बीटीएस : चांगुलपणाचा कोरियन बँडबाजा

१४ ऑक्टोबर २०२२

वाचन वेळ : ७ मिनिटं


बीटीएस या कोरियन बँडची तुफान क्रेझ शाळा-कॉलेजच्या पोरांपासून स्वतःला तरुण म्हणवून घेणाऱ्या सर्वांमधे दिसतेय. त्यांनी लाइव कन्सर्टसाठी भारतात यावं म्हणून फिल्डिंग लावली जातेय. या बँडच्या यशामागची कहाणी भन्नाट मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळेच संगीताच्या पलीकडे जाऊन हा बँड खूप काही सांगू पाहतोय.

दुसरीला असलेल्या लेकाच्या शाळेच्या रफवहीत एक लिस्ट सापडली. त्यावर लिहिलं होतं, ‘बीटीएस’. त्याखाली एकेक नावं लिहिलेली होती. जिन, सुगा, जे-होप, आरएम, जिमिन, वी, जुंगकूक. मी त्याला विचारलं, हा काय प्रकार आहे? त्यानं सांगितलं, ‘बाबा, ही बीटीएसची नावं आहेत. आम्ही शाळेतलं सगळे मित्र ‘बीटीएस आर्मी’त आहोत.’

‘बीटीएस आर्मी’ हे ऐकूनच माझ्या डोक्यात गोळीबार सुरु झाला होता. मग त्यानं समजावून सांगितलं की, बीटीएस हा कोरियन बँड आहे. आम्हा सगळ्या मित्रांना तो फार आवडतो. आम्ही यूट्यूबवर त्यांचे वीडियो बघतो. त्यावर शाळेत एकमेकांशी बोलतो. त्यांचे फोटो जमा करतो. आम्ही त्यांचे फॅन आहोत, म्हणून आम्ही सगळे ‘बीटीएस आर्मी’. ही आर्मी म्हणजे लढाई करणारी आर्मी नाही.

लेकाची ही सगळी तयारी पाहून आता बीटीएस काय आहे, हे समजून घेणं माझ्यासाठी तातडीचं आणि महत्त्वाचं होतं. त्या सगळ्या शोधातून एवढंच कळलं की, हे सगळं भारी प्रकरण आहे. नव्या जगाची भाषा बोलणारी ही पोरं आपल्याला नीटच कळली पाहिजेत.

हेही वाचा: आशाताई जेव्हा रहमानसाठी गातात

जग जिंकणारं बीटीएस

‘बीटीएस’ हा दक्षिण कोरियन बँड ‘के-पॉप’ म्हणजे कोरियन पॉप प्रकारची गाणी म्हणतो. खरं तर हे सगळं के-पॉप कल्चरच भन्नाट आणि जगभर क्रेझ असलेलं आहे. त्यात ‘बीटीएस’ हा मुलांचा आणि ‘ब्लॅक पिंक’ या मुलींच्या बँडला वेड्यासारखी फॅन फॉलोइंग आहे. फक्त ‘बीटीएस’ची माहिती सांगणारीही यूट्यूब चॅनल आहेत, सोशल मीडियावर पेज आहेत आणि असं खूप काही! सगळा मिळून हा अब्जावधी डॉलरचा धंदा आहे.

बीटीएस नावानं ओळखले जाणारे जिन, सुगा, जे-होप, आरएम, जिमिन, वी, जुंगकूक हे सात जण आज अब्जाधीश आहेत. पण त्यांचं राहणं, बोलणं, वागणं आणि मुख्य म्हणजे गाणं हे बिलकुलच अब्जाशीशांसारखं उच्चभ्रू नाही. गाण्यातून ते जे काही मांडतात ते साधं सोपं आणि कुणालाही भावेल असंच आहे. मुख्य म्हणजे ते माणसाच्या माणूसपणाचं आणि माणूसपणातल्या चांगुलपणाचं सेलिब्रेशन करतायत. त्यामुळेच या सात तरुण मुलांनी आज जग जिंकलंय.

बीटीएसचा अर्थ काय?

बीटीएस हा खरं तर ‘बँगटन सोनिएंडन’चा शॉर्टफॉर्म आहे. हा एक कोरियन भाषेतला वाक्प्रचार आहे. त्याचा सर्वसाधारणपणे अर्थ असा आहे की, आम्ही सगळे बुलेटप्रूफ, अनब्रेकेबल म्हणजेच अभंग आणि अनबीटेबल म्हणजेच अजिंक्य आहोत.

हे नाव अधिक स्पष्ट करताना ते म्हणतात की, तरुणांबद्दल जगभरात एका ठराविक पद्धतीनं विचार केला जातो. या तरुणाईच्या वाटेला कायमच त्याच त्याच अपेक्षा, टीका आणि हेटाळणी येते. साधारणतः ‘ही आजकालची पोरं म्हणजे..’ या शब्दांनी सुरु होणाऱ्या वाक्यांविरुद्ध केलेला हा एल्गार आहे. कितीही पडलो, झडलो तरी पुन्हा उठू, असा विश्वास म्हणजे बँगटन सोनिएंडन.

हेही वाचा: लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम

बदलाची भाषा गाणारे अल्बम

तरुणाईविषयीच्या स्टिरियोटाईप मोडून काढण्याची भाषा करणारी, ही सात जणं नक्की करतात तरी काय? खरं तर या पोरांचं वय गोडगुलाबी गाणी म्हणण्याचं. पण हे सात जणं जी गाणी म्हणतात ती त्या पलीकडली आहेत. बीटीएसचे अल्बम स्वतःला स्वीकारण्याची गोष्ट सांगतात.

रॅपच्या माध्यमातून ते मानसिक आरोग्य, तरुणाईचं प्रश्न, राजकारण अशा मुद्द्यांवर भाष्य करतात. हे सगळे विषय ते लोकांना आवडतील अशा पद्धतीनं सांगतात. त्यामुळे त्यांचे अल्बम हे अनेकदा चार्टबस्टर ठरलेत. समाजात सगळंच काही वाईट नाही. कुठं ना कुठं तरी चांगलं हे घडतच असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण चांगलं असायला हवं.

चांगुलपणा हा संसर्गजन्य आहे. आज सर्वत्र एकटेपणा, स्वार्थ, राजकीय द्वेष, भेदाभेद वाढत असताना, एकमेकांशी चांगलं वागणं हे अत्यंत गरजेचं आणि सोपं आहे. आपण तेवढं जरी करू शकलो तरी फार मोठा बदल घडू शकतो, हे ते सातत्यानं आपल्या गाण्यातून मांडत राहतात. त्यांचं हे प्रामाणिक मांडणंच लोकांना आपलंसं वाटतंय.

अपयश पचवून घेतली झेप

बीटीएस आज जरी प्रचंड यशस्वी असलं तरी, त्यांचं हे यश अपयशामधून आलंय. आधी हौस, मग प्रयत्न आणि त्यातून आलेलं अपयश यांनी पाहिलंय. जगभरात कौतुक होत असताना, स्वतःच्या देशात मात्र उपेक्षा असेही दिवस त्यांनी पाहिलेत. एक वेळ तर अशी आली होती की, दिवाळखोरी जाहीर करावी लागेल अशी परिस्थिती होती.

तेव्हा त्यांनी गृप बंद करण्याचंही ठरवलं होतं. पण त्यांनी तरीही हार मानली नाही. प्रत्येक वेळी न डगमगता पुन्हा नव्यानं सुरवात केली. त्यांच्या या फिनिक्ससारख्या राखेतून झेप घेण्याच्या प्रयत्नांचं प्रतिबिंबच त्यांच्या गाण्यांमधून उमटतं. त्यामुळे ते कायमच लोकांना प्रेरणा देणारं ठरतं. यामुळे आणखी एक गोष्ट घडलीय.

हे सातही जण आज तुफान यशस्वी ठरले तरी, त्यांचे पाय जमिनीवर राहिलेत. त्यांनी आपल्या डोक्यात हवा जाऊ दिलेली नाही. ते सेलिब्रेटी असले तरी सेलिब्रिटीहूड मात्र ते कधीच मिरवत नाहीत. ते कायम हेच सांगतात की, आम्ही कुठून आलो याचं आम्हाला सदैव भान आहे. त्यांची हीच गोष्ट लोकांना प्रचंड आवडते. त्यामुळेच लोक बीटीएसकडे प्रेरणा म्हणून पाहतात.

