'मुंबई आय'मधून ठाकरे सरकार कुठली जत्रा दाखवणार?

१६ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


महाराष्ट्र सरकार लंडन आय च्या धर्तीवर आपल्या मुंबईतही एक प्रचंड मोठा पाळणा उभारणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल याची घोषणा केली. बांद्रा वरळी सी लिंकजवळच्या एका कोपऱ्यात हा मुंबई आय प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. त्यासाठी सरकारने तयारी सुरू केलीय. यानिमित्ताने लंडन आयचा हा धावता पण रंजक आढावा.

आजही गावात, शहरातल्या गावठाणात देवीची किंवा गावची जत्रा भरते. जत्रेत अनेक गमतीजमती असतात. खाण्यापिण्याची चंगळ असते. तसंच, खेळणी आणि नव्या नव्या गोष्टी असतात. जत्रेतला फिरता झोपाळा हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचचं आकर्षण असतो. या गोल, उंच जाणाऱ्या झोपाळ्याला विल म्हणजे चाक म्हणतात. या विलमधे बसून एकतरी राईड मारायचीच असं जत्रेत आलेल्या प्रत्येकाला वाटतं असतं. मग तो कुणीही असो. चारेक दिवसांपूर्वीच आपल्या अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनीही जत्रेतल्या या पाळण्यात बसण्याचा आनंद लुटल्याची बातमी होती.

लहान मुलांमधे या विलचं विशेष आकर्षण असतं. गोल गोल फिरणाऱ्या या विलमधे आपण बसलो की एकदम उंचावर जाणार, सगळ्यांपेक्षा मोठं होणार असं स्वप्नरंजन मुलं मनात रंगवत असतात. उंचावर गेलं की सगळी खालची माणसं लहान दिसतात. वरून जत्रेचा सारा माहौल नीट बघता येतो. सगळं नटलेलं गाव दिसतं. एवढ्या उंचीवर गेलं की पोटात फुलपाखरं उडायला लागतात, असं आकाश पाळण्यात बसलेले खाली आल्यावर सांगतात.

आता हे असलंच मोठ्ठं विल मुंबईत आलं तर? एका बाजुला निळा छान समुद्र असेल आणि दुसऱ्या बाजुला बिल्डिंग, झोपड्या, चाळींची मोठ्ठीच्या मोठ्ठी मुंबई! आता असं विल हे फक्त स्वप्नरंजन राहणार नाहीय. तर लवकरच ते प्रत्यक्षात उतरणार आहे. लंडनमधे असलेल्या लंडन आय या भव्य विलसारखंच एक विल ठाकरे सरकार आता मुंबईत उभारणार आहे.

हेही वाचा : अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानींच्या मृत्यूने तिसरं महायुद्ध होणार?

बांद्रा-वरळी सी लिंकवर येणार मुंबई आय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काल बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी हे असं विल साकारणार असल्याची घोषणा केली. त्यावेळी अजित पवार म्हणाले, ‘आपल्या मुंबईत आणि महाराष्ट्राच्या इतर भागातही काही नवनवीन गोष्टी झाल्या पाहिजेत. आपण परदेशात गेलो तर तिथल्या काही खास गोष्टी बघत असतो. लंडनमधे गेल्यावर ‘लंडन आय’ ला भेट देतो. तसंच मुंबईमधेही ‘मुंबई आय’ साकारण्यात येणार आहे.’

मुंबई आयसाठी बांद्रा वरळी सी लिंक रस्त्यावरची एक जागा सरकारनं निवडलीय. सी लिंक क्रॉस करून पुढे गेलं की टोल लागतो. हा टोल ओलांडला की उजव्या बाजुला एक मोकळी जमीन लागते. त्या जमिनीवर सीआरझेडचा म्हणजेच समुद्रकिनाऱ्याभोवती बांधकामाला कोणता अडसर नसेल तर ‘मुंबई आय’ साकारण्यात येईल. लंडन आयची प्रतिकृती डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार ‘मुंबई आय’ बनवणार आहे.

याआधी २००६ मधेही मुंबई आय प्रकल्प उभारण्याची घोषणा झाली होती. मुंबई महापालिका हा प्रकल्प उभारणार होती. पण नंतर ही घोषणा प्रत्यक्षात काही उतरली नाही. त्यावेळी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं. आता राज्यात आणि महापालिकेत दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा सहभाग असलेले सत्ताधारी आहेत.

