सुनीता कापसे : त्यांच्यामुळे महिलांच्या हाती रिक्षाचं स्टेअरिंग आलं

२२ सप्टेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


सुनीता कापसे. नवी मुंबईतल्या पहिल्या महिला रिक्षा चालक. घरच्या परिस्थितीमुळे २९ वर्षांपूर्वी नवऱ्याकडे हट्ट करून त्या रिक्षा चालवायला शिकल्या. स्वावलंबी होण्याच्या दिशेनं टाकलेलं त्यांचं हे धाडसी पाऊल होतं. आज त्यांचं वय ५७ वर्ष आहे. तरीही रिक्षा चालवणं आणि उत्साह दोन्हीही तसंच टिकून आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच रिक्षा चालक महिलांना रिक्षा परवान्यांमधे ५ टक्के आरक्षण मिळालंय.

काही दिवसांपूर्वी फोटोशूटसाठी म्हणून नवी मुंबईतल्या जुईनगरला जायचा योग आला. स्टेशनला उतरून बाहेर आले. रिक्षा लागलेल्याच होत्या. भाडं मिळावं म्हणून प्रवाशांना एका वेगळ्या अंदाजात हाका मारायची जणू स्पर्धा लागली होती. यात महिला रिक्षा चालक असलेली एक धिप्पाड बाई तिच्या बोलण्याच्या लकबीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती.

ऐकताक्षणीच आपलं लक्ष त्यांच्याकडे जाईल अशा खास अंदाजात त्यांनी हाक मारली. 'शिरवणे गावात जायचंय?' मी लगेच 'हो' म्हटलं. शेअरिंग असल्यामुळे ५ जणांचा ताफा घेऊन त्या ताई सुसाट निघाल्या होत्या. त्यांनी मारलेले कट भल्याभल्यांना गारद करणारे होते. या क्षेत्रात वर्षानुवर्षे प्रस्थापित झालेली मक्तेदारी मोडीत काढायचा हा खरंतर यशस्वी प्रयत्न होता. एका महिलेनं त्यादृष्टीने टाकलेलं हे धाडसी पाऊल होतं.

मी पहिल्यांदाच कुणा बाईच्या हाती रिक्षाचं स्टेअरिंग बघत असल्यामुळे एकाचवेळी उत्सुकता, आनंद, आणि समाधान अशा संमिश्र भावना मनात दाटलेल्या होत्या. बायका कुठल्याच क्षेत्रात कमी नाहीत हे वाक्य हल्ली सहजपणे फेकून मारलं जातं. ते खरंही आहे. पण चार-दोन प्रतिष्ठित महिलांची उदाहरणं देऊन केवळ त्याच आणि त्याच कसं रोल मॉडेल आहेत हे बिंबवण्याचा प्रयत्न त्यातून होतो. त्यात या महिला रिक्षा चालक असलेल्या सुनिता कापसे मात्र वेगळ्या ठरतात.

हेही वाचा: महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?

रोजीरोटीसाठी मराठवाड्यातून मुंबईत

या छोट्याशा प्रवासा दरम्यान सुनीताताईंशी मस्त गट्टी जमली. त्यांचं प्रत्येक प्रवाशांशी आपुलकीने बोलणं विशेष भावलं. त्यामुळे लगोलग त्यांचा नंबरही घेतला. काही दिवसांनी त्यांना फोन केला. त्यांचं एकूण आयुष्यच एखाद्या सिनेमातल्या चित्तरकथेसारखं वाटलं.

५७ वर्षांच्या सुनीताताई मूळच्या मराठवाड्यातल्या उस्मानाबादच्या. दुष्काळी भागातल्या. १४ जनांचं भलंमोठं कुटुंब. हाताशी अगदीच तुटपुंजी शेती. त्यात कुटुंबाचं काही भागत नव्हतं.  रोजच्या गोष्टी भागवणंही अवघड होतं. त्यामुळे कापसे दाम्पत्याला थेट मुंबई गाठावी लागली.

