अराजकतेच्या उंबरठ्यावरचा अस्वस्थ पाकिस्तान

१९ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


१९४७ पासून बलुचिस्तान आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय. बलुचिस्तान पाकिस्तानापासून स्वतंत्र झाला तर भारत आणि मध्य आशियाला जोडणारा प्रमुख दुवा म्हणून त्याकडे पाहता येईल. भारतानं बलुच लोकांचा संघर्षाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचं काम केलंय. त्यामुळे बलुचिस्तात अस्वस्थता निर्माण केल्याचे आरोप भारतावर लावले जातायत.

२०१९ च्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जम्मू-कश्मीर मधल्या जनतेच्या मानवीय अधिकारांच्या उलंघनाबद्दल संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेत आग पाखड करत होते. अगदी त्याचवेळी न्यूयॉर्क बिल्डींगच्या बाहेर पाक आणि अफगाणिस्तान मधले बलुचि आणि पश्तूनी लोक इम्रान खान यांच्या नावाने अगदी त्याच कारणासाठी ओरड करत होते. या विचित्र योगायोगात पाकिस्तानामधली गेल्या अनेक वर्षांतली विविध प्रदेशातली आंदोलनं आणि त्यांच्या अधिकारांची होत असलेली गळचेपी सामावली आहे.

हातात पश्तून तहफूज चळवळीचे बॅनर्स घेवून पाकच्या बलुचिस्तान प्रांतातील हे लोक पश्तुनी बांधवांना आपला पाठींबा देत होते. त्यांच्यापैकी बहुतेक लोक हे बलुच रिपब्लीकन पार्टी, द मुताहिदा कौमी मुव्हमेंट आणि द जिसेंट मुताहिदा अशा चळवळींचे प्रतिनिधी होते. त्यांच्या नाऱ्यांमधे सरहद्द गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांच्या भावनांचं प्रतिबिंब होतं. 

१९४७ च्या फाळणीचं वर्णन खान अब्दुल गफार खान यांनी ‘तुम्ही आम्हाला लांडग्यांच्या कळपात सोडत आहात’ असं केलं होतं. बहुतेक सर्व पश्तून लोकांना, बलुचींना, गिलगिट बाल्टिस्थानच्या रहिवाशांना तसेच सिंधींना देखील लष्कराच्या ताब्यात असलेला पाकिस्तान हा लांडग्या सारखाच वाटतो. गेल्या अनेक वर्षापासून तिथल्या जमातींच्या आणि सभोवताल्या राज्यांच्या भरवशावर हा देश स्वतःला पुष्ठ करतोय.

बलुचिस्तानातल्या संघर्षासाठी भारत जबाबदार

पाकिस्तान हा पंजाब, सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, दक्षिण आणि पूर्व वझिरिस्थान, पाकव्याप्त काश्मिर म्हणजेच गिलगिट-बाल्टिस्थान अशा प्रदेशांचा मिळून अस्तित्वात आलेला आहे. बलुचिस्तान आणि पंजाब हे पाक मधले भौगोलिकदृष्ट्या मोठे प्रदेश. या मोठ्या प्रदेशांचं पाकिस्तानच्या राजकराण, समाजकारण, व्यवसायावर प्राबल्य आहे. पण हे सगळेच प्रदेश वेगवेगळ्या कारणांनी अस्वस्थ आहेत. त्या प्रांतातील लोकांची मानसिक अस्थिरता आता आंतरराष्ट्रीय पातळीवर समोर येतेय. न्यूयॉर्कमधे बलुची लोकांनी केलेली निर्दशने हे त्याचेच प्रातिनिधीक उदाहरण आहे.

भारत पाक फाळणीपूर्वी बलोच हा स्वतंत्र प्रदेश होता. पण इस्लामी एकीकरणाच्या नावाखाली बलोचला इंग्रजांनी पाकिस्तान सोबत जोडलं आणि तेव्हापासून आजतागयत बलोच आपल्या अस्तित्वासाठी अस्वस्थ आहे. तेव्हापासून आपल्या अस्तित्वासाठी बलुचि लोक आंदोलन करतायत. पाक प्रशासन लष्कराच्या मदतीनं हे आंदोलन चिरडून टाकत आलंय. बलुचि चळवळीसाठी आणि संघर्षासाठी पाकिस्तान आधीपासून भारताला जबाबदार धरत आलाय. या सर्व आंदोलनांना भारताची फूस असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे.

पाकिस्तानचे खलिफा महम्मद अली जीनांनी मुस्लिमांच्या आयडेंटीटी क्रायसिसच्या नावावर फाळणीचं समर्थन केलं होतं. पण १९७० मधे धार्मिक आधार हा आयडेंटीटी क्रायसिसचं मुख्य कारण होऊ शकतो हा जीनांचा सिद्धांत सपशेल खोटा ठरला. कारण बांग्लादेशची निर्मिती ही धार्मिक आधारावर झाली नसून ती भाषा आणि आयडेंटीटीच्या आधारावर झाली होती.

हेही वाचा : काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रियंकास्त्र बाहेर काढण्यामागची चार कारणं

परवेझ मुशर्रफ यांच्या क्रौऱ्याचा कळस

तेव्हापासून पाकच्या एकंदर राजकीय वाटचालीत नवीन नकारात्मक प्रवाह दिसायला लागले. या प्रवाहांपैकीच एक म्हणजे बलोच चळवळ. या चळवळीच नेतृत्त्व बलोच रिपब्लिकन पार्टी करते. बलुचिस्तानमधील सामाजिक स्थिती ही अतिशय गंभीर आहे. इंग्रजी मासिक ‘द वीक’च्या माहितीनुसार बलोच रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष बम्हुमदाघ बुग्ती यांच्या म्हणण्यानुसार - एखाद्या खेड्यावर हल्ला होत नाही, नागीरकांचा छळ होत नाही किंवा बंदुकीच्या गोळ्यांनी चाळणी झालेला बलुच राजकीय कार्यकर्त्याचा शव रस्त्यावर फेकलेला दिसत नाही असा एकही दिवस जात नाही.

बुग्ती यांचे हे विधान बलोच मधील अस्थिर सामाजिक परिस्थिती दर्शवतं. तिथला सामान्य बलोच नागरिक कुठल्या सामाजिक अस्वस्थतेत जगत असेल याचा अंदाज त्यांच्या या विधानावरून लावला जाऊ शकतो. बम्हुमदाघ बुग्ती यांना काही वर्षांपूर्वी हद्दपार करण्यात आलं होतं. जवळजवळ 9 वर्ष बुग्ती जिनेव्हा इथं हद्दपारीत होते. २००६ मधे बुग्तीने स्वतःची हद्दपारीतून अतिशय चमत्कृतीपूर्णरित्या सुटका करून घेतली.

पाकचे भूतपूर्व राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या लष्करी राजवटीने बलुचिस्तानच्या डेरा बुग्ती भागात आपल्या क्रौर्याचा कहर करतांना, बलुचिस्तानचे माजी राज्यपाल आणि बुग्तीचे आजोबा नवाब य. बुग्ती यांची हत्या केली होती. तेव्हा केवळ २५ वर्षांचे तरूण बुग्ती २०१० पर्यंत अफगाणिस्तानमधे पळून गेले होते. पाकने बुग्तीला आतंकवादी घोषीत करून त्याच्या पलायनासाठी भारताला जबाबदार धरलंय.

हेही वाचा : फक्त राजाचा बेटाच राजा बनणार का?

अचानक नाहिसे होतात मानवधिकार कार्यकर्ते

हद्दपारीतून परत आल्यापासून बुग्ती सातत्याने बलुचि नागरिकांच्या समस्या, बलोच मधली सामाजिक स्थिती आणि पाक लष्कर पुरस्कृत प्रशासन कशी दडपशाही करतंय याबद्दल आंदोलन करताहेत. ही आंदोलनं आता तीव्र स्वरूप धारण करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलीयत.
 
१९७० च्या दशकात जवळजवळ ८ हजार बलुचि लोक पाक मधून स्वतंत्र होण्याच्या चळवळीत मारले गेलेत. आजवर शेकडो मानवाधिकार कार्यकर्ते आणि नेते बलोच मधून अचानक नाहीसे झालेत. त्यांची संख्या १० हजाराहून अधिक आहे.
 
१९८० च्या दशकात बलुचिस्तान हे सोव्हीयत सैन्याच्या विरूद्ध लढण्यासाठीची युद्धभूमी होती. त्याचा एक परिणाम असा झाला की सोव्हीयत सैन्याच्या विरोधात लढतांना इथं तालिबानच्या विचारांची बीजं रोवली गेली. पाकिस्तानने बलोच भूमिला तालिबानचा स्वर्ग बनवण्यात कुठलीही कमतरता ठेवली नाही असा आरोप आमेरिकरा गेली कित्येक वर्ष करते आहे.

पाक आणि त्यांचं लष्कर सातत्याने बलोचमधल्या नागरी अधिकारांची पायमल्ली करत असल्याचा तिथल्या जनतेचा आरोप आहे. उच्चभ्रु पंजाबी लोकांचे पाकिस्तानवर प्राबल्य आहे असाही आरोप बलुचि लोक करतात. पंजाबी लोकांना बलोच भागातल्या मिलियन डॉलरच्या खनिजात आणि नैसर्गिक संसाधनातच फक्त रस आहे. बलुची लोक हे पंजाबी आणि सिंध प्रांतातील लोकांपेक्षा खुप गरीब आहेत तरीही आणि बलोचमधे प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्ती असतानाही पाकिस्तानच्या राष्ट्रीय अंदाजपत्रकात बलोचच्या वाट्याला अतिशय कमी आर्थिक तरतूद येते. त्यामुळे त्या भागात फारसा विकास झालेला नाही.

हेही वाचा : शहरी भागात मोदी लाट असूनही भाजपची चिंता काही संपेना!

