला गर्दी करतायत.

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार?

महाराष्ट्रात २८८ जागांसाठी मतदान होतंय. तर हरयाणात ९० जागांसाठी. महाराष्ट्रात एकूण ३ हजार २३७ उमेदवार रिंगणात उभे आहेत. पण नेहमीप्रमाणे पुरुषांचीच मक्तेदारी दिसून येतेय. कारण महिला उमेदवार फक्त २३६ आहेत.

पक्षानुसार किती उमेदवार उभे आहेत? हा प्रश्न आपल्याला पडतो. कारण आपण पक्षांनुसारच उमेदवारांचा विचार करतो. तर बहुजन समाज पार्टीचे २६२, भारतीय जनता पार्टीचे १६४, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे १६, मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ८, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे १४७, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १०१, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १२१,  शिवसेनेचे १२६, इतर स्थानिक नोंदणीकृत पक्षांचे ८९२ आणि अपक्षांचे १४०० उमेदवार आहेत.

हेही वाचा: येत्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कुणाला देणार कौल?

गोंदियामधे सगळ्यात जास्त मतदान

महाराष्ट्रातल्या १२ कोटी ४३ लाख २६ हजार लोकसंख्येपैकी ८ कोटी ९७ लाख २२ हजार ०१९ मतदार आहेत. पण या सगळ्यांनीच काही आपलं मतदार यादीत आपलं नाव नोंदवलेलं नाही. त्यामुळे वोटर आयडी कार्ड असलेले ८ कोटी ६८ लाख ७४ हजार ५११ लोक आहेत. याचा अर्थ २८ लाख ४७ हजार ५०८ लोकांनी मतदार यादीत नाव नोंदवण्यात उदासीनता दाखवली.

निवडणूक आयोग निवडणुकांचं आयोजन एक एक वर्ष आधी करत असतात. त्यासाठी मतदारांना जागृत करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. आताही लोकांनी बाहेर पडून मतदान करण्यासाठी अनेक माध्यमांमधून आवाहन केलं जातंय. तरी दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात साधारण ३१ टक्के मतदान झालं. तर हरयाणात साधारण ३३ टक्के. महाराष्ट्रत सगळ्यात जास्त मतदान गोंदियामधे ४०.४१ टक्के एवढं झालं. तर सगळ्यात कमी मतदान ठाण्यात २२.८९ टक्के एवढं झालं.

हेही वाचा: नरेंद्र मोदींची शेवटची प्रचारसभा रंगली नाहीच

मतदानाला जाताना काय काळजी घ्याल?

मतदान करण्याची वेळ अजून टळली नाही. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदान करताना आपण काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सेलिब्रेटींचे सेल्फी बघून आपल्यालाही सेल्फी काढावासा वाटेल. पण केंद्राच्या बाहेर ५० मीटरनंतर सेल्फी घेता येईल. तसंच केंद्रात मोबाईल घेऊन जाऊ शकतो. पण मोबाईलचा वापर करता येणार नाही. तो स्विच ऑफ किंवा सालेंटवर करून ठेवावा लागेल.

केंद्रापासून १०० मीटरपर्यंतचा परिसर संवेदनशील असतो. त्यामुळे गाडी पार्क करायला मनाई आहे. अडचण असल्यासा काही वेळासाठी गाडी उभी करायची असेल तर आपण पोलिसांची परवानगी घेऊ शकतो. तसंच केंद्राजवळ घोळका करून उभे राहण्याचीसुद्धा परवानगी नाही.

निवडणूक आयोगाकडून आलेली स्लीप नेल्यास तुमचं यादीतलं नाव शोधणं सोप्पं होईल. याबरोबर वोटर आयडी कार्ड किंवा इतर कोणतंही सरकारी आयडी घेऊन जाऊ शकतो. यात पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी कंपनी किंवा विभागाचा आयडी, बँक किंवा टपाल खात्याचं पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचं स्मार्टकार्ड, मनरेगाचा आयडी, कामगार विभागाच्या आरोग्य विम्याचे स्मार्टकार्ड, पेन्शनकार्ड, खासदार किंवा आमदारांनी दिलेला आयडी किंवा आधारकार्ड इत्यादी कोणताही आयडी नेता येतील.

हेही वाचा: आपण तरुणांनी मतदान करताना काय विचार करायला पाहिजे? 

डिलिटली सोडवा प्रॉब्लेम

मतदानाच्या दिवशी बरेच गोंधळ होतात. मशिन बिघण्यापासून ते आपलं यादीतलं नाव न मिळणं किंवा यादीच बदलणं वगैरे. यंदाही अशा तक्रारी आल्या. ६५ ईवीएम मशिन बिघडल्याचं समजलं. तर प्रत्येक मतदार केंद्रात नाव सापडत नाही म्हणून तात्कळत उभी राहणारी व्यक्ती आपण बघितली असेल. किंवा यापूर्वी आपल्याबरोबरही असं घडलं असेल. जर आपल्याला निवडणूक आयोगाची स्लीप मिळाली नसेल तर काय कराल?

आपण बसल्या बसल्यासुद्धा मतदान स्लीप मिळवू शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या वोटर आयडी कार्डाचा नंबर ८८२२२८८२२२ या नंबरवर वॉट्सअॅप करायचा आहे. आणि आपल्याला आपली वोटर स्लीप मिळेल. तसंच ही प्रक्रिया http//wa.me/918822288222 या लिंकवरही करता येईल. त्याचबरोबर आपलं नाव आणि मतदान केंद्र तपासण्यासाठी http//103.23.150.139 या लिंकचा वापर करता येईल.

हेही वाचा: 

या तीन लेखिका जग गाजवत आहेत

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय?

पाली भाषा आणि साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळे

भारतीय बाजारपेठेत चायना मालावर बंदी, पण वर्च्युअल बाजारपेठेचं काय?