तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?

०६ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


आपण कोरोनाविषयी खूपच चर्चा करतो आहोत. पण आता त्यातली बहुतांश चर्चा तबलीगच्या दिल्लीमधल्या कार्यक्रमाजवळ येऊन थांबतेय. विशेषतः सोशल मीडियावरची चर्चा. मात्र यातून आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्यात तबलीगविषयी खूप प्रश्न उभे राहिलेत. म्हणून आपल्यालाच आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून त्याची उत्तरं शोधून काढावी लागतील. त्यासाठीचा एक प्रयत्न.

सोशल मीडियावर तबलीगी जमातच्या मरकजची चर्चा सुरू आहे. त्यातून अनेक समज गैरसमज निर्माण झालेत. त्यामुळे प्रश्नही उभे राहिलेत. त्यासाठी सोशल मीडियातून आलेल्या माहितीची शहानिशा करण्याऐवजी आपण त्यावर आपला मोकळाढाकळा विश्वास ठेवतो. म्हणून त्याचं वायरल सत्य असत्य शोधणं गरजेचं आहे.

१. तबलीगमुळेच भारतात कोरोना पोचला का?

सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलने तबलीगची इतकी चर्चा केली की आपल्याला असं वाटायला लागलं की भारतात कोरोना तबलीगमुळेच पोचलाय. पण तसं नाही. तबलीगचा कार्यक्रम झाला तो मार्च महिन्यात आणि भारतात त्याआधी दीड महिना ३० जानेवारीलाच कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला. केरळमधे त्याच्यावर उपचार झाले आणि तो बरा होऊन घरीही गेला.

चीनमधून मायदेशी आलेल्या विद्यार्थ्याच्या आगमनानंच भारतात कोरोनाचं आगमन झालं. गेल्या दोन महिन्यात देशभरात कोरोनाचे तीन हजार रूग्ण सापडलेत. त्यात जवळपास ६५० तबलीगी जमातशी संबंधित आहेत. म्हणजेच त्यांची संख्या मोठी आहे. त्याचवेळेस आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की सुमारे तेवीसशे रूग्णांचा जमातशी संबंध नाही. एखाददुसरा अपवाद वगळता त्यांचे स्वतःचे परदेशी संसर्गाचे धागेदोरे सापडलेत.

हेही वाचाः दिल्लीच्या तबलीगी प्रकरणात नेमकं खरं काय आणि खोटं काय?

२. लॉकडाऊन असताना तबलीगी जमातनं कार्यक्रम का आयोजित केला?

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट केलंय. त्यानुसार तबलीगी जमातनं अगोदर महाराष्ट्रातचं असा कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. त्याला परवानगीही मिळाली. पण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी ही परवानगी नाकारली.

घटनेचं गांभीर्य ओळखून महाराष्ट्र सरकारनं परवानगी नाकारल्यावर तबलीगी जमातनं दिल्लीत हा कार्यक्रम घेतला. महाराष्ट्रानं परवानगी नाकारल्यावर तबलीगी जमातला परिस्थितीचं गांभीर्य कळायला हवं होतं. पण त्यांनी बेजबाबदारपणा केलाच.

अर्थात १३ ते १६ मार्च या काळात हा कार्यक्रम झाला. तेव्हा लॉकडाऊन सुरू झालं नव्हतं. जनता कर्फ्यूही झाला नव्हता. उलट १३ तारखेलाच आपल्या केंद्रीय आरोग्य खात्यानं कोरोनामुळे आरोग्य आणीबाणीसारखीही कुठली बिकट परिस्थिती नसल्याचं सांगितलं. त्यामुळं इतरही मशिदी, चर्च, देवळं, जत्रा, सत्संग असे सर्वधर्मीय धार्मिक कार्यक्रम सुरू होते. पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केली ती २४ मार्चला. तबलीगचा कार्यक्रम त्याच्या आधी झालाय.

हेही वाचाः आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

३. मग सरकारनं असा कार्यक्रम होऊ का दिला?

