अपना बाजारची गोष्टीः सक्सेसफूल सहकार मॉडेलची कहाणी

२१ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला खासगीकरण, जागतिकीकरणाच्या धोरणाने आपली पाळंमुळं चांगलीच रुजवली. याचा सहकार क्षेत्राला मोठा फटका बसला. आपल्याकडची सहकार क्षेत्रातली साखर कारखानदारी तर बुडीत निघाली. पण मुंबईतल्या अपना बाजारने सगळी संकटं परतवून सहकाराचं नवं मॉडेल उभं केलं. समाजवादी कार्यकर्ते गजानन खातू यांनी 'अपना बाजारची गोष्ट' या पुस्तकात या मॉडेलची स्टोरी सांगितलीय.

समाजवादी, पुरोगामी चळवळीतलं वय आणि समज या दोन्ही बाबतीत ज्येष्ठ असलेली खूप कमी लोकं आता आहेत. त्यातील एक म्हणजे खातूभाई. यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वयाला अजिबात न घाबरता त्यांच्याशी बोलता येतं, थेट आपल्या वयाच्या पातळीवरुन दोस्ती करता येते. वेगळी मतं मांडायला किंवा त्यांच्या मतावर प्रश्न उभे करायला किंचितही त्यांची ज्येष्ठता आड येत नाही. 

वयानं जुनं होत असताना वर्तमानाच्या ताऱ्यांचे नवनवे झंकार ऐकत भविष्याचा वेध घेण्याची त्यांची वृत्ती आणि क्षमता अनुभवताना आपल्या म्हातारपणाविषयी मनात एक लोभस चित्र तयार होतं. खातूभाईंचे खाणं, राहणं, बोलणं यातला रस पाहता ‘संध्याछाया भिवविती हृदया’ हा कविवर्य तांबेंचा स्वतःपुरताच अनुभव असावा असे वाटू लागते.

अशा या खातूभाईंचं वैचारिक लेखन वाचलं होतं. पण ‘अपना बाजार’शी असलेल्या त्यांच्या वैयक्तिक संबंधाचा केवळ संदर्भच मला होता. त्यातले तपशील ठाऊक नव्हते. या पुस्तकामुळे ती उणीव दूर झाली. त्यांच्या व्यक्तित्वाची आणि अपना बाजार या एका अत्यंत महत्वपूर्ण सहकाराच्या प्रयोगाची घडण कळायला मदत झाली.

१९६८ ते १९८२ या १४ वर्षांमधली म्हणजे त्यांच्या वयाच्या २७ ते ४२ या कालखंडातली ही घडण त्यांनी तब्बल ३६ वर्षांनी रेखाटली. ‘हे पुस्तक अपना बाजारचा इतिहास नाही. १९४८ ते १९६८ पर्यंतच्या संस्थेच्या वाटचालीची त्यात नोंद नाही. १९८२ नंतरच्या कालखंडाचीही चर्चा नाही. त्यामुळे अनेकांना ते अपुरे वाटेल.’ असा ‘कबुलीजबाब’ ते सुरवातीलाच देतात.

पण ‘निरोप घेताना’ या शेवटाकडच्या प्रकरणात ते म्हणतात- ‘ही १४ वर्षे अविरत कामाची होती. प्रतिवर्षी काही ना काही घडत होते. जणू बाल्यावस्थेतून युवावस्थेत वाटचाल होताना जडणघडणीची वाटचाल.’ त्यामुळे या पुस्तकात अपना बाजारचा संपूर्ण इतिहास नसला तरी त्यात नोंदवलेल्या काळाचं मोल मोठं आहे.

पत्राशेडच्या अपना बाजारमधे आले

पर्सोनेल मॅनेजमेंट हा विषय असलेले खातूभाई क्रॉम्पटनच्या भव्य कारखान्यातली नोकरी सोडून अपना बाजारच्या नायगावच्या पत्राशेडच्या कार्यालयात येतात.  ते म्हणतात- ‘पण मला त्याचं फारसं वाटलं नाही. कारण ही आपली माणसं होती. आपल्या विचारांची होती. क्रॉम्प्टनमधलं कामगारविरोधी वातावरण मला कधी आवडलं नाही. आपल्या विचारांच्या क्षेत्रात यायला मिळाले याचाही आनंद होता.’

