लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक

१९ मार्च २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


कोरोनाचा उद्रेक वाढू नये म्हणून मुंबईत लॉकडाऊन म्हणजे दिवसरात्र धावणारी मुंबई थांबवण्याचीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. काही मीडिया चॅनल्सनी तर लॉकडाऊनसाठी मोहीमच उघडलीय. पण दक्षिण कोरियानं असं कुठलंही लॉकडाऊन न करता कोरोनाला बऱ्यापैकी रोखून धरलंय. माघारी पाठवलंय. कोरियानं हे कसं साध्य केलं?

आपणच सर्वशक्तिमान असल्याचं डंके की चोट पर सांगणाऱ्या अमेरिकेला कोरोना वायरसनं आपल्या विळख्यात घेतलंय. युरोपातही कोरोना खूप वेगानं पसरतोय. पण तैवान, हाँगकाँग, सिंगापूर यासारख्या चीनशेजारच्या देशांनी वेळीच आक्रमक पावलं उचलत कोरोनाला रोखून धरलंय. त्यामुळं पाश्चात्य देशांतला मीडिया आपापल्या देशाला तैवान, सिंगापूरकडून काहीएक धडा घेण्याचा सल्ला देतोय.

दक्षिण कोरिया तर लॉकडाऊन न करता वायरसशी लढण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे. चीन, इटली आणि इराण यांच्यानंतर दक्षिण कोरियात कोरोनाचा संसर्ग झालेले सर्वाधिक लोक सापडलेत. सरकार हजारो लोकांच्या नमुन्यांची रस्त्यांवर तपासणी करते आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांनी तर या वायरसविरोधातल्या लढ्याला ‘एका लढाईची सुरवात’ असं संबोधलंय.

दक्षिण कोरिया कोरोनाविरोधात कसं लढतोय यावर मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार यांनी एक सविस्तर पोस्ट लिहिलीय. त्या पोस्टचा सदानंद घायाळ यांनी केलेल्या अनुवादाचा  हा संपादित भाग .

हेही वाचाः एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

दक्षिण कोरियानं हे सारं कसं केलं?

दक्षिण कोरियाची लोकसंख्या ५ कोटी आहे. २९ फेब्रुवारीला इथे एकाच दिवसात ९०९ जणांना कोरोना वायरसचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. १७ मार्चला नव्यानं ७४ जण सापडले. आतापर्यंतचा तिसरा दिवस आहे, एका दिवशी १०० हून कमी केस आढळल्यात. इथं आतापर्यंत ८ हजार ४१३ जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. ८४ जणांना जीव गमवावा लागलाय तर १५४० लोक बरे होऊन घरी परतलेत.

जनजीवन ठप्प न करता म्हणजेच लॉकडाऊनशिवाय कोरोना वायरसशी लढणारा हा एकमेव देश आहे. आपली शहरं बंद केली नाहीत. दक्षिण कोरियानं हे सगळं कसं केलं?

चीनमधून कोरोना वायरसच्या बातम्या येऊन लागताच दक्षिण कोरियातल्या चार खासगी कंपन्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार टेस्ट किट तयार करायला सुरवात केली. कोरोनाचा धोका ओळखून दक्षिण कोरियानं वेळीच तयारी सुरू केली. त्यामुळेच कोरियाकडे एका दिवशी १० हजार नमुने तपासले जातील एवढे टेस्ट किट उपलब्ध झाले. आता ही क्षमता वाढून एका दिवशी १५ हजारवर गेलीय. दक्षिण कोरिया आपल्या जुन्या अनुभवातून शिकला. त्यामुळेच कोरियानं यावेळी हातात असलेला वेळ न दवडता वेळीच आपली तयारी पूर्ण केली.

सँपल टेस्टिंगमधे भारत कुठंय?

मीडियात आलेल्या बातम्यांनुसार, दक्षिण कोरियात आतापर्यंत २ लाख ७० हजारांहून अधिक लोकांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. दहा लाखांहून अधिक लोकसंख्येचे ५२०० नमुने तपासण्यात आलेत. याउलट अमेरिका दहा लाख लोकसंख्येवर केवळ ७४ नमुने तपासू शकतोय. १३ मार्चपर्यंत भारतात ६००० नमुने तपासण्यात आले होते.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या मते, १८ मार्चपर्यंत भारतात १२ हजार ३५१ नमुने तपासण्यात आलेत. यापैकी १४५ नमुने पॉझिटिव आढळलेत. भारतात सध्यातरी अलीकडच्या काळात परदेशात जाऊन आलेल्या लोकांचेच नमुने तपासण्यात येत आहेत. त्यामुळंच भारतानं आपल्या नियमांत थोडीशी ढिलाई देत अधिकचे नमुने तपासायला हवेत, अशी मागणी जोर धरतेय. पण आता आपण दक्षिण कोरियाची चर्चा करू.