तबलीगी जमातला कोरोनाचं गांभीर्य कळलं नाही. पण स्वतःची प्रचंड यंत्रणा असलेल्या सरकारला याचा धोका माहीत होता. असं असतानाही दिल्ली आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांना या कार्यक्रमाला परवानगी दिली. दिल्लीतल्या पोलिसांवर राज्य सरकार म्हणजे केजरीवालांची ऑर्डर चालत नाहीत. देशाच्या राजधानीत दिल्ली पोलिसांचा कंट्रोल केंद्रीय गृहखातं म्हणजे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मरकज बिल्डिंगमधे म्हणजे तबलीग जमातच्या मुख्यालयात हा कार्यक्रम झाला, त्याची एक भिंत पोलिस स्टेशनला लागून आहे. तबलीगी जमातचं आंतरराष्ट्रीय मुख्यालय असलेल्या या बिल्डिंगमधे रोजच परदेशी नागरिकांची येजा सुरू असते. पोलिसांच्या सहकार्याशिवाय जमातचं पानही हलू शकत नाही. तरीही ३० मार्चला मीडियात बातम्या येईपर्यंत पोलिस, सरकार चिडीचूप होतं.

आपचे आमदार अमानुल्ला खान यांनी ट्विट करून सांगितलंय की त्यांनी मरकजच्या कार्यक्रमात लोकांची गर्दी होत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आणून दिलं होतं. पोलिसांनी त्याची वेळीच दखल घेतली असती तर पुढचा प्रादुर्भाव रोखता आला असता.

हेही वाचाः भारतीय मुसलमानांना बदलवण्याचं तबलीगचं पॉलिटिक्स काय?

४. तबलीगचा कार्यक्रम हा भारतात कोरोना पसरवण्याचा कट आहे का?

धर्ममेळा घेण्यामागं तबलीगी जमातचा भारतात कोरोना पसरवण्याचा कट असल्याचे मेसेज सोशल मीडियावर जोरात सुरू आहेत. आता घराघरातही कोरोना कटाविषयी चर्चा रंगू लागलीय. पण फक्त भारतातच नाही, तर अनेक इस्लामी देशांतही तबलीगच्या बेजबाबदारपणामुळे गोंधळ घातलाय. तिथली लागण आपल्यापेक्षा जास्त आहे.

पाकिस्तानात डॉन नावाचं आघाडीचं वृत्तपत्र आहे. डॉनमधल्या एका बातमीनुसार, तबलीगी जमातमुळे पाकिस्तानातही कोरोनाचं संक्रमण झालंय. दुसरीकडे मुस्लिमबहुल मलेशियातही तबलीगचा कार्यक्रम होता. यात सहभागी झालेल्या काहींनाही कोरोनाची लागण झालीय. मलेशियात कोरोनाचे जेवढे रूग्ण सापडलेत त्यापैकी दोनतृतीयांश हे तबलीगच्या कार्यक्रमात सहभागी झालेले लोक आहेत, अशी बातमी अल जझीरानं दिलीय.

पोटात कोरोना वायरस घेऊन फिरणं म्हणजे मृत्यू सोबत नेण्यासारखं आहे. सुसाईड बॉम्बरसारखं इथं काही टार्गेट धरून नेम धरता येत नाही. असं करणारा स्वतः तर मरतोच. त्याच्या कॉण्टॅक्टमधल्या लोकांनाही मरण हातात घेऊन फिरावं लागतं. आणि लोकांचं घराबाहेर पडणं बऱ्यापैकी थांबल्यावर असा कुठला कट करणं हे निव्वळ स्वतः मरण्यापुरतंच मर्यादित राहतं.

हेही वाचाः आपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया

५. मग परदेशी धर्मप्रचारक या कार्यक्रमाला कसे आले? त्यांच्यामुळं काय धोका निर्माण झाला?

तबलीगी जमातमधे मोठ्या संख्येने परदेशी धर्मप्रचारक आले होते. हे सारेजण पर्यटक विसा घेऊन भारतात आले. पण इथं येऊन ते बेकायदेशीरपणे धार्मिक कार्यात सहभागी झाले. अशा ९६० जणांची नावं ब्लॅकलिस्टमधे टाकण्यात आलीत. तसंच त्यांचा विसाही रद्द करण्यात आल्याचं गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून सांगितलंय. तसंच या सगळ्यांवर आता सरकार कायदेशीर कारवाईही करणार आहे.

इकॉनॉमिक टाइम्सनं २ एप्रिलला गृहखात्याच्या अधिकाऱ्याच्या हवाल्यानं बातमी दिलीय. त्यानुसार, ९६० परदेशी नागरिकांनी जमातमधे सहभाग घेतला. यामधे ३७९ इंडोनेशिया, ११० बांगलादेश, ७७ किर्गिस्तान, ७५ मलेशिया, ६५ थायलंड, ६३ म्यानमार, ३३ श्रीलंका, १२ विएतनाम, ९ ब्रिटन, ९ सौदी, ६ चीन, ४ अमेरिका आणि ३ फ्रान्सच्या नागरिकांचा समावेश आहे.

कोरोना वायरस परदेशातून भारतात आलाय. त्यामुळे तबलीगी कार्यक्रम भारतातल्या मुस्लिमांपुरताच मर्यादित असता तर त्याचा एवढा धोका निर्माण झाला नसता. परदेशी धर्मप्रचारक आल्यानं भारतातला सध्याचा कोरोनाचा धोका वाढला. त्यांनी देशभर फिरूनही आपल्याच धर्माच्या लोकांमधे कोरोना पसरवण्याचा अधर्म केला. पण एवढ्या मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक बेकायदेशीरपणे धार्मिक काम करत असताना पोलिसांनी वेळीच कारवाई करायला हवी होती.

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

६. तबलीगच्या कार्यक्रमातून देशभरात गेलेल्या लोकांमुळे कोरोनाचा धोका आहे का?

तबलीगी जमातमधे सहभागी झालेले हे धर्म प्रचारक दिल्लीतला कार्यक्रम झाल्यावर देशभर फिरत राहिले. आपल्या महाराष्ट्रात जमातला गेलेले १५४ जण आढळलेत. जवळपास सगळ्यांचा सरकारी यंत्रणेने ठावठिकाणा लावलाय. त्यांच्यापैकी अनेकांना क्वारंटाईन केलंय. त्यापैकी काही जणांचे रिपोर्ट पॉझिटिव आलेत. तर काही जण मेलेतसुद्धा.

ज्या राज्य सरकारांनी तबलीगचं गांभीर्य ओळखून वेळीच नियंत्रण केलं, तिथे त्याचा कोरोनाचा प्रसार थांबला. उदाहरणार्थ मकरजमधले सर्वाधिक सहभागी प्रचारक हे तामिळनाडूमधून आले होते. तरीही तिथे त्याचे दुष्परिणाम जाणवले नाही. याउलट दुर्लक्ष करणाऱ्या तेलंगणात त्याचे दुष्परिणाम सर्वाधिक जाणवत आहेत.

७. तबलीगचे लोक मशि‍दींमधे लपून का राहत आहेत?

हा तबलीगच्या लोकांचा सगळ्यात मोठा वेडेपणा आहे. त्यांनी स्वतःहून सरकारी यंत्रणांशी संपर्क साधायला हवा. पण तसं क्वचितच झालंय. उलट महाराष्ट्रातच श्रीगोंदा, निलंगा, आणि चंद्रपूरसारख्या ठिकाणी तबलीगचे प्रचारक मशि‍दींत लपून बसलेले आढळले. त्यातले काहीजण परदेशी प्रचारकही आहेत.

त्यांनी स्वतःहून सरकारला माहितीही द्यायला हवी होती. शिवाय अनुयायांना वेळीच पोलिसांना सहकार्य देण्याचं आवाहनही करायला हवं होतं. पण तसं झालं नाही. झालं असलं तरी तोंडदेखलं झालेलं आहे. त्यामुळे तबलीगविषयी गैरसमज वाढत गेले. या प्रकरणाला धार्मिक रंग देणं सोशल मीडियामधल्या विघ्नसंतोषी लोकांना सोपं गेलं. त्या सगळ्याचा दोष निश्चितपणे तबलीगवर येतो.

हेही वाचाः पीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला?

८. तबलीगी संघटना सरकार आणि डॉक्टरांशी सहकार्य करत नाही का?