१९८७ला सुनीता कापसे मराठवाड्यातून मुंबईतल्या कोपरखैरणेत आल्या. त्यांचं कुटुंब कोपरखैरणेतल्या श्रमिकनगर इथं भाड्याने राहू लागलं. त्या आणि त्यांचे पती नेताजी कापसे मोलमजुरी करू लागले. खूप अपेक्षेनं आलेल्या या जोडप्याचा मुंबईनं निदान रोजीरोटीचा तरी प्रश्न सोडवला होता. पण त्याचवेळी दुसरीकडे कुटुंबही विस्तारत होतं.

मोलमजुरीतून मिळणाऱ्या तीनेक हजारात त्यांचं काहीच भागत नव्हतं. पती नेताजी कापसे अधूनमधून आजारी पडायचे. मुलांच्या संगोपनाची जबाबदारीही होती. घरची आर्थिक स्थिती अधिकच ढासळत होती. त्यावेळी रिक्षा चालवणं हा एक पर्याय त्यांना समोर दिसत होता. आता रिक्षा चालक म्हणजे पुरुष हे समीकरण घट्ट बनलेल्या आपल्या समाजात थेट रिक्षा चालवण्याचा सुनीताताईंचा निर्णय त्यावेळी क्रांतिकारी होता.

रिक्षाचं स्टेअरिंग हाती आलं

सुनीताताईंनी रिक्षा चालवायच्या निर्णयाला थेट घरातूनच विरोध झाला. बायका हे काम करतात का असं म्हणत त्यांच्या पतीनेच त्यांना हिणवलं. त्यांच्या या निर्णयाची खिल्ली उडवली गेली. पण सुनीताताईंनी जिद्द सोडली नाही; ना माघार घेतली. त्यांनी पतीला एकतर रिक्षा चालवायची परवानगी द्या किंवा मला कायमचं माहेरी सोडा अशी अट घातली. शेवटी त्यांच्या पतीला सुनीता यांचं म्हणणं मान्य करावं लागलं.

हो, नाहीमधे दोन महिने निघून गेले. शेवटी सुनीताताईंच्या पतीनेच त्यांना रिक्षा चालवायला शिकवली. लोक काय म्हणतील याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केलं. १९९३ला त्यांच्या हाती रिक्षाचं स्टेअरिंग आलं. पण त्याचा परवाना आणि इतर परवानग्या मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. मोठ्या संघर्षानंतर त्यांना परवाना मिळाला. रिक्षाच्या स्टेअरिंगला एकप्रकारे सरकारी बळ मिळालं. हळूहळू आर्थिक घडी नीट बसू लागली. खर्चाची गणितंही जमू लागली.

महिला रिक्षा चालक म्हणून काम करताना दुसरीकडे घरची जबाबदारी होती. मुलांचं शिक्षण आणि मुलांना सांभाळण्यासाठी कुणी घरी नसल्यामुळे त्यांना मुलांना एकटं सोडून रिक्षा चालवण्यासाठी जावं लागायचं. त्यासाठी सकाळी त्या पाच वाजता उठायच्या. सात वाजता मुलांना शाळेत सोडण्यासाठी तर १२ वाजता त्यांना पुन्हा आणण्यासाठीही जावं लागायचं. या सगळ्यात त्यांची कसरत व्हायची. पण एन्जॉय करत त्यांनी हा प्रवास चालू ठेवला.

एकीकडे घर आणि दुसरीकडे व्यवसाय म्हणून रिक्षा चालवणं असा हा दुहेरी संघर्ष होता. लहान मुलं आणि पतीचं आजारपण असं सगळं सांभाळत त्यांनी ही जबाबदारी लीलया पार पाडली. पतीही हळूहळू आजारपणातून बाहेर पडू लागले. घरकामात त्यांचीही मदत झाली. जे घरकाम केवळ बाईचं असं आजपर्यंत समजलं जायचं तिथं सुनीताताईंमुळे त्यांच्या पतीचा पूर्ण दृष्टिकोन बदलून गेला.