लंडन बघण्यासाठी एक डोळा

लंडन आय म्हणजे थोडक्यात लंडन बघण्यासाठीचा एक डोळा. या डोळ्यातून लंडनची अख्खी दुनिया बघण्याचा फील मिळतो. लंडनच्या थेम्स नदीच्या काठावर हे लंडन आय उभारण्यात आलंय. त्याला कोकाकोला लंडन आय किंवा मिलेनियम विल असंही म्हणतात. हे विल ४४३ फूट उंच आहे.

१ जानेवारी २००० ला या विलचं युकेचे तत्कालिन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी उद्घाटन केलं होतं. गेल्या १ जानेवारीला या लंडन आयला २० वर्ष झाली. मार्च २००० मधे लंडन आय पर्यटकांसाठी उघडण्यात आलं. लंडन आय बांधण्यासाठी त्यावेळी ७० मिलियन पाऊंड एवढा खर्च आला होता. आता त्याचा हिशोब करायचा झाला तर हा खर्च रुपयांमधे जवळपास ६५ कोटी रुपये एवढा होतो.

दरवर्षी येतात ३५ लाख पर्यटक

लंडन आयमधे अंडाकृती छोट्या खोल्या आहेत. या खोल्यांना कॅप्सूल म्हणतात. या खोल्यांमधे बसून किंवा उभं राहून विलची राईड करता येते. एकावेळी जवळपास ८०० माणसं राईड करू शकतात. एका कॅप्सूलचं कमीतकमी भाडं २७ पाऊंड्स म्हणजे साधारण २,४०० रुपये एवढं आहे. त्यात आपल्याला हव्या असणाऱ्या सोयीनुसार पैसे कमी जास्त होतात.

एक संपूर्ण कॅप्सूल बुक करून त्यात खासगी पार्टी करण्याचीही सोय असते. कॅप्सूलमधे शॅम्पेन वगैरे हवी असेल तर वेगळे पैसे मोजावे लागतात. लहान मुलांच्या ट्रीपसाठी त्यांना विशेष सवलतही दिली जाते.

लंडन आय हे सुरवातीला एक शोभेची वस्तू म्हणून फक्त पाच वर्ष ठेवायचं असं ठरलं होतं. पण नंतर त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून युके सरकारनं ही वास्तू कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. युके सरकारच्या आकडेवारीनुसार दरवर्षी ३५ लाख माणसं लंडन आयची राईड करतात. इजिप्तच्या पिरॅमिड आणि भारताच्या ताजमहालपेक्षाही जास्त पर्यटकांना लंडन आय आकर्षित करतं.

हेही वाचा : मोदी सरकारने इतिहासजमा केलेला लोकसभेतला अँग्लो इंडियन कोटा काय आहे?

'तुम्हाला लंडनला घेऊन जायची व्यवस्था करतो'

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई आय साकारण्याची चर्चा झालीय आणि सगळ्यांनी त्याला होकार दिलाय, अशी माहिती अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर पत्रकारांची प्रश्न उत्तरं चालू झाली. हा प्रकल्प कोण चालवणार असा प्रश्न विचारल्यावर एमएमआरडीए म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटीयन रिजन डेवलपमेंट अथॉरिटी अंतर्गत हा प्रकल्प साकार करण्यात येईल, असं पवारांनी सांगितलं.

त्यानंतर हे मुंबई आय नक्की कसं असेल असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. तेव्हा 'मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना लंडनला घेऊन जायची व्यवस्था करतो. आणि तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव देतो’ असं मिश्कील उत्तर पवारांनी दिलं. ते नाही जमलं तर तिथलं विडिओ शुटींग काढून आणतो, असंही ते  म्हणाले. त्यांच्या या उत्तरामुळे पत्रकार परिषदेच्या गंभीर वातावरणातून सगळे बाहेर आले आणि खळखळून हसू लागले.

‘मुंबई आय’ कसं असेल याची अजून पुसटशीही कल्पना सरकारला दिसत नाही. पण इथल्या जनतेनं ‘मुंबई आय’सारखे छोटे मोठे पाळणे गावागावातल्या जत्रेत पाहिलेत. तेव्हा आता ‘मुंबई आय’च्या तिसऱ्या डोळ्यातून सरकार मुंबईचा झगमगीत माहौल दाखवणार की आधीच्यासारखंच हीसुद्धा एक घोषणाच ठरणार हे आपल्याला येत्या काळातच कळणार आहे.

हेही वाचा : 

बाबरी मशीद निकालानंतर मुस्लिमांनी काय करावं?

 अश्लीलता ही काय भानगड आहे: र. धों. कर्वेंचं न झालेलं भाषण

न्या. लोया मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी अमित शाहांचं टेन्शन वाढवणार?

अजित पवारांचा हा निर्णय दिल्लीत काँग्रेसच्या पराभवाचं कारण ठरणार?