तबलीगी जमातवर सुरवातीपासूनच सरकारी यंत्रणेशी असहकार्य करण्याचे आरोप होताहेत. मुळात महाराष्ट्रानं कोरोनाचं कारण देऊन परवानगी नाकारल्यावरच जमातनं परत दिल्लीत जाऊन कार्यक्रम घेणं हे एक प्रकारचं असहकार्यच आहे. असहकार्याची ही प्रकरणं मोठ्या प्रमाणात दिल्ली, उत्तर प्रदेश इथून समोर येत आहेत. या सगळ्या गोष्टी सध्या चौकशीच्या कक्षेत आहेत. काहींचं सत्य समोर आलंय.

बीबीसीच्या एका बातमीनुसार, तबलीगी जमातशी संबंधित प्रकरणात चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर बिहारमधे दगडफेकीची घटना घडली. २ एप्रिलला हा सारा प्रकार घडला. मध्य प्रदेशातल्या इंदूरमधेही असाच प्रकार घडला. तिथे एका मौलवीने पोलिसांना आपल्या मोहल्ल्यात शिरू दिलं नाही. पण बिहारमधल्या प्रकरणाचा थेट संबंध तबलीगशी आहे, तसा इंदूरच्या प्रकरणाचा नाही.

हेही वाचाः कोरोनाः जग सारे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?

९. तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचं षड्यंत्र केल्याचा दावा करणारे अनेक वीडियो सध्या सोशल मीडियावर आहेत, त्यांचं काय?

तबलीग षडयंत्र करत असल्याचे दावे प्रामुख्याने वीडियोंवरच आधारित आहेत. आपल्यापैकी अनेकांच्या मोबाईलमधेही हे विडिओ येऊन पोचलेत. अनेकांनी ते फॉरवर्डही केलेत. आता सर्वच टीवी चॅनल आणि वेबसाईटने यापैकी बहुसंख्य वीडियो जुने असल्याचं उघड केलंय. म्हणजेच आपल्या मोबाईलमधे शिरलेले जवळपास पाच विडिओ तर फेकन्यूजचा भाग असल्याचं सिद्ध झालंय.

  • एक वीडियो फळविक्रेत्याचा आहे. तो प्रत्येक फळावर थुंकताना दिसतोय. तसाच आणखी एक वीडियो आहे. त्यात टोपी घातलेला एक तरुण एका चमच्यात भाजी घालून त्यात थुंकताना दिसतोय. मुळात हे दोन्ही वीडियो कोरोना येण्याच्या आधीचे आहेत. चमच्याचा वीडियो तर २०१८चा आहे. ती मुस्लिमांच्या काही समुदायांमधली एक अंधश्रद्धा आहे. कोणतंही खाणं देताना त्यावर फूंक मारून दिलं जातं. त्याला दम भरणं असं म्हणतात. अर्थात असं करणं आरोग्याच्या दृष्टीने चुकीचंच आहे. पण त्याचा कोरोनाशी संबंध नाही.
  • दुसरा वीडियो मशिदीत थुंकण्याचं प्रशिक्षण देण्याचा आहे. हा वीडियो पाकिस्तानचा आहे. एक प्रकारचा श्वासोच्छवास घेत देवाचं नाव घेण्याची ती सुफी पद्धत आहे. ती विचित्र वाटतेय, पण तसं आहे खरं. हा वीडियोही कोरोनापेक्षा फार फार जुना आहे. विशेष म्हणजे सुफी आणि तबलीगींमधे विस्तव जात नाही. तबलीगी अशा प्रथांना विरोध करतात.
  • तिसरा वीडियो लहान मुलं थाळ्या चाटत असतानाचा आहे. ही बोहरा मुलं आहेत. बोहरांचंही तबलीगींशी जमत नाही. हा वीडियोही जुना आहे. अन्नाचा एक कणही वाया जाऊ नये म्हणून असा प्रकार केला जातो. पण तोही आरोग्याच्या दृष्टीने चुकीचाच मानायला हवा. पण त्याचाही कोरोनाशी संबंध नाही कारण हा वीडियोही २०१८चा आहे.
  • चौथा सर्वात गाजलेला वीडियो पोलिसांवर थुंकण्याचा आहे. याचा तर कोरोनाशी काहीच संबंध नाही. तो कोरोनाचा रुग्ण असल्याचा दावा केला जातो. पण तो मुंबईतला स्थानिक गुन्हेगार आहे. त्याला पकडून नेताना पोलिसांवर थुंकला होता. हा वीडियो मुंबई मिररने फेब्रुवारी महिन्यात अपलोड केलेला दिसतो.
  • शिवाय आयसोलेशनमधले जमातमधले रूग्ण नागडे फिरत असल्याच्या बातम्या वायरल झाल्यात. गाझियाबाद, कानपूरमधून अशा बातम्या आल्यात. यूपीतल्या आरोग्य अधिकाऱ्यानं आरोप केला की, ‘नर्सनी आपल्याला लिखित स्वरुपात अशी तक्रार केलीय. जमातमधे सहभागी रूग्ण दवाखान्यातल्या वार्डमधे नागडं फिरत आहेत. वॉर्डमधे अश्लील गाणे ऐकतात. नर्सकडे बघून चाळे करतात. तसंच स्टाफ नर्स आणि कर्मचाऱ्यांकडे बीडी, सिगारेटची मागणी करतात.’ या प्रकरणात सहा जणांवर यूपी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घातलंय.

