कोरोना वायरसनं जगाला दिलेले शब्द

०६ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोरोना वायरसनं एक नवं जग निर्माण केलंय. या जगात क्षणाक्षणाला नव्यानव्या गोष्टी घडताहेत. रोज नवी माहिती समोर येतेय. तसं नवंनवे शब्द कानावर पडताहेत. त्यात इंग्रजी शब्द अधिक आहेत. यातले काही शब्द तर आपल्या रोजच्या वापरात रुळलेत. कोरोना काळात जन्मला आलेल्या मुलांसाठीही एक शब्द सध्या खूप चर्चेत आलाय.

सध्या जिकडे बघावं तिकडे कोरोना वायरसचीच चर्चा आहे. दोनेक महिन्यापासून एकही दिवस असा नसेल ज्यादिवशी कोरोना वायरस हा शब्द कानावर पडला नसेल. म्हाताऱ्या कोताऱ्यांपासून अगदी बोबडे बोल बोलणाऱ्या छोट्या पोरांच्या तोंडात हा शब्द हमखास आहे. शिवाय या वायरसविषयी असलेली भीती हा त्यातला एक भाग आहेच म्हणा! पण या निमित्ताने इंग्रजीतले बरेच मोठंमोठे शब्द माणसांच्या रोजच्या व्यवहाराचा भाग झालेत. सध्या या शब्दांची चर्चा आहे.

पँडेमिक

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अर्थात डब्ल्यूएचओने ११ मार्चला कोविड १९ ला पँडेमिक म्हणजेच जागतिक साथीचा रोग म्हणून घोषित केलं. याला महामारी असंही म्हटलं जातंय. आजार एखाद्या देशापुरता मर्यादित असतो तेव्हा त्याला एपिडेमिक असं म्हणतात. चीनचं वूहान हे शहर सध्याच्या कोरोना वायरसचं मूळस्थान आहे. हा वायरस सातत्याने जगभरात वेगाने वाढतोय. वायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळं त्याचं स्वरूपही जागतिक आहे.

२००९ मधे एच१ एन१ हा वायरस जगभर वाढलेला होता. हा स्वाईन फ्ल्यू या नावानं ओळखला जातो. यालाही डब्ल्यूएचओने साथीचा रोग म्हणून घोषित केलं होतं. डब्ल्यूएचओने २०१० मधे एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं. त्यात उष्णतेच्या काळात साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचं म्हटलंय.

हेही वाचाः पीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला?

क्वारंटाइन

एखाद्या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांच्या फिरण्याला प्रतिबंध करणं याला क्वारंटाइन म्हणतात. याचा उद्देश एखाद्या आजाराचा संसर्ग रोखणं हा आहे. बाहेरून कोणती व्यक्ती आली असेल आणि त्याबद्दल संशय असेल तर त्या व्यक्तीला वेगळं ठेवलं जातं. व्यक्तीसोबतच शहरं, सार्वजनिक ठिकाणं यांनासुद्धा क्वारंटाइन करता येतं.

सध्या कोणी कोरोनाचा संशयित रुग्ण असेल तर त्याला १४ दिवसांसाठी वेगळं ठेवलं जातं. त्या व्यक्तीपासून इतरांना होणारा संसर्ग रोखणं हा यामागचा उद्देश असतो. ज्या ज्या भागात कोरोनाचे संशयित रुग्ण सापडताहेत असे भागही सध्या क्वारंटाइन करण्यात येत आहेत. सध्या आपल्या मुंबईत कोरोनाचा वाढता धोका ओळखून काही वस्त्यांना असं क्वारंटाइन करण्यात आलंय.

वेगवेगळ्या देशांचे क्वारंटाइनबाबत स्वतःचे असे काही नियम आणि कायदेही आहेत. शिवाय अमेरिका आणि युरोपात रोगामुळे संसर्ग झालाय अशा व्यक्तींना घरी क्वारंटाइन करून त्याच्या दारावर तशी नोटीस लावली जाते. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात झाडं आणि प्राण्यांनाही गरजेनुसार क्वारंटाइन केलं जातं.

कोरोनियल

#Coronial हा शब्दही सध्या ट्विटरवर बराच ट्रेंडिंगमधे आहे. कोरोना वायरस जगभर पसरत असताना त्याचा धोका लक्षात घेवून अनेकांचं 'वर्क फ्रॉम होम' सुरुय. आता वेळ मिळालाय तर काही जोडपी सेक्सही करतील. मुलंही जन्माला घातली जातील. या ९ महिन्यांच्या काळात जन्मलेल्या बाळाला 'कोरोनियल' म्हटलं जाईल. अशा मुलांसाठी हा शब्द वापरला जातोय. मुलांची नाव काय ठेवायची यावरच्या याद्याही सध्या वायरल होताहेत.

हेही वाचाः तबलीगने भारतात कोरोना पसरण्याचा कट केलाय का?

सोशल डिस्टन्सिंग

सोशल डिस्टन्सिंगला मराठीत सामाजिक अंतर ठेवणं असं म्हटलं जातं. सध्या हा बराच चर्चेत असणारा शब्द आहे. थोडक्यात काय तर साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी परक्या व्यक्तीपासून अंतर राखणं. आपल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, 'सोशल डिस्टन्सिंग ही संसर्गजन्य रोग रोखण्याची ही एक आरोग्यदायी पद्धत आहे. याचा हेतू रोगाचा प्रसार रोखण्यासाठी तसंच याचा संसर्ग झालेल्या लोकांमधला संपर्क कमी करणं हा आहे. यामुळे रोगाचा प्रादुर्भाव आणि त्यातून होणारे मृत्यू टाळण्यास मदत होईल,' असं म्हटलंय.

लोकांपासून एक मीटरचं अंतर राखून संपर्क करणं, कोणत्याही कारणाशिवाय घरातून बाहेर न पडणं शिवाय हस्तांदोलन किंवा मिठी न मारणं या सगळ्या गोष्टी यात येतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सोशल डिस्टन्सिंग हा शब्दप्रयोग न करता फिजिकली डिस्टन्सिंग म्हणजेच शारीरिक अंतर हा शब्द वापरात आणलाय.

हेही वाचाः सोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग!

लॉकडाऊन

अमेरिका, पाकिस्तान, दक्षिण कोरिया यासारख्या बोटावर मोजता येईल अशा देशांचा अपवाद वगळल्यास साऱ्या जगच टाळेबंद झालंय. या टाळेबंदीलाच आपण लॉकडाऊन म्हणतो. भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पिरिअड लागू करण्यात आलाय. लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक ठिकाणं बंद करून आपण जिथं आहोत तिथंच थांबणं अपेक्षित आहे.

या काळात फक्त जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात येते. लॉकडाऊनच्या काळात आपला सामाजिक वावर बंद केला जातो. कोरोना वायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या कडक निर्बंधात याच पालन केलं जातंय. गरज भासल्यास पोलिसी बळाचा वापरही केला जातोय.

कोविड १९

कोरोना या वायरसमुळे झालेल्या रोगाचं नाव आहे कोविड-१९. आपण ज्या कोरोनाचा पेशंट म्हणतोय, तो मुळात कोरोनाचा नाही तर कोविड-१९ चा पेशंट आहे. कोरोना हे वायरसचं नाव आहे. तर कोविड १९ चं पूर्ण नाव कोरोना वायरस डिसीज २०१९ असं आहे. कोरोनाचा को, वायरसचा वि आणि डिसीजचा डी मिळून कोविड १९ हे नाव ठेवण्यात आलंय.

कोरोना वायरसचा संसर्ग झालेली पहिली व्यक्ती डिसेंबर २०१९ मधे सापडली. त्यामुळे याला कोविड १९ असं नाव देण्यात आलं. २००२ मधे आलेल्या कोरोना कुटुंबातला सार्स वायरस आला होता. तर आपण ज्याला कोरोना वायरस म्हणतो त्याचं शास्त्रीय नाव हे SARS-CoV-19 असं ठेवण्यात आलंय.

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

आपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

कोरोनाचा आर्थिक फटका भारताला बसणार नाही, असं यूएन का म्हणतंय?

सेल्फ आयसोलेशन

व्यक्तीला इतरांपासून पूर्णपणे दूर करणं याचा अर्थच आयसोलेट करून ठेवणं. संसर्ग झालेल्या लोकांपासून असणारा धोका टाळण्यासाठी 'सेल्फ आयसोलेशन' महत्वाचं आहे. कोरोना वायरस ज्या झपाट्याने पसरतोय त्याचा विचार करून बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत हा मार्ग अवलंबला जातोय. रोग प्रतिकार क्षमता कमी असलेल्या व्यक्तींना अशा संसर्गाचा धोका अधिक असतो. अशांनी वेळीच स्वतःला आयसोलेट करण्याची गरज असते. असं करणं हा इन्फेक्शनपासून बचाव करण्याचा एक हुकमी मार्ग आहे.

फ्लॅटनिंग द कर्व

मागच्या काही दिवसांमधे Flattening the curve हा शब्द ट्रेंडिंगमधे होता. कोरोना वायरस हा दिवसेंदिवस वाढतोय. याचं वाढणारं प्रमाण विचारात घेऊन डब्ल्यूएचओला हा साथीचा रोग म्हणून घोषित करावं लागलं. म्हणजेच हा रोग एकाच वेळी बर्‍याच देशांमधे पसरतोय. अमेरिका, इटलीसारख्या देशांमधे घटना झपाट्याने वाढतोय. या वाढणाऱ्या घटना हा वाढता वक्र आहे. या संसर्गजन्य रोगाचा प्रसार कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हा वाढीचा वेग अर्थात हा वक्र सपाट करणं.

हा वाढता वक्र इन्फेक्शनचं वाढणारं प्रमाण दाखवत असतो. सध्याच्या स्थितीत कोरोनाचा वाढत्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तो एका पातळीवर आणणं महत्वाचा आहे. हा वक्र एका पातळीवर येणं म्हणजे लोकांनी खबरदारी घेणं, सरकार जे काही सांगतय त्या गोष्टी फॉलो करणं. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्य सुविधांवर भर देणं आवश्यक आहे. या सगळ्या प्रक्रियेला 'फ्लॅटनिंग द कर्व' असं म्हटलं जातं.

इन्क्युबेशन

कोणत्याही वायरसचा माणसांना संसर्ग होतो तेव्हा संसर्ग होऊन त्याची प्रत्यक्ष लक्षणं दिसेपर्यंत बराच काळ जातो. यालाच इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतात. कोरोनाची लक्षणं दिसायला २ ते १४ दिवसांचा काळ जावा लागतो. यामुळेच कोरोना संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. कोरोना बाधिताच्या संपर्कात एखादी व्यक्ती नकळत येऊ शकते. अशा संशयित व्यक्ती शोधायला, त्या व्यक्तीपर्यंत पोचायला बराच काळ गेलाय. अशा व्यक्ती शोधणं लक्षणं दिसेपर्यंत अवघड असतं. कारण तोपर्यंत त्या व्यक्ती नॉर्मल असतात.

हेही वाचाः 

एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?

आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

पंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे

दिल्लीच्या तबलिगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?

कोरोनानं कांद्याचा बाजार बंद झाला, मग शेअर बाजार बंद का होत नाही?