भरकटलेल्या समाजात राहणाऱ्या भटक्यांची एक गोष्ट

२३ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ९ मिनिटं


एका गावातून दुसऱ्या गावात जात भटके विमुक्त भिक्षा मागत भारतभर भ्रमण करत असतात. या प्रवासातच त्यांची लग्न होतात, त्यांना मुलं होतात, कुणीतरी मरण पावतं. त्याचा तिथंच अत्यंविधी करून पुढं भटके पुढे चालू लागतात. गोरख या तरूणाचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू होतो. त्याच्या प्रेताला अग्नी देण्यासाठीही कोणी नसतं. भारतात वर्षानुवर्ष राहणाऱ्या या भटक्यांचा मायदेश नक्की कोणता याचं उत्तर काही मिळत नाही.

काही कामानिमित्त झारखंड राज्यातील रांची शहरात गेलो होतो. २३ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शंकरचा, माझ्या मोठ्या भावाचा फोन आला. ‘आपल्या गोरखचा रांची जवळच्या बंडू गावात मृत्यू झालाय. तू तिथं असल्यानं तुला फोन केला. तुला शक्य असल्यास जाऊन ये,’ त्यानं फोनवरून बातमी दिली. 

गोरख दादाराव भोसले. वय ३०-३५ असावं. बायकोचे वय २५. सात-आठ वर्षाच्या दोन मुली, एक दहा-बारा वर्षाचा मुलगा. एक मोठी मुलगी होती तिचं बारा-तेराव्या वर्षीच लग्न झालं. तीही अशीच भारताच्या कोणत्यातरी कोपऱ्यांत भिक्षा मागत असावी. गोरखचे वडील पाच-सहा वर्षापूर्वी असेच भटकत असताना कर्नाटक प्रांतात कॅन्सरमुळं वारले. दुसरा चुलता असाच आजारी अवस्थेत कुठेतरी वारला. एक लहान चुलता लक्ष्मण हा लहानपणी ८-१० वर्षाचा असताना भिक्षा मागताना हरवला. आई-वडिलांनी शोध-शोध शोधलं. पण यश आलं नाही. तो सापडलाच नाही.

या मुलाच्या आठवणीनं त्याच्या आई-वडिलांनी तिकडं परमुलखातच कुठेतरी प्राण सोडला. नंतर या लक्ष्मणच्या गतस्मृती जाग्या झाल्या आणि त्याला महाराष्ट्र, सोलापूर, बामणी गाव आठवलं. तो थेट १५-२० वर्षांनी गावाला आला. तोपर्यंत त्याच्या आई-वडिलांनी हे जग सोडलं होतं. लक्ष्मणही आपली भाषा बऱ्यापैकी विसरला होता. तो रडरड रडला आणि शांत झाला. हे सारं आठवायला लागलं. गोरखच्या संदर्भातले प्रसंग आठवायला लागले. भटक्यांच्या भग्न संसाराच्या प्रासंगिक अशा कहाण्या वर येऊ लागल्या.

भटक्यांना भारताचा भूगोल पाठ असतो

गोरख माझा दूरचा भाऊ होता. गोरखचा गोरा वर्ण, माफक उंची, वजन जेमतेम, साधारण बोलका, मदत करणारा स्वभाव, निर्भय वृत्ती, पान-तंबाखूचं आणि दारूचं व्यसन. स्वतःच्या मुला-मुलींबाबत हळवा पण बायकोबाबत कठोर वागणारा. त्याचे पणजोबा आणि माझे पणजोबा हे सख्खे भाऊ होते.

आमच्या खापर पणजोबांना म्हणजे रत्नुला दोन मुले लक्ष्मण आणि खेत्री. लक्ष्मणचा बाबाजी आणि खेत्रीचा ज्ञानोबा. बाबाजीला दोन मुलं शामराव आणि रामा. तर ज्ञानोबाला तीन दादाराव, नारायण आणि लक्ष्मण. त्यापैकी मी रामाचा आणि गोरख दादारावचा. असा आमचा रक्त संबंध आणि भिक्षा व्यवसायाशी संबंध. माझ्या आजोबानं भिक्षा मागून काही जमीन घेतली आणि स्थिरतेकडे वळण घेतलं. ज्ञानोबाला असं काही करता आलं नाही. ते आणि त्यांची पुढची पिढी भिक्षेकरीच राहिली.

गोरखचे वडील आणि माझे वडील यांचा एकमेकांना विशेष लळा होता. कोणत्या भागात विशेष भिक्षा मिळते? कोणत्या भागातले लोक चांगले आहेत? कोणत्या भागातली भाषा सोपी आहे? दाट वस्ती कुठं आहे? धोका कुठं आहे? स्त्रियांसाठी सुरक्षित प्रांत कोणता? असा त्यांच्यातला वार्तालाप मी अनेकदा ऐकला होता. भटकी भिक्षेकरी कुटुंब अशा माहितीची देवाणघेवाण करत असतात. म्हणुन तर त्यांना भारताचा भूगोल सर्वार्थानं पाठ असतो. त्यांचं ज्ञान हे एक प्रकारचं लोकल गॅझेट असतं.

अंधश्रद्ध लोक मागास होतात की मागास लोक अंधश्रद्ध होतात

महाराष्ट्रात सरकारमान्य अशा मुख्य ४२ भटक्या विमुक्त जमाती आहेत. त्याच्या पोट शाखा इंगळीच्या पायासारख्या २५० पेक्षा ज्यास्त वाढल्यात आणि अजून वाढतायत. यातल्या बऱ्याच भटक्या जमातीचा जगण्यासाठीचा मुख्य व्यवसाय भिक्षा मागणं हाच आहे.

यातील नाथपंथी डवरी गोसावी ही एक ऐतिहासिक भटकी जमात. गोरख हा याच जमातीचा. यांची अंदाजे लोकसंख्य ४-५ लाख असावी. त्यामधले निम्मे तरी लोक भिक्षा मागुनच जगतात, हे निरीक्षणात्मक अनुमान आहे. यांचं मूळ महाराष्ट्र असलं तरी वेल मात्र भारतभर पसरली आहे. ते भारतातल्या विविध भागत भिक्षा मागूनच आपला उदरनिर्वाह करतात.

नवरा-बायको, असली तर लहान मुलं, कधी-कधी आई-वडील किंवा अन्य नातेवाईक सोयरे सोबत असतात. आंधळ्याला आंधळ्याची सोबत असते त्या प्रमाणे! जगभर सामंती भांडवली व्यवस्थेच्या पिळवणुकीच्या वर्तणुकीनं अंधश्रद्ध लोक जास्त मागास असल्याचं निरीक्षणातून समोर येतं. किंवा मागास लोक अंधश्रद्ध ठेवले जातात असंही म्हणता येईल.

हेही वाचा : श्रमिक कष्टकऱ्यांचा आवाज लोकशाहीर द ना गव्हाणकर

दुःखाच्या झेंड्याखालीही श्रमिकांना येऊ दिलं जात नाही

ज्यांना चिकित्सेचा अधिकार नाकारला जातो ते मागास राहतात. त्यांचा मागासलेपणा हा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक असा बहुंगी असल्यानं शरीरात बसलेल्या कॅन्सरच्या विळख्यासारखा असतो. यामुळे पूर्ण जमातच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जमाती नष्ट होतील पण त्यांचं दारित्र्य नाही. भांडवलशाही वाढत असताना ती काही लोकांना-समुदायांना गुंगीचं औषध म्हणून धर्म आणि देव-देवळं यांचा वापर करायला लावते. भांडवलशाही मोठ्या कौशल्यानं त्यांच्या श्रमाची चोरी करून त्यांनाच चोर-मागास ठरवते. आणि पुन्हा यांच्या तथाकथित उन्नयनाचे कार्यक्रम आखून स्वतःच गब्बर होते.

भांडवलशाही सततचे लागणारे शोध, संशोधन, ज्ञान श्रमिकापासून लपवते. श्रमिकांना दु:खाच्या झेंड्याखालीही एकत्र येऊ देत नाही. शोषितांची एकजूट म्हणजे भांडवलशाहीची घसरण असते. त्यासाठी ती बुद्धिभ्रम करून सतत एकमेकांत संशयाचे भूत उभे करते. भांडवलशाही अक्टोपस प्रमाणे हजार हाताने शोषितांचे शोषण करते. अक्टोपस निसर्ग रचित आहे पण भांडवलशाही मनुष्य रचित आहे. 

भटक्यासारखे समुदाय जगण्यासाठी कशाचा सहारा घेत असतील? किंवा त्यांना कोणती साधने वापरण्याची मोकळीक असते? भटके भिक्षेसाठी देवाच्या मुर्त्या वापरतात. मुर्त्या विज्ञानाचे नियम वापरून बनविल्या जातात आणि त्याची पूजा अवैज्ञानिकतेचं काम करते. देवाच्या मूर्त्यांचा ते छोटा रथ बनवतात आणि त्यावर भिक्षा मागतात. कधी कधी काळूबाई, दुर्गामाता, साईबाबा, स्वामी समर्थ यांची पालखी करून त्यावर भिक्षा मागतात. ओरिसा राज्यातील पाच-सहा पाय गाई, तीन शिंगे, तीन डोळे, दोन जनेन्द्रीय, असलेली जनावरे घेऊन त्यावर भिक्षा मागतात, सर्व प्रवास पायी.

भटक्या विमुक्तांच्या जगण्याचा बोन्साय

दिवसाला १०-१५ ते २०-१५ मैलांचं अंतर चालून रस्त्यातील वाड्या-वस्त्या आणि शहरं आढळल्यास तिथं या साधनाचा वापर करून भिक्षा मागतात. ते आपल्या मूळ गावी वर्षाला एकदा या प्रमाणे येतात. पैशाच्या उपलब्धतेवर त्यांचं गावाकडे येणं ठरतं. याच प्रवासात लहान वयात त्यांची लग्नं होतात. त्यांना मुले-बाळे होतात. प्रवासात वाट चालता-चालता बाई बाळंत होते, तिथंच दगडानं नाळ तोडली जाते. ओली बाळंतीण पुन्हा पुढच्या प्रवासाला निघते. कोणी आजारी पडल्यास झाड-पाल्याचे औषध घेऊन कधी-कधी पैसे असतील तर खर्चिक दवाखाना बघून पुढचा प्रवास सुरु होतो.

या प्रवासात आजारानं, नैसर्गिक आपत्तीनं, म्हातारपणामुळं अनेकांचा मृत्यू होतो. अशा वेळी मिळेल तशा जागेत मिळेल त्या साधनानं मृताचं दहन अथवा दफन केलं जातं. कधी दहन दफानास जागा मिळेपर्यंत मृत शरीर घेऊन शेकडो मैल प्रवास करावा लागतो. रड नाही की बोंब नाही! हुंदका नाही की आक्रोश नाही! डोळ्यातून घरांगळणारे अश्रू आटवले जातात. कित्येक दिवसाचे उपाशी पोट बांधले जाते. अडव-तिडव वाढणार झड वाढू नये मूळ्या बांधून बोन्साय करतात तशा!

बोर्डिंग स्कुल मधे शिकणाऱ्या कित्येकांना आपल्या आप्त स्वकीयांचा मृत्यू सहा महिने वर्षांनी कळतो. तेव्हा सर्व काही संपलेलं असतं! ही कर्म कहाणी प्रत्येक भटक्या बिऱ्हाडाच्या वाट्याला येतेच येते. यात कधी बिऱ्हाडात निराशा नाही की आत्महत्येचा विचार नाही. जीवनाचाच विचार! जगण्याचाच विचार! भटके भाषा सोडतील. प्रांत सोडतील. पण जगणं सोडणार नाही.

हेही वाचा : एकविसाव्या शतकात एकविसावं बाळंतपण मिरवण्याचं काय करायचं?

अन्नाच्या शोधात जीव टांगणीला लागतो

मग गोरख दादाराव भोसलेचं काय झालं? तर गोरख दादाराव भोसले गाव बामणी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर इथला रहिवासी. रहिवासी म्हणजे काय तर त्याच्या वाड-वडिलांचं पाल तिथं होतं. तिथलं ना रेशन कार्ड, ना आधार कार्ड, ना ओळख पत्र, ना सातबारा, ना हे गाव आपलं आहे याचा काही पुरावा. म्हणून गोरख जमातीच्या परंपरेनं भिक्षा मागूनच उदरनिर्वाह करत होता. मागत मागत तो भारतभर फिरला. सारे भारतीय माझे बांधव आहेत, याचा कधी अनुभव त्याच्या वाट्याला आला नाही. 

शेवटी निसर्ग समृद्ध अशा झारखंड भागात गोरख गेला. झारखंड खरोखरच नावाप्रमाणे गर्द वनराई, प्रमाणाबाहेर पावसाळा, भाताची शेती, तुरळक मानव वस्ती, जंगली श्वापदांची धास्ती, अगदीच कमी रस्ते. पण तरीही हे भटके निष्ठेनं अन्नाच्या शोधात जीव टांगणीला लावत अशा भागात जातातच. तसा गोरखही गेला.

मिळालेलं वास्तव स्वीकारण्या अथवा नाकारण्यासाठी यांच्याकडे असतेच काय? कसं विसरणार पोटातील भुकेला? कसं विसरणार औषध-पाण्यावाचून तडफडून मरणाऱ्या पोटच्या गोळ्याला? कसं विसरणार पदरकरीन पोरीचा विनयभंग होताना? कसं विसरणार चोर समजून मरेपर्यंत मारणाऱ्या, ठेचणाऱ्या मारेकऱ्यांना? कसं समजून घेणार या भग्न संसाराला? एक-एक पिकलेलं पान गळावं तसं बिऱ्हाडातील गळणाऱ्या माणसांना? नवी पालावी फुटावी तसं जन्मणाऱ्या पिलाकडं बघून कशी करावी आत्महत्या?

मग व्यसनाशिवाय जवळचा मार्ग कोणता? कोण डोकं शांत ठेवायला मदत करणार? हे प्रश्न झाकण्यास कोण मदत करणार? पोटात अन्न नाही. आजारपणात औषध नाही. याने गोरख खंगत गेला. वाळल्या चीपाडागत होत गेला. आणि शेवटी बिन औषध पाण्याचा, आई-वडिलांविना, बहिण-भावांविना, नातेवाईकांविना एकटाच मृत्यूच्या सरणावर चढला. 

झारखंडचा निसर्ग श्रीमंत पण लोक गरीब

मला रांचीत बातमी समजली. माझ्या भावानं दिलेल्या फोनवरून मी गोरखच्या 10-12 वर्षाच्या मुलाला फोन लावला. बराच वेळ फोन उचलला गेला नाही. बंडू गावाजवळ एक एच.पी.चा पेट्रोल पंप आहे अशी माहिती मिळाली होती. त्या पंपाजवळ काही मीटर अंतरावर तांदळाची गिरणी आहे. त्या गिरणीजवळच्या आडोशाला गोराखचं पाल आहे. 

झारखंड आणि त्यातील राजधानीचं ठिकाण रांची आणि रांची जवळ बंडू गाव. झारखंड म्हणजे ८० % आदिवासींचा भाग. मुलनिवासीच्या संस्कृतीचा भाग. श्रीमंत नैसर्गिक भाग पण लोक गरीब. म्हणून अशा भगत गरीबच लोक राहतात. जिथे भांडवली श्रीमंत लोक राहतात तिथे निसर्ग कमकुवत असतो. जिथे निसर्ग सशक्त तिथे भांडवलशाही अविकसित असते. निसर्गाच्या संहारावर भांडवलशाही उभी राहते. अशा भांडवलशाही शहरीकरणाला निसर्गही धडा शिकवतो. जसा सिंधू संस्कृतीला शिकवला तसा. पूर, अवर्षण-रोगराई अशा साधनानं.

मी आणि माझे दोन सहकारी डॉ. जगदीश सोनावणे आणि डॉ. नागेंद्र शर्मा रांचीवरून गोराखाची डेड बॉडी शोधायला निघालो. ६० किलोमीटरचं अंतर ओलांडल्यावर एच.पी चा पेट्रोल पंप दिसला. तिथं तांदळाच्या गिरणीची आणि भिक्षेकरी बिऱ्हाडाची चौकशी केली. त्यांनी तांदळाच्या गिरणीची दिशा दाखवली. दिवस पावसाळ्याचे होते. डोक्यापर्यंत गवत वाढले होते. आम्ही पोचोपर्यंत रात्र झाली होती आणि तांदळाची गिरणी त्या अंधारात दिसत नव्हती. मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात डोक्याएवढ्या गवतातून चिखल तुडवत आम्ही गिरणीच्या दिशेनं गेलो.

हेही वाचा : कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधला शेतकरी कोलमडलायः राजू शेट्टी

आणि गोरखंच प्रेत सापडलं

तिथं भटक्याची पाले दिसली. ती गोरखचीच असल्याची खूणही दिसली. पण दोन कुत्री आणि दोन चार-पाच वर्षांच्या लहान लेकरांपलीकडे तिथं कुणी नव्हतं. सर्व सुन्न! त्या लहानग्याला काही सांगता येईना. त्या अंधाऱ्या रात्री आसपास पाहिलं तर बऱ्याच दूरवर एक दिवा मिणमिणता दिसला. दबकत-दबकत त्या परमुलखात मला माझ्या सहकार्यासह गोराखाच्या शवापर्यंत पोहचायचं होतं.

तिथं गेलो तर एक झोपडपटीवजा घर होतं. घरातून एक मध्यम वयाची बाई बाहेर आली. हिंदी मिश्रीत झारखंडी भाषेत विचारू लागली, ‘आप कौन लोग है? किसलीये आये हो?’ मी म्हणालो, ‘हम टीचर है. बच्चोंको पढाते है. ती बाई थोडावेळ थांबली. काही बलामत तर नाही ना याचा तिनं अंदाज घेतला. आणि म्हणाली, ‘यांह से दोन किलोमीटर दूर एक नदी है, उस नादिके किनारेपे उस आदमीको जलानेके लिय लोग गये है.

आता या अंधाऱ्या रात्री, झिम-झिम पावसात गोरखचे प्रेत कसे सापडणार? शेवटी त्याच बाईला विनंती करून तिच्या हाता-पाया पडून तिच्या एका सज्ञान मुलाला घेऊन आम्ही भिजत-भिजत पावसात वाहणाऱ्या नदीकडे गेलो. अर्थात रस्त्याच्या कडेला आमच्याकडे असलेल्या फोर व्हीलर वरून नदीचा किनारा शोधला, जळणारी प्रेते शोधली पण कुठेच गोरख सापडला नाही. शेवटी गाडीतून उतरुंन चालत नदीच्या किनाऱ्या किनाऱ्यानं बराच वेळ बरेच अंतर चालल्यावर अंधारात काही माणसे दिसली. त्यातील गोरखच्या बायकोला मी ओळखलं. तिनेही मला ओळखले. तिला हंबरडा फोडायचा होता आणि मलाही हुंदका अवरावयाचा होता. तिनं प्रेत दाखवलं. 

गोरखचा मुलगा सरणाची तयारी करत होता. लाकडं, पांढर कापड, मडक, फुलांचा हार, रॉकेल हे गोळा करणं त्या लहानग्याच्या अनुभव विश्वाच्या पलीकडे होतं. पण त्याने ते केलं. परंपरेचा पाईक होण्याची पात्रता अंगी येण्यासाठी त्याने प्रयत्नाची पराकाष्टा केली. बापाचं मढ सजवलं. परिस्थिती माणसाला सर्व शिकविते. ओल्या लाकडांवर गोरखला झोपवलेलं. अंधार पडलेला. एक दोन लिटर रॉकेल. १०-१२ वर्षाचा गोरखचा मुलगा आणि दोन स्थानिक लोक दूरवर बसलेले! बातमी कळल्यानं आत्ताच गोरखची बहिण गंगा आणि तिचा नवरा आले होते. तिनं तिच्या आई-वडिलांना, भावांनाव मुलीला संपर्क केला पण तो होऊ शकला नाही.

जिवंतपणी पेट न घेणारे मेल्यावरही घेत नाही

शेवटी मी निर्णय घेतला गोरखच्या प्रेताला अग्नी देण्याचा. झाला तेवढा सोपस्कार पुरे होता. पुढं कोणताच सोपस्कार न करता थेट अग्नी देण्यासाठी मी गोरखच्या मुलाला घेऊन पुढे झालो. ठेंभा पेटवला. शवाला पाच फेऱ्या मारल्या. आणि मुखाग्नी दिला! गोरखच्या बायकोने हंबरडा फोडला. बहिण गंगानं हंबरडा फोडला. मुलगा रडू लागला. दोन लहान मुली गांगरल्या. त्यांना काय चाललंय ते कळेना. 

लाकडं खूप मोठी आणि ओली होती. सगळं रॉकेल संपवलं. पण काही केल्या गोरख पेट घेईना. आपली ही माणसं जिवंतपणी अन्याय अत्याचाराच्या विरोधी पेट घेत नाहीत तर मेल्यावर काय पेट घेणार, असं काही वाटू लागलं. आणखी तीन चार हजाराचं सामान आणल्यावर शेवटी कसंबसं गोरखचं थंड झालेलं सरण गरम होऊन पेट घेऊ लागलं. माणसांचं असंच असतं खूपदा दुसऱ्याच्या सांगण्यावरून ते पेट घेतात! पुन्हा अर्धा पावूण तासं गेल्यावर प्रेत जळतं आहे हे पाहून गोरखच्या कुटुंबीयांना घेऊन पुन्हा त्यांच्या पालाकडे रवाना झालो. उद्या सकाळी गोरखची माती सावडायला येऊ म्हणून निघालो. 

दुसऱ्याच दिवशी गोरखची आई, दोन भाऊ कर्नाटकातून धावा घेत आले. रडत रडतच रस्ता विचारात पाल शोधून काढला. गोराखचे चीलेपिले पाहून त्यांचा जीव कासावीस झाला. गोरखच्या पत्नीचं भकास कपाळ कसे पाहणार! पुन्हा पालात रडारड. ते गोरखच्या चीतेकडे माती सवडण्यासाठी नदीकडे गेले. गोरखचं शेवटचे दर्शन झालं नाही, त्याच्या मातीला तर हात लागेल असे त्यांना वाटले होते. पण जाऊन पाहतो तर काय? नामोनिशान मिटले होते! नदीला पूर आला, त्या पुरात सरनासह गोरखही वाहून गेला.

गोरख आदिवासीच्या घराजवळ वारला होता. त्यांनीच त्याला सहारा दिला होता. त्यांच्या प्रथेप्रमाणे तिसऱ्या दिवशीचा मांसाहारी विधी बोकड कापून करणे आवश्यक होतं. जेंव्हा गोरखचं कुटुंब बंडू गाव सोडून जाऊ लागले तेंव्हा आदिवासींनी त्यांना अडवले आणि इथेच बोकड कापून क्रियाक्रम केल्याशिवाय तुम्हाला जाऊ दिलं जाणार नाही असे सांगितले. पुन्हा पैशाची जुळवा-जुळव केली, बोकड कापले, सर्वाना जेवण घातले आणि हे भटके आपल्या तथाकथित मायदेशी परतण्यास निघाले. यांचा कोणता मायदेश नेमका कोणता हे आजतयागत कळलेलं नाही!

हेही वाचा : 

इंदिरा गांधीः गुंगी गुडिया ते देशाची दुर्गा

बाजार समित्या बरखास्ती ही तर दुसरी नोटाबंदीच

कॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी?

जागतिक पुरुष दिन विशेषः लैंगिकतेला आधार बदलत्या माध्यमांचा

(लेखक मुंबई विद्यापीठात इतिहास विषयाचे प्राध्यापक आहेत.)