सुरीरत्ना: भारतीय मातीतली कोरियन कुलमाता

०१ नोव्हेंबर २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


दरवर्षी दक्षिण कोरियाचं शिष्टमंडळ अयोध्येला येऊन आपल्या कुलमातेला आदरांजली अर्पण करतं. सुरीरत्ना ही कोरियाची कुलमाता अयोध्येची की कन्याकुमारीची, हा ऐतिहासिक वाद चालूच राहणार. राजकारण इतिहास घडवतं तसंच बदलवतही. असं असलं तरी कोरियाच्या कुलमातेचा भारतीय मातीशी असलेला  अनुबंध आणि त्याचा शोध अनेक वाटा-वळणांनी पुढं जात राहील.

साधारणपणे १९९७मधे दक्षिण कोरियातून एक शिष्टमंडळ अयोध्येला आलं. त्यांनी अयोध्येच्या राजघराण्याचे वर्तमान वंशज बिमलेंद्र मिश्रा यांची भेट घेतली. कोरियन शिष्टमंडळ कोरियाच्या कुलमातेचं मूळ शोधण्यासाठी अयोध्येला आलं होतं. इ.स. १२८० मध्ये लिहिण्यात आलेला ‘सामगुक युसा’ हा ग्रंथ कोरियाचा पहिला लिखित ऐतिहासिक दस्ताऐवज मानण्यात येतो.

‘सामगुक युसा’तल्या कथेनुसार इ.स. ४८ च्या दरम्यान एक १६ वर्षांची राजकुमारी आपल्या २,२०० लोकांच्या लव्याजम्यासह समुद्र प्रवास करत होती. ‘आयुता’ या दूरच्या राज्यातल्या या राजकुमारीचं जहाज कोरियाच्या समुद्रकिनार्‍याजवळ खडकाला धडकलं. बेशुद्ध अवस्थेतल्या राजकुमारीला तिच्या सेवकवर्गानं किनार्‍यावर आणलं.

हेही वाचाः आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल

कोरियन कुलमातेचं भारतीय मूळ

घटनेच्या आदल्या रात्री कोरियाचा म्हणजे तत्कालीन ‘ग्युमग्वान गया’चा राजा ‘सुरो’ याला झोपेत एक स्वप्न पडलं. त्यानुसार उद्या सकाळी समुद्रकिनार्‍यावर एक राजकुमारी बेशुद्ध अवस्थेत सापडेल. तिच्यासोबत विवाह केला तर तुझ्या वंशाचा आणि राज्याचा भाग्योदय होईल. राजा सुरोनं सकाळी उठल्यावर स्वप्नाची सत्यता पडताळण्यासाठी आपल्या सैनिकांना समुद्रकिनारी पाठवलं. खरोखरच तिथं एक राजकुमारी बेशुद्धावस्थेत सापडली. राजकुमारीचं नाव ‘सुरीरत्ना’ असं होतं आणि ती भारत देशातून आली होती.

सुरीरत्ना भारतातल्या महाकौशल जनपदाचा राजा पद्मसेन आणि राणी इंदुमती यांची पुत्री होती. राजा पद्मसेनलाही आपल्या पुत्रीसाठी योग्य वर समुद्र पर्यटन करत असताना प्राप्त होईल, असं स्वप्न पडलं होतं. म्हणून त्यानं सुरीरत्नाला समुद्र प्रवासाला पाठवलं होतं. दोन्ही स्वप्नांचं फलित म्हणजे राजा सुरो आणि सुरीरत्नाचा विवाह झाला.

तिचं नामकरण ‘हिओ व्हांग ओ’ असं करण्यात आलं. या दोघांना १२ अपत्यं झाली. आज उत्तर आणि दक्षिण कोरिया मिळून असलेले सहा कोटी कोरियन लोक म्हणजे राजा सुरो आणि राणी सुरीरत्ना म्हणजेच हिओ व्हांग ओ यांचाच वंशविस्तार आहे, अशी मान्यता कोरियात आहे. त्यामुळे कोरियाचा कुलपिताराजा सुरो आणि कुलमाता राणी हिओ व्हांग ओ, असं मानलं जातं.

शिष्टमंडळाची अयोध्येला भेट

दक्षिण कोरियातल्या ‘गिम्हे’ या ठिकाणी असलेलं थडगं हिओ व्हांग ओ म्हणजे सुरीरत्नाचं आहे, अशी मान्यता आहे. या कथेतल्या ‘आयुता’ नावाच्या  उल्लेखावरून कोरियन शिष्टमंडळ भारतातल्या अयोद्धेला पोचलं होतं. 'आयुता' म्हणजे 'अयोध्या' असा शिष्टमंडळाचा दावा होता. त्यानंतर २००१ला अयोध्या राजघराण्याचं वंशज बिमलेंद्र मिश्रा यांना दक्षिण कोरिया सरकारकडून हिओ व्हांग ओ म्हणजे सुरीरत्नासंदर्भात माहिती कोरलेली कोनशिला पाठवण्यात आली.

उत्तर प्रदेशच्या तत्कालीन राज्य सरकारनं एक बगिचा तयार करून ही कोनशिला तिथं स्थापित केली. कथेवर विश्वास ठेवल्यास आपल्याला हा इतिहास सरळ वाटू शकतो. संशोधनाच्या दृष्टीनं खोलवर गेलं तर या इतिहासाला अनेक पैलू आणि कंगोरे असलेले दिसतात. कोरियन आणि भारतीय इतिहासकारांमधे भारत-कोरिया यांच्यातल्या ऐतिहासिक अनुबंधासंदर्भात मतमतांतरं दिसतात.

प्रत्येक पक्ष आपल्या मांडणीच्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे सादर करताना दिसतो. त्यामुळे प्रत्येक पैलूतून इतिहासाचा धांडोळा घेणं उचित ठरतं; नाहीतर आपला दृष्टिकोन एकांगी होऊ शकतो. हिओची आख्यायिका असलेली ग्युमग्वान गया, गारकगुकगी राज्याची प्रमाण ऐतिहासिक नोंद आज उपलब्ध नाही किंवा हरवलेली आहे. भारताच्या कोणत्याही ग्रंथ, किंवा दंतकथांमधे ही आख्यायिका आढळत नाही.

हेही वाचाः सफदर हाश्मीः नाटक थांबवत नाही म्हणून त्याचा भररस्त्यात खून केला

कोरियन इतिहासकारांमधे मतमतांतरं

कोरियन इतिहासकारांमधे 'आयुता' म्हणजे 'अयोध्या' याविषयी पाच प्रमुख पक्ष आहेत. पहिला म्हणजे या कथेला प्रमाण मानून ध्वनी साधर्म्याच्या आधारावर आयुता म्हणजे अयोध्या, असं मानणारा.  दुसर्‍या पक्षाच्या म्हणण्यानुसार, आयुता म्हणजे थायलंडमधलं ‘आयुथया’ शहर किंवा राज्य. तिसरा पक्ष म्हणतो, थायलंडमधल्या आयुथया शहर किंवा राज्य इ.स. १३५० नंतर म्हणजे सामगुक युसा ग्रंथाच्या निर्मितीनंतर अस्तित्वात आलं. चौथा पक्ष अयुता राज्य हे ‘अय’ किंवा ‘लन्याकुमारी’ राज्य याचं चुकीचं भाषांतर आहे.

प्राचीन तमिलकमच्या अर्थात तामिळनाडू पांड्य साम्राज्याचे शासक हे मूळचे अय राज्यातले किंवा लन्याकुमारीचे म्हणजे कन्याकुमारीचे होते. राणी हिओ व्हांग ओ आपल्यासोबत पांड्यची राज्य चिन्हं म्हणजे ‘जुळे मासे’ आणि ‘त्रिशूल’ घेऊन कोरियाला आली होती. पाचवा पक्ष तर या आख्यायिकेला केवळ मोहकपरिकथा अथवा दंतकथा मानतो. भारतीय इतिहासकारांचा विचार केला, तर अयोध्येविषयीच त्यांच्यात मतमतांतरं दिसून येतात.

इतिहासाच्या कसोटीवर उतरणारं प्राचीन भारतीय साहित्य म्हणजे बौद्ध आणि जैन वाङ्मय. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकापर्यंत अयोध्या असा उल्लेख न आढळता ‘साकेत’ असा या नगरीचा उल्लेख या वाङ्मयात आढळतो. काही इतिहासकारांच्या मते, अयोध्या हे साकेतनगरीच्या एका भागाचं नाव होतं. इसवी सनाच्या ५ व्या शतकानंतर म्हणजे गुप्त काळात साकेतनगरीचा उल्लेख अयोध्या असा केला जाऊ लागला.

कोरियन भाषेवर तमिळीचा प्रभाव

दक्षिण भारताचे द्राविडियन इतिहासकार कोरियातल्या अय किंवा लन्याकुमारी राज्याशी हिओचा संबंध जोडणार्‍या इतिहासकारांच्या मांडणीच्या समर्थनार्थ अत्यंत सबळ पुरावे सादर करताना दिसतात. भाषेतल्या साधर्म्यापासून याची सुरवात होते. तमिळ आणि कोरियन भाषेतलं ५०० पेक्षा अधिक शब्द उच्चारण आणि अर्थदृष्ट्या समान आहेत.

तमिळप्रमाणे कोरियात वडिलांना ‘अप्पा’ संबोधलं जातं. आईला कोरियनमधे ‘ओमा’, तर तमिळमधे ‘अम्मा’ म्हणतात. असं अनेक समान नातेवाचक शब्द सांगता येतात. ‘पूल’ हा शब्द तमिळ आणि कोरियन दोन्ही भाषेत गवतासाठी वापरला जातो. ‘नल’ म्हणजे दिवस कोरियन  आणि तमिळमधे एकच आहे. दोन्ही भाषेत ‘नान’ म्हणजे मी. तमिळमधे लढाई म्हणजे ‘संदाई’, तर कोरियनमधे ‘सांडा’. ‘आत ये!’साठी तमिळ ‘उल्ले’, तर कोरियन ‘इलिवा.’

तुलनात्मक भाषाशास्त्रज्ञ कांग गिल उन यांनी तर तमिळ-कोरियनमधली अशी १,३०० शाब्दिक साम्यस्थळं शोधली आहेत. भाषाशास्त्रज्ञांच्या मते, सीमावर्ती मंचुरियातल्या ‘निव्ख’ भाषेशी संबंधित कोरियन भाषेवर तमिळ भाषेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.

सध्या भारतात कोरियन गीत-संगीताने तरुणांना वेड लावलंय या गाण्यांमधेही तमिळ शब्दांची जाणीव होते. समुद्री व्यापारामुळे तामिळनाडू आणि कोरिया यांचा प्राचीनकाळापासून संबंध आल्यानेही हा भाषासंबंध निर्माण झाला असावा. अशा पुराव्यांमुळे दाक्षिणात्य इतिहासकार आयुता म्हणजे अयोध्या नसून, कन्याकुमारी आहे. कोरियाच्या कुलमातेशी तामिळनाडूचा संबंध जाणीवपूर्वक तोडला जात आहे, असा आरोपही केला जातो.

हेही वाचाः आंबेडकरांनी नाकारलेला शब्द पंतप्रधानांनी वापरू नये

धार्मिक इतिहास आणि बौद्ध धर्म

धार्मिक इतिहासाचा विचार केला तर बौद्ध धर्माच्या प्रसाराशी हिओचा संबंध काही इतिहासकार सिद्ध करून दाखवतात. सुरीरत्ना किंवा हिओ व्हांग ओ इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेली. हा काळ मौर्य साम्राज्याचा आणि त्याचा राजधर्म बौद्ध धर्माच्या प्रभावाचा होता. कौशल किंवा महाकौशल हे जनपद मौर्य साम्राज्याचा भाग होते. त्याची राजधानी साकेत होती.

इसवी सन ३७२ला बौद्ध धर्म कोरियात पोचला. हिओच्या ग्युमग्वान गया राजघराण्यानं त्याचा राजधर्म म्हणून स्वीकार केला. भविष्यात या राज्याची तीन शकलं झाली. तरी ग्युमग्वान गया राज्याचा राजधर्म बौद्धच राहिला. आज दक्षिण आणि उत्तर कोरियातले जवळपास ५० टक्के लोक निधर्मी आहेत. उरलेल्या ५० टक्के लोकसंख्येत ३० टक्के बौद्ध आणि उर्वरित कॅथोलिक ख्रिश्चन आहेत. म्हणजेच हिओचा संबंध बौद्ध धर्माशी जोडता येतो, असं मत मांडलं जातं.

इतिहासाला अनेक कंगोरे असतात. प्रत्येकजण इतिहास आपल्या दृष्टिकोनातून आणि आपल्याकडच्या पुराव्यांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे इतिहास कायम घडत असतो. मोडत असतो. इतिहासाच्या अन्वयार्थावर त्या-त्या काळातली राजकीय परिस्थिती प्रभाव टाकत असते. आज तरी कोरियाच्या कुलमातेच्या भारतीय मुळाबाबत अयोध्येचं पारडं जड आहे.

अयोध्येतल्या स्मारकाला २४ कोटी

दरवर्षी दक्षिण कोरियाचं शिष्टमंडळ अयोध्येला येऊन आपल्या कुलमातेला आदरांजली अर्पण करतं. २०१६ ला भारत-दक्षिण कोरिया यांच्यादरम्यान झालेल्या सांस्कृतिक देवाण-घेवाण करारानुसार अयोध्येत असलेलं राणी हिओ व्हांग ओचे स्मारक अधिक भव्यदिव्य करण्याचं नियोजन आहे. त्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय.

दिवाळीनिमित्त उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं आयोजित केल्या जाणार्‍या दीपोत्सवाला दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी म्हणजेच कोरियाच्या प्रथम महिला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी कोरियाची कुलमाता अयोध्येची की कन्याकुमारीची, हा ऐतिहासिक वाद चालूच राहणार आहे. कारण, राजकारण इतिहास घडवतं तसंच बदलवतही असतं. असं असलं तरी या सगळ्या घडामोडींमधे कोरियाच्या कुलमातेचा भारतीय मातीशी असलेला अनुबंध आणि त्याचा शोध अनेक वाटा-वळणांनी पुढं जात राहणार.

हेही वाचाः 

पालघरबद्दल मी गप्प नव्हतो, हिंदू-मुस्लिमवाली टोळी जास्त सक्रिय होती

शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!

५६ वर्षांपूर्वी कोरोना कुटुंबाचा मूळ वायरसपुरुष शोधणाऱ्या जून अल्मेडाची गोष्ट

राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)