आज आशा भोसलेंचा ८५ वा वाढदिवस. पण आजच्या पिढीलाही त्यांचा आवाज आपला वाटतो. साठीच्या नंतरही त्यांनी हिट गाणी दिली. त्यातली अनेक ए. आर. रहमानसाठी होती. एकविसाव्या शतकातली गाणी देणाऱ्या या संगीतकाराने आशाताईंच्या आवाजात रंगील्या मनांना हाळी दिलीय.
First Published : 08 September 2018
`दिल हैं छोटा सा, छोटी सी आशा` या गाण्यासोबत ए. आर. रहमान अवघ्या देशाचा झाला. पण त्या गाण्यात `आशा` नुसत्याच शब्दांना होत्या. मिनमिनी नावाच्या गोड गळ्याच्या मूळ मल्याळम पण तमिळमधेच जास्त लोकप्रिय असलेल्या गायिकेने ते गाणं गायलं होतं. `रोजा` आला तेव्हा आशा भोसले छोट्या नाही, तर फार मोठ्या होत्या. पण त्यांनी ए. आर. रहमानसाठी गावं अशी `छोटीशी आशा` दोघांच्याही फॅनना वाटत होती.
ते घडलं, तीनच वर्षांनी राम गोपाल वर्माच्या `रंगीला`च्या निमित्ताने. ए. आर. रहमानचा तो पहिला हिंदी सिनेमा होता. पण त्याच्या हिंदीत डब झालेल्या मूळ दक्षिणी गाण्यांना धुमाकूळ घातला होता. देशातली तरुणाई त्याच्यात आपला सूर शोधत होती.
तेव्हा आशा भोसलेंची साठी उलटली होती. नव्या गायिकांच्या गर्दीत त्या फारशा चर्चेत नव्हत्या. अशावेळेस `तनहा तनहा यहां पे जिना ये कोई बात हैं` हा आशा भोसलेंनी विचारलेला सवाल चिरतरुण होता. त्या आवाजाने वयाला जिंकलं. नव्या पिढीला जिंकलं. ती पिढी `रंग रंग रंगिला`च्या रंगात रंगून गेली.
रहमान `रंगीला` करत होता, तेव्हा खरं तर त्याला हिंदीचं ओ की ठो कळत नव्हतं. त्याच्या चालीवर लिहिलेले शब्द किंवा शब्दांची बांधत असलेली चाल जमणारी आहे का, हे त्याला कळतच नव्हतं. त्यात त्याच्या मदतीला आशाताई धावून आल्या होत्या. रहमान तासनतास एकेक ओळ घेऊन आशाताईंबरोबर बसायचा. न थकता अनेक आठवडे हे सुरू होतं. आशाताईंना रहमानच्या या चिकाटीचं फारच कौतूक वाटलं. त्यांनी एका मुलाखतीत हे आवर्जून सांगितलंय.
रहमानने खरं तर अनेक नव्या आवाजांचे प्रयोग केले. गाण्यासाठी सूट होईल तो आवाज भले हेमा सरदेसाईचा असो की सुखविंदर सिंगचा त्याने गायकांचा फारसा विचार केलेला दिसत नाही. तो आवाज ऐकणारा होता. त्यामुळे त्याच्याबरोबर कुणा गायकाची जोडी जमलीय, असं फारसं दिसत नाही. त्यामुळे त्याने लता मंगेशकरांकडूनही गाऊन घेतलंय तसंच वैशाली सामंतकडूनही.
आशा भोसलेंबरोबर मात्र त्याची तेरा चौदा पंधरा गाणी सापडतात. ती सगळीच ग्रेट आहेत असं नाही. हिट आहेत असंही नाही. २००३ च्या तहजीब सिनेमातलं `मेहरबा मेहरबा`, त्याच वर्षीच्या `लकीर` मधलं `ओफ्फो जल गया` किंवा एम. एफ. हुसेनच्या `मिनाक्षी`मधलं `बदन धुआं धुआं` ही गाणी आशा आणि रहमानचा परिसस्पर्श वगैरे होऊनही त्या त्या सिनेमांसारखीच विसरून जाण्यासारखी होती.
तरीही या दोघांची बरीचशी गाणी दोन पिढ्यांमधल्या प्रतिभेचा संगम होऊन नवं काहीतरी देऊन जातात. रहमान पंधरा वीस वर्षं आधी जन्मला असता किंवा आशाताई तेवढीच वर्षं उशिरा जन्मल्या असत्या तर आपल्याला अद्भूत गाणी ऐकायला मिळाली असती, याची झलक ही गाणी दाखवतात. आज ८५व्या वर्षांच्या झालेल्या आशाताई तरुण का आहेत, हे ही यादी डोळ्याखालून घातल्यावर नक्की कळेल.
ए. आर. रहमानच्या संगीतात आशा भोसलेंनी गायलेली ही काही मस्त गाणी,
१. कही आग लगे लग जाये
ताल १९९९
`…पर तुटे दिल की पीर सहीं ना जाय`, हे हृदय पिळवटून टाकणारे आनंद बक्षींचे शब्द गाण्यासाठी आशाताईंशिवाय दुसरा आवाजच नव्हता. `ताल` तसा टिपिकल सुभाष घई स्टाईल सिनेमा. गाणी आणि त्याच्या पडद्यावरच्या रूपासाठी सुभाष घईने कायम मेहनत घेतलीय. त्यामुळे हे गाणं पाहताना मजा येते. पण डोळे बंद करून ऐकतानाही ते हृदयाच्या आरपास जातं.
२. तनहा तनहा यहां पे जीना
रंगीला १९९५
या सिनेमाने रामगोपाल वर्मा आणि ए. आर. रहमानला बॉलीवूडशी घट्ट बांधलं. त्याच सिनेमाने अमीर खान आणि उर्मिला मातोंडकर यांच्या बरोबरीने आशा भोसलेंनाही नवी ओळख करून दिली. रहमानची उत्तुंग प्रतिभा ओळखून त्याला आशाताईंनी न्याय दिला.
३. रंग दे रंग दे
तक्षक १९९९
या गाण्यात आशाताईंच्या आवाजाचा दम नव्या पिढीला कळला. हा सिनेमा पडला. गोविंद निहलानींसारख्या तगड्या दिग्दर्शकाचा असूनही त्यात लक्षात राहण्यासारखं काही नव्हतं. पण तो फक्त या एका गाण्यासाठी ओळखला जातो. `अक्सिडेंटल हजबंड` नावाच्या हॉलीवूडच्या सिनेमातही हे गाणं ऐकता येतं. विशेष म्हणजे गायक सुखविंदर सिंगने हे गाणं लिहिलंय.
४. राधा कैसे ना जले
लगान २००१
`लगान` गाजला. ऑस्करपर्यंत गेला. त्याची गाणीही गाजली. जगभर पोचली. त्यातलं रहमानच्या दाक्षिणात्य पठडीला सूट न होणारं `राधा कैसे ना जले` गोड होतं. त्यात आशाताईंच्या नटखट आवाजाने आणखी मजा आणली. याच सिनेमासाठी रहमानने लता मंगेशकरांकडूनही गाऊन घेतलंय.
५. रंगीला रे
रंगीला १९९५
`रंग रंग रंगीला रे` हे फक्त गाणं नव्हतं, ती आशाताईंनी मारलेली हाक मारली. सरत्या विसाव्या शतकाने एकविसाव्या शतकात जाण्यासाठी आतूर झालेल्या नव्या पिढीसाठी घातलेली साद होती ती. फक्त भारतीय सिनेमाच नाही तर सगळा भारतीय समाजच नव्या रंगात रंगत होता. या स्थित्यंतराच्या काळावर आशाताईंच्या या आवाजाने आपला ठसा उमटवला.
६. ओ भंवरे
दौड १९९७
राम गोपाल वर्माने `रंगीला` नंतर `दौड` आणला. त्यातही उर्मिला मातोंडकर होती. रहमानही होता. आशा भोसलेंची तीन तीन गाणी होती. पण ना या सिनेमाने मजा आणली. ना त्याच्या गाण्यांनी. बहुतेक प्रयोगांच्या अतिरेकामुळे हे घडलं असावं. त्यातलं `ओ भंवरे` मात्र ऐकायला आजही बरं वाटतं. म्युझिक चॅनलवर हे गाणं ऐकताना आपण थांबतो. पण तेच `जहरिला प्यार` आणि ओ सैया येयैंया या गाण्यांच्या बाबतीत होत नाही.
७. वेनिला वेनिला
इरूवर १९९७
खास तामिळनाडूच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर घडणारा `इरूवर` हा मणिरत्नमचा तामिळ सिनेमा मोहनलालच्या कामासाठी लक्षात ठेवला जातो, तसाच रहमानच्या गाण्यांसाठीही. हिंदी नॉस्टॅल्जियाचा टच असणाऱ्या या गाण्यासाठी आशाताईंचा आवाज फिट्ट बसलाय. या गाण्यात ऐश्वर्या रायही आहे. तिच्यासाठीही एकदा यूट्यूबवर हे गाणं पाहता येईल.
८. सप्टेंबर मध्धम
अलाईपयूथे २०००
`अलाईपयूथे` म्हणजे तमिळमधला ओरिजिनल `साथिया`. शाद अलीने दिग्दर्शित केलेला `साथिया` पेक्षाही त्याचा गुरू असलेल्या मणिरत्नमचा `अलाईपयूथे` मस्तय. तसंच `साथिया`मधल्या `चोरी पे चोरी` या गाण्यापेक्षाही मूळ `सप्टेंबर मध्धम` ऐकायला मजा येते. दोन्ही गाणी आशाताईंनीच गायलेली असली तरीही.
९. मेरे दिल का वो शहजादा
कभी ना कभी १९९८
पूजा भट आणि अनिल कपूरचा हा सिनेमा कधी आला आणि गेला ते कळलंच नाही. त्यातल्या या गाण्याचे बोलही बरे आहेत. रचनाही आकर्षक आहे. आशाताईंनी ते गायलंही चांगलंय. पण तरीही एकूण गाणं फारसं लक्षात राहत नाही. `रंगीला`तलाच एखादा उरलेला तुकडा थोडीशी फोडणी देऊन पुन्हा वापरल्यासारखा वाटतो.