हेही वाचा: आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट

चांगुलपणा साजरा करणारी पोरं

एवढंच नाही, तर बीटीएसचे सभासद आपल्या स्टारडमचा आणि प्रसिद्धीचा उपयोग वाईट गोष्टींसाठी करत नाहीत. ते कायम सामाजिक आणि लोकोपयोगी गोष्टींसाठीच याचा वापर करतात. त्यांनी दिलेल्या देणग्या हा त्यामुळेच चर्चेचा विषय ठरतो.

चमकोगिरी करण्याचे दिवस असताना, बीटीएसनं जगभरातल्या विविध सामाजिक उपक्रमांना दिलेल्या प्रचंड मदतनिधीची कधीच जाहिरात केली नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर आणखीच वाढलाय. कधीकधी माध्यमातून त्यांनी दिलेल्या देणग्यांच्या बातम्या फुटतात, तेव्हा ही पोरं केवढी मदत करतात याचा जगाला अंदाज येतो. ते अनेक चांगल्या कामांसाठी शो करतात.

लॉकडाऊनच्या काळात त्यांनी केलेल्या वर्च्युअल कन्सर्टला तर जगभरातल्या लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. लहान मुलांच्या कुपोषणावर उत्तर शोधण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, तर सारं जग त्यांच्या सोबत आलं. युनिसेफसोबत त्यांनी फक्त करार केल्यानंतर अवघ्या दोन दिवसात दहा लाख डॉलर जमा झाले. या सगळ्यामुळेच बीटीएस हे चांगुलपणाचं सेलिब्रेशन ठरलंय.

बीटीएसची धडाकेबाज सुरवात

बीटीएसच्या सात जणांची नावं अनेकांना माहिती आहेत. पण, त्यांना जोडणारं आठवं नाव आहे, बँग पीडी! बिग हिट ही त्यावेळची छोटीशी म्युझिक कंपनी सुरु करणाऱ्या बँग पीडींना २०१०मधे आरएमसोबत एक हिपहॉप गृप करायचा होता. पण ते फारसं काही जमलं नाही. अखेर त्यांनी योजना बदलली आणि २०१३ मधे ‘टू कूल फॉर स्कूल’ या नावानं बीटीएसचा पहिला अल्बम बाजारात आणला. पालकांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षांना दिलेलं हे उत्तर होतं.

या अल्बमनं बीटीएस हे नाव लोकांच्या डोक्यात फिट्ट केलं. शाळाकॉलेजच्या पोरांना आपली भूमिका मांडणारी गँग मिळाल्यानं त्यांनीही या गृपला आपलं मानलं आणि ही गाणी त्यांचा आवाज बनली. पुढे २०१५मधे ‘आय नीड यू’ हे गाणं आलं. या गाण्याला एमटीवीचा पुरस्कार मिळाला. हा त्यांचा पहिला पुरस्कार होता. त्यानंतर २०१६मधे आलेल्या त्यांच्या ‘विंग्स’ या अल्बममुळे त्यांना खऱ्या अर्थानं ओळख मिळाली.

त्यांच्या अनेक अल्बमनी म्युझिक चार्टवर टॉप रँकिंग मिळवलं. कोरियाची हद्द ओलांडून त्यांनी जपानच्या म्युझिक मार्केटमधे हंगामा केला. पुढे त्यांनी आशियातले विविध देश पालथे घातले. मग अमेरिकेत आणि युरोपमधेही त्यांचा मोठा फॅन बेस वाढला. जगभरातले अनेक म्युझिक अवॉर्ड त्यांनी खिशात टाकलेत. बिलबोर्ड रँकिंगमधे तर त्यांनी ‘बीटल्स’शी बरोबरी केलीय.

हेही वाचा: प्रति परमेश्वर सुपरस्टारला कोणी विचारत नाही तेव्हा

बीटीएस आर्मीची क्रेझ

आज हे सातजण शाळा-कॉलेजातल्या मुलांचे हिरो ठरलेत. आरएम हा या सात जणांचा टीम लीडर. त्याचं मूळ नाव किम नाम जून. दक्षिण कोरियातला हा गाणंबजावणं करणारा मुलगा आज जगातल्या सर्वात लोकप्रिय बीटीएस बँडचा म्होरक्या आहे. त्याचं वय फक्त २८ वर्षं आहे. त्याचा काही महिन्यांपूर्वी वाढदिवस झाला. जगभरातून कोट्यवधी मेसेज त्यांच्या इन्स्टाग्रामवर आले. यात भारतातून काही लाख मेसेज असतील.

बीटीएसचे जगभर पसरलेले फॅन स्वतःला बीटीएस आर्मी म्हणवून घेतात. तेच या बँडला सोशल मीडियावर प्रचंड प्रमोट करतात. त्यांचे पोस्टर घरात लावतात. टीशर्ट घालतात. स्टेटस ठेवतात आणि कायकाय करतात ते त्यांचं त्यांनाच माहीत! त्यांचं बीटीएसवरचं प्रेम हे फक्त त्यांच्या स्टाईलवर नाही, तर त्यांच्या शब्दांवर आहे. बीटीएस जी भाषा बोलते ती त्यांना आपली वाटते.

कोरोनाच्या काळात बीटीएसने एनडीटीवीला एक इंटरव्यू दिला. एखाद्या भारतीय टीवी चॅनलला दिलेला हा त्यांचा पहिलाच इंटरव्यू. या इंटरव्यूमधे भारतातले काही फॅन त्यांच्याशी थेट बोलले. त्यांनी व्यक्त केलेली भावना साधारणतः अशी होती की, ‘बीटीएस हे आम्हाला आमच्या भावनांना वाट करून देणारं संगीत वाटतं. आमच्या मनातली कोंडी फोडणारं, मनाला शांत करणारं असं काही तरी बीटीएस करतंय.’

हे सगळं भारी आहे. भाषेची बंधनं झुगारून, देशांच्या सीमा नाकारून, संस्कृतीचं जोखड भिरकावून भारतातल्या तरुणाईला कोरियातला एक बँड आपलासा वाटतो. शेवटी माणसाला फक्त प्रेमाचीच भाषा कळते, हे सत्य यातून पुन्हा पुन्हा समोर येतं. त्यांच्या या प्रेमाची दखल टाइम मॅगझिननं फ्रंटपेज स्टोरी करून घेतली. संयुक्त राष्ट्रांनी त्यांना बोलावलं. आत तर हे सात जण जगभरात माणुसकीची, प्रेमाची गाणी गात सुटलेत. त्यांना साथ द्यायला त्यांची बीटीएस आर्मी सज्जच आहे.

‘के-पॉप’चं गारूड

कोरियन पॉप्युलर संगीत म्हणजेच के-पॉप गेल्या तीसेक वर्षात तुफान लोकप्रिय ठरलंय. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियातला संघर्ष, जागतिकीकरणामुळं मध्यमवर्गाची बदललेली गणितं, तंत्रज्ञान आणि संवादक्रांतीमुळे छोट्या देशांच्या अर्थव्यवस्थेमधे झालेले मूलगामी बदल या सगळ्या पार्श्वभूमीवर के-पॉप या संगीताकडे पाहायला हवं.

या संगीतातून तरुण मुलांनी मांडलेल्या भावना म्हणजे त्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या परिस्थितीला संगीतातून दिलेलं उत्तर आहे, हे मुळात आपण समजून घ्यायला हवं. के-पॉपमधे संगीतासोबतच नाच, शब्द, वेशभूषा या सगळ्यामधे तरुणाईचा जोष ओसंडून वाहत असतो. त्यात एकीकडे प्रचंड स्वातंत्र्य तर दुसरीकडे कमालीची शिस्त, नेटकेपणा आहे.

त्यामुळे ते ऐकताना आपण एखादा सुत्रबद्ध, बांधीव कलाप्रकार पाहतोय अशी तंद्री लागते. त्यातले शब्द थेट हृदयाचा ठाव घेतात. अनेक शब्द, वाक्यरचना कळतही नाहीत. पण त्यातून त्यांना काय म्हणायचं हे मात्र भावतं. त्यामुळेच या संगीताची, नृत्याची जादू जगभरातल्या रसिकांना पडली, त्यात काहीच नवल नाही. भारतात तर के-पॉपची चांगलीच क्रेझ आहे.

हा सगळा प्रकार आज चाळीशी-पन्नाशीत असलेल्या आईवडलांना फारसा रुचत नाही. या सगळ्या कलाकारांचे दाढी-मिशा नसलेले चेहरे, काहीसे बायकी वाटणारे हावभाव यावरून टीकाटिप्पणीही होत राहते. पण ज्यांना माणसाला माणूस पाहण्यात कोणतीच अडचण वाटत नाही, त्यांच्यासाठी या टीकेची किंमत शून्य असते आणि ते या जागतिक प्रवाहातल्या संगीताला सहजगत्या आपलं म्हणतात.

हेही वाचा: प्रभाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे

बँड की बंड?

जुन्या रुढींवर मात करणं, देशादेशातल्या सीमा नाकारणं, मानसिक आजारांबद्दल खुलेपणानं बोलणं, महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणं, लैंगिक भेदाभेदाविरुद्ध ठामपणे उभं राहणं या सगळ्यामुळे के-पॉप हे जागतिकीकरणाच्या काळातलं बंड आहे.

कोणत्याही हिंसेविना आणि सामाजिक शांतता भंग न करता, जगभरात सुरु असलेल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडणारा हा एल्गार आहे. बीटीएसचं यश हे असल्या बिनधास्त विषयांमुळे आणि त्यांच्या वागण्यामुळे आहे, हे कोणीही नाकारणार नाही.

सात जण एका टीममधे कोणताही वाद न घालता गेली बारा-तेरा वर्षं एकत्र काम करतायत, हेही एका अर्थानं केलेलं स्टेटमेंटच आहे. आज अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्याचा जमाना असताना आणि वैयक्तिक मोठेपणाचा टेंभा मिरवण्याचे दिवस असतानाही, बीटीएसचे सात जण कायमच आम्ही टीम आहोत, असं सतत सांगत आलेत. त्यांच्या एकत्र राहण्यातच त्यांचं खरं यश आहे.

भारतातही के-पॉप कल्चर

एकीकडे भारतात के-पॉप ऐकण्याचं आकर्षण असताना, के-पॉप गाण्यातही यंगिस्तान मागं नाही. भारतात अनेक मुलं के-पॉप गाण्याचा सराव करतायत. त्यांनी केलेल्या के-पॉपच्या रियाजाचे वीडियो सोशल मीडियावर वायरल होत असतात. शेवटी संगीत हे स्वतःला अभिव्यक्त करण्याचं माध्यम आहे. त्यामुळे भविष्यात के-पॉप इंडस्ट्री भारतातही रुजली तर आश्चर्य वाटायला नको.

श्रिया लंका ही १८ वर्षाची ओडिशामधली मुलगी ब्लॅकस्वॅन या प्रसिद्ध के-पॉप गृपमधे निवडली गेली. भारतातून या इंडस्ट्रीत जाणारी ही पहिलीच मुलगी असल्याचं सांगितलं जातंय. जगभरातून झालेल्या चार हजार जणांच्या ऑडिशनमधून तिची निवड झालीय. पुढचे काही महिने ती सेऊलमधे प्रशिक्षणासाठी जाणार असून, तिथून तिचा या बँडसोबतचा पुढील प्रवास सुरु होईल.

हे सगळं आपल्यासाठी नवीन आहे. जगभरातली संगीतसृष्टी प्रचंड मोठी आहे. संगीत हे माणसाला माणसाशी जोडण्याचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. भारतानं कायमच जगातलं चांगलं संगीत स्वीकारलंय आणि जगाला आपल्याकडलं चांगलं दिलंय. गेल्या काही दशकांमधली नाव घ्यायचीच झाली तर रविशंकर, लता मंगेशकरांपासून ए.आर. रेहमानपर्यंत आणि बीटल्स, मायकल जॅक्सनपासून आत्ताच्या बीटीएसपर्यंत हा प्रवाह सतत वाहतच राहणार आहे.

हेही वाचा:

करण जोहर सेक्शुअॅलिटी उघड करेल?

विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?

मोहम्मद अझीजः चेहरा नसणाऱ्या माणसांचा आवाज

दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

महागुरू सचिन पिळगावकरांना लोक शिव्या का घालतायंत?