भारताकडून मदतीची अपेक्षा

बलोच नॅशनल मुव्हमेंट या अग्रणी बलोच चळवळीचे अध्यक्ष खलील बलोच यांच्या मते बलुचिस्तान जर स्वतंत्र झाला तर तो भारत आणि मध्य आशिया यांच्यामधे महत्त्वाचा दुवा बनून या भागामधे शांती आणि स्थैर्य निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. 

चीन पाकिस्तान इॅकॉनॉमिक कॉरीडोअरला देखील बलोच लोकांचा विरोध आहे. बलुचिस्तानची जमीन, समुद्र आणि नैसर्गिक संसाधनांचा आणि स्त्रोतांचा गैरफायदा घेणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे असं बुग्ती यांचं मत आहे. वाढणारा चीनी प्रभाव हा फक्त बलोचसाठी नव्हे तर पाक आणि शेजारच्या देशांसाठीही धोकादायक आहे. 

ग्वादार बंदरांची उभारणी करून चीनने बलुचींना आणखी वेगळं केलंय. त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असणारे मासे सुद्धा स्थानिक लोकांना दिले जात नाहीयत. पाकमधला हा आंतरीक संघर्ष भारत त्रयस्तपणे बघत असतांना पाकिस्तानमधले बंडखोर गट मात्र भारताकडून नैतिक आधार आणि भौतिक मदतीची अपेक्षा करतायत.

पाक व्याप्त कश्मीर आणि गिलगिट-बलुचिस्तानमधले लोक त्यांच्या प्रश्नांना जागतिक पातळीवर वाचा फोडतायत. त्याबद्दल भारतीय प्रधानमंत्र्यांनी २०१६ च्या स्वातंत्रदिनाच्या भाषणात जाहीरपणे त्यांना धन्यवाद दिलं होतं. बुग्तींच्या शब्दांत सांगायचं तर बलुचीच्या प्रश्नांनी लक्षणीयरित्या जगाचं लक्ष वेधलंय.

हेही वाचा : झारखंडमधे नरेंद्र मोदींच्या सभेला लाखोंची गर्दी, पण

तर बलोचवर चिनचं वर्चस्व निर्माण होईल

बलुचिस्तान हा प्रदेश भारतीय उपखंडाला मध्य आशिया तसेच मध्य पूर्वेशी जोडत असल्यामुळे तो भारतासाठी तसा महत्त्वाचा प्रदेश आहे. बलोची लोकांची सांस्कृतिक नाळ भारत आणि मध्य आशियाशी जुळलेली आहे. बलुचि लोक प्रामुख्याने दोन भाषा बोलतात. त्यातील बलुची भाषा ही इंडो इरानियन आहे तर बहुई भाषेचं मूळ हे द्रविडीयन भाषांशी जुळलेलंय. भारताने अजून बलोच मधे लष्करी किंवा इतर भौतिक मदत दिली नसली तरी त्यांच्या चळवळीचं एकप्रकारे नैतिक समर्थन केल्यानं आता आंतरराष्ट्रीय पातळीवर बलोच चळवळीचा आक्रोश पोचेल आणि त्यांच्या मागणीची नोंद होईल अशी बलुचि लोकांना आशा आहे.

भारतही बलोच आणि गिलगिटबाबत अत्यंत सावध भूमिका घेत पावलं टाकतोय. चीन पाकिस्तानमधे करत असलेली गुंतवणूक, आर्थिक मदत, रशियाचा पाकिस्तानसोबतचा शस्त्रास्त्र खरेदीचा अलिकडचा व्यवहार हे सगळं भारतासाठी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. चीन पाकिस्तान इॅकॉनॉमिक कॉरिडोर म्हणजेच सीपीईके हा भारतासाठी डोकेदुखी आहे. कारण त्याच्या विकासाने गिलगिट आणि बलोच तसेच पश्चिम आशियात चीनचं वर्चस्व निर्माण होईल. 

गिलगिट हा पाक व्याप्त काश्मिरचा भाग असून त्या जमीनीवर भारताचा अधिकार आहे असं भारत वेळोवेळी सांगत आलाय. या प्रदेशावरचा हक्क भारताला सोडायचा नाही. म्हणून भारताने सीपीईके कराराला विरोध केलाय. याच रणनितीचा एक भाग म्हणून भारत बलोच आणि गिलगिट चळवळीला नैतिक समर्थन करताना दिसतोय. 

बलुचिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलेली ही आंदोलनं पाकिस्तानच्या राजकीय, लष्करी आणि सामाजिक जीवनात काय उलथापालथ घडवून आणते हे भविष्यात दिसेलच पण पाकिस्तानील जवळपास सगळेच प्रदेश हे अस्वस्थ आहेत आणि आता त्यालील लोक चळवळी निर्णायक आणि निराकाराच्या भूमिकेत आल्या आहेत. पाकिस्तान लष्करी वर्चस्वाखालील प्रशासनास लोक विरोधाने हादरे बसायला सुरूवात झाली आहे.

हेही वाचा : 

यासर अराफात : एका वादळाची शोकांतिका

डायना राजमुकुटाची गरज नसलेली राजकन्या

आपली भूमिका इतिहासाची दिशा ठरवणार आहे

ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?