लिटल मास्टर गावस्करच्या सत्तरीनिमित्त हे तर वाचावंच लागेल

१० जुलै २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


लिट्ल मास्टर सुनील गावस्कर यांनी आज सत्तरीत पदार्पण केलं. गेल्या पाचेक दशकांपासून ते क्रिकेटच्या मैदानावर आहेत. कधी मैदानावर तर कधी मैदानाबाहेर राहून त्यांनी क्रिकेट गाजवलं. टीम इंडियाला टेक्निकचं बाळकडू देणाऱ्या गावस्करांनी क्रिकेटपटूला व्यावसायिक केलं. स्तंभलेखक, कॉमेंटेटर म्हणून क्रिकेटपटूला नवं प्रोफेशन मिळवून दिलं.

असा अनुभव आहे ज्या कलाकाराला शुटिंगवेळी कॅमेरा नेमका कुठंय त्याचं भान असतं तो मोठा होतो. हेच क्रिकेटमधे बॅटिंगबाबत बोलायचं तर ज्या बॅट्समनला आपला ऑफ स्टंप कुठंय याचं भान असतं तो मोठा होतो. सुनील मनोहर गावस्कर नेमकं हेच भान ठेऊन होता म्हणून मोठा झाला. क्रिकेटचं तंत्र घोटवून त्याने स्वतःबरोबर भारतीय क्रिकेटचं भलं केलं.

इंग्लिश टीकाकार हिणवायचे

आज वयाच्या सत्तरीत पदार्पण करणाऱ्या गावस्करला सेंच्युरीची सवय असल्याने तो आयुष्याची सेंच्युरीही झळकवणार असं खात्रीलायक वाटतं. सुनील तपस्वी असल्यासारखा खेळला. एकाग्रता हा त्याचा मोठा गुण. त्याने क्रिकेटवर एकाग्रता आणली आणि तो महान क्रिकेटपटू झाला. त्याने व्यावसायिक व्हायचं याबाबत एकाग्रता ठेवली. तो विविध क्रिकेट संबंधीची क्षेत्रं हाताळत मोठा झाला. स्तंभ लेखक, समालोचक म्हणूनही तो नावाजला गेला.

सुनीलने भक्कम बॅटिंग केल्याने टीम इंडियाच्या बॉलिंगला पोटापुरता तरी धावांचा आधार मिळत होता. तो आणि विश्वनाथ हे दोघंच बॅटिंगचा भार वाहायचे आणि त्यांच्या धावसंख्येच्या मदतीने भारताचे बॉलर विरोधी टीमला आव्हान द्यायचे. सुनीलने पदार्पण करण्याआधी भारतीय बॅटिंग हा एक विनोद मानला जात होता. विशेषतः शिष्ट आणि खडूस इंग्लिश समीक्षक टीम इंडियाला कमी लेखायचे.

हेही वाचाः वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर

फॉस्ट बॉलिंगचा आत्मविश्वासाने सामना

वेगवान माऱ्याला तोंड देताना टीम इंडियाच्या बॅट्समनची त्रेधातिरपीट उडायची. रन जमवणं सोडाच, काही बॅट्समन स्टम्प सोडून दूर व्हायचे. सुनीलने आत्मविश्वासाने वेगवान मारा खेळायचं तंत्र अप्रतिमरित्या राबवून दाखवायला सुरवात केली. त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरचा क्रिकेटचा श्रीगणेशाच वेस्ट इंडिजमधे झाला. तिथे त्याने न बुजता ७७४ रन जमवल्या. आणि भारताला मालिका पहिल्यांदाच जिंकून देण्यात मोठं योगदान दिलं. या अशा सुरवातीनंतर त्याने मग मागे वळून पाहिलंच नाही.

आठवतंय तसं सुनील कसोटीपटू झाला नव्हता तेव्हा रणजी मॅचमधे खेळताना तो सीमारेषेवर फिल्डिंग करायचा. त्यावेळी काही प्रेक्षक ‘मामाचा वशिला’ असं ओरडायचे. माजी क्रिकेटपटू माधव मंत्री हे त्याचे मामा असल्याने त्यांच्यामुळे तो मुंबईच्या टीममधे असल्याचं अनेकांचं मत होतं.

पण त्याच सुनीलने विंडीजमधे मोठा पराक्रम केल्यावर सर्वांची तोंडं गप्प झाली ती कायमची. आणि त्यानंतर सर्वच त्याच्या प्रेमात पडले. तो एकटा खेळपट्टीवर ठाम उभा रहायचा. तो लवकर बाद झाला तर नंतरच्या बॅट्समनवर दडपण यायचं. डावही लवकर संपायचा. हां हां म्हणता सुनील गावस्कर म्हणजे भारत असं समीकरण बनत गेलं.

हूक आणि पूलचे धाडसी फटके

सुनीलचं वैशिष्टय म्हणजे तो खेळत होता तेव्हा हेल्मेट हा प्रकार उपलब्ध नव्हता. आणि विंडीजसारखी टीम एका वेळी चार चार फॉस्ट बॉलर्स बाळगून होती. त्यांना सुनील खंबीरपणे तोंड द्यायचा. आणि त्याच्या धावांची भूक अशी होती की तो शतकाची मजल मारायचाच. टीमचं हित पाहून त्याने हूक आणि पूल हे धाडसी फटके म्यान केले होते हे विशेष.

सुनीलची विकेट ही नेहमीच मौल्यवान असायची. त्याने साहजिकच बॅटिंगमधले अनेक विक्रम खालसा केले. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो प्रेक्षकांच्या आणि क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला. विंडीजचे प्रेक्षक रसिक, इतके दिलदार की त्यांनी सुनीलवर कलिप्सो अर्थात गाणं रचलं. एखाद्या खेळाडूसाठी यापेक्षा मोठा सन्मान तो कुठला?

सुनीलकडे नेतृत्व सहजच आलं. त्याने इथेही टीमची तब्येत, भारतातील प्रेक्षकांची मानसिकता याचा विचार करून भारत हरणार नाही याची तेवढी काळजी घ्यायची रणनीती ठेवली. तरीही त्याने काही चांगले विजय मिळवून दिले. सुनील ध्यास घेऊन क्रिकेट खेळला म्हणून महान झाला आणि त्याच्यामुळे टीम इंडियाचे दुबळेपण कमी झाले.

हेही वाचाः सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही

क्रिकेटपटूंना आले अच्छे दिन

भारताकडे बघण्याचा इतरांचा दृष्टीकोन बदलला. याची किंमत त्याने थेट बीसीसीआयकडून घेण्याचा रोखठोकपणाही दाखवला. मानधनात वाढ घेण्यापासून ते क्रिकेटपटूचं भवितव्य सुरक्षित राहील या दृष्टीने मंडळाकडून नेमकं जे हवं ते घेतलं. त्याच्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना चांगले दिवस आले, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

सुनील इथेच थांबला नाही. त्याने निवृत्तीनंतरही क्रिकेटपटूंना विविध मार्ग दाखवले. ज्यातून कमाई करून क्रिकेटपटू स्थैर्य मिळवू शकेल. सुनील एक महान क्रिकेटपटूच नव्हे तर महान व्यक्ती आहे यात वाद नाही. म्हणून सरकारने त्याला मानाचे पुरस्कार दिलेत. त्याला आयुष्याच्या शतकासाठी शुभेच्छा!

हेही वाचाः टीम इंडियाला यशाचा टीळा लावणारे रवी शास्त्री मैदानावर आल्यावर गो बॅकचे नारे लागायचे

काही हलकेफुलके किस्से

  • सुनील जन्माला आला तेव्हा त्याच इस्पितळात बाळंत झालेल्या एका कॉलनीच्या मुलाबरोबर त्याची अदलाबदल झाली होती. सुनीलच्या चाणाक्ष आजोबांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यामुळे सुनील हा गावस्करांचाच राहिला.
  • गिरगावातल्या इमारतीत मोठा होताना गॅलरीत सुनीलची आई त्याला गोलंदाजी करायची. हे त्याचे क्रिकेटचे प्राथमिक धडे आणि मामाश्री माधव मंत्री यांनी त्याला दादर युनियन क्लबमधे तो आल्यावर क्रिकेटमधल्या खाचाखोचा दाखवल्या. त्याचबरोबर शिस्तही शिकवली. त्याने सहजच मंत्री यांची भारतीय कॅप डोक्यावर घातली असता त्यांनी त्याला बजावलं, ‘ही कॅप स्वस्त नाही. ती मिळवण्यासाठी घाम गाळावा लागतो. ही कॅप मिळवण्यासाठी प्रयत्न कर.’
  • वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेल्यावर मालिकेतल्या पहिल्या कसोटीच्या आदल्या दिवशी नखुरडे झाल्याने सुनीलची त्या कसोटीत निवड झाली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्यांची एंट्री झाली.
  • निवृत्तीनंतर इंग्लंडमधे विंडीजचा एक सामना सुरु असताना विंडीजच्या सुनील क्लॉईव लॉईडला भेटायला तो गेला. तेव्हा ड्रेसिंग रूमचा दरवाजा उघडणाऱ्या कर्टनी वॉल्श या तेव्हा नवोदित असणाऱ्याने सुनीलला पिटाळण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाच रिचर्ड्स नेमका बाहेर आला. त्याला दिसलं सुनील भेटायला आलाय. त्याने त्याला सन्मानाने आत घेतलं आणि वॉल्शला झापलं. त्याला जरासा धपाटा घालत तो म्हणाला, ‘याला तू ओळखत नाहीस. विंडीज गोलंदाजी तुडवणारा हाच एकमेव.’

  • इम्रान खान मैदानावर सुनीलची विकेट काढायला जंग जंग पछडायचा. पण मैदानाबाहेर तो त्याचा दोस्त होता. एकदा त्याने सुनीलला सांगितलं की त्याने हेल्मेट वापरावं. आयुष्यात असा एक तरी चेंडू येतो जो डोक्याचा वेध घेणारा असतो. सुनीलने हा सल्ला मानला आणि स्कल कॅप वापरायला सुरवात केली.
  • कपिल देव बरोबर सुनीलचे संबंध नरम गरम राहिले. कपिलदेव त्याच्या बॅटिंगमधल्या गुणवत्तेला न्याय देत नाही अशी सुनीलची रास्त तक्रार होती. पण कपिलचा अहंकार दुखावला. इंग्लंडविरुद्धची जिंकत आलेली कसोटी कपिलच्या बेजबाबदार फटक्याने गमावली गेली. त्यामुळे कपिलला बेशिस्तीसाठी टीमनधून पुढच्या कसोटीत वगळण्यात आलं होतं.
  • क्रिकेटमधे पदार्पण केलं तेव्हापासून कपिलला एकदाही टीमबाहेर ठेवण्यात आलं नव्हतं. यानिमित्ताने कपिलला पहिल्यांदाच डच्चू मिळाला. पुढे निवड समितीनेही या दोघांमधलं कर्णधारपद फिरतं ठेवलं. असं असूनही १९८३ च्या वर्ल्डकपवेळी सुनीलने कपिलला मोलाचे सल्ले दिले आणि विश्वविजयाला हातभार लावला होता.
  • सुनीलने सिनेमातही भूमिका केली. ‘सावली प्रेमाची’ आणि ‘झाकोळ’ हे त्याचे सिनेमे. तसेच ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला’ हे शांताराम नांदगावकर लिखित गाणंही त्याने गायलं. सनी डेज आणि आयडॉल ही त्याची इंग्रजीतली पुस्तकंही गाजली.

हेही वाचाः 

धर्म कसला बघताय क्रिकेटपटूंची जिगर बघा

क्रिकेटची पिढी घडवणाऱ्या आचरेकर स्कूलची स्टोरी

राहुल गांधींचा अख्खा राजीनामा समजून घ्या ८ पॉईंटमधे

अंबाती रायडूमधेच तोंडावर राजीनामा फेकून मारण्याची हिंमत

आशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेंडींग चक्क झाडाखाली व्हायचं