जसं वरच्या सगळ्या प्रकरणांचे विडिओ आहेत, तसं याचा विडिओ नाही. पॉर्न फिल्मची लत लागलेले काही विकृत सोशल मीडिया वॉरिअर्स विडिओ द्या, विडिओ अशी मागणी करताहेत. पोलिसांच्या या एफआयआरनं प्रकरणाला नवं वळण मिळालंय. आता चौकशीतून पुढं काय येतं हे बघावं लागेल.

हेही वाचाः लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी

परदेशी धर्मप्रचारकांना चिकन, बिर्याणी हवी होती?

हिंदी पेपर, न्यूज चॅनलमधे ५ एप्रिलला यूपीतल्या सहारनपूरची एक बातमी आली. इथल्या जैन इंटर कॉलेजमधे क्वारंटाईन करण्यात आलेल्या ५८ परदेशी धर्मगुरूंनी जेवणात बिर्याणी, चिकनची मागणी केली. साधं जेवण नाकारलं. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडालीय. अधिकारी परेशान झालेत. एवढंच नाही तर या लोकांनी उघड्यावर संडास केलीय, असा दावा करणारी ही बातमी आहे. या बातमीत कुठल्याही अधिकाऱ्याची प्रतिक्रिया नव्हती.

पण दुपारी ४ वाजता सहारनपूर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एका प्रश्नाला रिप्लाय देण्यात आला. तो प्रश्न होता - बिर्याणीच्या मागणीची मीडियात देत असलेली बातमी खरी आहे का? आणि पोलिसांनी उत्तर दिलं – आमच्या ठाणेदारांनी चौकशी केली असता असा अशी कुठली घटनाच घडली नाही. वेगवेगळी वृत्तपत्रं, न्यूजचॅनल आणि सोशल मीडियातली ही बातमी सपशेल खोटी आहे.

आता पोलिसांनीच ही बातमी फेक न्यूज असल्याचं सांगितलं. त्यामुळे जवळपास सगळ्याच न्यूज वेबसाईट्सनी ही बातमी डिलिट केलीय. आता इंटरनेटवर अशी कुठली बातमी सापडत नाही. पण वृत्तपत्रांच्या ईपेपरमधे त्याचे पुरावे सापडतात.

विशेषतः निवडणुकीच्या काळात असे जुने वीडियो वापरून दुष्प्रचार केला जातो. एखाद्या समाजाला, धार्मिक गटाला, राजकीय पक्षाला बदनाम केलं जातं. तसाच अत्यंत खोटा आणि कलुषित प्रचार या वीडियोंमधून चाललाय. त्याचा बनावटपणा आता कुठे हळूहळू उघड होऊ लागलाय.

हेही वाचाः 

कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

संजय राऊत लिहितातः कोरोना हा निसर्गाने देवधर्माचा केलेला पराभव

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोतः युवाल नोवा हरारी

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

कोरोनानं कांद्याचा बाजार बंद झाला, मग शेअर बाजार बंद का होत नाही?