सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी

०१ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज १ जानेवारी. सोनाली बेंद्रेचा बड्डे. आपण या मराठी अभिनेत्रीला आजवर विविध भूमिकांमधे पाहिलं. दुर्दैवानं तिला अलीकडे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या भूमिकेतही आपल्याला पाहावं लागलं. ही ‘भूमिका’ तिच्यासाठी एक कसोटी होती. या कसोटीतून ती पूर्णपणे बाहेर तर आलीच. या भूमिकेतला तिचा सहजपणा, सामान्यपणा तिला ‘असामान्य’ बनवून गेला.

बाईच्या जातीनं कसं टापटीप राहावं. तिनं तिचं सौंदर्य जपावं, त्याची काळजी घ्यावी असं कुठेतरी लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं. अंगभर कपड्यातल्या बाईच्या सौंदर्याचे गोडवे गाणारा समाज हा मुखवटे घेऊन तर वावरत असतोच; पण त्याहीपेक्षा तो माणूस म्हणूनही तितकाच खालच्या पातळीचा असतो.

विदाऊट मेकअप बाई

सर्वसामान्य बाई आपल्यासमोर मेकअप करून आली नाही तरी आपल्याला चालतं. पण सेलिब्रिटींनी मात्र म्हातारं व्हायचं नाही, हा आपला एक अट्टहास असतो. त्यामुळंच की काय, स्वतःच्या सौंदर्याच्या बाबतीत सेलिब्रिटी आपल्याला खूप जागरुक असताना दिसतात. विदाऊट मेकअप कुठंतरी फोटो येईल, या भीतीनं सतत मेकअपचा थर यांच्या चेहर्‍यावर चढलेला दिसतो. सौंदर्यांच्या या सर्व परिभाषेला छेद दिला तो सोनाली बेंद्रे या आपल्या मराठमोळ्या कन्येनं!

गेल्या काही महिन्यांपूर्वी सोनालीनं ‘वोग’ या मासिकासाठी एक फोटोशूट केलं. या फोटोशूटमधे तिनं चक्क आपल्या शरीरावर झालेल्या सर्जरीचे व्रणही अख्ख्या जगाला दाखवले. तब्बल २० इंचाचा हा व्रण सोनालीच्या शरीरावर पाहताना मनात चर्रर झालं. पण ‘पठ्ठी जिगरबाज आहे’, हेच वाक्य तोंडून बाहेर पडलं.

एरवी तेरवी डिझाइनर कपडे, परिपूर्ण केशरचना आणि मेकअपमधे सोनालीच्या रूपानं अनेकांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. पण मासिकातल्या या फोटोनं मात्र तिच्या इंडस्ट्रीसह सर्वसामान्य जनतेचंही लक्ष वेधून घेतलं. कुणाला काय वाटतंय, हा विचार करण्यापेक्षा मी किती साधेपणानं आणि खरेपणानं आयुष्य जगतेय, हेच सोनालीला या फोटोमधून जगासमोर आणायचं होतं.

हेही वाचाः आणि डोक्यावरचे केस काढून मी खरंखुरं सौंदर्य मिळवलं!

आजारपणाचा प्रवास मांडण्याचं धाडस

सोनाली बेंद्रे माधुरी दीक्षितच्या जोडीला बॉलिवूडमधलं एक मराठमोळं नाव. सोनालीनं स्वतःची अशी एक ओळख निर्माण करून मराठी प्रेक्षकांच्या मनावर छाप निर्माण केलीय. २०१८ च्या सुरवातीला मात्र सोनालीनं सोशल मीडीयावर केलेल्या एका पोस्टनं सर्वांचीच झोप उडवली. सोनालीनं तिला मेटास्टॅटिक कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं. खरंतर कुठलाही सेलिब्रिटी हे असं जाहीर करत नसल्यानं सोनालीच्या या वागण्यानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

आजही अनेक कलाकार आपल्या आजाराबद्दल किंवा आजारपणाबद्दल बोलायला कचरतात. ते शक्यतो बोलणं टाळतात. सोनालीने मात्र आजारपणावर मात तर केलीच. हा प्रवासही तिनं लोकांसमोर मांडला. तिच्या शारीरिक वेदना आणि मानसिक भावभावनांचा कल्लोळही तिनं अगदी बिनदिक्कतपणे मांडला. कुठंही कशाचीही भीड, तमा न बाळगता स्वतःच्या आजारपणाबद्दल बोलणं याला धाडस असावं लागतं. खासकरून कॅन्सरसारख्या आजारावर बोलणं खूपदा टाळलं जातं. इथं तर एक सेलिब्रिटी या अशा विषयावर बिनधास्त बोलतेय, हे पाहुनच सोनालीच्या एकूणच सर्व हालचालींकडे मीडीयासह सामान्य माणसाचंही लक्ष लागलं.

सोशल मीडियावरची प्रेरणादायी स्टोरी

या संपूर्ण काळाकडे आपण एक नजर टाकल्यावर इथं आपल्याला एक दिसून येईल ते म्हणजे सोनालीची इच्छाशक्ती आणि जिद्द. तिनं तिला जे काही वाटतंय, रुचतंय पटतंय ते मांडताना कुठंही सेलिब्रिटी असण्याचा आव आणला नाही. म्हणूनच तिच्या पोस्ट या सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी ठरल्या.

एका पोस्टमधे सोनालीनं तिच्या मानसिक स्थितीचं वर्णन करताना ‘मला जे काही झालंय ते माझ्याच वाट्याला का हा प्रश्‍न अनेकदा मनात डोकावला. डोळ्यासमोर सतत मुलाचा आणि सहचारी गोल्डीचा चेहरा असायचा. पण नाही असं रडून काही होणार नाही,’ असं तिनं मनाशी ठरवलं आणि परदेशी ट्रिटमेंटसाठी रवाना झाली.

सोनालीच्या या दरम्यानच्या घडामोडींवर आपण थोडं बारीक लक्ष दिल्यास आपल्याला एक नक्कीच उमजेल की, ती आजारानं घाबरली होती. पण खचलेली दिसून आली नाही किंवा तिनं कुठंच हात टेकले नव्हते. अगदी स्वतःचं टक्कल करतानाचे फोटोही तिनं चक्क सोशल मीडीयावर ज्यावेळी टाकले त्यावेळी तर तिचं कौतुक करण्यावाचून पर्याय नव्हता.

हेही वाचाः राधिका सुभेदार सांगतेय, मासिक पाळीविषयी गुप्तता नको स्वच्छता बाळगा

आजारपण समजून घेणारी बहीण

एखाद्या सेलिब्रिटीनं हे अशाप्रकारचं धाडस दाखवणं, हे खरोखर वाखाणण्याजोगं होतं. कॅन्सरमुळं शरीरावर झालेली सर्जरी आणि त्याच्या औषधांचे परिणाम म्हणून जात असलेले केस या सर्व गोष्टींना रुग्णाला आपसूक सामोरं जावंच लागतं. शरीरावर असणारी जखम आणि त्याचे व्रण उघड्या डोळ्यांना दिसतात; पण मनावरच्या जखमांचं काय, मनात माजलेल्या वादळाचं काय, या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीतच असतात.

सोनालीच्या या दरम्यानच्या प्रवासावर नजर टाकली असता आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतील अशाच आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टमधे तिनं ती जे भोगतेय ते तिनं मांडलेलं दिसून येतं. यामधे केवळ आजारपणातून निर्माण झालेला त्रासच नाही तर त्यावर तिनं कशी मात केली यापासून ते अनेक छोट्या गोष्टी तिनं नमूद केल्यात. तिच्यासोबत सतत सावलीसारखी असणारी मोठी बहीण तिला कशी सांभाळून घेत होती. मोठी बहीण तिच्यासाठी या सर्व उचचारादरम्यान कशापद्धतीनं अनेक भूमिका वठवत होती, हे देखील तिनं लिहीलेलं होतं.

सोनालीनं लिहिलेल्या पोस्टमधे सर्वात मनाला भिडणारं वाक्य होतं ते म्हणजे, ‘बहिणीनं या दरम्यान माझ्यासाठी खूप भुमिका पार पाडल्या. समुपदेशक, सहवेदना समजून घेण्यासोबत मला जाणून घेतलं. समजून घेतलं आणि मुख्य म्हणजे माझं ऐकून घेतलं.’ हे वाक्य खरंच खूप बोलकं आणि हृदयस्पर्शी आहे. माणसाला अनेकदा अशावेळी प्रश्न नको असतात किंवा काही प्रश्नांची उत्तरंही अपेक्षित नसतात. अशावेळी त्या आजारी  माणसाला समजून उमजून घेणारी व्यक्ती जवळ हवी असते. सोनालीच्या मोठ्या बहिणीनं म्हणजेच रूपाताईनं ही भूमिका अगदी लीलया पार पाडल्याचं ती सांगते.

वोग मासिकासाठी धाडसी फोटोशूट

हायग्रेड असलेल्या कॅन्सरवर सोनालीनं तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर मात केली. आजाराच्या खुणा मात्र पाठ सोडणार नव्हत्या. सर्जरीचे व्रण शरीरावर होते. यातच भारतात आल्यावर ‘वोग’ मासिकासाठी शूट करताना मनाची द्विधा अवस्था झाली होती. हे शूट करावं की, नाही हा विचार करत असतानाच तिनं अखेरीस धाडस करून या शूटला परवानगी दिली. यावर तिनं एक कोपरखळी सुद्धा लगावली ती म्हणजे या शूटसाठी माझी तयारी खूप लवकर झाली होती. कारण कमी मेकअप आणि हेअरस्टाईल करण्याचा वेळ इथं वाचला होता. स्वतःकडे विनोदी बुद्धीनं पाहणारी सोनाली इथं अनेकांच्या पसंतीस उतरली.

गणपतीपासून ते अगदी दिवाळीपर्यंत सर्व सण तिनं या आजारपणातही तिच्या पद्धतीनं साजरे केले. यावरून केवळ एकच लक्षात येतं की, जगण्याची तिची इच्छा कुठंही कमी झाली नव्हती. उलट तिनं प्रत्येक क्षणावर मात करत जगणं सुसह्य केलं होतं. यादरम्यान गोल्डीनं म्हणजे नवर्‍यानं कशी साथ दिली याचंही तिनं अगदी सुंदर वर्णन केलंय. ती म्हणते, ‘लग्न म्हणजे एकमेकांच्या सुख-दुःखात उभं राहणं. गोल्डीनं ही भूमिका अगदी उत्तमपणे पार पाडली. तो केवळ माझ्यासोबत नव्हता, तर माझ्या वेदनाही समजून घेत होता.’

सोनालीनं अतिशय छोट्या गोष्टी मांडून तिच्या जगण्याप्रती असलेली जिद्द आपल्यासमोर ठेवली होती. तिच्या या प्रवासात तिला सर्वात महत्त्वाची साथ लाभली ती पुस्तकांची. तिनं अनेक पुस्तकं वाचण्याचा सपाटा लावला. पुस्तकांनी तिचं जगणं अधिक सुसह्य केलं, असं ती म्हणते.

हेही वाचाः स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ

माणसांसोबतच पुस्तकांचीही मदत

एका मुलाखतीत बोलताना ती म्हणते, ‘माझ्या आजूबाजूला मला समजून घेण्यासाठी माणसं तर होतीच. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्याचं सार समजून घेण्यासाठी पुस्तकांचा वाटा खूप महत्त्वाचा होता.’ एकूणच या सर्व गोष्टींचा विचार केल्यास सोनालीनं तिच्या अनेक गोष्टी आपल्यासमोर अगदी बिनदिक्तपणे मांडल्या, हे दिसून येतं.

शरीराला होणारी वेदना, रोजचं रडणं असं अनेक दिवस सुरू होतं. पण नवनवीन माणसं भेटत गेली आणि जगणं अधिक सुसह्य होत गेल्याचंही मत ती व्यक्त करते. केस पूर्ण कापल्यानंतर विग बनवणारी तिची परदेशी हेअर ड्रेसर हिचाही उल्लेख तिनं अनेकदा केलाय. कोण तुमच्या आयुष्यात कसा रोल निभावेल, हे सांगता येत नाही असं ती म्हणते. प्रियांका चोप्रानं तिला या नवीन हेअर ड्रेसरची ओळख करून दिली होती, तिला धन्यवादही तिनं दिलेत.

या सर्व प्रवासावर नजर टाकल्यास इथं कुठेही सेलिब्रिटी असण्याचा बडेजाव नाही, तर सर्वसामान्य माणूस म्हणून सोनाली आपल्याला व्यक्त होताना दिसलीय. तिच्यातली बायको, आई, बहीण, मुलगी, मैत्रीण यामधून अधिक ठळकपणे समोर आली. केवळ आजारपणाशी दोन हात करणं नाही तर त्याकरता तिनं स्वतःमधे कोणते सकारात्मक बदल घडवले, हे सुद्धा दिसून आलं. अशा या सोनालीला केवळ ‘लढवय्यी’ हेच नाव खुलून दिसतं.

एखादी अभिनेत्री पूर्णतः टक्कल करून आपल्यासमोर येते, तेव्हा तिची मनःस्थिती काय असेल याचा विचार न केलेलाच बरा.. विचारांचं काहूर तिच्या मनात माजलेलं नक्कीच असणार; पण सोनाली बेंद्रेनं चक्क आपल्यासमोर असं येऊन ती किती लढवय्यी आहे हेच दाखवून दिलं आहे.

हेही वाचाः 

कॅलेंडर माणसाला वर्तमानात राहायला शिकवतं!

कोलाजचा पहिला बड्डेः अभिनंदन नहीं करोगे हमारा!

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे आठ सोप्पे अर्थ

२०१९ चा निरोप : गेल्या वर्षभरात स्त्रियांच्या जगात काय काय झालं?

नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

(दैनिक पुढारीच्या २०१९ च्या दीपस्तंभ दिवाळी अंकात आलेल्या लेखाचा हा संपादित अंश आहे. सर्व फोटो इंटरनेट आणि सोशल मीडियावरून साभार.)