ज्या परिसरात अपना बाजार उभं राहत होतं, तो परिसर नायगाव, दादरचा. खातूभाई या परिसराचं व्यक्तित्व रेखाटताना लिहितात- ‘नायगाव हे कामगार आणि राजकीय चळवळीचं केंद्र. अशोक मेहतांच्या नेतृत्वाखाली समाजवादी कामगार चळवळीने इथे सामाजिक कामाची पायाभरणी केली. त्यांच्याच प्रेरणेने अपना बाजार सुरु झाले. जी. डी. आंबेकरांनी इंटकची उभारणी केली. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांग्यांनी लाल बावटा उभारला. त्यामुळे नायगावच्या सामाजिक राजकीय जीवनात समाजवादी, काँग्रेस आणि कम्युनिस्ट या तिन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते होते. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते होते. त्यामधे नंतर शिवसेनेची भर पडली.’

अपना बाजारच्या कर्मचाऱ्यांनी ठसा उमटवला

अपना बाजारच्या टीमचे निर्विवाद कॅप्टन असलेले दादा सरफरे आणि त्यांचे सहकारी या सर्व प्रवाहांना कसे यशस्वीपणे हाताळत होते त्याची नोंद खातूभाई करतात. अपना बाजारची अध्वर्यू असलेल्या या मंडळींची पाळेमुळे त्या भागातील सामाजिक, राजकीय जीवनात खोल रुतलेली होती.

नायगावमधे आदराचे स्थान असलेल्या दादा सरफरेंबद्दल लिहिताना ते म्हणतात- ‘दादांच्या घरी गेलं की दादा बहुधा नायगावमधल्या कुठल्या तरी मर्तिकाला जाऊन आलेले असत. बहुधा त्या काळात नायगावमधे एकही मर्तिक असे नसेल ज्याला दादा गेले नाहीत. दादांच्या या चौफेर जनसंपर्कामुळेच दादा नायगावचे किंगमेकर झाले.’

दादांच्या बरोबरीने अपना बाजार उभारणीतले सहकारी, पुढं आमदार झाले आणि आमदार होऊनही शेवटपर्यंत एकाच खोलीच्या घरात राहणारे एन. के. सावंत यांचाही नायगावच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर ठसा होता. अपना बाजारचे बहुतेक कार्यकर्ते प्रजा समाजवादी पक्षाचे. संस्थेच्या कामाचा मोबदला न घेणारे, मासिक बैठकीचा प्रवासभत्ताही पार्टीला देणारे, व्यापाऱ्यांच्या दिवाळी भेटी घरी न स्वीकारता ऑफिसमधे जमा करायला लावणारे हे पदाधिकारी. या सर्व सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या धगधगत्या काळातील प्रेरक, ध्येयवादी कार्यकर्त्यांच्या विलक्षण जिद्दीचे कोंदण अपना बाजारच्या घडणीला मिळालं.

अपना बाजारचा विस्तार वाढला

या चबुतऱ्यावर अपना बाजारची इमारत आकार घेत होती. एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर आणि पुढे जनरल मॅनेजर म्हणून खातूभाईंचा सहभाग सुरु झाला तो या माहोलात, या गतीत. ते लिहितात- ‘पाण्यात पडलेला माणूस जसा जिवाची बाजी लावून हातपाय मारतो तसे आम्ही करत होतो.’ फिरती बससेवा, बोनस स्टॅम्प योजना, विजयी भांडी बचत योजना, दिवाळी भेट, जनता मिठाई अशा अनेक यशस्वी तर काही अयशस्वी उपक्रमांद्वारे तसेच अनेक क्षेत्रांतला संचार करत अपना बाजार शिकत पुढं जात होतं.’ या दरम्यान अनेक मासलेवाईक अनुभव- जिंकल्याचे, पडल्याचे, फसल्याचे या पुस्तकात वाचायला मिळतात.

