सुंदरलाल बहुगुणा: निसर्गासोबतचं सहजीवन जगणारा पर्यावरणवादी

२६ मे २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


पर्यावरणवादी कार्यकर्ता सुंदरलाल बहुगुणा यांचं २१ मेला निधन झालं. ते कोविड १९ ने आजारी होते. चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी त्यांचं नाव कायम वर राहील. हिमालयातल्या पर्वतरांगांमधून त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही तिथं कायम आहे. आणि तो जितका शाश्वत तितकाच प्रेरणा देणाराही आहे.

विकास की पर्यावरण हा वाद अधूनमधून डोकं वर काढत असतो. जल, जमीन, जंगल वाचवण्यासाठी झटणाऱ्या पर्यावरण कार्यकर्त्यांबद्दल आपण ऐकत असतो. त्यांच्या वेगवेगळ्या स्टोरीही वाचतो. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला गृहीत धरलं जातं त्यावेळी हेच कार्यकर्ते पुढे येतात. त्यासाठी धडपडतात.

उत्तराखंड राज्यातले महापूर, अवकाळी पाऊस, जंगलांना आगी लागणं, जमिनी खचण्यासारखे प्रकार वारंवार आपण बातम्यांमधून ऐकत असतो. दुसरीकडे हिमालयीन भागातल्या पर्वतरांगा, तिथला निसर्ग आपल्याला भुलवतो. तिथं एकदातरी भटकंती करावी असं आपल्याला वाटत राहतं.

पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ज्यावेळी आपल्या समोर येईल त्यावेळी हिमालय आणि पर्यायाने पर्यावरण संरक्षणासाठी झटणाऱ्या सुंदरलाल बहुगुणा यांची आठवण येत राहील. त्यांचं नुकतंच २१ मेला कोरोनामुळे निधन झालंय. हिमालयातल्या पर्वतरांगांमधून त्यांनी सुरू केलेला संघर्ष आजही कायम आहे. आणि तो जितका शाश्वत तितकाच प्रेरणा देणाराही आहे.

निसर्गासोबतचं सहजीवन

९ जानेवारी १९२७ ला उत्तराखंडमधल्या टिहरी जिल्ह्यातल्या मारोडा गावात त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण टिहरी इथं झालं. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. तत्कालीन टिहरी संस्थानाविरोधात आंदोलन उभं केलं. पुढे १९४७ ला लाहोरमधून बीएची पदवी घेतली. पुन्हा आपल्या गावी परतले. पुन्हा आंदोलनात सहभागी झाले.

पर्यावरण, राजकीय जीवन, समाजसेवक आणि पत्रकारिता अशा सगळ्यात क्षेत्रांमधे त्यांचा वावर होता. उत्तराखंडमधल्या कौसानी इथल्या सरला देवी आश्रम ज्याला लक्ष्मी आश्रम म्हणायचे तिथं त्यांनी आयुष्यातला बराच काळ घालवला. इथंच गांधी विचारांशी घट्ट मैत्रीही जमली. या भागाला महात्मा गांधी 'भारताचा स्वित्झर्लंड' म्हणायचे.

इथंच ते पर्यावरण आणि निर्सगाशी एकरूप झाले.  निसर्ग हीच त्यांची जीवनशैली बनली. 'मी भात खात नाही. कारण त्यासाठी जी शेती करावी लागते त्याला भरपूर पाणी लागतं. त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण होतं का मला माहीत नाही. पण मला निसर्गासोबतचं सहजीवन जगायचंय,' असं सुंदरलाल बहुगुणा म्हणायचे.

हेही वाचा: ८९ व्या वर्षी अरण्यऋषी चितमपल्लींनी मांडलाय नवा डाव 

शोषित वर्गासाठी काम

सिलयारा भागात 'पर्वतीय नवजीवन मंडळ' या संस्थेची स्थापना केली. त्याआधी 'वृक्ष मानव' नावाची संस्था उभी करून दारूबंदी, पर्यावरण संरक्षण यासाठी १९८६ मधे आंदोलन उभं करत ७४ दिवसांचं उपोषणही केलं. अनुसूचित जातींचा मंदिरप्रवेश ते अगदी लहान मुलींचं शिक्षण अशा महत्वाच्या मुद्यांवर ते सातत्याने प्रस्थापितांशी संघर्ष करत राहिले.

पर्वतीय नवजीवन मंडळ' या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शोषित वर्गातल्या मुलांसोबत लहान मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. अस्पृश्यतेच्या भीषण वास्तवाला छेद देत दलित कुटुंबासोबत बराच काळ घालवला. त्यांचं आयुष्य समजून घेतलं. तिथल्या मुलांसाठी टिहरी इथं ठक्कर बाप्पा हॉस्टेलची स्थापना केली. दलितांच्या मंदिरप्रवेशासाठी त्यांनी १९७१ मधे १६ दिवसांचं उपोषण केलं होतं.

याच काळात त्यांची भेट सामाजिक कार्यकर्ता असलेल्या विमला नौटियाल यांच्याशी झाली. अनेक सामाजिक विषयांवर दोघांनी एकत्र काम केलं. एकत्र काम करत असताना सहजीवन स्वीकारत लग्नही केलं. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांचा त्यांच्यावर फार प्रभाव होता.

'चिपको' महिलांचं आंदोलन बनलं

सुंदरलाल बहुगुणा यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला. महात्मा गांधींचं तत्त्वज्ञान हा त्यांच्या संघर्षांचा मूळ आधार राहिला. त्यातूनच पर्यावरणाच्या रक्षणाचं चिपको आंदोलन सुरू झालं. हिमालयातली जंगलं आणि पर्वतरांगामधून सुंदरलाल बहुगुणा हिंडले. त्यासाठी ४७०० किलोमीटरचा पायी प्रवास केला. विकासाच्या नावाखाली जे काही मोठे प्रकल्प उभे राहतायत त्यातून हिमालयातल्या पर्यावरणाला किती धोका आहे याची जाणीव त्यांना होत होती.

केवळ शहर नाही तर गाव, खेड्यातल्या, पहाडी भागातल्या लोकांवर त्याचा परिणाम होणार होता. त्याचाच एक भाग म्हणून १९७३ मधे आंदोलन उभं राहिलं. आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यासाठी 'महिला मंगल दल' स्थापन करण्यात आलं. गौरा देवी या महिलेकडे या दलाची जबाबदारी देण्यात आली. महिला घरोघरी जाऊन जंगल, झाडं वाचवण्यासाठी पर्यावरणाचं महत्त्व लोकांना पटवून द्यायच्या.

झाडं तोडायच्या घोषणा होऊ लागल्या. तसा त्याला विरोध करण्यासाठी गावागावात मोर्चे, आंदोलनं उभी राहिली. आंदोलन महिलांनी आपल्या हाती घेतलं. तसं ते सगळीकडे पोचलं. रैनी हे गाव आंदोलनाचं केंद्र बनलं. लोकांचा विरोध डावलून तिथली अडीच हजार झाडं तोडण्याचा ठेका देण्यात आला. झाडांना मिठी म्हणजे चिपकायची आयडिया देण्यात आली. गौरा देवींच्या नेतृत्वात महिलांनी झाडांना मिठी मारली. त्यामुळेच हे चिपको आंदोलन म्हणून ओळखलं गेलं.

हेही वाचा: पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!

यश मिळालं पण संघर्ष कायम

शेवटी झाडं तोडायचा फतवा तत्कालीन सरकारने मागे घेतला. सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट्ट या पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. 'क्या हैं जंगल के उपकार, मिट्टी, पानी और बयार, जिंदा रहने के आधार' ही वाक्य आंदोलन काळात ऊर्जा भरायची. या आंदोलनाची ती घोषणा होती. जंगलाचं मानवी जीवनाशी किती घट्ट नातं आहे याची जाणीव या घोषणेनं पर्यायाने या आंदोलनाने करून दिली.

आंदोलन जगभर पसरलं. आंदोलनाचा परिणाम म्हणून १९८० मधे पुढची १५ वर्ष या भागातली झाडं तोडायला बंदी घालण्यात आली. तसंच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वन संरक्षण कायदा आणावा लागला. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारला वन आणि पर्यावरण खातंही आलं. चिपको आंदोलनाचं हे खूप मोठं यश होतं.

पुढे टिहरीमधे होऊ घातलेल्या मोठ्या धरणालाही बहुगुणा यांनी विरोध केला. १९९५ मधे त्यासाठी ४५ दिवसांचं उपोषण केलं. धरणाचं काम मात्र सुरू राहिलं. सोबत सुंदरलाल बहुगुणांचा संघर्षही.

पर्यावरण जागृतीसाठी अखंड प्रवास

चिपको आंदोलनामुळे त्यांना जगभर वृक्षमित्र ही ओळख मिळाली. पर्यावरण रक्षणाच्या कामानं त्यांना थेट संयुक्त राष्ट्र संघात पोचवलं. तिथं बोलायची संधी त्यांना मिळाली. त्यांचा जंगल तोड रोखण्याचा संघर्ष कायम राहिला. त्या मागणीसाठी त्यांनी सरकारचा पद्मश्री हा पुरस्कार घ्यायलाही नकार दिला होता. पर्यावरण गांधी म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं.

पर्यावरण जागृतीसाठी त्यांनी उत्तराखंड इथून काश्मिर ते कोहिमा असा पायी प्रवास तर गंगा नदीच्या संरक्षणासाठी सायकल प्रवास केला. धरती की पुकार, उत्तराखंड प्रदेश और प्रश्न, बागी टिहरी, उत्तराखंड मे १२० दिन अशी पुस्तकं लिहिली. पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ता या सोबतच लेखक, पत्रकारितेतही त्यांचा वावर होता.

पर्यावरणाच्या जागृतीसाठी ते भारत आणि जगभर फिरत राहिले. १९८५ मधे जमनलाल बजाज, १९८७ ला राईट लाइवलीवूड, सरस्वती सन्मान, १९९९ मधे गांधी सेवा सन्मान, २००९ ला पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला.

हेही वाचा: 

चक्रीवादळाचं नाव कसं ठरवतात?

नदीष्ट : माणूस आणि नदी यांचा समांतर प्रवास

डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट