मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?

०८ मार्च २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


द क्विंट या वेबसाईटवर सेक्स आणि रिलेशनशिपविषयी मार्गदर्शन करणारा एक कॉलम आहे. सेक्सॉल्व नावाचा. त्यात वाचक प्रश्न पाठवतात. रेनबोमॅन या नावाने प्रसिद्ध सेक्सॉजिस्ट हरीश अय्यर त्यावर उत्तरं देतात. मागे शबरीमलाचा वाद सुरू होता. तेव्हा एका केरळी पालकाने पाठवलेला प्रश्न आणि उत्तर यात आहे. मासिक पाळी नावाच्या साध्या नैसर्गिक गोष्टीचं धर्माच्या नावाने इतकं मोठं राजकारण कसं होतं, ते उलगडून सांगणारं हे प्रश्नोत्तर.

प्रिय रेनबोमॅन,

मी तुमच्या कॉलमचं जबरदस्त कौतुक करत असतो. मी अनेक मुद्द्यांवर तुमच्या विचारांचं कौतुकही करत आलोय. पण मला असं वाटतं, देवाला जी इच्छा आहे त्यात आपण हस्तक्षेप करु नये. इतर मुद्दे असताना आपण तिकडे का लक्ष देत नाही? मी भगवान अय्यपाच्या मुद्द्यावर बोलतोय. या सगळ्या प्रकाराकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन आपण समजून घ्या.

मी लग्न झालेला माणूस आहे. माझ्या लग्नाला आता वीस वर्ष झालीत. मनापासून खूश आहे. माझ्या बायकोनं माझ्याकडे एकदाही शबरीमला मंदिरात जाण्याची इच्छा व्यक्त केली नाही. तिने नेहमी देवाच्या पवित्र भावनेचा सन्मान केलाय. पण माझ्या मुलीचं मत मात्र अगदी वेगळंच आहे. ते मला पटणारं आणि जुळणारंही नाही. तिने सोशल मीडियावर तुमच्या सारख्याच काही स्त्रीवाद्यांना वाचलंय. आणि आता शबरीमला मंदिरात जाण्यासाठी घरी भांडतेय.

ती भगवान अय्यप्पांच्या मंदिरात जायचं म्हणतेय, ते तर ब्रम्हचारी होते. आपल्याला त्यांच्या ब्रम्हचर्याचा सन्मान करायला हवा. ती १२ वर्षांची आहे. तिची मासिक पाळीही सुरू झालीय. त्यामुळे तिला तिथे जाण्याचा अधिकार नाहीय. तुम्ही आणि तुमच्या या ढोंगी स्त्रीवाद्यांनी सोशल मीडियावर आपले विचार मांडून परंपरेला मोडण्याचा प्रयत्न केलाय.

आपल्या संस्कृतीच्या विरोधात तरुणांच्या मेंदूला दुषित करण्याच काम राजरोस करताय. तुम्हा सगळ्यांना अय्यपांचा राग लक्षात ठेवला पाहिजे. इतक्या वर्षानंतर आलेला महाप्रलयही लक्षात असू द्या. खरंच मी खूप टेंशनमधे आहे. कारण तुम्हीही या ढोंगी स्त्रीवाद्यांच्या सुरात सूर मिसळलाय. तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती.

आपला नम्र,
नाराज पप्पा

.................

प्रिय नाराज पप्पा,

पत्र लिहून तुम्ही तुमची नाराजी कळवली. त्यासाठी खरंच आभार. संवादातून या जगाला आपण एक चांगली राहण्यालायक जागा बनवू शकू. आपण नेहमी एकमेकांशी सहमत असूच असं नाही. पण दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेवू शकलो आणि संकुचित न होता त्यावर विचार करू शकलो, तर आपलं जग नक्कीच सुंदर बनेल. आणि यावर माझा विश्वास आहे.

पहिली गोष्ट, तुमच्या मुलीच्या मासिक पाळीबद्दल. दुसऱ्या कोणाशी बोलण्याआधी तुमच्या मुलीची परवानगी घेतलीय ना? मुलांना त्यांच्या शरीराबद्दल पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्यांचं ते स्वातंत्र्य कुणीच हिरावून घेऊ नये. तुम्ही त्यांचे आईवडील आहात की नाही याने कुठलाच फरक पडत नाही. हे माहीत असायला हवं की मासिक पाळीबद्दल तुमची मुलगीच फक्त सार्वजनिक ठिकाणी यावर बोलू शकते. दुसऱ्यांना हा अधिकार नाही.

दुसरं, मला आनंद आहे की तुम्ही तुमचं माझ्या विरोधातलं मतं मांडलात. मुळात देवाचा लैंगिक समानतेवर विश्वास असणारच, असं माझं मत आहे आणि ते कायम राहील. 

मासिक पाळी हा काही कोणता आजार नाहीय. बाईला मासिक पाळी येणं, हा तिच्या शरीराचाच एक भाग आहे. जसं पुरूषांचे शुक्राणू बनतात, अगदी तसाचं. पुरूषांनी काही काळासाठी हस्तमैथुन केलं नाही तर, शुक्राणू नाइटफॉलच्या रूपात बाहेर फेकले जातात. अगदी तशीच महिलांची मासिक पाळी असते. शरीरातून बाहेर फेकले जाणारे  पाण्यासारखे द्रवपदार्थ असतात, हे स्त्रीपुरूषांच्या लिंगावाटेच बाहेर पडतात. निसर्गानेच हे चक्र बनवलंय. त्यामुळे कोणत्याही एका जेंडरकडे कुत्सितपणे पाहण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिलाय?

तुम्ही बोलू शकता की ही इतक्या वर्षांची परंपरा आहे. पण काळानुसार परंपरा बदलत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मासिक पाळी आलेल्या महिलेला बहिष्कृत करण्यासाठीच परंपरांना पुढे करण्यात आलंय. मुळात परंपरा या सगळ्यांच्या मुक्त प्रवेशासाठी असल्या पाहिजेत.

भगवान अय्यप्पा हे ब्रम्हचारी आहेत, असं तुम्ही मानता. आणि मी ते समजू शकतो. पण तुमच्या मुलीची मासिक पाळी ही अय्यप्पाच्या ब्रम्हचर्याला कशी काय भ्रष्ट करू शकते? देव हा सगळ्यांनाच आत येण्याची परवानगी देतो, असं तुम्हाला का वाटत नाही? मासिक पाळी आलेल्या बायकांचंच त्याला का टेंशन येईल? देव हा काम आणि राग यापासूनच्या सगळ्या इच्छांच्या वर नाहीय का?

आता केरळमधे आलेल्या पुराविषयी. खरं तर मला हा शब्द तुमच्यासाठी वापरायला नकोय. पण हे तुमचं बोलणं बेजबाबदारीचं लक्षण आहे. कोणतीही दुर्घटना ही सर्व जेंडरना समान वागणूक मिळतेय म्हणून होऊ शकत नाही. प्रत्येकाबाबत प्रेम, आदर आणि आपुलकी असेल तर सगळ्यांचं चांगलचं होईल. महापुरासारख्या घटना रोखायच्या असतील तर आधी जंगलं सुरक्षित ठेवायला हवीत. दिवसेंदिवस हिरवाई नष्ट होतेय. त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.

मी तुमच्या मुलीसोबत आहे. त्यासाठी भगवान अय्यप्पांचा एक अनुयायी गमावणं, मला मंजूर आहे. हसाल अशी अपेक्षा करतो.

आपलाच,

रेनबोमॅन

ता.क. शेवटची गोष्ट तुम्ही मला अजून अनफ्रेंड केलं नाहीत? त्यासाठी राहुकाल हा चांगला मुहूर्त आहे. 

हेही वाचाः 

मासिक पाळीविषयी आपल्या मुलामुलींशी कसं बोलायचं?

मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?

महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष

राधिका सुभेदार सांगत्येय, मासिक पाळीविषयी गुप्तता नको स्वच्छता बाळगा

(याचा हिंदीतून मराठी अनुवाद अक्षय शारदा शरद यांनी केलाय. )