खातूभाईंच्या कारकीर्दीतल्या या सर्व प्रयत्नांचे फलित नोंदवताना ते लिहितात- ‘१९६८ ते १९८२ या चौदा वर्षांत अपना बाजारचा कायापालट झाला. १९४८ साली नायगावमधे एक धान्य दुकान सुरु करणाऱ्या नायगाव कामगार ग्राहक सहकारी संस्थेचं १४ शाखा आणि २५ प्राथमिक संस्था सदस्य असलेल्या मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक संस्थेत रुपांतर झालं. अन्न धान्याबरोबर रेशनिंगचं वितरण, कापड दुकान, औषध दुकान आणि औषध भांडार असा विस्तार झाला. मुंबईपासून दिल्लीपर्यंत संस्थेची ओळख निर्माण झाली.’

नायगावमधील अपना बाजार मागोमाग वाशी, मुलुंड, अंधेरी या ठिकाणी स्वतःच्या इमारतींत विस्तारला. याच काळात संस्थेनं सरकारचं भाग भांडवल आणि कर्जाची संपूर्ण परतफेड केली. अशी परतफेड करणारी संस्था हे अपना बाजारचे वेगळेपण. आणखी बऱ्याच मिळकती ते पुढे नोंदवतात.

अपना बाजार ही एक सहकार चळवळ

या यशाची गुरुकिल्ली काय? याचं सरळसोप्प उत्तर नाही आणि तसं ते नसंतही असे ते म्हणतात. मात्र काही ठळक गोष्टींची, वैशिष्ट्यांची ते नोंद करतात. उदा. पदाधिकारी आणि अधिकारी यांची साप्ताहिक बैठक. त्यामुळे निर्णयप्रक्रिया जलद व्हायला तसेच पदाधिकारी आणि अधिकारी यांतील संवाद वाढायला मदत झाली. 

अपना बाजारचे वार्षिक अहवाल फक्त कायद्याच्या पूर्ततेसाठी नसत तर त्यातून सभासदांना आपली संस्था खरोखरी कशी चालते ते कळण्यासाठी असत. त्यात कारणमीमांसा असे. 

सभोवतालच्या घडामोडींचा उदा. १९७१ चं बांग्ला देशाचं स्वातंत्र्य युद्ध, सरकारी धोरणांचा या अहवालात तपशील असे. खातूभाई म्हणतात- ‘अपना बाजारचे अहवाल म्हणजे वैश्विक विचार आणि स्थानिक कृती याचा वस्तुपाठच आहे.’ अपना बाजार हे समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी उभं केलेलं रचनात्मक काम आहे आणि सहकारी चळवळ परिवर्तनासाठी आहे हे भान कायम ठेवलं. परिणामी राजकीयदृष्ट्या कायम एकत्र राहिलेल्या या मंडळींनी संस्था चालवताना पक्षीय संकुचितता येणार नाही याची काळजी घेतली.

खातूभाईंनी कामगारांची साथ सोडली नाही

परिवर्तनवादी संस्थाचालक आणि त्याच दृष्टिकोनाचा उत्तम प्रशासकीय कौशल्य असलेला व्यवस्थापक एकत्र आल्याने धंदा, परिवर्तनाची चळवळ आणि कामगारांचे हितसंबंध यांची कशी समतोल सांगड घातली जाते, तुटू न देता पेच कसे सोडवले जातात याचे नमुने या पुस्तकात आहेत. 

अपना बाजारच्या कामगारांनी शिवसेनेची युनियन आणली तेव्हा तिला मान्यता द्यायचा प्रश्न तयार झाला. खासगी कारखान्यात मालकधार्जिणी युनियन असायला आपला विरोध असतो. सहकारी क्षेत्रही याला अपवाद असता कामा नये. या भूमिकेतून कामगारांच्या युनियन निवडण्याच्या अधिकाराला खातूभाईंनी साथ दिली. संस्थाचालक नाराज झाले. पण त्यांनी आपला आग्रह सोडून अखेर या युनियनला मान्यता दिली.

कामगारांचे अधिकार आणि धंद्याचे हित याबाबत कामगार संघटनांतील कार्यकर्ते आणि नेत्यांची भूमिका हा मोठा प्रश्न आजही आहे. या दोन्ही बाबींचा विचार करण्याचं आणि तसं कामगारांचं शिक्षण करण्याचं काम कॉ. डांगेंनी केलं. पण ही परंपरा पुढं चालवणारे नेते कमी राहिले, जवळपास दुर्मिळच. 

खातूभाई या परंपरेचं वाहक आहेत. कामगारांच्या योग्य मागणीसाठी संस्थाचालकांशी संघर्ष, संस्थेच्या आणि पर्यायाने कामगारांच्या भविष्यातील अहिताला रोखण्यासाठी युनियनच्या मागणीला विरोध यात खातूभाईंनी कधी तडजोड केली नाही.

अपना बाजारच्या सेवकांचं आयुष्य बदललं

अपना बाजारचा सेवक वर्ग मुख्यतः बहुजन समाजातला. कारागिरी, शेती आणि कष्ट करणारा. पारंपरिकपणे उच्चवर्णीयांचा प्रभाव असलेल्या व्यापारात बहुजनसमाजातील नव्या पिढीत व्यापार हाताळण्याची क्षमता निर्माण करण्याचं काम खातूभाईंच्या पुढाकाराखाली अपना बाजारमधे झालं. अपना बाजारच्या चळवळीचं मापन करताना या सोशल इंजिनियरींगची दखल घेणं गरजेचं आहे, असे खातूभाई म्हणतात ते रास्तच आहे.

अपना बाजारच्या सेवकांना हाऊसिंग बोर्डाच्या जागा मिळाव्यात यासाठी संस्थेनं प्रयत्न केले. आर्थिक अडचणींमुळे पुढे न येणाऱ्या सेवकांना ही संधी कशी महत्वाची आहे, त्यासाठी सोने विका, पतपेढीतून कर्ज घ्या असे समजवावं लागे. या कर्जाचा न पेलणारा भार संस्थेनं उचलावा यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन खातूभाई सेवकांना देत. यामुळे या सेवकांचं आयुष्य कसं बदलून गेलं याची उदाहरणं खातूभाईंनी पुस्तकात दिली आहेत. 

आपना बाजार सोडलं

सामान्य माणसाच्या कर्तृत्वावरचा विश्वास वाढवणाऱ्या घटनाही ते नोंदवतात. सेवकांना शिकवणारे खातूभाई ‘भोगलेंमुळे मला शिक्षणापलीकडच्या व्यावहारिक शहाणपणाचं दर्शन झालं.’ असंही नमूद करतात.

इतकं सगळं करणाऱ्या खातूभाईंनी अपना बाजार यशाच्या शिखरावर असताना आणि कर्तृत्वाची आणखी भरारी घेण्याचे वय असताना, संस्थेच्या वाढीबरोबरच मोठ्या प्रमाणात वेतन वाढीची शक्यता असताना, विशेषतः मुलं लहान आणि एकटा कमावता असताना अवघ्या ४२ व्या वर्षी अपना बाजार का सोडले? 

पदाधिकाऱ्यांबरोबर मतभेद नव्हते, कामकाजात पेचप्रसंग नव्हते, सेवकांशी उत्तम संबंध होते अशावेळी काहीही कारण नसताना मी अपना बाजार सोडले हे आपल्या स्नेही, सहकाऱ्यांना शेवटपर्यंत पटलं नाही, असे खातूभाई म्हणतात. या पुस्तकात काही कारणं, त्यावेळची त्यांची मनःस्थिती तसंच भूमिका ते नोंदवतात.

संस्था उत्तम अवस्थेत असताना, सर्वांशी सलोख्याचे संबंध असताना बाहेर पडावं हे उत्तम, हे पहिलं कारण. आपल्याकडून होण्यासारखं, निर्मिती करण्यासारखं जे होतं ते झाल्यावर केवळ दैनंदिन कामात अडकून पडावं असं वाटत नव्हतं. असं अडकून पडणं संस्थेच्या हिताला तसेच व्यक्तिगत विकासाला अडथळा ठरणार होतं. अशावेळी नव्या नेतृत्वाला संधी देऊन नव्या दिशेच्या शोधाच्या शक्यता निर्माण करणं, हे दुसरे.

संवेदना पूर्ण शाबूत ठेवून वस्तुनिष्ठपणे जीवनाला सामोरं जाण्याच्या छे, जीवनाला वळविण्याच्या या निःसंग स्थितप्रज्ञतेमुळंच त्यांच्या निरोपाची घटना अशी असू शकते – ‘प्रत्येक माळ्यावरती सर्वांना भेटत चार मजले उतरलो आणि हिंदमाताच्या बस स्टॉपवर पुढच्या बसची वाट पाहत उभा राहिलो.’

