देशभक्त सुभाषबाबूंच्या मातृप्रेमाची ही स्टोरी आपल्याला माहीत आहे का?

२३ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. सुभाषबाबूंच्या शौर्याच्या अनेक गोष्टी आपण वाचल्यात. त्यांच्या महात्मा गांधी तसंच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल तर अनेक असल्या नसलेल्या गोष्टी आपल्यापुढे आल्यात. या सगळ्यांमधे देशभक्त सुभाषबाबूंच्या मातृभक्तीची स्टोरी दुर्लक्षित राहिली. सुभाषबाबूंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जडणघडणीबरोबरच त्यांच्या मातृभावाची ही कहाणी.

देशगौरव, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मातृभूमीवरची असीम भक्ती, त्यांची प्रखर बुद्धिमत्ता, त्यांचा पराक्रम, त्यांचा मुत्सद्दीपणा, त्यांचं शुभ्रधवल चारित्र्य, राष्ट्रीय ऐक्याविषयीची त्यांची ठाम भूमिका हे सारं स्वच्छ सूर्यप्रकाशाइतके लखलखीत नि वादातीत आहे. त्यांचं महात्मा गांधी यांच्याशी असलेलं तसंच जवाहरलाल नेहरू यांच्याशी असलेले प्रेमाचे आणि तितकेच तणावाचे संबंध याचीही बरीच चर्चा झालीय. तथापि त्यांची आपल्या आईवर किती विलक्षण भक्ती होती,  त्यांच्या अंतर्मनातला मातृभाव कसा होता याची चर्चा खूप कमी झालीय. 

स्वातंत्र्य लढ्याच्या काळात जडणघडण

आई ही सुभाषबाबूंची प्रेरणा आणि स्फूर्ती होती. कोलकता इथले प्रख्यात वकील जानकीनाथ बोस आणि प्रभावतीदेवी यांना १४ अपत्यं होती. त्यातले शरद्चंद्र हे दुसरं आणि सुभाषबाबू हे आठवं अपत्य म्हणजेच सहावा मुलगा होते. तो काळ स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी भारलेला होता. सुभाषबाबूंचा जन्म २३ जानेवारी १८९७ चा आणि स्वामी विवेकानंदांचा देहान्त १९०२ चा.

स्वामीजी गेले तेव्हा सुभाष पाच वर्षांचे होते. ते पंधरा वर्षांचे झाले, तेव्हा विवेकानंदांचं वाङ्मय त्यांच्या वाचनात आलं; ते वाचून भारावून गेले. विवेकानंदांच्या अलौकिकत्वाशी त्यांचा परिचय झाला. शिकागो सर्वधर्म परिषदेत भारताची आणि हिंदु धर्माची पताका गौरवाने फडकवल्यानंतर सार्याप देशभर त्या महान संन्याशाचे विचार पोचले. सारे देशवासीय त्यांची पूजा, त्यांचा आदर करत होते आणि कोलकता ही तर त्यांची जन्मभूमी होती.

सुभाषचा जन्म कटकचा. जानकीबाबू हे नंतर कोलकत्याला स्थायिक झाले. विवेकानंदांच्या क्रांतिकारी विचारांनी भारलेल्या त्या भूमीत त्यांचं भरणपोषण झालं. त्याच भूमीत देशबंधू चित्तरंजन दास हे राष्ट्रीय विचारांचे नेते कार्यरत होते. काँग्रेसची स्वातंत्र्य चळवळ फोफावली होती आणि त्याच वेळी सशस्त्र क्रांतिकारकांची जहाल चळवळही सुरू होती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं राष्ट्रीय चळवळीतलं नेतृत्व देशानं स्वीकारलं होतं. त्या वातावरणात सुभाषबाबूंच्या विचारांचं पोषण सुरू होतं.

हेही वाचा : तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

कृतिशील मानवतावादाचा विचार

विवेकानंदांनी कर्मयोगाचं केलेलं विवेचन कुमारवयातल्या सुभाषबाबूंना प्रभावित करून गेलं. बोस घराणं सुखवस्तू असलं, तरी अतिभौतिकतावादी नव्हतं. सुभाष यांनी पाश्चिमात्य शिक्षण घेतलेलं असलं तरी समकालीन तरुणांप्रमाणे ते चैनीला चटावलेले नव्हते.
‘आत्मानो मोक्षार्थं जगद्धिताय च’ म्हणजेच जगाच्या उद्धारातच आत्म्याचा मोक्ष आहे, या तत्त्वाचा अंगिकार त्यांनी केला होता.

सुभाषबाबूंनी मठाधीशाप्रमाणे पूर्ण एकांतवास नाकारला आणि आधुनिक काळातला पोषाखी उपयुक्ततावादही नाकारला. स्वामी विवेकानंदांचा अद्वैतवादाचा सिद्धान्त भारतातल्या वास्तवाला दारिद्र्याला नाकारत नव्हता, त्याकडे डोळेझाक करत नव्हता. ‘वस्त्रहीन, निवाराहीन, उपाशी, अशिक्षित असे सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे तुम्ही ठासून जगाला सांगा आणि त्यांचा उद्धार करा’, हा विवेकानंदांचा कृतिशील मानवतावाद सुभाषबाबूंनी स्वीकारला.

तसंच स्वतःच्या आईबरोबरच जगातल्या प्रत्येक बाईकडे आई म्हणून बघून तिला वंदन करायचं, हा स्वामी विवेकानंदांचा संस्कार सुभाषबाबूंच्या मनात खोलपर्यंत रुजला. त्यांचं संपूर्ण जीवन त्या संस्कारातूनच घडलेलं दिसतं. म्हणूनच वासनेतून उद्भवणार्याज कोणत्याही लैंगिक व्यभिचाराचा स्पर्शही त्यांच्या आयुष्याला झालेला नव्हता. तशा कोणत्याही संदर्भात त्यांचं नाव कुठंही घेतलं जात नाही. याचं कारण काय, हे त्यांचं राजकीय आणि वैयक्तिक जीवनचरित्र अभ्यासताना कळून येतं.

स्वामी विवेकानंदांचा प्रभाव

सुभाषबाबू लिहितात, ‘माझ्या जीवनात विवेकानंदांनी प्रवेश केला, तेव्हा माझं वय फक्त पंधरा वर्षं होतं. त्या क्रांतीमुळे माझ्यातली प्रत्येक गोष्ट कमीजास्त प्रमाणावर बदलून गेली. त्यांच्या शिकवणुकीतूनच नाही, तर त्यांच्या छायाचित्रांमधूनही त्यांचं एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व मला जाणवलं. माझ्या मनात बंदिस्त असलेल्या ज्या समस्यांमुळे मी जास्त सतर्क होत गेलो, त्या समस्यांवर समाधानकारक तोडगा फक्त त्यांच्यापाशीच मला मिळाला.’

सुभाषबाबूंनी सुरू केलेल्या धार्मिक पुनरुत्थानाच्या प्रवाहात अनेक तरुण सहभागी झाले होते. त्यांची धर्मपरायण वृत्ती सुधारकी बाण्याची होती. धार्मिक उपचारांमागचा मूळ उद्देश समजून न घेता अंधश्रद्धेतून ते केले जातात, असं त्यांचं मत होतं. संघटनेची बांधणी करताना आध्यात्मिक वृत्तीतून, पण कर्मयोगाच्या तत्त्वावर ते करायचे.

हेही वाचा :  रानडे-फुले यांच्यात मतभेद असूनही दोघांची समाजसुधारणा तत्त्वं एक होती!

दुर्गा मातेच्या पुजेवरून आईला पत्र

ते दुर्गेला आई मानून तिच्याकडे पाहायचे. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद जसं कालीमातेची उपासना करताना पराकोटीच्या मातृभावनेतून करायचे, तीच सुभाषबाबूंची भावना होती. ते पंधरा वर्षांचे असताना कटकहून कोडलिआला गेले. तिथून त्यांनी आपल्या आईला प्रभावतीदेवींना एक पत्र पाठवलं.

‘आदरणीय आई,

आज दुर्गापूजेचा अखेरचा दिवस. तू पूजेत तल्लीन झालेली असशील. मला वाटतं यंदा दुर्गापूजा थाटमाटात आणि समारंभपूर्वक साजरी झाली असेल. पण आई, खरोखरच या थाटामाटाची आवश्यकता आहे का? आपण मनापासून दुर्गेची आळवणी करत असू, तर तेवढंच तिला पुरेसं आहे. इतर गोष्टींची आवश्यकताच काय? डामडौल आणि अनन्यभावे भक्ती या परस्परविसंगत गोष्टी आहेत.

यंदा मी दुर्गापूजेच्या सांगता समारंभाला जायचं टाळलं. दुर्गादेवी ही जगन्माता आहे. तिला सार्याय लोकांची काळजी आहे.

तुझा निष्ठावंत पुत्र,

सुभाष’


सुभाषबाबूंचा पूजेला विरोध नव्हता, तर डामडौलाला होता.

आणखी एका पत्रात ते लिहितात,

‘प्रिय आई,

आज फक्त देशच दयनीय अवस्थेत आहे असं नाही, तर आपल्या धर्माची स्थिती पहा. आपला हिंदू धर्म किती वैश्विक आणि पवित्र होता. सध्या तो किती अवनत अवस्थेत आहे. तो शाश्वत असा दृढ विश्वास आता लुप्त पावला की काय? नैतिकतेचा, विश्वासाचा अभाव आणि फाजील धर्माभिमानाला उधाण आलंय. इतके पाप आणि अनंत यातना. लोकांच्या वाट्याला आलेलं अपरिमित दुःख. आई, हे सर्व पाहून, डोळ्यांतून अश्रू पाझरणार नाहीत का?’

‘एखादा मनुष्य किती काळ आपल्या देशाची आणि धर्माची अशी अवस्था पाहू शकेल? आता अधिक काळ थांबणं शक्य नाही. यापुढे कुणाला निद्रा घेणंही शक्य नाही. आता या धुंदीतून आपण बाहेर यायलाच हवं. कातडीबचाव धोरण फेकून देऊन प्रत्यक्ष कृती करायला हवी. पण हाय रे दुर्दैवा! कितीसे निस्वार्थी तरुण मातेच्या स्वातंत्र्यासाठी आणि उद्धारासाठी आपल्या वैयक्तिक आशा-आकांक्षांवर पाणी सोडायला तयार आहेत?’

‘आई, हा तुझा मुलगा तरी तयार आहे का?’

आपल्या प्रज्ञावान अस्वस्थ मुलाच्या प्रश्नांची उत्तरं प्रभावतीदेवींकडे नव्हती.

सुभाषबाबूच कस्तुरबांना ‘बा’ म्हणायचे

सुभाषबाबूंच्या मनात जो मातृभाव होता, त्यातूनच त्यांनी देशाला माता मानून तिची सेवा केली. देशातले शेतकरी, धोबी, चर्मकार, अस्पृश्य, सफाई कामगार अशा मागास वर्गाकडून देशाची प्रगती होईल, म्हणून त्यांची प्रगती झाली पाहिजे, ही विवेकानंदांची भावना घेऊन सुभाषबाबूंनी राष्ट्रकार्य केलं. आपल्या आईविषयी तर त्यांच्या मनात भक्ती होतीच, त्याशिवाय देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी वासंतीदेवी यांच्याविषयी आणि महात्मा गांधींच्या अर्धांगिनी कस्तुरबा गांधी यांच्याविषयीसुद्धा त्यांच्या मनात श्रद्धा होती. 

कस्तुरबांना सारेच ‘बा’ म्हणत. इतकंच नाही तर स्वतः बापूसुद्धा त्यांना ‘बा’ म्हणूनच हाक मारत. फक्त सुभाषबाबू एकमेव असे होते की, ते कस्तुरबांना ‘माँ’ म्हणत. आणि गांधीजींच्या आश्रमात एकट्या सुभाषबाबूंनाच चहा प्यायची परवानगी होती. स्वतः कस्तुरबाच त्यांना चहा द्यायच्या; सुभाषबाबूंचा बालहट्ट त्यांच्याजवळ चालायचा.

सुभाषबाबू भारतीय नागरी सेवा म्हणजेच आयसीएसच्या परीक्षेत चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सर्व सुखोपभोग ऐषाराम देणारी ही नोकरी त्यांनी सहजपणे ठोकरली. ते गांधीजींना भेटले. त्यांच्या सांगण्यानुसारच चित्तरंजन दास यांचं शिष्यत्व पत्करलं. देशबंधू चित्तरंजन दास हे विवेकानंदांपेक्षा सात वर्षांनी लहान होते. एकाच धार्मिक-सांस्कृतिक मुशीतून दोघांची जडणघडण झाली होती. ते सुभाषबाबूंचे राजकीय गुरू होते.

हेही वाचा : र धों. कर्वेंचा बुद्धिवाद अस्सल आणि आरपार होता

आणि ‘नेताजीं’चा जन्म झाला!

देशातल्या दरिद्री जनतेला विवेकानंदांनी दरिद्री नारायण असं नाव दिलं होतं. दरिद्री नारायणाच्या सेवेला वाहून घ्या, अशी त्यांची शिकवण होती. त्यातूनच सुभाषबाबूंनी दरिद्री नारायणाच्या सेवेचं व्रत स्वीकारलं आणि बंगालच्या मोठ्या दुष्काळात त्यांनी जनसेवा हीच देशसेवा, देवसेवा मानून कार्य केलं. दरिद्री नारायण सुखी व्हायचा असेल, तर आधी देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, असा निश्चय त्यांनी केला.

सोविएत रशियात झालेल्या क्रांतीविषयीची प्रतिक्रिया सुभाषबाबूंनी विवेकानंदांच्या प्रेरणेतून दिली होती. पण बोल्शेविक क्रांतीच्या माध्यमातून विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी नव्यानं अभ्यास केला. तो काळ मोठा धगधगता होता. रामकृष्ण परमहंस यांच्या सहधर्मचारिणी शारदा माता कोलकत्यात राहात होत्या. १९२० पर्यंत त्या हयात होत्या. शारदा मातेला गांधीजींच्या चरख्याच्या चळवळीविषयी विशेष आस्था होती. सुभाषबाबूंना त्यांच्याविषयी श्रद्धा होती.

लोकांचे दारिद्र्य आणि दारिद्र्याच्या आगीत होरपळून होणार्याा स्त्रियांच्या आत्महत्या बघून शारदा माता संतापल्या. ‘हे इंग्रज कधी जातील? हे आपला देश कधी सोडतील? साधारणतः प्रत्येकाच्या घरी चरखा असायचा. लोक आपले कापड आपण विणीत. कपड्यांची टंचाई नव्हती. ब्रिटिशांनी य सर्व गोष्टींचा नाश केला. आम्हांला त्यांनी फसवलं. त्यांच्या स्वस्त कपड्यांची चटक लावली.’
 
हे सगळं सुभाषबाबू बघत होते, अनुभवत होते. त्यातूनच त्यांच्यातल्या ‘नेताजीं’चा जन्म झाला!

हेही वाचा : 

मोदी मास्तरांचे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना ७ गुरूमंत्र

खरंच, भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्नच केला नाही?

भारत माता की जय म्हणणं हा माझा अधिकार, जावेद अख्तर यांचं वायरल भाषण