सुप्रिया सुळे का जिंकल्या, पार्थ पवार का हरले?

२३ मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


पाच दशकांपासून अपराजित राहण्याचा पवार कुटुंबाचा इतिहास आज मोडीत निघाला. मावळमधे पार्थ पवार यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव झाला. तिकडे बारामतीत गेल्यावेळी काठावर पास झालेल्या सुप्रिया सुळे यांनी मात्र यंदा चांगलं मताधिक्य घेतलं. पवार कुटुंबातल्या जय-पराजयाची काही कारणं.

शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा पार्थला यंदा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे पवारांची एकुलती एक मुलगी सुप्रिया सुळे यांनी मात्र गेल्यावेळपेक्षा दुपटीच्या लीडने विजय मिळवला. पण या जय पराजयामागे काही महत्त्वाची कारणं आहेत.

पवारांनी शर्थीचे प्रयत्न केले पण

यंदाची निवडणूक पवार घराण्यासाठी खूप प्रतिष्ठेची होती. वयाच्या ऐंशीत पवारांनी जवळपास ८० सभा घेऊन महाराष्ट्र पिंजून काढला. मतदारसंघांमधे मुक्काम ठोकले. काही ठिकाणी तर पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज भरायला स्वतः हजेरी लावली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही महाराष्ट्रातल्या आपल्या सभांमधे पवारांनाच टार्गेट केलं. सत्ताधारी भाजप युतीने पवारांना आपल्या प्रचाराच्या ट्रॅपमधे अडकवण्याचा प्रयत्न केला.

त्यात यंदा राष्ट्रवादीने मावळ मतदारसंघातून ऐनवेळी पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली. मतदानाच्या काही दिवस आधी जाहीर केलेल्या या उमेदवारीने निवडणुकीत चांगलीच रंगत आली. अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस पार्थच्या प्रचारासाठी मावळमधे ठाण मांडून बसली. यावरून ही जागा राष्ट्रवादीसाठी किती प्रतिष्ठेची होती हे ध्यानात येईल.

हेही वाचाः शरद पवारांसाठी बारामतीपेक्षाही मावळ, शिरूर, शिर्डी महत्त्वाची

मावळ आणि बारामतीत काय झालंय? 

मावळमधे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांच्यात लढत झाली. यामधे बारणेंना ६ लाख ८५ हजार, तर पार्थला ४ लाख ७२ हजार मतं मिळाली. टक्केवारीमधे दोघांना अनुक्रमे ५३ टक्के आणि ३६ टक्के मतं मिळाली. महत्त्वाचं म्हणजे शहरी तोंडवळा असलेल्या मावळमधे एकूण १२ लाख ९२ हजार मतांमधे १४ हजार ८२४ मतं नोटाला पडली. जवळपास २३ लाख मतदार असलेल्या मावळमधे ५९.४९ टक्के मतदान झालं.

बारामतीतली लढाई ही एका अर्थाने पवार कुटुंबामधेच होती. एकमेकांच्या नातेवाईक असलेल्या सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्या लढतीत राष्ट्रवादीने ही जागा पुन्हा पटकावली. सुळे यांना ६ लाख ७९ हजार, तर कुल यांना पाच लाख २६ हजार मतं पडली. सुळे यांना ५२ टक्के तर कुल यांना ४० टक्के मतं मिळाली. बारामतीमधे नोटाला ७८१५ मतं पडली. सुळे यांना गेल्यावेळी ७० हजार मताधिक्य मिळालं होतं. ते यंदा दीड लाखावर गेलंय.

पार्थला  मैदानात का उतरवलं?

२००८ मधे मतदारसंघ फेररचनेत अस्तित्वात आलेल्या मावळमधे सुरवातीपासूनच शिवसेनेचं वर्चस्व आहे. मतदारसंघातली महत्त्वाची पिंपरी चिंचवड महापालिका ताब्यात असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा जिंकता आली नाही. त्यातच महापालिकेच्या या भागातल्या राजकारणावर अजित पवार यांची चांगली छाप आहे. पण गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीत भाजपने ही महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यातून हिसकावून घेतली. राष्ट्रवादीपेक्षा हा अजितदादांचाच पराभव मानला गेला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने इथून ऐन निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवारची उमेदवारी जाहीर केली. स्वतः शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, ‘आतापर्यंत जिंकू न शकलेल्या जागांवर चांगला उमेदवार द्यावा असा विचार समोर आला. त्यामुळे पार्थला उमेदवारी दिली. तिथे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. आमचा बेस वाढवण्यासाठी जो प्रयत्न करायचा होता तो आम्ही केलाय.’

हेही वाचाः नरेंद्र मोदींना इतकं मोठं यश मिळालं, याची सर्वात महत्त्वाची ५ कारणं

सुप्रिया सावध, पण पार्थ अचानक आले

बारामती हा पवारांचा बालेकिल्ला. इथल्या राजकारणात पवार कुटुंबाच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही, असा महाराष्ट्रात समज आहे. पण गेल्यावेळच्या मोदीलाटेत हा समज धुळीस मिळाला. पवारांची कन्या आपल्या होमपिचवरच अवघ्या ७० हजाराच्या मताधिक्याने जिंकल्या. हा पवारांच्या साम्राज्याला मोठा धक्का होता. गेल्यावेळची कामगिरी ओळखून भाजपने यंदा कसंही करून बारामतीची जागा जिंकायचीच, हा पण केला.

दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी भविष्यातला धोका ओळखून मोर्चेबांधणी केली. निवडून आल्यावर जनसंपर्क वाढवला. लोकांसोबत थेट संपर्क ठेवला. तसंच संसदेतलं काम या कॉम्बिनेशनच्या जोरावर त्यांनी सारी ताकद पणाला लावली. त्याचं त्यांना फळही मिळालं. मावळमधेही पवार घराण्यानं जोरदार फिल्डिंग लावली होती.

पवार घराण्यातलं नवं प्रोडक्ट इथे मोठ्या घाईत लाँच करण्यात आलं. नेहमी पराभव वाट्याला आलेल्या या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा हा निर्णय घेणं ही तशी रिस्कच. पण अजितदादांनी ही रिस्क घेतली. तिथे मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. ऐनवेळी उमेदवारी दाखल करून जिंकणं हे आव्हानचं होतं.

हेही वाचाः काय आहेत मतमोजणीच्या पहिल्या धारेचे अपडेट?

लाँचिंगची वेळ चुकलीच

सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीच्या राजकारणात येण्याआधी वेगवेगळ्या पातळ्यांवर स्वतःला सिद्ध केलं. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात कार्यकर्त्यांचं स्वतःचं नेटवर्क उभं केलं. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात त्यांचं लाँचिंग करण्यात आलं. याउलट पार्थला असं कुठलंही कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याआधीच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. ही घाईच नडल्याचं आजच्या निकालाने स्पष्ट केलंय.

पवार यांना राजकारण येऊन पन्नास वर्ष झाली. पवार घराण्यातल्या अजून कुणाचा पराभव झाला नाही. पण पार्थच्या निमित्ताने पाच दशकांपासून पराभवाचं तोंड न बघितलेल्या पवार कुटुंबाला यंदा ते बघावं लागलं. शरद पवार यांनी आपल्या कारकीर्दीत जवळपास १५ निवडणुका लढवल्या. यात त्यांचा एकदाही पराभव झाला नाही.

शहरी मतदारांना आकर्षित करण्यात अपयश

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले एचपेच माहीत असलेली एनसीपी शहरी भागात मात्र अडखळते. गेल्या काही वर्षांत तर शहरी भाग राष्ट्रवादीसाठी खूप जड जातोय. राष्ट्रवादीकजे शहरी मतदारांना आकर्षित करेल, दाखवता येईल असं काम आणि चेहरा नाही. शहरी मतदारसंघात त्यांना प्रस्थापितविरोधी लाटेचा सामना करावा लागतोय. 

गेल्यावेळी सुप्रिया सुळे शहरी तोंडवळा असलेल्या खडकवासल्यातून खूप मागे होत्या. त्यामुळे यावेळी खडकवासल्यातून लीड मिळणार नसली तरी कमीत कमी नुकसान होईल, यासाठी मोर्चेबांधणी केली. 

मावळ हाही सता शहरी तोंडवळा असलेला मतदारसंघ आहे. पिंपरी-चिंचवड, पनवेल हा इंडस्ट्रीयअल भाग आहे. पिंपरी चिंचवडमधे तर आयटी इंडस्ट्रीत काम करणाऱ्यांची खूप मोठी संख्या आहे. पण तरुण, शहरी चेहरा असूनही पार्थ यांना साठीतल्या बारणेंचा पराभव करता आला नाही. तसंच भौगोलिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या प्रचंड वैविध्यता असलेल्या या मतदारसंघात सहापैकी पाच आमदार विरोधातले आहेत. अशा मतदारसंघात ऐनवेळी उमेदवार देणं आणि त्यातही राजकारणात नव्यानं येऊन जिंकणं अवघड आहे.

हेही वाचाः मतदानात शहरी लोक का मागे राहतात?

वडिलांच्या पुण्याईचा फायदा आणि फटका

यंदाच्या प्रचारात मतदारांमधे प्रस्थापितविरोधी सूर बघायला मिळाला. वेळोवेळी निवडून आलेल्यांना प्रचारात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आज आलेल्या निकालातही वर्षानुवर्षे सत्ता उपभोगलेल्या अशोक चव्हाण, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ, धनंजय महाडिक यांना फटका बसला.

मावळमधेही सुरवातीपासूनच प्रस्थापितविरोधी सूर होता. आजच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केलं. अजित पवार यांच्या राजकारणाबद्दलच्या नाराजीचा मुलाला फटका बसला. तर शरद पवार यांच्या पुण्याईचा मुलीला फायदा झाला. वडिलांच्या बऱ्यावाईट पुण्याईचा हा नवाच फॅक्टर सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्या निकालाने अधोरेखित केलाय. हा ट्रेंड केवळ काँग्रेस राष्ट्रवादीपुरता मर्यादित नाही. तो येत्या विधानसभेत सत्ताधारी भाजप, शिवसेनेलाही आपल्या कवेत घेऊ शकतो.

हेही वाचाः 

विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली

महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी ही आत्मचरित्रं वाचायला हवीत