गरजेपेक्षा जास्त कमाई नको

अपना बाजार सोडल्यावर पुढे काय? ऐन उमेदीच्या काळात गतिमान आयुष्याला ब्रेक लागणार होता. पण त्याच्यावर मात करणारं अपना बाजारच्या बाहेर सामाजिक कामाचं एक बृहद वर्तुळ मी तयार केलं होतं, असे खातूभाई सांगतात.

अपना बाजारमधे असतानाच राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, विषमता निर्मूलन शिबिरं, नामांतर आंदोलन, जेपी आंदोलन यांत त्यांचा सहभाग होता. या सामाजिक आणि राजकीय कामातून अनेक आव्हानं पुढं येत होती. त्यामुळे अपना बाजारनंतर नोकरी स्वीकारली नाही असे खातूभाई म्हणतात. रिटेल मॅनेजमेंटमधे कन्सलटन्सी हे व्याप न वाढवता गरजेपेक्षा जास्त कमाईच्या मागं लागायचं नाही असं ठरवून १९८२ पासून ‘सार्वकालिक कार्यकर्ता न होता सर्वकाळ सार्वजनिक जीवनात वावरलो.’ असं ते नोंदवतात.

पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात सहकारी चळवळीच्या भवितव्याविषयी खातूभाईंचं चिंतन आहे. हे प्रकरण मूळातूनच वाचायला हवे. या चिंतनाची प्रत कळावी म्हणून काही सूत्रं नोंदवतो.

पुन्हा सहकार चळवळ उभी राहणार

औद्योगिकीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आर्थिक विषमतेच्या कष्टकऱ्यांना बसणाऱ्या चटक्यांपासून सोडवणूक करायला शासनव्यवस्था पुरेशी सक्षम नव्हती. अशावेळी या दुर्बल घटकांनी सहकारी चळवळीचा आधार घेतला. हे जगभरच्या विकसनशील तसेच विकसित देशांत घडलंय. आता औद्योगिक भांडवलशाहीची जागा वित्तीय भांडवलशाहीने घेतलीय. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादन क्षेत्रातल्या नोकऱ्या आणि सेवा क्षेत्रातले रोजगार घटतायंत. संघटित क्षेत्र मोडल्यामुळे संघटित कामगार चळवळ संदर्भहिन होतेय. तशीच आजवरची सहकारी चळवळही संदर्भहिन होतेय.

सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक घेण्याचे अधिकार जसे रजिस्ट्रारकडे आहेत, तसेच लहानसहान हाऊसिंग सोसायट्यांची निवडणूकही रजिस्ट्रारच घेत आहे. मग या सगळ्यात लोकसहभाग आणि सहकार राहिला कुठे? शेतीसमाज, औद्योगिक कष्टकरी समाज आणि मध्यमवर्ग यातलं स्थिर आणि आंतरिक नातं असलेल्या समूहांचं स्थलांतर सुरु झालं. असा विखंडित समूह परस्पर सहकार्याने सहकारी संस्था कशा उभ्या करु शकेल?

तरीही सहकारी चळवळीला भविष्य प्रदान करणारी नवी परिस्थिती आता तयार होतेय. कोणत्याही पेचप्रसंगातून बाहेर पडू शकेल अशी लवचिकता दाखवणाऱ्या भांडवलशाहीला २००८ नंतरच्या अरिष्टातून बाहेर पडणं मुश्कील झालंय.

अर्थव्यवस्था ठीकठाक करण्याच्या सर्व प्रचलित उपाययोजना निरुपयोगी ठरतायत. अशावेळी सहकारी अर्थव्यवस्था प्रस्थापित स्पर्धेच्या मूल्याला, प्रस्थापित नफ्याच्या संकल्पनेला आणि प्रचलित भांडवलीकरणाच्या प्रक्रियेला पर्याय देऊ शकते. पण यासाठी सहकाराचे नवे प्रारुप सिद्ध करण्याची गरज पुस्तकाच्या अखेरीस ते नमूद करतात.

पुस्तकाचं नावः अपना बाजारची गोष्ट

लेखकः गजानन खातू

पानंः १९०

किंमतः २००

प्रकाशकः अक्षर प्रकाशन

(सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांच्या ब्लॉगवरून साभार)