वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं

१२ जुलै २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांती आणि मानवतेची समानता हा असतो. म्हणून आचार विचार आणि उच्चार यातली शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यांच प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे बघितलं जातं. वारकरी संप्रदायात जात, धर्म आणि भेदाभेद मानले जात नाहीत. वारकरी संप्रदायाचं हे वर्तन आध्यात्मिकतेच्या अंगानं जाणारं आहे. आषाढी एकादशी निमित्त हा 'वारी' विशेष लेख.

वारीला काही शतकांची परंपरा आहे. वारीच्या माध्यमातून विराट जनसमुदाय संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरला चालत जातो. दरवर्षी यात भर पडते. तरुणांची आणि महिलांची संख्या लक्षणीय वाढतेय. अशा सामाजिक शक्ति अधिकाधिक विधायकतेकडे कशा वळतील, हे समाजचिंतन सर्व समाजाला पुढे नेणारं ठरेलं. लाखो लोकांनी तीन आठवडे अडचणी सोसत कामधाम सोडून असंच चालत जाण्यानं कार्य साधतं? हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना परंपरा आणि आधुनिकता ह्यांचं सामर्थ्य कळलेलं नाही, असं म्हणावं लागेल.

कोणतीही अपेक्षा न करता नवस फेडण्याशी संबंध नसताना लाखोंचा जनसमूह विशिष्ट प्रकारचे वर्तन करतो. त्यावेळी ती त्याची जीवन जगण्याची रीत आहे, म्हणूनच समजावून घ्यावी लागते. आधुनिक पद्धतीने विचार केला, तरी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही गोष्टी प्राधान्य क्रमाच्या वाटतात. कोणासाठी ते गिर्यारोहण असेल, कोणासाठी ते वनभ्रमण असेल, तर आणखी कोणाला संगीताची मैफल, चित्रकलेची संग्रहालयं पाहण्यात आनंद मिळेल. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्याकडचा श्रम, वेळ, पैसा ह्यांची शक्यतेनुसार गुंतवणूक करत असते.

आध्यात्मिकता म्हणजे भौतिक सुखाच्या पलिकडचं श्रेयस

व्यक्तिला असलेल्या स्वातंत्र्याचा आदरच करायला हवा पण फार मोठ्या संख्येने जनसमुदाय बाहेर पडतो तेव्हा काही प्रश्न निर्माण होतात. शारीरिक विधींमुळे स्वच्छतेचे जे काही प्रश्न आहेत ते नव्या कल्पनेचा वापर करुन जनता शासन ह्यांच्या मार्फत सोडवणं सहज शक्य आहे. शिवाय खरा मुद्दा यापेक्षा वेगळाच आहे.

वारकरी संप्रदायात जात, धर्म आणि भेदाभेद मानले जात नाहीत. वारकरी संप्रदायाचं हे वर्तन आध्यात्मिकतेच्या अंगानं जाणारं आहे. अध्यात्म ह्या शब्दाच्या चर्चेत जाण्यात अर्थ नाही. पण खरी आध्यात्मिकता असं मानते की, भौतिक सुखाच्या पलिकडे जीवनाचं एक श्रेयस आहे. ते भौतिक सुखापेक्षा अनंत पटींनी मोलाचं आहे. ही जाणीव अंतरंगात उमगलेली व्यक्ति संयमी असते. ती मानवसंमुख कृती करते. त्याद्वारे तिच्या जीवनात सुचिता आणि पावित्र्य येतं.

हेही वाचा: वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन

वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश

या मार्गावरुन जाण्याच्या साधनेचा प्रारंभ वारीच्या मार्गावरुन चालण्याने होतो, असं अनेक वारकऱ्यांना वाटतं. उत्तम खाणं, निवास, विश्रांती या सुविधा भौतिक सुखाच्या गोष्टी आहेत. या उलट वारीच्या काळात वारकरी रोज २०-२० किलोमीटर चालतात. प्रवासात जे मिळेल ते खाणं, निवास आणि पावसाचं झोडपणं, चिखल तुडवणं आनंदाने स्विकारतात. वारकरी माळ धारण करतात. एका अर्थाने व्रतस्थ होतात. मांस, धुम्रपान आपोआप व्यर्ज होतात.

ज्या गोष्टी करायच्यात त्यात नामस्मरण, भगवतगीता, पुण्यकर्म, शुद्ध आचार यांचा समावेश होतो. वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांती आणि मानवतेची समानता हा असतो. म्हणून आचार विचार आणि उच्चार यातली शुद्धता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यांच प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे बघितलं जातं.

पंढरपूरची वारी ही अंधश्रद्धा असेल तर तिला विरोध का करत नाही, ती डोळस श्रद्धा असेल तर पुरोगामी त्यात खुल्या दिलाने सामील का होत नाहीत? असा एक प्रश्न विचारला जातो. श्रद्धा म्हणजे काय, हा एक बहुचर्चित प्रश्न आहे. एकोणीसाव्या शतकातले अव्वल धर्म प्रबोधनकार न्या. म. गो. रानडेंनी ‘उत्कटपणे कृतीशील झालेली विवेकबुद्धी’ अशी श्रद्धेची समर्पक व्याख्या केलीय.यातली उत्कटता आणि कृतिशीलता या दोन्ही गोष्टी वारकऱ्यांकडे दिसून येतात.

हेही वाचा: बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?

वारी हा सज्जनशक्तीच्या स्रोतांचा आविष्कार

याशिवाय कोणीही न बोलावता स्वखर्चाने एवढा मोठा जनसमूह शांतपणे येत राहिलाच नसता. पण या व्याख्येतील तिसरा शब्द फार महत्त्वाचा आहे. माणसाचा मूल्यविवेक उन्नत करते, ती श्रद्धा असते आणि तो मूल्यविवेक अवनत करते ती अंधश्रद्धा असते. वारकरी संप्रदायाशी संबंधित मूल्य विवेकाच्या दोन बाबी आजतरी महाराष्ट्राच्या समाजजीवनात ऐरणीवर आहेत. मद्यमुक्तीबाबत वारकरी आग्रही असतात.

गळ्यात वारकरी संप्रदायाची प्रतीक असलेली तुळशीची माळ घातली की तिच्या प्रभावाने अनेक जण व्यसनमुक्त होतात असा त्या माळेचा दरारा आहे. विकासासाठी अधिकाधिक पैसा कररूपाने गोळा करण्याच्या मोहापोटी महाराष्ट्रातले शासन मद्यवर्धक धोरण राबवतं. महाराष्ट्र शासनाला मद्यविक्रीच्या करापासून मिळणारं उत्पन्न गेल्या दहा वर्षात २५० कोटीवरून २६०० कोटिपर्यंत म्हणजे दहा पटींनी वाढलंय. वारीकडे लोकांचा ओढा वाढतोय, म्हणून वारी हा सज्जनशक्तीच्या स्रोतांचा आविष्कार बनू शकतो.

अशा शक्तीने भूमिका घेतल्यास शासनाला काही प्रमाणात जाग येईल आणि दुसरीकडे लोकांना आनंदाने जगण्यासाठी मद्यसेवन करण्यातील व्यर्थता व धोकादायकपण कळू शकेल.

हेही वाचा: आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

वारकरी संप्रदायाचा समतेचा विचार आणि आचारही

याहीपेक्षा मोठं आव्हान ते समतेचं. परंतु वारकरी संप्रदायाचा पाया क्रांतिकारीच आहे. त्याच्या तत्वज्ञानाची मांडणी जाती-अंताच्या दिशेने जाणारी आहे. वारकरी संप्रदाय निर्माण झाला, त्याकाळी समाजात जाती, उपजाती यांचा कमालीचा बुजबुजाट झाला होता. बाह्यांगाच्या खुणापासून ते जीवनाच्या सर्व व्यवहारात आपण वेगळे आणि श्रेष्ठ असल्याचे दाखवण्याचा अट्टाहास चालू होता. अशा वेळी वारकरी संप्रदायाने समतेचा विचार मांडला आणि आचारला.

ज्याच्या कपाळी टिळा आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, जो चुरमुरे – बत्तासे यांचा गोपाळ काला सर्वांसोबत आनंदाने खातो तो जाती- धर्माने कोण आहे याची शूद्र चौकशी न करता वारीची परंपरा चालू झाली. ‘वैष्णव ते जन! वैष्णवाचा धर्म !! भेदाभेद भ्रम ! अमंगळ !!’ ही वारकरी संप्रदयाची प्रतिज्ञा होती आजही वारीतले सगळे वारकरी एकमेकांना ‘माऊली’ म्हणून अशी हाक मारतात. जात-धर्म यांचा विचार न करता परस्परांच्या पायावर नतमस्तक होतात.

हेही वाचा: पंढरीची वारीः माऊलींच्या दिंडीतला एक दिवस

आज सामाजिक समतेचा प्रश्न ऐरणीवर

मात्र, चंद्रभागेच्या तिरावर वर्षानुवर्षे उभा राहणारा हा समता संगर आपापल्या गावातले जातीपातीचे गडकोट उद्धवस्थ करण्याइतका अद्यापही प्रभावी ठरलेला नाही. सामाजिक समतेच्या चळवळीत असं भान आर्य समाजानं दाखवलं. आर्य समाजाच्या मांडणीबाबत मत भिन्नता आहे. मात्र जाती निर्मूलनाबाबत आर्य समाजाने एकेकाळी प्रबोधन आणि चळवळ जोरदारपणे चालवली होती. ज्या काळात सहभोजनं हा जाती निर्मूलनाचा प्रभावी उपक्रम होता, त्याकाळात विविध जातीच्या हजारो नाही लाखो लोकांची सहभोजनं आर्य समाजानं घडवली. मराठवाड्यातल्या काही भागात आर्य समाजाचा प्रभाव होता.

आज ४० ते ५० वर्ष वयोगटातल्या अनेक व्यक्तींच्या आई, वडलांचे विवाह ५० ते ६० वर्षपूर्वी आंतर जातीय पद्धतीने झाले होते. आजच्या महाराष्ट्रातही सामाजिक समतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. एका जातीची व्यक्ती दुसऱ्या जातीच्या व्यक्तीपेक्षा उच्च किंवा नीच आहे, असं जाती व्यवस्थेची मानसिकता सांगते. ही एक निखालस आणि जीवघेणी अंध्रश्रद्धा आहे. आधुनिक विज्ञान असं सांगतं की, जगातल्या सर्व मानवांचा जिनोम पॅटर्न ९९.९७ टक्के एकच आहे. मात्र या वैज्ञानिक सत्याला उच्च- नीचतेची जातीची भावना पुरून उरलीय.

हेही वाचा: 'वारीच्या वाटेवर' ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर

वारकरी संप्रदायानं हे मनावर घ्यावं

सावरकरांची सहभोजनं, साने गुरुजींचं उपोषण, संविधानातल्या तरतुदी, एक गाव-एक पाणवठा चळवळ, शासनाचे प्रयत्न या सर्वांमधूनही जातीची मानसिकता बदलण्यात पुरेसं यश आलेले नाही. जात ही व्यवस्था म्हणून एक भौतिक रचनाही आहे. म्हणून या व्यवस्थेतून निर्माण झालेल्या विषमतेवर भौतिक उपाययोजनांची गरजही आहे. याबरोबरच जन्माधिष्ठित उच्च नीचता हीही एक मानसिकता आहे. नाहीतर अजूनही जातवार वस्त्या दिसल्या नसत्या. भूकंपानं उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा बांधताना जातवार वस्त्यांचे आग्रह धरले गेले नसते.

आंतरजातीय विवाहाला आजही ज्या प्रमाणात व ज्याप्रकारे विरोध होतो, तो या बाबतीतला सामाजिक चळवळीच्या अपयशाचं आणि जाती व्यवस्थेचं जहर किती जालीम आहेत, याचं दर्शन घडवतो. हे आव्हान बिकट आहे, तरीही स्वीकारणं आवश्यक आहे. जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत ही वारकरी संप्रदायाची मनोभूमिका आहे. म्हणून सामाजिक समतेचं मन्वंतर घडवून आणण्याचं वारकरी संप्रदायाने मनावर घेतलं पाहिजे. २१ व्या शतकातल्या महाराष्ट्राला ती मोठीच भेट ठरेल.

( डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 'विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’ या पुस्तकातून साभार ) 

हेही वाचा: 

साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत? 

लोकसंख्या समस्या नाही तर देशाला विकसित करण्याची संधी आहे

सिंगल-डबलची स्ट्रॅटेजी फेल आणि भारत वर्ल्डकप बाहेर