हेही वाचा: गोझी ओकोन्जो : आर्थिक सत्तेच्या चाव्यांनी विकासाची दारं उघडणाऱ्या ‘आजीबाई’

बाईचं कामही पुरुषाच्या तोडीचं

रिक्षा चालवताना सुनीताताईंना चांगले वाईट अनुभव आले. पण त्यांची धडपड सुरूच राहिली. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकत एक वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केला. सुरवातीला अडचणी आल्या पण या सगळ्यात रिक्षा चालक असलेल्या पुरुष सहकाऱ्यांची साथही मोलाची ठरली असं त्या अभिमानाने सांगतात. कधी रिक्षाचा टायर बिघडायचा तर कधी इतर काय. पण त्यांनी आलेल्या प्रत्येक संकटाकडे एक संधी म्हणून पाहिलं.

सध्या सुनीताताई नवी मुंबईच्या 'रिक्षा चालक-मालक सेवाभावी संस्थे'च्या अध्यक्ष आहेत. आजही वयाच्या साठीत नवी मुंबईच्या शिरवणे, जुई नगर आणि डी. वाय. पाटील कॉलेज भागात त्या शेअर रिक्षा चालवतात. त्यांच्यासाठी हा प्रवास सोप्पा नव्हता. पण यश मिळवण्याची लागणारी जिद्द त्यांच्याकडे होती. त्यांच्यातला उत्साह वाखाणण्याजोगा आहे. आजही लोक त्याकडे कुतूहलाने बघतात.

जमीनीवर राहून आभाळ कवेत घेण्याची त्यांची क्षमता कमालीची प्रेरणादायी आहे. त्यामुळेच अनेक संस्थांनी त्यांचा आदर्श महिला रिक्षा चालक म्हणून सन्मान केलाय. 'आपण महिला असलो तरी पुरुषांच्या तोडीचं काम करू शकतो. त्यासाठी मनामधे जिद्द आणि ध्येय निश्चित करून कोणतंही काम करायला हवं. त्यामुळे लाचार राहू नका. स्वतःच्या पायावर उभं रहा.' असा संदेश सुनीताताई महिलांना देतात.

रिक्षा परवान्यातल्या आरक्षणाचं श्रेय

सुनीताताईंमुळे अनेक महिलांना या व्यवसायात यायची प्रेरणा मिळाली. पण त्यांची स्वतंत्र संघटना नव्हती. त्यामुळे रिक्षेचा परवाना घेण्यासाठी महिलांना अनेक अडचणी यायच्या. ही गोष्ट लक्षात घेऊन या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या महिलांना त्यांनी पाठबळ दिलं. त्यांचं संघटन केलं. आणि प्रसंगी मार्गदर्शनही. इतक्यावरच त्या थांबल्या नाहीत. त्यांनी सरकार दरबारी महिला रिक्षा चालकांच्या अडचणींसंदर्भात पाठपुरावा केला.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेण्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान गाठलं. पुढे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते हे परिवहनमंत्री असताना त्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना आपल्या अडचणी बोलून दाखवल्या. तसंच महिलांना रिक्षाचा परवाना का महत्वाचा आहे हे त्यांनी रावतेंना पटवून दिलं. त्यांना भेटण्यासाठी त्या थेट रिक्षानेच त्यांच्या निवासस्थानी जायच्या.

'बाई स्वत: कमावती झाली की, ती कुणासमोर हात पसरणार नाही. ती आत्मविश्वासाने जगू शकेल. त्यामुळे महिलांना रिक्षाचा परवाना मिळालाच पाहिजे.' ही गोष्ट सुनीताबाईंनी मंत्री महोदयांना सांगितली. त्यांच्यासोबतच्या चर्चेनंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महिला रिक्षा चालकांना परवान्यांमधे ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. महिलांच्या स्वावलंबनाच्या दिशेनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल होतं. त्यात सुनीताबाईंचा खारीचा वाटा होता.

हेही वाचा: 

अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया

बायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार?