माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री ६ ऑगस्टला निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांच्या अचानक जाण्यामुळे सगळ्यांना धक्का बसला. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं आपण सगळे सहजपणे म्हणतोय. पण त्यांचं निधन कार्डिएक अरेस्टमुळे झालं.
महिलांच्याच नाही पुरुषांच्याही रोल मॉडेल, माजी परराष्ट्र मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं बुधवारी ६ ऑगस्टला निधन झालं. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतल्या एम्समधे म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधे दाखल करण्यात आलं. पण तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्या ६७ वर्षांच्या होत्या. गुरवारी ७ ऑगस्टला त्यांच्यावर लोधीरोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
बुधवरी मीडियामधून त्यांना हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्या हार्ट अटॅकने गेल्या नाहीत. तर डॉक्टरांनी कार्डिएक अरेस्टमुळे स्वराज्य यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. पण सर्वसामान्यांच्या भाषेत हार्ट अटॅक आणि कार्डिएक अरेस्ट एकच होऊन बसलेत. मात्र दोन्ही गोष्टी एक नाही.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या वेबसाईटने यावर माहिती दिलीय. त्यात असं सांगितलंय, कार्डिएक अरेस्ट झाल्यावर हृदयात इलेक्ट्रिकल गडबड होते. त्यामुळे शरीराकडून कुठलेही संकेत मिळत नाहीत. आणि हृद्याच्या ठोक्यांचा ताळमेळ बिघडतो. यामुळेच हृदयात रक्ताचं पंपिंग व्यवस्थित होत नाही. त्यामुळे रक्त मेंदू किंवा इतर अवयवांपर्यंत पोचत नाही.
अशावेळी व्यक्ती बेशुद्ध पडते आणि हृदयाचे ठोकेही मंदावतात. म्हणूनच प्रथमदर्शी त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्याचं वाटतं. पण असं होत नाही. सुषमा स्वराज यांच्या बाबतीतही सुरवातीला असंच काहीसं समजलं गेलं.
ह्रदयाचा ठोका चुकल्यावर ताबडतोब योग्य उपचार घेणं गरजेचं आहे. नाही तर काही सेकंदांत किंवा मिनिटांमधे व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. अमेरिकेत प्रॅक्टिस करत असणारे डॉक्टर सौरभ बंसल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, खरं तर कार्डिएक अरेस्टला मृत्यूचा अंतिम क्षण असंच म्हटलं जातं. यात हृदयाचे ठोके मंदावून ते बंद पडतात.
कार्डिएक अरेस्ट होण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. सामान्यपणे याचं एक प्रमुख कारण म्हणजे मोठा हार्टअटॅक. हृदयातील इलेक्ट्रिकल सिग्नलमधे अडचणी आल्यानंतर शरीराच्या इतर भागांचा रक्तपुरवठा बंद होतो. आणि हीच प्रक्रिया कार्डिएक अरेस्ट होण्यासाठी कारणीभूत ठरते.
आपलं हृदय रक्ताचं पंपिंग बंद करतं, तेव्हा मेंदूतील ऑक्सिजनचं प्रमाणही घटतं. अशावेळी व्यक्ती बेशुद्ध पडते आणि श्वास घेता येत नाही. आणि म्हणूनच यात मृत्यू अटळ असतो, असं डॉक्टर बंसल म्हणतात.
हेही वाचा: शीला दीक्षितः काँग्रेसमधल्या एका कर्तृत्ववान पिढीचं जाणं
कार्डिएक अरेस्ट येण्याआधी त्याची काहीच लक्षणं दिसत नाही. म्हणूनच मृत्यू येण्याचा धोका कैकपटींनी वाढतो. यामागे असामान्य हार्ट ऱ्हिदम असल्याचं कारण डॉक्टरांकडून सांगितलं जातं. ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'वँट्रिकुलर फिब्रिलेशन' म्हटलं जातं.
कार्डिएक अरेस्टची अनेक कारणं असू शकतात. कोरोनरी हार्ट, हार्ट अटॅक, कार्डियोमायोपॅथी, काँजेनिटल हार्ट, हार्ट वॉल्वमधली समस्या, हार्ट मसल्समधलं इन्फ्लेमेशन, लाँग क्युटी सिंड्रोमसारखे डिसऑर्डर इत्यादी हृदयविकाराशी संबंधित आजार किंवा समस्या असल्यास कार्डिएक अरेस्ट होण्याची शक्यता वाढते.
तसंच विजेचा झटका, प्रमाणापेक्षा जास्त ड्रग्जचं सेवन, ब्रेन हॅमरेज, पाण्यात बुडणं. त्याचबरोबर हृदयाच्या आजूबाजूला असलेल्या द्रवपदार्थांमधे इन्फेक्शन, रक्ताच्या गुठळ्या होणं इत्यादींमुळे कार्डिएक अरेस्ट होऊ शकतो.
हेही वाचा: गोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं
कार्डिएक अरेस्ट झाल्यानंतर व्यक्ती बरी होऊ शकते का? हो, आपल्याकडे एवढं प्रगत तंत्रज्ञान असताना यावरही माणसाने उपाय शोधलाय. छातीवर इलेक्ट्रिक शॉक देऊन बंद पडलेलं हृदय सुरू करता येतं. यासाठी डिफिब्रिलेटर नावाचं यंत्र वापरलं जातं.
पण कार्डिएक अरेस्ट झाल्यानंतर जवळपास डिफिब्रिलेटर नसलं तरीसुद्धा कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन म्हणजे सीपीआर देऊन त्या व्यक्तीला वाचवता येऊ शकतं. यात दोन्ही हात सरळ रेषेत ठेवून रुग्णाच्या छातीवर जोराने दाब दिला जातो. आणि तोंडावाटे श्वास देण्याचा प्रयत्न केला जातो. जे आपण बऱ्याच सिनेमांत पाहिलंय.
हेही वाचा: निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, खरंच?
हार्ट अटॅकमधे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीतला रक्तप्रवाह बंद होतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूचा भाग निर्जीव होतो. रस्ता रोखला गेल्यानं ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा मेंदूपर्यंत पोचू शकत नाही. त्यावर उपचार घेण्यास उशीर झाला तर, हृदय आणि शरीराचं नुकसान होतं. पण हृद्याचे ठोके सुरु असतात. कार्डिएक अरेस्टप्रमाणे ते बंद पडत नाहीत.
छातीत दुखणं, दम लागणं, डाव्या खांद्यात दुखणं, खूप घाम येणं ही याची लक्षणं असतात. तर उच्च रक्तदाब, रक्तातील कोलेस्टेरॉलची उच्च पातळी, धुम्रपान, मधुमेह, लठ्ठपणा ही यामागची मुख्य कारणं असतात.
म्हणूनच कार्डिएक अरेस्ट हे हार्ट अटॅकपेक्षा वेगळं आहे. आणि हार्टअटॅकमधे रुग्णांना वाचवलं जाण्याची शक्यता जास्त असते. आणि मोठा अटॅक आल्यावर जास्तवेळापर्यंत इलाज झाला नाही तर मात्र कार्डिएक अरेस्ट होऊ शकतो, अशी माहिती डॉ. विनीता शहा यांनी झी न्यूजशी बोलताना दिली. त्या कार्डिओलॉजिस्ट म्हणून दिल्लीत प्रॅक्टिस करतात.
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन ही संस्था ह्रदयाशी संबंधित आजारांवर काम करते. संस्थेकडून दरवर्षी ह्रदयरोगांशी संबंधित आकडेवारी सादर केली जाते. हृदयाशी संबंधित आजारांमुळे जगातल्या सुमारे १.७ कोटी लोकांचा मृत्यू होतो. हे प्रमाण एकूण मृत्यूच्या ३० टक्के इतकं आहे.
हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंमधे अचानक आलेल्या कार्डिएक अरेस्टमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण हे ४० ते ५० टक्के आहे. जगभरात कार्डिएक अरेस्टमधून वाचण्याचं प्रमाण हे एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. फक्त अमेरिकेत याच प्रमाण ५ टक्के आहे. यावर योग्य औषधोपचारासाठी जगभरात वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधन सुरु आहे.
हेही वाचा:
लोक सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय?
३७० नाही, तर जम्मू काश्मीर केंद्रशासित करणं ही सगळ्यांत मोठी खेळी
काश्मीरच्या निमित्ताने द्वेषाचं कोडिंग करुन आपल्या मेंदूचं प्रोग्रामिंग सेट होतंय