हेही वाचाः भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

तपासणीची साधीसरळ प्रक्रिया

कोरोनाचा संसर्ग कुणाला झाला आणि कुणाला झाला नाही हे ओळखण्यासाठी दक्षिण कोरियानं एक गोष्ट ठरवली. ती म्हणजे, अधिकाधिक लोकांच्या नमुन्याची तपासणी करणं. यासाठी देशभर ५० ड्राईव थ्रू टेस्ट स्टेशन सुरू करण्यात आले. या केंद्रांवर अवघ्या १० मिनिटांत टेस्टची सारी प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि अवघ्या काही तासांतच टेस्टचा रिपोर्टही दिला जातो. 'कार घेऊन जा, सँपल द्या आणि रिपोर्ट मिळवा' अशी साधीसरळ प्रक्रिया कोरियानं राबवली.

टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव आढळलेल्यांच्या सेलफोनचा रेकॉर्ड आणि क्रेडिट कार्ड व्यवहार यावरून ते कुठकुठं गेले होते, हे शोधण्यात आलं. ही माहिती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांसाठी खुली करण्यात आली. यामुळे घटनास्थळी या व्यक्तींच्या संपर्कात कोणकोण आलं होतं हे ओळखणं इतर लोकांना शक्य झालं. म्हणजेच टेस्ट पॉझिटिव आलेली व्यक्ती सिनेमा बघायला गेलेली असेल तर त्याचा सीट नंबर सार्वजनिक करण्यात आला. असं केल्यानं आजूबाजूच्या लोकांना आपणही टेस्ट करून घेतली पाहिजे याबद्दल माहिती मिळू लागली.

एवढंच नाही तर नगरपालिकेच्या वेबसाईटवर सॅम्पल पॉझिटिव आलेल्यांची माहिती खुली करण्यात आली. यात संबंधित व्यक्ती कुठं राहते, काय काम करते अशी माहिती देण्यात आली. ही माहिती खुली करून संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना सावध करण्यात आलं. दक्षिण कोरियात सर्वसामान्य माणसं एरवीच तोंडाला मास्क लावून फिरतात. अनेक अपार्टमेंट, गृहनिर्माण सोसायट्यांमधे मास्क लावल्याशिवाय कुणीही प्रवेश करून नये, असे बोर्ड लावलेले असतात.

हेही वाचाः तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

आपण काय धडा घेणार?

दक्षिण कोरियाचा हा अनुभव आपल्यासाठी एक महत्त्वाचा धडा आहे. तो म्हणजे, एक देश म्हणून जागतिक साथींविरोधात लढायचं असेल तर आपल्याकडे नमुने तपासण्यासाठीची पुरेशी व्यवस्था असली पाहिजे. टेस्ट पॉझिटिव आढळलेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यासाठीची यंत्रण उपलब्ध हवी. तिथे विलगीकरण म्हणजेच क्वारेंटिन करण्यात आलेल्यांना मेडिकल टीम दिवसातून दोनवेळा फोन करते. संबंधित लोक कुठं बाहेरत हिंडत नाहीत ना याची खात्री करून घेतली जाते. कायद्याचं उल्लंघन केल्यास ३ लाख वॉन इतक्या रकमेचा दंड वसूल केला जातो.

इथे नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, दक्षिण कोरियामधे कोरोनाच्या विळख्यात आलेल्यांमधे तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. संबंधित लोकांना त्यांच्या मोबाईल नंबरवर अलर्ट पाठवले जात आहेत.

दक्षिण कोरियाचं म्हणणं आहे, की अख्खं शहर बंद करणं हा काही योग्य मार्ग नाही तर अधिकाधिक लोकांची तपासणी केली पाहिजे. लोकांवर निगराणी ठेवली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे, माहिती सर्वसामान्य लोकांसोबत शेअर करायला हवी. आणि आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे दक्षिण कोरियानं परदेशातून येणारी विमानंही बंद केली नाहीत.

हेही वाचाः 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार 

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, पत्रकार सांगतेय स्वानुभव

कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा

कोरोना: रँडच्या वधाला कारणीभूत १८९७ चा कायदा पुण्यात पुन्हा लागू

१०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय?