इंदिरा संत यांची कविता एकाचवेळी स्वतःशी आणि जगाशी बोलते

०४ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज ४ जानेवारी. कवयित्री इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. इंदिरा संत यांचे एकूण १४ काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांकडे एकाचवेळी अनेक अंगांनी पाहता येतं. मानवी मनाच्या खोल खोल भावनांंचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटत असतं. त्यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या काही खास कविता.

आज इंदिरा संत यांची १०६ वी जयंती. ४ जानेवारी १९१४ ला जन्मलेल्या इंदिरा संत यांचं कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातल्या इंडी हे जन्मगाव. कोल्हापूर बेळगाव मार्गावरल्या ‘तवंदी’ या गावात त्यांचं बालपण गेलं. बेळगावच्या लहेजात सगळे त्यांना ‘आक्का’ म्हणायचे. आक्का म्हणजे मोठी बहीण. नावाप्रमाणे खरोखरच मोठं झाल्यावर साहित्यातली आक्का झालेल्या इंदिरा संत यांची आज जयंती.

इंदिरा संत यांच्या नावावर शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, मृण्मयी, चित्कळा, गर्भरेशमी, वंशकुसुम, निराकार असे एकूण १४ काव्यसंग्रह आहेत. त्यांच्या प्रत्येक कवितेत निसर्गाचं वर्णन दिसतं. खरंतर निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून इंदिरा संतांनी नेहमी माणसाची भावनिक अवस्था आपल्या कवितेत मांडलीय.

कवितांचं म्युझिकल इंटरप्रिटेशन

सामाजिक कार्यकर्ते मोहन देस यांनाही इंदिरा संत यांच्या कविता फार आवडतात. त्यांच्या काही निवडक कवितांना त्यांनी स्वतः चाली लावल्या आहेत. या कवितेला चाली लावताना, त्या गाताना कवितेचे वेगवेगळेच अर्थ उलगडत जातात, असं मोहन देस म्हणतात. ‘इंदिरा संतांच्या कवितेला चाल लावली असं साधारण भाषेत म्हणता येईल. पण खरंतर ते त्यांच्या कवितांचं म्युझिकल इंटरप्रिटेशन आहे.’ असं मोहन देस यांनी कोलाजशी बोलताना सांगितलं. इंदिरा संत यांच्या कवितांमधे त्यांना जे संगीत सापडलं तेच ते गातात.

मोहन देस सांगतात, 'इंदिरा संतांच्या कविता या आत्ममग्न आहेत. स्वतःच्या दुःखातून, भावनेतून उर्मी घेऊन त्यांची कविता तयार होते. पण त्याच बरोबर स्त्रियांच्या अनुभव विश्वाला हात घालण्याची ताकद इंदिरा संत यांच्या कवितेत आहे. त्यांच्या कवितेतल्या भावना कधी ना कधीतरी अनुभवलेल्या असतातच. म्हणूनच इंदिरा संत यांची कविता एकाचवेळी आत्ममग्न आणि वैश्विक होऊन जाते.'

इंदिरा बाईंच्या एका कवितासंग्रहाचं नाव आहे ‘चित्कळा’. चित आणि कळा अशी या शब्दाची फोड करता येईल. कळा म्हणजे वेदना असा याचा एक अर्थ होऊ शकेल. पण त्याचबरोबर चित्ताची किंवा मनाची वेगवेगळी रूपं असाही अर्थ त्यातून निघू शकतो. इंदिरा संतांच्या कविता मानवी मनाची विविध रूपं आपल्यासमोर ठेवतात.

माणसाच्या जगण्याचा जिवंतपणा उतरलेल्या त्यांच्या अशाच काही दुर्लक्षित कविता आणि त्याचे मोहन देस यांनी लावलेले हे अर्थ.

हेही वाचा: आपण इतके हिंसक का होतोय?

१) मृगजळ

मृगजळासी पाहिले
कशी मी काय भारले,

लवथवती किरणधार,
मृगजळी धावले

ओसळत्या निळ्या उन्हात
मृगजळी हरवले...

पुन्हा तशीच तीच मी
मृगजळी उमटले;

अमरशुभ्र कमळ की
मृगजळी डोलले...

मृगजळ आहे हे इंदिरा संत यांनी पुरतं ओळखलंय. पण त्याचबरोबर ते मृगजळ खरं मानण्याची ताकद त्या ठेवतात. एवढंच नाही तर, कवितेच्या शेवटी मृगजळात त्यांना कमळंही दिसू लागतं.

२) टाहो

पांढऱ्या शुभ्र ढगांचे दाट
धुक्यासारखे नाजूक गेंद
स्तब्ध निळ्या आकाशावर
विखुरलेच विखुरले

की थव्याथव्याने पांढरे मोर
नाचत झुलत आले
की आजवरच्या मलमली आठवांचे
थवे उत्सवाला आले

त्यांना पाहून इथे कासावीस
पाय बांधलेला पांढरा मोर
टाहो फोडू लागला
पाय बांधलेला पांढरा मोर

टाहो कवितेत इंदिरा संतांनी विरहाचं दु:ख मांडलंय. त्यांचे पती नारायण संत यांच्या निधनाने झालेलं दु:ख त्या इथे मांडत असाव्यात. पांढरा मोर हे त्याचंच प्रतिक. विरहाचं दु:ख असलं तरी मोराची नाचण्याची उर्मी संपत नाही आणि हाच सगळ्यात मोठा 'टाहो' आहे.

हेही वाचा: रात्रीस खेळ चालेः शेवंता हॉट म्हणून बदलला प्लॉट?

३) आला उतरून चांद

आला उतरून चांद
माझा मुराळी दाराशी,
घोडा त्याचा खोळंबून
बहरलेल्या चाफ्यापाशी

खिंकाळतो घोडा दारी
लगबग काळजाची
वारूवरुन माहेरी
माझी सवारी जायाची

असे कसे निघताना
डोळे गेले गं दिपून
उभा गेंद शेंदराचा
दारी वाट अडवून

चंद्र हा मुराळी होऊन येतो. मुराळी म्हणजे कोण? तर माहेरचं विश्वासाचं, प्रेमळ माणूस. त्या मुराळीसोबत मी माहेराला चाललेली असं चित्र इंदिरा संत यांनी उभं केलंय. चाफा ही गोष्ट पुरातन मराठी संस्कृती, संत वाड्मयात वैराग्य असलेल्या माणसाचं प्रतिक आहे. हा चाफा बहरला म्हणजे चाफ्यानं वैराग्य सोडलं. त्यानंतर पुन्हा सासरी जायची वेळ येते तेव्हा मात्र त्यांचे डोळे दिपून जातात. पाय निघत नाही. आणि गेंद शेंदराचा म्हणजे उगवतीचा सूर्य त्यांची वाट अडवून उभा असतो. स्त्री जीवनातले हे संदर्भ अगदी सहजपणे त्यांच्या जगण्यात येतात.

या कवितेत वरवर असं दिसत असलं तरी त्यातून खूप खोल मतीतार्थ स्पष्ट होतो. 'सासर' असं म्हणण्याऐवजी ही पृथ्वी सोडून इहलोकीची यात्रा संपवण्याची चाहूल इंदिरा संत यांना लागली असावी. या भरल्या संसारातून, आसमंतातून, निसर्गातून त्यांचा पाय निघत नाहीय आणि त्याचबरोबर चंद्र मुराळी बनून दाराशी उभा आहे.

४) गोत

आभाळाशी माझे नाते
एक वाऱ्याला कळावे
धरित्रीचे माझे गोत
एका पाण्यालाच ठावे

धरित्रीला दिले तन
पैठणीची रंगभूल
फडफडे पदराला
थवा राण्यांचा कोमल

असे देताना घेताना
कशी सामावून गेले
जिव्हाळ्याच्या तरंगात
राजहंसी नादावले

५) कुसुंबी

निळी कुसुंबी धुसर संध्या
हिरवा माळ अन् पिवळा मोहोर
कुठेकुठे अन् पाणथळीतील
रंगीत पाणी करते थरथर

आरोळ्यांची उठवी दंगल
शिव्या फुंकते अधीर होऊन
आध्यात्माची देत जांभई
अखेर पडते पेंगून झिंगून

मखमलीच्या पडद्यापुढती
केव्हापासून तिष्ठत जीवन
केविलवाणे
रंगमंच नव मनात उभवून

कुसुंबी नावाचं एक फूल आहे. त्याचा रंग लाल, गुलाबी आणि मरून अशा तीन रंगाचा मिळून अशा सुंदर रंगाचं हे फूल आहे. सूर्य मावळल्यानंतर लगेचच असा हा रंग पश्चिमेच्या आभाळावर दिसतो. आता संध्याकाळ होणार आहे, रात्र येणार आहे असं इंदिरा संत लिहितात. तरीही, त्यात एक आशावाद दिसतो. रात्र झाली तरी होऊ दे पण त्यातही मला नवा रंग दिसणार आहे असा हा आशावाद.

हेही वाचा: 

फुले दांपत्याचं काम फक्त स्त्री शिक्षणापुरतंच आहे?

यल्लम्मा देवीची यात्रा अनुभवायलाच हवी अशी आहे

यल्लमाच्या भाविकांची ओढाताण सरकारला दिसत नाही का?

किती भाषा मारल्या याचीही यूएन मानवाधिकार संस्थेने नोंद करावीः भालचंद्र नेमाडे