पहिल्या वृत्तपत्रापासूनच मीडियाचा स्वातंत्र्यासाठी संघर्ष आजही सुरूच

२९ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


बरोबर आजच्याच दिवशी तब्बल २३९ वर्षांपूर्वी बंगाल गॅझेट हे भारतातलं पहिलं वर्तमानपत्र प्रत्यक्ष अस्तित्वात आलं. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश माणसाला त्याचं श्रेय द्यावं लागेल. त्यांनी फक्त भारतातलं पहिलं वर्तमानपत्रच काढलं नाही, तर वृत्तपत्र स्वातंत्र्याची पहिली लढाईही लढली.

हॉलंडमधून भारतात आलेला एक हरहुन्नरी व्यापारी विल्यम वोल्ट्स यांनी १७६६ मधे वर्तमानपत्र काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यात यश मिळालं नाही. त्यानंतर जवळपास चौदा वर्षांनी त्याची कल्पना प्रत्यक्षात आणली जेम्स ऑगस्टस हिकी याने. २९ जानेवारी १७८० मधे बंगाल गॅझेट हे भारतातलं पहिलं वर्तमानपत्र कोलकात्यात आकाराला आलं.

बंगाल गॅझेट या पेपराचं पूर्ण नाव होतं, `कलकत्ता जनरल अडवटायझर अँड हिक्कीज बेंगाल गॅझेट`. त्याला हिक्कीज गॅझेट असंही म्हणतात. अर्थातच ते इंग्रजी भाषेत प्रकाशित झालं होतं. हिकीला इथल्या भारतीयांसाठी तसंच ईस्ट इंडिया कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी एक वृत्तपत्र लाँच करायचं होतं. पण त्याला ईस्ट इंडिया कंपनीचा विरोध होता. त्यामुळे त्याला सतत विरोध होत राहिला. त्यामुळे कोलकात्यातल्या ईस्ट इंडिया कंपनी सरकारने २३ मार्च १७८२ रोजी पेपरचं प्रकाशन रद्द केलं.

कंपनीच्या विरोधामुळे बंगाल गॅझेटचं आयुष्य फक्त दोन वर्षांचं होतं. ते साप्ताहिक होतं. त्यात जाहिरातीही भरपूर असत. तरीही त्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. या दोन वर्षांतच आणखी काही इंग्रजी वर्तमानपत्र प्रकाशित झाली. बंगालमधे कलकत्ता करिअर, एशियाटिक मिरर, ओरिएंटल स्टार. मद्रासमधे मद्रास गॅझेट, मद्रास करिअर आणि मुंबईत हेराल्ड, बॉम्बे गॅझेट.

हिकी पत्रकारितेचा निर्भय चॅम्पियन

जेम्स ऑगस्टस हिकी यांना भारतीय पत्रकारितेचा पिता म्हणून ओळखलं जातं. ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार असतानाही वृत्तपत्र सुरू करण्याचं धाडस करणारा तो पहिला माणूस होता. ते भारतातील पत्रकारितेचे निर्भय चॅम्पियन होते. तत्कालीन सरकारचा विरोध सहन करुनही त्यांनी आपलं वर्तमानपत्र निर्भयपणे चालवलं. खरं तर इथूनच भारतीय पत्रकारिता विश्वाची सुरवात झाली.

सुरवातीच्या काळात ते ईस्ट इंडिया कंपनीचे प्रिंटर होते. त्यामुळे पुढे वर्तमानपत्र काढताना त्यांना याचा फायदाच झाला. जेम्स हिकी हे काही व्यावसायिक पत्रकार नव्हते. ते व्यापारी होते. तसंच ते डॉक्टरकीही करायचे. वृत्तपत्रात त्यांना सुरवातीला फार रस नव्हता. पण ते वृत्तपत्र काढण्याच्या संकल्पनेतल्या नाविन्यामुळे झपाटले होते. त्यातून त्यांना समाधान मात्र मिळत होतं. त्यांनी पत्रकारितेला आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याच माध्यम बनवलं. त्यातूनच त्यांच्या वृत्तपत्राचं स्वरूप तयार झालं.

वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष

कोलकात्यात बंगाल गॅझेटची सुरवात झाली आणि त्याचबरोबर वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या संघर्षाला सुरवात झाली. त्या चळवळीचा नायकच हिकी होता. ब्रिटिश नागरिक असूनही तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनीच्या मुजोर भूमिकेला विरोध केला. हिकी धाडसी आणि साहसी होते. ते कोणालाही घाबरत नसत.

हिकीच्या वर्तमानपत्राची चार पानं आणि १२ कॉलम कंपनी सरकारची डोकेदुखी बनली. प्रत्येक पानावर तीन कॉलम होते. त्यामधे कंपनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्याविरुद्ध धारदार व्यंगचित्र प्रकाशित करण्यात येत असत. टीका तर कधीकधी अश्लीलतेची पातळीही गाठे. वॉरन हेस्टिंग्स आणि एलिझा इम्पेसारख्या सर्वोच्च अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराविषयी थेट टीका असे. हिकी यांनी आपली संपादकीय भूमिका स्पष्ट करताना सांगितलं होतं की प्रत्येक नागरिकासाठी आणि स्वतंत्र सरकारसाठी वृत्तपत्र स्वातंत्र्य आवश्यक आहे.

हिकीने ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात मुक्तपणे लिहिलं. त्यांची लेखन पद्धत अतिशय प्रभावी आणि बोल्ड होती. ज्याच्यावर टीका करायची, त्याचं नाव त्यांनी कधीही दिलं नाही. पण त्यांचा इशारा स्पष्ट असायचा. त्यांची टीका नेमकी कुणावर आहे, हे लोकांना सहजपणे समजायचं.

हिकीने तत्वनिष्ठा आणि लेखनस्वातंत्र्य या दोन गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून वर्तमानपत्र चालवलं. त्यांनी आपल्या वर्तमानपत्रात विविध विषयांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वर्तमानपत्राची पानं राजकारण, जागतिक बातम्या आणि भारतातील कार्यक्रम याविषयीच्या लेखनाने भरली. लोकांना पत्रं आणि कविता लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं. विनोद आणि उपहास हे बंगाल गॅझेटचे प्लस पॉइंट होते. कारण यातून लोकांना मनोरंजनाबरोबर बातम्या मिळाल्या.

वृत्तपत्राला सर्वसामान्यांचा मंच बनवला

कंपनी सरकारशी दोन हात करताना हिकीने ठामपणे सांगितलं की लोकांना त्यांची मतं व्यक्त करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असायला हवं. त्या स्वातंत्र्यास शाप देणारं प्रत्येक कृत्य समाजासाठी दडपशाहीचं आणि घातक ठरेल. या भूमिकेतूनच हिकीने बंगाल गॅझेटला प्रतिष्ठा मिळवून दिली.

कंपनीचे कर्मचारी आणि इंग्रजी लोकांशिवाय सर्वसामान्य भारतीयही या वृत्तपत्राचे वाचक बनले. त्यात आपलं काहीतरी आहे ही जाणीव सर्वसामान्यांमधे निर्माण करण्यात हिकी यशस्वी ठरला. हिकीने आपल्या वृत्तपत्रास सर्वसामान्यांचा मंच म्हणून पाहिलं. जिथे वेगवेगळ्या स्तरातील लोक समाजाच्या प्रश्नांवर बोलू शकतील. त्यांनी पक्षपाती भूमिकेस नकार दिला.

समाजातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना हिकीने आपल्या वर्तमानपत्रातून वाचा फोडली.  शहर सुधारणा, रस्ते बांधकाम, स्वच्छता अशा विषयांना प्राधान्य दिले. हिकीने कोणालाही न भीता वर्तमानपत्रातून भ्रष्टाचार आणि कंपनी सरकारविरोधात आवाज उठवला. त्याचा परिणाम म्हणून सरकारने त्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले आणि २३ मार्च १७८२ ला वर्तमानपत्राचं प्रकाशन बंद झालं.

कशासाठी सुरू केलं वर्तमानपत्र?

वृत्तपत्र सुरवात करण्यामागे हिकीने तीन महत्वाची उद्दीष्टं ठेवली होती. ईस्ट इंडिया कंपनीचा खरा चेहरा उघड करणं. दोन स्थानिकांना त्यांच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांविषयी जागरूक करणं. कंपनीच्या शोषणाच्या धोरणाविषयी जागृती करणं.

बंगाल गॅझेटमधे मोठ्या प्रमाणात ईस्ट इंडिया कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खासगी आयुष्यावर लेख छापले जात. हिकीने वर्तमानपत्रात गवर्नरच्या पत्नीच्या बेकायदेशीर व्यवहारांविषयी छापलं, तेव्हा त्याला शिक्षा झाली. हिकीने कोणालाही न भीता वर्तमानपत्रातून भ्रष्टाचार आणि कंपनीविरोधात आवाज उठवला.

तो उद्ध्वस्त झाला, पण स्वातंत्र्य नाही

पत्रकारांना त्रास दिला जाऊ शकतो, त्यांच्यावर हल्ला केला जाऊ शकतो किंवा तुरुंगात टाकलं जाऊ शकतं. पण पत्रकारिता मरत नाही. हे त्याही काळातल्या पत्रकारितेने सिद्ध केलं होतं. आज ज्या आव्हानांचा सामना मीडियाला करावा लागतोय, तसाच त्याही काळात करावा लागत होता. आव्हानांचं स्वरुप वेगळं असेलही मात्र सत्ताधीशांना आपल्या धोरणांवर टीका करणारी कोणतीही माध्यमं नकोच होती. त्या दडपशाहीच्या काळात हिकी खंबीरपणे उभा राहिला. कंपनी सरकारसमोर न वाकता त्याने वृत्तपत्र स्वातंत्र्याची भूमिका मांडली.

वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी तीन वर्षं तुरुंगात काढल्यानंतर हिकीची तब्येत ढासळली होती. तो आजारीही पडला आणि तो कंगालही झाला. त्याच्या हकालपट्टीमुळे त्याचा शेवट अत्यंत वाईट झाला. त्याविषयी फारशी माहिती मिळत नसली. तरी युरोपाच्या वाटेवर चीनच्या जवळ असताना जहाजावरच १८०२ मधे त्याचं निधन झालं.

हिकीची हलाखीची परिस्थिती पाहून नंतरची वर्तमानपत्र कंपनी सरकारशी पंगा घेण्याच्या भानगडीत पडली नाही. हिकीच्या प्रकरणापासून धडा घेऊन सरकारने वर्तमानपत्रांसाठी नियमही केले. त्यामुळे अनेक वर्षं इंग्रजी वर्तमानपत्रं सरकारची मुखपत्रच बनून राहिली. तरीही हिकीने जागवलेली वृत्तपत्र स्वातंत्र्याची ठिणगी अधूनमधून जागी होत राहिली. पुढच्या काळात वर्तमानपत्रांनीच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठं योगदान दिलं. त्याचा पाया हिकीने घातला होता.