विदर्भ साहित्य संघाचं सातवं लेखिका साहित्य संमेलन २२ तारखेच्या रविवारी थडीपावनी या नागपूर जिल्ह्यातल्या गावात झालं. आजही महिला लेखिकांच्या संमेलनाबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. संमेलनाच्या अध्यक्षांनीही या मुद्द्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकलाय. संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा सबाने यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २००४ मधे आम्ही काही कार्यकर्त्यांनी सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कलावंत सर्वांना एकत्र आणलं. अनेकांनी भाषणातून आपला पाठिंबा व्यक्त केला. त्यावेळी एक फार मोठे साहित्यिक तिथं होते. आम्ही त्यांनाही बोलण्याची विनंती केली. ते म्हणाले, शेतकरी आत्महत्या करतात. हे फक्त मी रोज वर्तमानपत्रातून वाचतो. बाकी या विषयातलं मला काही माहिती नाही. या विषयाशी माझा दुरान्वयानेही संबंध नाही. इथे मला कशाला बोलवलं कळतच नाहीय.
एक संवेदनशील लेखक इतकं बेजबाबदार विधान कसं करू शकतात? म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय बोलता किंवा लिहिता येत नसेल तर लब्धप्रतिष्ठित सुखवस्तू केवळ स्वत:चं आयुष्य जगणारी माणसं आणि महान लेखक यांच्यात काय फरक असणार? त्यावेळी अनेकांना नवल वाटलं. शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घ्यायला, ते आत्महत्या का करतात, हे जाणून घ्यायला प्रत्यक्ष शेतकरीच असायला हवं काय? किंवा आपल्या घरातच आत्महत्याच व्हायला हवी काय?
परदु:ख जर आपल्या मनाला शिवतच नसेल, तर आपण कुठल्या कॅटेगरीतले लेखक? याचा विचार त्यांनीच करायला हवा. ते मान्यवर लेखक आहेत. त्यांच्या साहित्याबद्दल मला प्रेमच आहे. पण त्यांनी अशी ‘पोझ’ का घ्यावी? आपण काहीतरी वेगळेच आहोत, असंच दाखवायचं असतं का? ज्यांचं सांस्कृतिक वर्चस्व समाजावर असतं असे अनेक लेखक, साहित्यिक-सामाजिक प्रश्नांची माहिती घेऊन त्यावर भूमिका घेऊ इच्छित नाहीत. याचं मला दु:ख आहे.
सर्वांना सर्वच माहिती असायला पाहिजे हे गरजेचं नाही, याचीही मला जाणीव आहे. पण शेतकरी आत्महत्या हा रोज वर्तमानपत्रांमधून वाचण्यात येणारा प्रश्न. आपल्या जगण्यामरण्याच्या विषयाशी संबंधित आहे. त्याबद्दल एखादा लेखक असं विधान कसं करू शकतो, ही माझी खंत. सुखलोलुप आणि ‘स्व’च्या चौकटीत मग्न असल्यामुळे ‘श्रमजीवी वर्ग’ अशा लेखकांना क्षुल्लक वाटतो हेच खरं.
फक्त संख्येकडे बघायचं तर विदर्भातून विपुल लेखन झालं असं आपण म्हणू शकतो. पण कसदार किती? महिला लिहू लागली हे खरं, पण काय लिहिते, का लिहिते, कशासाठी लिहिते हे महत्त्वाचंय. काय सांगायचं याच्यासोबतच कसं सांगायचं हेही महत्त्वाचं. हे प्रश्न तिला पडतात काय? काही मैत्रिणी किरकोळ मानधनासाठी, काही केवळ प्रसिद्धीसाठी तर काही कुणालातरी खुश करण्यासाठी लिहितात.
लेखन ही एक साधना आहे. ही शक्ती फार कमी लोकांना मिळते. याचा अनुभव आम्हाला आम्ही आयोजित केलेल्या ५ लिहित्या महिलांच्या कार्यशाळेतून आला. एकट्या नागपूरची लोकसंख्या आज तीस लाखाच्या घरात आहे. त्यातल्या दहा लाख जरी महिला लक्षात घेतल्या तर लिहितात किती? पन्नास ते शंभर. म्हणजे किती वेगळी कला आपल्याला निसर्गाकडून मिळालीय? त्याला लहानपणापासून खतपाणी घालून आपण ती अधिक समृद्ध केली.
लेखक असा सहजच होत नाही. त्यालाही घडावं लागतंच. त्याच्याजवळ प्रतिभाही असावी लागते. सर्वांनाच सुरेश भट, ग्रेस होता येत नाही. सर्वच आशा बगे, प्रभा गणोरकार असू शकत नाहीत. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत किती लोक घेतात? विशिष्ट स्वार्थी हेतूने जर आपण लेखन करीत असू, त्याच्या प्रसिद्धीसाठी नाना क्लृप्त्या करीत असू, तर लेखनाप्रति हा केलेला विश्वासघात आहे. हा साहित्यातला भ्रष्टाचार. भ्रष्टाचार फक्त आर्थिक होतो असं नाही, राजकारणातच होतो असंही नाही,
हेही वाचा: अरुणा सबानेः एकटेपणाचा खंबीरपणे सामना करण्यासाठीची प्रेरणा
साहित्यक्षेत्रात भ्रष्टाचार कमालीचा होतो. सध्या तो फार बोकाळला आहे, हे आम्ही डोळ्यांनी बघतो आहोत याचा त्रास होतो. आपणच मानधन देऊन पारितोषिक पटकावणाऱ्यांची संख्या वाढतं आहे. त्याची बातमी नुकतीच आपण वर्तमानपत्रातून वाचलीय. तशीच अशाच पद्धतीचा गैरवापर करून लेखिका होणाऱ्यांचीही संख्या वाढतेय. आपल्या कलाकृतीवर मेहनत घेता येत नाही. आणि छापून येण्यासाठी होणारे गैरप्रकार क्लेशकारकच आहेत.
आशा बगे स्वत: सांगतात, ‘भूमी कादंबरीवर मी सातदा काम केलं.’ सुप्रिया अय्यरची नुकतीच प्रकाशित झालेली कादंबरी. त्यावरसुद्धा त्यांना प्रकाशकाने बरीच मेहनत घ्यायला लावली. माझी कथा तीनदा परत आली होती. मेहनत घ्यावीच लागते. माझी माझ्या सर्व लिहित्या मैत्रिणींना या विचारपीठावरून कळकळीची विनंती आहे की कृपा करून आपण साहित्याला असे बाजारू स्वरूप नको आणू या. आपल्याला लिहिण्याचा हा अधिकार, आपला आत्मस्वर ठामपणे मांडण्याचा हा अधिकार आपल्या आधीच्या पिढीने फार कष्टाने, जिकीरीने मिळविलाय. त्याचा अनादर होईल असं आपण नको वागू या. आपण जे लिहितो, त्यात जिवंतपणा असावा आणि काही खडक फोडण्याची ताकद असावी लागते, याचा विचार व्हावा.
काही लेखिका असं म्हणतात, ‘आता पहिला खर्डा लिहून झाला. आता बस ब्युटी पार्लरचा हात फिरला की पाठवतेच तुमच्याकडे आकांक्षासाठी कथा.’ पहिला खर्डा लिहून झाल्यावर पुनर्लेखन करावंच लागतं, यात शंकाच नाही. पण जातिवंत सौदर्य असलेली स्त्री फक्त पावडर लावल्यानंही सुंदरच दिसते, नाहीतर कितीही पार्लरमधे पैसा ओता, सौंदर्यात भर ती किती पडणार?
हेही वाचा: वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण
जिवंत कलाकृती निर्माण करण्यासाठी आणि ती वाचल्यानंतर वाचकांनी अस्वस्थ होण्यासाठी किंवा त्याचा पुरेपूर आस्वाद त्यांना लाभण्यासाठी आधी आपल्याजवळ संवेदनक्षम मन हवं, परदु:ख समजून घेण्याची ताकद हवी, आणि जे मांडावयाचं ते निर्भयपणे मांडण्याची तयारी हवी. आधी त्या प्रश्नाने स्वत:ला रक्तबंबाळ करून घ्यायला हवं. तेव्हाच हाती महत्त्वाचा ऐवज येणार. ग्रेस म्हणतात तसे, ‘जो वीज खुपसतो पोटी, तो एकच जलधर होता.’ फार कष्टानं मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आपण आदर करणार आहोत की मूल्यांना पायदळी तुडवणार आहोत, याचा आपण विचार करावा.
