भारतीय क्रिकेट टीम वारंवार का हरतेय?

२५ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


टी-२० विश्वचषकात झालेल्या नामुष्कीजनक पराभवामुळे भारतीय क्रिकेट टीमवर टीका होतेय. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकली गेली. खेळाडूंची कामगिरी उत्तम असली तरी बेभरवशी असल्याचं या स्पर्धेतून पुन्हा एकदा दिसून आलं. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, यावर चिंतन करण्याची खरंच गरज आहे.

भारतात निवडणुका आणि क्रिकेट या दोन गोष्टी लोक डोक्यावर घेऊन नाचतात. भारतात क्रिकेटची लोकप्रियता शिगेला पोचलेली आहे, ही गोष्ट क्रिकेट सामन्यांच्या वेळी रस्त्यावर कमी दिसणारी वर्दळ पाहून सहज लक्षात येते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याच्या वेळी तर रस्ते अक्षरशः ओस पडलेले असतात. पण चाहत्यांकडून इतकं भरभरून प्रेम देऊनही आपले खेळाडू त्या प्रेमाला योग्य न्याय देतात का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे.

टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमधे इंग्लंडकडून भारताचा पराभव झाल्यामुळे नामुष्की पत्करावी लागली आणि या निराशाजनक पराभवामुळे क्रिकेटप्रेमी कमालीचे नाराज झालेत. याचं कारण या विश्वचषक स्पर्धेत भारतीय टीम जिंकेल अशी सर्वांनाच आशा होती. भारतीय टीमकडून चांगल्या नाही तर धडाकेबाज कामगिरीची आस सगळ्यांनाच होती. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत प्रत्येक सामन्यात सर्वोकृष्ट कामगिरीच करावी लागते. असं असताना मर्यादित षटकांच्या सामन्यात आतापर्यंत भारतीय टीमची ही सगळ्यात खराब कामगिरी होती, असं मानलं जातंय.

टीमवरच प्रश्नचिन्ह होतं

पहिल्यांदाच टी २० विश्वचषकाच्या सेमीफायनलमधे एखादी टीम १० विकेटने हरलीय. भारतीय टीममधले पहिले तीन-चार बॅटसमन लवकर बाद झाले की बाकी पूर्ण टीम पत्ताच्या बंगाल्याप्रमाणे कोसळते, हे आता जगजाहीर आहे. याला अनेक जण सायकल स्टँडची उपमा देतात. सायकल स्टँडमधे जसं एक सायकल दुसर्‍या सायकलवर पडली की इतर सायकली धडाधड पडतात. तशीच स्थिती भारतीय क्रिकेट टीमची अनेकदा दिसून आली आहे.

खरं तर भारतीय टीमला तयार करण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू आहेत. पण जेव्हा टीम घोषित झाली तेव्हा लक्षात आलं, की आशिया कपमधे खेळलेल्या खेळाडूंचाच यात अधिक भरणा केला आहे. विशेष म्हणजे या सर्वच खेळाडूंची कामगिरी लक्षवेधी नव्हती. अनेक वरिष्ठ खेळाडूंनी निवड केलेल्या भारतीय टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

सामना तुल्यबळ असेल तर खेळाडूंची निवड त्याच आधारावर केली गेली पाहिजे. कोणतीही स्पर्धा किंवा सामना जिंकण्यामधे खेळाडूंची निवड हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असतो. भारतीय निवड समितीकडून नेहमीच चांगल्या कामगिरी करणार्‍या खेळाडूंऐवजी मोठमोठ्या प्रभावशाली, वलयांकित नावांनाच प्राधान्य दिलं जातं. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात भारतीय टीममधे अनेक बदल केले जातायत. याचा परिणाम असा झालाय की, कोणता खेळाडू कधी खेळणार आणि का खेळणार, हे कुणीच सांगू शकत नाही.

हेही वाचाः स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

चुकलेलं गणित, हुकलेली संधी

विश्वचषकात झालेल्या भारताच्या पराभवामागे निवड समितीच्या चुकाही आहेत, अशी चर्चा आहे. ती चुकीची म्हणता येणार नाही. निवड समितीने २०२१च्या टी २० विश्वचषकानंतर तब्बल सात कॅप्टन बदललेत आणि हीच परंपरा आताही कायम असल्याचं दिसून येतंय. २०११नंतर भारतीय टीम कोणतीही मोठी स्पर्धा का जिंकलेली नाही, या मुद्द्यावर चिंतन, मनन करण्याची खरंच गरज आहे.

सचिन तेंडुलकरने याबद्दल म्हटलंय की, इंग्लंडकडून भारताच्या झालेल्या दारूण पराभवामुळे आपण खूपच निराश झालोय. सचिन पुढे असंही म्हणतो की, टीमची योग्यता केवळ एका सामन्याच्या आधारावर करणं योग्य नाही. अ‍ॅडलेटवर १६८ धावसंख्या एक चांगला स्कोर नव्हता. या मैदानात बाउंड्री खूप लहान आहे. इंग्लंडला टक्कर देण्यासाठी किमान १९० धावसंख्येच्या जवळपास भारतीय टीमने धावा करणं गरजेचं होतं. आपल्या बॅालरनाही या मैदानावर एकाही खेळाडूला आऊट करता आलं नाही, हे विशेष आहे.

टीमवर ‘चोकर्स’चा शिक्का

इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन याने म्हटलं की, भारतीय टीम जुन्या पद्धतीने खेळला. वॉनने लंडनच्या 'द टेलीग्राफ' या  लेखात लिहिलं की, टी २० स्पर्धेत खेळणार्‍या सर्व टीममधे भारतीय टीम सर्वात कमकुवत होती. या लेखात वॉन म्हणतो, की आयपीएलमधे खेळणारा प्रत्येक खेळाडू असं सांगत असतो की, आयपीएलमधे खेळल्यामुळे त्याच्या खेळात सुधारणा झाली आहे. भारतीय टीमला यातून खरंच काही हाती लागले आहे का?

वॉन म्हणतो की, 'भारताकडे बॅालर्सचे पर्याय खूपच कमी आहेत. त्यांच्या बॅटिंगमधे अनेक उणिवा आहेत. एक-दीड दशकापूर्वी भारतीय टीमचे महत्त्वाचे बॅटसमनही अप्रतिम बॅालिंग करत होते. सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, विरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुलीसुद्धा बॅालिंगमधे आपली चमक दाखवत होते. आता कोणताही बॅटसमन बॅालिंग करत नाही, यामुळे कॅप्टनकडे केवळ पाचच बॅालर्सचा पर्याय असतो.' लेग स्पीनर युजवेंद्र चहल याला खेळू न दिल्याचाही फटका भारतीय टीमला बसला.

प्रसिद्ध अष्टपैलू कपिल देव यांनी सध्याच्या टीमवर ‘चोकर्स’चा शिक्का मारला आहे. चोकर्स अशा टीमला म्हणतात, जो महत्त्वाच्या सामन्यात ढेपाळतो आणि पराभव पदरी पाडून घेतो. मागच्या सहा विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम पाच वेळा नॉकआउटमधेच पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलाय. कपिल देव यांनी म्हटलं की, अधिक कडक शब्दांत भारतीय टीमचे कान आपण टोचणार नाही, कारण हे तेच खेळाडू आहेत, ज्यांना आपण भूतकाळात डोक्यावर घेऊन नाचलो आहोत. त्यांनीच मागे आपल्याला विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी दिली. आपण त्यांना ‘चोकर्स’ म्हणू शकतो.

हेही वाचाः ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम

वारंवार पराभवाचे धक्के

मागच्या काही वर्षांपासून भारतीय टीमसाठी शेवटच्या मोक्याच्या वेळी पराभव होणं ही मोठी डोकदुखी ठरली आहे. भारतीय टीम २०१४च्या टी २० विश्वचषकाच्या फायनलमधे पोचला होता. श्रीलंकेकडून भारतीय टीमला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. २०१५ आणि २०१६ च्या विश्वचषक स्पर्धांमधे भारतीय टीम सेमीफायनलमधेच पराभूत झाला होता.

२०१७च्या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल सामन्यात भारतीय टीमला तर पाकिस्तानकडून नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला होता. याशिवाय २०१९ च्या विश्वचषकाच्या सेमीफायनलमधेही पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. २०२१ च्या टी२० विश्वचषकात तर भारतीय टीम सुरवातीलाच स्पर्धेतून बाहेर फेकला गेला होता. आता २०२२ मधेही भारतीय टीम पुन्हा एकदा सेमीफायनलमधे पराभूत झाला आहे.

धोनीची आठवण का येतेय?

भारताचा अशा प्रकारे पराभव होत असताना अनेकांना महेंद्रसिंग धोनीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानंही भारतीय टीमच्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीची आठवण काढली. तो म्हणाला की, धोनीसारखा कॅप्टन पुन्हा भारतीय टीमला मिळणार नाही. धोनी भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. अशी कोणतीही ट्रॉफी बाकी नाही जी त्याच्या नेतृत्वात जिंकली नसेल.

धोनीच्या नेतृत्वात भारतीय टीमने अगोदर २००७मधे टी२० विश्वचषक जिंकला होता. २०११ मधे वनडे विश्वचषक जिंकला होता. २०१३मधे चॅम्पियन्स ट्रॉफीसुद्धा जिंकली होती. गौतम गंभीर म्हणाला की, उद्याच्या भविष्यात एखादा खेळाडू येईल आणि रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा जास्त शतकं ठोकू शकेल; पण कोणीही भारतीय कॅप्टन आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकून देईल असं वाटत नाही. खेळतज्ज्ञांचंही असंच म्हणणं आहे की, भारतीय संघ सतत टुर्नामेंट जिंकण्यामागे धोनीचे नेतृत्वगुणच होते.

धोनीने कॅप्टनशिप सोडल्यानंतर त्याने तयार केलेली टीम पुढची काही वर्ष खेळत होती. २०१८मधे रोहित शर्माच्या नेतृत्वात आशियाई चॅम्पियन बनण्यात भारतीय टीम यशस्वी झाली. त्यानंतर भारतीय टीमची कामगिरी खालावत गेली. धोनी कॅप्टन असताना कोणत्या खेळाडूचा केव्हा उपयोग करून घ्यावा हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. तसंच आपल्या खेळाडूंवर दबाव कसा येणार नाही, याचीही धोनी काळजी घेत होता. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर भारतीय टीमचं स्वरूपच बदललं. आता भारतीय टीम दोन देशांदरम्यानची स्पर्धा तर जिंकतो मात्र मोठ्या स्पर्धेत पराभूत होतो.

आता वेळ आली आहे की, भारतीय टीम निवडताना केवळ मोठी नावं न पाहता चमकदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंचीच निवड केली गेली पाहिजे. टी २० युवा खेळाडूंचा खेळ आहे. निवड समितीने वय वाढलेल्या खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी दिली पाहिजे.

हेही वाचाः 

क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी 

(लेखक क्रीडा अभ्यासक असून त्यांचा लेख दैनिक पुढारीतून घेतलाय)