अमोल मुझुमदारच्या वाट्याला आव्हानांशिवाय दुसरं काय?

१८ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


मुंबईकर क्रिकेटपटू अमोल मुझुमदार यांना दक्षिण आफ्रिकेने आपल्या टेस्ट टीमसाठी बॅटिंग कोच म्हणून निवडलंय. दक्षिण आफ्रिकेची टीम भारताच्या दौऱ्यावर येतेय. त्याआधी आपली बॅटिंग लाईन मजबूत करण्यासाठी आफ्रिकेने ही निवड केलीय. भारताने आपला आपल्या मुख्य टीममधे, तसंच बॅटिंग कोच म्हणूनही अमोलला संधी दिली नाही.

अमोल मुझुमदारची दक्षिण आफ्रिकेच्या टीमचा बॅटिंग कोच म्हणून निवड झाली आणि पटलं की पिकतं तिथे विकत नाही. अमोलने टीम इंडियासाठीही बॅटिंग कोच पदासाठी अर्ज केला होता. पण त्याला पसंती मिळाली नाही. तिथे विक्रम राठोडची वर्णी लागली. अमोलचं दैव नेहमीच त्याच्या आड आलंय. अहो त्याला कधी कसोटीचा टिळाही लागला नाही.

टीम इंडियात एकही संधी नाही

सातत्यपूर्ण बॅटिंग करणाऱ्याला त्याच्यासारख्याला एकदाही टीम इंडियात संधी मिळाली नाही. त्याचा दोष हाच की त्याच वेळेस बऱ्यापैकी गुणी बॅटसमॅन भोवती होते. स्पर्धा जबर होती. सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी हे तर त्याचे शाळासोबती. ते तर होतेच. पण भारतीय अ संघात एकदा त्याची निवड झाली, तेव्हा त्याच्याबरोबर राहुल द्रविड, सौरव गांगुली होते. या दोघांना टीम इंडियासाठी खेळायची संधी मिळाली आणि त्यांनी तिचे सोने केल्याने अमोल संधीविना राहिला तो कायमचा.

गंमत म्हणजे त्याला आयुष्यात प्रतिक्षा करायचे अनुभव ठायी ठायी आले. शारदाश्रम शाळेकडून सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी यांनी हारिस शिल्ड स्पर्धेतली ऐतिहासिक ६६४ धावांची नाबाद भागीदारी केली तेव्हा तंबूत पॅड बांधून पुढच्या क्रमांकावर खेळायला जाण्यासाठी बसलेला कोण होता? अमोल मुझुमदार. त्या दिवसापासून जणू प्रतिक्षा करायची हेच अमोलच्या वाट्याला येत गेलं.

वास्तविक सणसणीत असं त्याचं पदार्पण होतं. त्याने मुंबईच्या ज्युनिअर टीमचं नेतृत्व करताना धावांचा सडा पाडत फार वर्षांनी विजेतेपदही आणलं होतं. दादरला सायंदैनिकच्या ऑफिसमधे तेव्हा अमोल उत्साहात आपली पहिली मुलाखत द्यायला आला होता. दुसरा सचिन अवतरत असल्याचा बोलबाला तेव्हाच सुरु झाला आणि त्याने मुंबईकडून हरयाणाविरुद्ध रणजी पदार्पण करतानासुद्धा ६० धावांची खेळी करून आपल्याबाबतच्या अपेक्षा अधिकच उंचावल्या होत्या.

हेही वाचा: भारताला मोहालीच्या खेळपट्टीची देणगी देणारे दलजित सिंग

मुंबईच्या टीमचा आधार

अमोल त्यानंतर मुंबई संघाच्या बॅटिंगचा आधार बनला. स्टार खेळाडू भारताकडून खेळत असताना मुंबईच्या टीमची सारी भिस्त अमोलवरच असायची. अमोल चिवट आणि टिपिकल मुंबईचा खडूसपणा दाखवत खेळायचा. त्याला विकेट बहाल करणं पसंत नसायचं. तो एकदा तर पाच बाद शून्य अशा स्थितीतून मुंबईला बाहेर काढतानाही दिसला. त्याने काही संस्मरणीय खेळी केल्या. बंगालविरुद्ध फायनल मॅचमधे तो अप्रतिम खेळला. तेव्हा त्याची टीम इंडियात निवड होईल असं वाटलं होतें. पण तसं झालं नाही.

पुढे मुंबईला जेव्हा तो नकोसा झाला, तेव्हा त्याने आसाम आणि आंध्र प्रदेशकडून खेळण्यात कमीपणा मानला नाही. याचं फळ म्हणजे तो रणजी स्पर्धेतला सर्वाधिक धावा काढणारा बॅटसमॅन झाला. अशोक मंकड, अमरजित केणी यांना त्याने मागं टाकलं. नंतर त्याचा हा विक्रम असाच मुंबईच्याच काहीशा उपेक्षित वासिम जाफरने मोडला.

आचरेकर स्कूलचा विद्यार्थी

अमोलचं क्रिकेटवर जीवापाड प्रेम. ते त्याला लावलं त्याचे वडील आनंद यांनी. ते स्वतः क्रिकेट खेळणारे. अमोलला ते भल्या पहाटे उठवायचे. आधी बाबू नाडकर्णींनी त्याला क्लबकडून खेळायला दिलं. पण त्याच्यावर क्रिकेटचे खरे संस्कार अर्थातच रमाकांत आचरेकर सरांनी केले.

अमोल सांगतो, ‘जगात मी कुठेही असलो आणि समोरून सर आले तर मी त्यांच्या पाया पडणारच. त्यांच्याविषयीचा आम्हा सर्वांचा आदर हा धाकामुळे नव्हता तर त्यांनी आमच्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे होता. मी भाग्यवान समजतो की मला असे गुरु लाभले. माझ्यापेक्षाही खूप चांगलं खेळणारी पोरं तेव्हा होती. पण ती आता कुठे आहेत हे माहित नाही. मी या दृष्टीनेही स्वतःला नशीबवान समजतो की मी निदान मुंबईकडून तरी खेळलो.’

हेही वाचा: लिटल मास्टर गावस्करच्या सत्तरीनिमित्त हे तर वाचावंच लागेल

एक गंमतीदार किस्सा

अमोल शारदाश्रममधला एक गंमतीदार किस्सा आहे. तो थोडा अनाठायी वाटेल पण सांगितला पाहिजे. शाळेच्या आवारात आधी छोटीशी चाळ होती. छोट्या छोट्या खोल्यांमधे बिऱ्हाड रहायची. शाळा भरायच्या आधी सचिन, विनोद, अमोल आणि गँग तिथेच क्रिकेट खेळत असायची. एकदा सचिनने मारलेला फटका एका खोलीत गेला आणि बॉल नेमका पाण्याच्या भांड्यांची उतरंड रचली होती त्यावर बसला. मोठा आवाज होत ती भांडी पडली.

साहजिकच तिथली माणसं धावत शाळेत आली आणि त्यांनी प्रिन्सिपॉलकडे तक्रार केली. शाळा भरताच प्रिन्सिपॉलनी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व मुलांना घरी जायला सांगितलं. बाहेर रस्त्यावर आल्यावर सचिनने युक्ती काढली. सगळेजण दादर चौपाटीवर क्रिकेट खेळायला जायची. जर का सगळे लगेच घरी गेले असते तर घरच्यांना संशय आला असता. म्हणून शाळा सुटण्याच्या वेळेपर्यंत सगळे चौपाटीवर खेळत राहिले.

निवृत्त झाल्यावरही अमोलचं क्रिकेटप्रेम कमी झालं नाही. कधी कॉमेंट्रेटर म्हणून, कधी कोच म्हणून, स्तंभलेखक म्हणून तो क्रिकेटशी नातं जोडून राहिला. तो नेदरलँडचा कोच झाला. त्याने क्रिकेट कोचिंगचा रीतसर कोर्सही पूर्ण केला. बंगलोरला क्रिकेट अकॅडमीतही तो राहिला. त्याला टीम इंडियाच्या बॅटिंगचं प्रशिक्षकपद खुणावत होतं. पण ते स्वप्न अद्याप पूर्ण झालेलं नाही. मात्र जेव्हा दक्षिण आफ्रिकेने त्याला ते देऊ केलं, त्याने ही संधी सोडायची नाही असं ठरवून ते स्विकारलंय.

हेही वाचा: सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही

आव्हानं स्वीकारायची सवय

गेल्या खेपेस दक्षिण आफ्रिकेच्या बॅटसमॅननी आश्विन आणि जडेजाच्या फिरकीपुढे सपशेल लोटांगण घातलं. आफ्रिकेला आता याची पुनरावृत्ती नकोय. म्हणून त्यांनी भारतातला बॅटिंग कोच नेमलाय. शिवाय आमल, एबी डिविलिअर्स रिटायर झाल्याने आफ्रिकेची बॅटिंग लाईन कमकुवत झालीय. ती मजबूत करायची जबाबदारी अमोलवर आहे.

अमोलच्या प्रतिस्पर्धी टीमचा कोच आहे रवी शास्त्री. अमोल बच्चा होता तेव्हा रवी त्याचा कॅप्टन होता. त्याचं क्रिकेटमधलं ज्ञान, बारकावे टिपण्याची वृत्ती, डावपेच आखण्यातली सफाई याने अमोल कायमचा प्रभावित झाला. बंगालविरुद्ध फायनलच्या आदल्या दिवशी रवीने एक स्फूर्तीदायक भाषण केलं होतं. तेव्हा कधी एकदा मैदानात उतरतो असं सर्वांना झालं होतं.

अमोलने तो क्षण विसरलेला नाही. ती मॅच मुंबईने जिंकली. आज तोच रवी त्याच्या विरुद्ध कंपूत आहे. अमोलसाठी हे मोठं आव्हान आहे. पण आव्हान स्वीकारायची आता त्याला सवय झालीय.

हेही वाचा: 

पेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार

पाकिस्तानातूनच नाही, कुठूनही कांदा आयात करणं हा दशद्रोहच

एकविसाव्या शतकात एकविसावं बाळंतपण मिरवण्याचं काय करायचं?