खरं तर आज संवादच हरवला आहे. मोबाईल नावाचं गोंडसं खेळणं आपल्या हातात आलं. मात्र अनेक गोष्टी आपल्या हातातून निसटून गेल्यात. एकमेकांमधला संवाद संपला, कट्टे लयास गेलेत, कसदार कविसंमेलनांची संख्या कमी झाली. वाङ्मयीन कार्यक्रमांना लागणारी उपस्थिती तर चिंताजनक झालीय. संवाद वाढण्याच्या दृष्टीनं मला आजचं हे संमेलन फार महत्वाचं वाटतं.
१९७५ सालापासून आपल्याकडे उदयास आलेले स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद हे शब्द. १९८० पर्यंत चांगलेच मूळ धरून बसलेत. पण सुरवातीला या शब्दांचीच टिंगल उडवली. स्त्रीवादी लेखन, स्त्रीमुक्तीवाल्या स्त्रिया म्हणजे जणू काय, परग्रहावरून आलेल्या कुणी वेगळ्याच जगातल्या महिला. असंच त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होऊ लागला. स्त्रीवाद म्हणजे दुसरंतिसरं काही नसून स्त्रीला व्यक्तीसारखं जगू द्या, तिच्याकडे सन्मानाने बघा, तिलाही एक मन आहे, तिच्याही काही भावना आहेत, ती आदरास पात्र आहे आणि तीही हाडामांसाची एक व्यक्ती आहे, तिचेही काही अधिकार आहेत, ते आपण मान्य करायला हवेत. बस हाच स्त्रीवाद आहे.
स्त्रीवादी जाणीव म्हणजे एकच एक साचा किंवा एकाकार नसतो. इतिहासाच्या भिन्न टप्प्यावर, विविध परिप्रेक्ष्यातून स्त्रीवादी भान घडत असतं. साहित्याच्या आविष्कारातल्या कोणत्या साहित्याला स्त्रीवादी म्हणता येईल, हा एक गुंतागुंतीचा प्रश्न. पण केवळ स्त्रीकेंद्री लिहिणं किंवा केवळ तिच्या दु:खाच्याच रडक्या कहाण्या दयेच्या अथवा उद्धाराच्या भूमिकेतून मांडणं तसंच स्त्री आहे म्हणून कारण नसताना तिच्या सौंदर्यगाथेचे झेंडे फडकवणं आणि त्याला स्त्रीवादी साहित्य म्हणणं चूक आहे.
स्त्रीवाद हा महिलेला माणुसकीशी जोडणारा हवा. थोडक्यात, स्त्रीपुरुषांनी स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मानाने जगण्यासाठी केलेले पुनर्विचार आणि पुनर्रचना म्हणजे स्त्रीवाद.
अशी सोपी व्याख्या मी स्त्रीवादाची करते. स्त्रीवादाचा अंगीकार करण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक जडणघडण अद्याप आमच्या लेखिकांमधे आलेली दिसत नाही. प्रभा गणोरकरांच्या कवितेत, कुमुद पावडेंच्या लेखांमधून ती आढळते. सीमा साखरे, निशा शेंडे, अरुणा सबाने, नयना धवड, प्रज्ज्वला तट्टे या स्त्रीवादी चळवळीतूनच पुढे आल्यामुळे त्यांच्या लेखनात पूर्णपणे स्त्रीवाद आढळतो. प्रसंगी त्यांच्या नायिका बंडखोरी करते आणि त्याची किंमतही चुकवते. पण कुठलीही तडजोड न करता. त्यानंतरचा प्रयत्न माधुरी अशिरगडे, सुमती वानखेडे, सुनीता झाडे, मंजुषा सावरकर, भाग्यश्री पेठकर यांनी केलेला दिसतो.
हेही वाचा: धनगर संमेलनाच्या निमित्ताने मूक समाज बोलू पाहतोय
सध्या एका बाईचं भाषण फार गाजतंय. त्या म्हणतात, ‘मुलींची १८ वर्षे पूर्ण झालीत की लग्न करून द्या. शिक्षणाच्या नावाखाली या मुलींनी संस्कृतीचा बट्टयाबोळ केलाय. २५-२६ वर्षांच्या घोड्या होऊन लग्न करतात, यांना नवरा कसा वठणीवर आणणार? कशाला यांना नोकऱ्या करायला हव्यात? ७ च्या आत मुली-सुना घरी आल्याच पाहिजेत. घरात तिनं आपली मतं मांडायची नाहीत, आपल्याला एक मेंदू आहे, हे विसरूनच जायचं. तिनं मोठं होण्याची स्वप्न बघायची नाही. ज्या स्त्रिया स्वत:च्या करिअरला महत्त्व देतात, त्या बदफैली असतात.’ अशी एकएक भयंकर विधाने आहेत या बाईची.
६ वर्षांची मुलगी झाली की तिच्या वडिलांनीसुद्धा तिला जवळ घ्यायचं नाही, तिचे लाड करायचे नाहीत, तिची पप्पी घ्यायची नाही. पूर्णपणे मनुसंस्कृतीकडे परतीचा प्रवास सुरू करण्यासाठी या बाईंना काही संस्थांनी मोकाट सोडलंय. दुसऱ्यांच्या मुलीसुनांनी ७ च्या आत घरात आलं पाहिजे आणि या बाई गावोगाव भाषणं देत फिरतात, असल्या विचारांची गरळ ओकतात, स्त्रीमुक्तीवाल्यांचे वाभाडे काढतात, त्यांना नवरे नको असतात, त्या दुसऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करतात, फालतू बकवास करतात हे सारे उपदव्याप करून या बाई किती वाजता घरी पोचत असतील?
या सांस्कृतिक दहशतवादाला मी स्वीकारलंय. सोशल मीडियावरून या बाईंना आव्हान दिलं आहे, त्यांनी नागपुरात भाषण द्यायला यावं आणि आम्ही विचारू त्या प्रश्नांची भर सभेत उत्तरं द्यावीत. तुमच्या साऱ्यांच्या समक्ष पुन्हा एकदा बाईंना मी दिलेल्या शब्दांची आठवण करून देते. इथे जर कुणी त्यांचे फॉलोअर्स असतील तर त्यांना पुन्हा एकदा माझा हा निरोप द्या. आम्ही बधणार नाही. स्त्रीवादी लेखिका खमक्या आहेत. आपल्या योग्य विचारांची पेरणी करण्याची हिंमत त्यांच्यात आहे आणि त्यासाठी द्यावी लागणारी किंमत त्या चुकवण्याची क्षमताही ठेवतात.
आपल्या घरावर आलेले दगडधोंडे हसत स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. या देशासाठी, या समाजात नवविचार प्रस्थापित करण्यासाठी, स्त्रियांना त्यांचे म्हणून असलेलेच हक्क मिळवून देण्यासाठी त्या कधीही तत्पर आहेत. यांच्याच घरात लेकीसुना जाळल्या गेल्या, मारल्या गेल्या, बलात्कार झाले अशावेळी मोर्चा काढायला स्त्रीमुक्तीवाल्यांकडेच येतात ना.
‘अहो, तुमच्या शब्दाला मान आहे, तुमच्यावर लोक विश्वास ठेवतात, तुम्ही म्हणाल तर कुणीही येऊ शकतं,’ वगैरे शब्दांची भलावण करत ते याच मार्गाने येतात ना? अशावेळी कुठे जातो यांचा स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्त्यावरचा राग? एक लक्षात घ्या स्त्रीमुक्तीवाल्या कुणाचंही घर फोडण्याची भाषा करीत नाही, चुकलेल्याला वठणीवर आणण्याचं काम करतात, मग ती स्त्री असो वा पुरुष.
हेही वाचा: संमेलनाला जाताय, मग वि.भि. कोलतेंच्या बंडखोर वारशाविषयी
महिलेला न्याय देण्यात ती कुठेही कसूर करत नाही आणि आपल्या लेखनाला, वागण्याला बाजारू स्वरूप आणत नाही. महत्प्रयासाने सावित्रीबाई, ताराबाई शिंदेंनी जे वाण आमच्या पदरात टाकलंय, त्याचा अवमान होणार नाही, याची पुरेपूर काळजी त्या घेतात. ही माझी मन की बात नाही. सध्या आपल्या देतात काय सुरू आहे? जो उठतो तो काय मनाला येईल ते बोलतो. प्रत्येक स्त्रीला दहा-दहा मुलं व्हायला पाहिजे. बाईपेक्षा गाय महत्त्वाची. शेतकऱ्यांना कशाला पाहिजे भाववाढ. ‘ते साले’ माजले आहेत. अशा पद्धतीची ‘वैचारिक’ पेरणी सारखी होताना दिसतेय.
या गोष्टींचा आम्ही विरोध केला. आमची लेखणी त्यावर काम करू लागली की ते लेखक देशद्रोही होतात. यातूनच पुरस्कारवापसीसारखी चळवळ सुरू झाली, तर ती नाटकं वाटते. २०१४ नंतर अशा पद्धतीचं लेखन करायला छातीला माती लावायला लागते. लेखकाच्या प्रत्येक शब्दाकडे कृतीकडे आज लक्ष आहे. लेखकाच्याच कशाला, अगदी परवाच एका आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याच्या जेवणात फक्त मीठपोळी वाढलेली बातमी व्हायरल केली. म्हणून एका पत्रकाराला तंबी मिळाली. कमालीची असहिष्णूता आणि कमालीचा विघटनवाद, संवादावरसुद्धा बंदी.
तुम्ही मोबाईलला कोणती कॉलरट्यून लावता तिकडे लक्ष, ‘भीमा’ ची कॉलरट्यून असेल तर त्याचा खून. रेल्वेप्रवासात जेवणात गोमांस आहे, या संशयावरून मारझोड करून त्यांचा खून. सगळीकडे भाषा विकासाचीच आहे, पण प्रत्यक्षात वातावरण मात्र उन्मादाचं. हा दहशतवाद नाही, तर आणखी काय? ही आणीबाणी नाही तर आणखी काय? आणि विकास कोणता? इथे रोज १ कोटी लोक उपाशी राहतायत, लाखो मुलं कुपोषणाने मरतायत, हजारो शेतकरी आत्महत्या करतायत, रोज शेकडोत बलात्कार होतायत, खून होतायत. आणि आपण फक्त बातमी वाचतो आणि पुढे जातो.
आपल्याभोवती सारखं विकासाचं गाणं वाजत आहे. फ्रान्झ काफ्काच्या ‘ट्रायल’ नावाच्या कादंबरीतला नायक एके सकाळी उठतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपल्या भोवती पहारे बसवलेत. तो कैदेत नाही तसा तो स्वत:च्या घरात स्वतंत्रच जगतोय. पण आपल्यावर सतत कोणाची तरी नजर आहे, हे त्याला जाणवतं. आजच्या लेखकांची परिस्थिती याहून वेगळी नाही. आता आपण कुणाच्यातरी रडारवर आहोत. तुम्ही काय बोलता, यावर सतत कुणाचं तरी लक्ष आहे. या देशात महत्त्वाच्या मंत्र्याचे फोन जर टॅप होत असतील तर तुम्ही आम्ही कोण?
स्वातंत्र्यानंतर आपण जी राज्यघटना स्वीकारली, ती सर्वांना समान न्याय देणारी, समान मानणारी, सर्वांचा सारखा आदर करणारी आणि स्वीकार-नकाराचा अधिकार देणारी. पण आज आपण काय पाहतोय? आपल्याकडे सतत फणा काढून उभा राहिलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद हा समरसतेची भाषा बोलणारा आणि राज्यघटनेच्या समतेच्या ढाच्याला आव्हान देणारा आहे. आज लेखकांवर, काही प्रामाणिक पत्रकारांवर सेन्सॉरशीप आहे. स्त्रीस्वातंत्र्यावर सारखा बुलडोझर चालतोय. हीच वेळ आहे, आपल्या होणाऱ्या मुस्कटदाबीविरुद्ध बोलण्याची.
सांस्कृतिक क्षेत्रात राजकीय आक्रमणाचा हा झंझावात आपल्याला थांबवता आला पाहिजे. साहित्य संमेलनाच्या विचार पीठावरचं हे राजकीय भाषण आहे की काय असं तुम्हाला वाटू शकतं. पण हे राजकीय नाही, सांस्कृतिक दहशतवादाचे मुद्दे आहेत. आणि हे सारे साहित्याशीच जुळलेत. आपल्या आजच्या संमेलनांमधून ही जीवनमूल्यांची समीक्षा होणं आवश्यक आहे. निर्मिती आणि आस्वाद यामधे पूल निर्माण करण्याचं कार्य साहित्यसंमेलनांतूनच व्हायला हवं.
संस्कृती आणि साहित्य यांचा जैव संबंध असतो. मग या गोष्टी इथे बोलणार नाही तर कुठे? इतर विषयांसोबतच शोषित, पीडित, वंचित हे लेखकांच्या लेखनाचे आणि चिंतनाचे विषय रहायला हवेत. राजकारणात याच घटकांचा वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग करून घेतला जातो. हे आम्ही लेखक सतत बघतो. आज भारतातला लेखकवर्ग प्रचंड घाबरलेला, असुरक्षित झालेला आहे. महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कर्नाटकातले निवृत्त कुलगुरू एम. एन. कलबुर्गी, गौरी लंकेश यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं.
पेरुमल मुरूगन या तामीळ लेखकाने तर २०१६ मधे आपण ‘साहित्यिक आत्महत्या’ करत असल्याचं घोषित केलं. म्हणजे यापुढे मी लेखक म्हणून नाही तर केवळ प्राध्यापक म्हणूनच जगेन. लेखन बंद. २०१० साली ‘मथोरुभगन’ अर्थात अर्धनारीनटेश्वर नावाची कादंबरी प्रकाशित झाली. त्यात धर्माची नालस्ती केली गेली, असा त्यांच्यावर आरोप लावला. त्यांचा जीव नकोसा करून टाकला.
परिस्थिती एवढीही वाईट झाली नाहीय. लेखकांच्या आशेला अजूनही वाव आहे. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमधून त्यांची मुक्तता करताना मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं, लेखकाला त्याला त्याच्या पद्धतीने, त्याला जे आवडेल ते काम करू देऊ. यात त्याने लिहिलेलं आपण वाचायचं की नाही? हा पर्याय वाचकासाठी आहेच.’ किती साधा विषय आहे ना. तुम्हाला एखादं पुस्तक आवडत नसेल तर नका वाचू. साहित्यिक अभिरूची ही एकसारखी असूच शकत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
अलीकडे प्रेमानंद गज्वी यांच्या ‘छावणी’ या नाटक. हे थेट राजकीय भाष्य करणारं असल्याने सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली. त्यावर माध्यमांतून बरंच चर्वितचर्वण झालं. आणि एका जबाबदार सदस्याच्या पुढाकाराने ही बंदी उठवण्यात आली. गांधी आणि आंबेडकरांना डोक्यावर घेतल्याचं दिसतंय. पण खरी मेख वेगळीचय. ही सर्व उदाहरणं अलीकडची आहेत आणि साहित्याशीच जुळलेली आहेत.
अलीकडच्या काळात लिहू लागलेल्या दलित, आदिवासी, आंबेडकरी लेखिका आणि कवयित्रींनीही फक्त सोयीसाठी बाबासाहेबांचं नाव घेऊन, इतरवेळी साध्य करणारे मार्ग वेगळेच असं चालणार नाही. ही लढाई केवळ इतरांसोबतची नाही. आधी ती आपल्यासोबतची आहे आणि ती जिंकणं जास्त कठीण आहे. कुणाला चांगलं वाटावं म्हणून लेखिकांनी लिहू नये, तर मला काय मांडायचं आहे, माझी काय अस्वस्थता आहे हे आधी ठरवून लिहायला पाहिजे.
आज एकविसाव्या शतकातही बहुजनांमधल्या जातपंचायती जातअंतर्गत जातीयतेच्या भिंती बळकट करतायत. आपल्यातल्याच पीडित, निर्धनांचं शोषण करतात, अन्याय करतात, याचं चित्रण तरी बहुजनांच्या लेखणीतून किती उतरतं याचाही विचार लेखिकांनी करायला पाहिजे. बहुजनांच्या संवेदनांशी एकरूप होणाऱ्या कलाविष्कारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात कलावंत कधीतरी एकत्र उभे राहणार आहेत की नाही? खैरलांजी, कोपर्डी, सोनई, खर्डा इथे झालेल्या हत्याकांडांवर, बलात्कारावर किती लेखिकांनी लिहिलं? आणि ज्यांनी लिहिलं त्यात किती लेखिका त्या घटनेशी तादात्म्य पावल्या?
काही लेखिकांनी कथा किंवा कादंबरी लिहिली, पण ती कथा कादंबरी न होता, एम.फील.चा प्रबंध झाला. जो फॉर्म आपण लिहायला घेतो, तो नीट हाताळता आला पाहिजे, त्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. लेखन ही एक साधना आहे. ती कष्ट केल्याशिवाय फळाला येत नाही. एक लेखिका एकदा मला म्हणाली, ‘अमुक एका पुरस्कारासाठी पुस्तकं मागवलीयत. त्या संस्थेची ध्येयधोरणं जशी आहेत, त्यांना जसं आवडतं, तशीच एक १०० पानांची कादंबरी मी १५ दिवसात लिहून तयार केली. मला नक्की पुरस्कार मिळणार.’
हेही वाचा: बायकांचा अकलेशी संबंध काय, असं म्हणाऱ्यांना बबिता ताडेंची चपराक
हा स्तर आणि ही पद्धत आपल्या लेखनाची असेल, इतरांना रिझवण्यासाठी, पुरस्कारासाठी आपण लिहिणार असू तर आपण पुढल्या स्पर्धेत टिकणार कसे? भूमिका घेणार कशा? याचा विचार मैत्रिणींनो नक्कीच व्हायला हवा. याचा अर्थ उत्तम साहित्य आपल्याकडे निर्माण झालं नाही असं मला मुळीच म्हणायचं नाही. अनेक लेखिकांनी आपली नाममुद्रा साहित्याच्या क्षेत्रात उमटवली. बहुजनवादी जाणिवेतून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केलं, यात शंकाच नाही.
माझा प्रश्न आजचा आहे. वर्तमानातला. माझा वारंवार प्रश्न आहे की, विदर्भातल्या किती लेखिका आज भूमिका घेताना दिसतात? कारण भूमिका घेणं सोपं नाही. अनेकांची नाराजी ओढवणं, अनेक पुरस्कारांना तिलांजली देणं. पण संघर्षात्मक परिस्थितीतून भूमिका घेणं गरजेचं असताना जर आपण भूमिका घेतली नाही, तर आपण सोकावणाऱ्या काळाला मदत करणारे शिलेदार ठरू हे लक्षात घ्या मित्रमैत्रिणींनो.
पुरस्कारवापसीनं भारतभरातल्या अस्वस्थ लेखकांनी याचं मोल दिलं. त्यातूनच दक्षिणायनसारखी चळवळ उदयास आली. अनेक लेखक, कलावंत, पत्रकार आज त्याचं मोल देतायत. स्पष्टपणे विरोध पत्करत, प्रसंगी एकाकी पडून आपलं लेखन करीत राहाणं, परखडपणे आपली मतं ठामपणे मांडणं याला मी भूमिका घेणं म्हणते. आणि ‘दक्षिणायन’ हे काम नेटानं करतंय. ही राजकारणातली ढवळाढवळ नसून ती केवळ लोकशाही आणि अभिव्यक्त संवर्धनाची प्रक्रिया आहे. या चळवळीतली मी एक शिलेदार आहे.
मी फेमिनिस्ट आणि विशिष्ट तत्त्वाला धरून चालणारी लेखिका आहे, मी भूमिका घेऊन प्रसंगी आपल्याच लोकांना नाराज करणारी. पण मी सामान्य माणसाची, शोषित, पीडित सर्वप्रकारच्या स्त्रीवर्गाची, रोज बळी पडणाऱ्या शेतकऱ्याची, कामगारांची प्रतिनिधी आहे.
आपण मला आज हा अध्यक्षपदाचा सन्मान दिला, माझ्यावर विश्वास ठेवला. या कृतीतून आपण केवळ माझाच सन्मान केला असं नाही. तर माझ्यातल्या सामाजिक कार्यकर्तीच हा सन्मान आहे. याची मला पूर्ण जाणीव आहे.
माझ्या भाषणाचा शेवट मी या कवितेतून करते,
तुला ठाऊक आहे का?
पुरुषांपेक्षा वेगळा एका स्त्रीचा आकांत?
घर, प्रेम आणि जातीपेक्षा वेगळं
एका स्त्रीला तिच्या स्वत:च्या भूमीबद्दल सांगू शकतोस तू?
सांगू शकतोस शतकानुशतके आपलं घर शोधणाऱ्या
एका बेचैन स्त्रीला तिच्या घराचा पत्ता?
जर नाही तर मग काय ठाऊक तुला
स्वयंपाक आणि बिछान्याच्या गणितापलीकडे एका स्त्रीबद्दल
हेही वाचा:
मंदीच्या जात्यात रोजगारी भरडतेय
आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?
मराठवाड्याच्या मागासलेपणात पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं गुपित