तैवान कोरोना डायरी ३ : भीतीच्या सावटातही शिस्त विस्कटली नाही

२९ मार्च २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


नेहमी हसतमुख असणाऱ्या एलनने मला टेन्शनमधेच धक्कादायक बातमी दिली. फिलीपाईन्समधे कोरोनामुळे एक पेशंट दगावला होता. त्यानंतर भीतीची एक लकेर माझ्याही मनात पसरली. मी लगेचच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. कोरोनाशी लढणाऱ्या तैवानमधल्या आठवणी सांगत आहेत डॉ. कैलाश जवादे.

सोमवारी १० फेब्रुवारी २०२० मी सकाळी सात वाजता तयार झालो. नेहमीप्रमाणे आजही सकाळी लिवर ट्रान्सप्लांट मीटिंग होती. फेलोशिपच्या काळातही दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत लिवर ट्रान्सप्लांटमधे काम करणाऱ्या वेगवेगळ्या विभागातल्या तज्ञांशी बैठक असायची. आठवडाभरात करायच्या ट्रान्सप्लांटच्या ३ ते ४ केसेस विषयीची चर्चा सोमवारी केली जायची. तर तपासणी चालू असलेल्या रुग्णांबाबतची चर्चा गुरुवारच्या मीटिंगमधे करायचो.

खूप कामं बाकी होती

या मीटिंगमुळे सर्वांना केसेसबद्दल माहिती मिळायची. त्यानुसार प्रत्येक जण तयार राहायचा. यशस्वी प्रत्यारोपण कार्यक्रम बनवण्यात या मीटिंगचा सिंहाचा वाटा होता. १५ वर्षापासून ही मीटिंग नियमितपणे केली जायची. मीटिंगमधे सादर केलेल्या सगळ्या केसचे रेकॉर्ड आजही विभागात उपलब्ध आहेत. खरोखरच तैवानमधल्या सगळ्यांकडूनच खूप काही शिकण्यासारखं आहे.

मला डीवाय पाटील हॉस्पिटलमधे ट्रान्सप्लांट सेंटर चालू करायचंय. त्यासाठी फेलोशिपमधे शिकलेल्या गोष्टींची उजळणी करणं आवश्यक होतं. त्याशिवाय मला भारतातल्या विद्यार्थ्यांना सहजपणे तैवानला येता यावं यासाठी दोन्ही संस्थांच्या मदतीनं प्रशिक्षण कार्यक्रम अर्थात फेलोशिप प्रोग्राम चालू करायचाय. ही सगळी कामं करण्यासाठी मी तैवानला आलो होतो. ही सर्व कामं मला या काळात करायची होती. गरज पडल्यास पंधरा दिवस थांबायचं. पण आवश्यक सगळ्या बाबींची पूर्तता करायची असं मी ठरवलं होतं.

हेही वाचा : कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

कोरोनाच्या तणावातही शिस्त सोडली नाही

नेहमीप्रमाणे मीटिंग पार पडली. तीनपैकी एका पेशंटमधे टीबीसाठीची एक तपासणी पॉझिटिव आल्यानं ट्रान्सप्लांट पुढं ढकलण्यात आलं. त्यामुळे या आठवड्यात फक्त दोनच केसेस होणार असल्याचं कळालं. माझ्यासोबत इतर सहाजण ऑपरेशन बघण्यासाठी थांबले होते. मीटिंगनंतर नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ट्रान्सप्लांटसाठी वाट बघणाऱ्या रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात म्हणजेच ओपीडीत तपासणी होणार होती. दुपारच्या सत्रात ट्रान्सप्लांट झालेल्यांची तपासणी होणार होती.

माझे मित्र डॉ याँग यांना मी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओपीडीत काय काळजी घेतली जाते, याबाबत विचारलं. त्यांनी सांगितलं की ओपीडीमधे आजही नेहमीप्रमाणे तीनशे पेशंटची तपासणी केली जाणार आहे. पेशंटना अपॉइंटमेंटची वेळ दिली होती. वेळापूर्वी दहा मिनिट अगोदर त्यांना येण्यास सांगण्यात आलं होतं. बाहेर गर्दी होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. सगळ्यांना मास्क वापरणं बंधनकारक होतं. येणाऱ्या प्रत्येकाचंच थर्मल स्कॅनिंग केली. कोरोनाच्या सावटाखाली शिस्त आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून पेशंटना सेवा देण्याचं कामही चालू होतं.

कोरोना मृत्यूची बातमी आली

दुपारी ओपीडी संपल्यावर मी परत अकराव्या मजल्यावरच्या यकृत प्रत्यारोपण विभागात गेलो. बहुतांश जुनेच कर्मचारी तिथं होते. आमच्या बसायच्या जागा नवीन फेलोना देण्यात आल्या होत्या. डॉ एलन तिथं होता. ते नेहमीच हसतमुख राहणारे. तो इथला सर्वात जुना फेलो. त्यामुळे त्याला तिथल्या सगळ्या गोष्टींची माहिती असायची. तरीही त्याच्या चेहऱ्यावर तणाव जाणवत होता. मी त्याला त्याविषयी विचारलं असता मला त्याच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली.

फिलिपाईन्समधे कोरोनामुळे पहिला रुग्ण दगावला होता आणि त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालं होतं. त्यांनी चीनमार्गे आणि चीनमधून येणाऱ्या सगळ्या विमानांना बंदी घातली. अचानक झालेल्या या निर्णयामुळे डॉक्टर एलनला आता फिलिपाईन्सला जाता येणार नव्हतं आणि त्यामुळे तो टेन्शनमधे होता.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

भीती वाढत चालली होती

कोरोनाबाबत जागतिक पातळीवर नेमके कुठे किती रुग्ण आहेत? त्यातल्या किती जणांची परिस्थिती गंभीर आहे? किती मरण पावलेत? याची माहिती असणाऱ्या वर्ल्ड मीटर या मोबाईल अॅपबद्दल त्यानं मला सांगितलं. जगभरात त्यावेळेस ४३ हजार रुग्णांना कोरोना वायरसचा संसर्ग झाला होत. त्यातले बहुतांश चीनमधील लोक होते.

भारतात तिघांना तर तैवानमधे ११ जणांना लागण झालेली होती. फिलिपाईन्समधे एक रुग्ण दगावल्यानं हालचालींना जोरदार वेग आला होता. हे सगळे चालू असताना माझ्या मनात भीती निर्माण झाली. शक्य तितक्या लवकर आपणही मायदेशी परत जायचं मी ठरवलं.

त्यादिवशी डॉर्मेटरीत परत आल्यानंतर माझ्या बायकोला फोन करून माझ्या परतीच्या तिकीटाची तारीख बदलून घ्यायला सांगितली. थाई स्माईल या कंपनीचं ऑनलाइन तिकीट मी काढलं होतं. ऑनलाइन पद्धतीमुळे तिकीट काढताना कोणताही त्रास झाला नाही. पण तारीख बदलताना भाषेचा अडसर येत होता. शेवटी ‘मेक माय ट्रिप’च्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि भुर्दंड भरून तारीख बदलून मिळाली.

मलाही अशीच टीम उभी करायचीय

१४ फेब्रुवारीला परत जायचं ठरल्यानं वेळ कमी होता. त्यातले दोन दिवस ऑपरेशन बघण्यात गेले. ऑपरेशनच्या पद्धतीमधे अगदी थोडाफार फरक होता. दहा वर्षानंतरही पूर्वी इतकेच लोक त्याच पद्धतीने ऑपरेशनमधलं आपापलं काम करायचे आणि सगळं कसं शांततेत चालायचं. तेच तेच काम करण्याचा त्यांना कंटाळा आला असावा असं वाटत नव्हतं.

भारतात ज्युनियर डॉक्टरांना लवकरात लवकर सगळं शिकून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची घाई असते. त्यात चूक काहीच नाही. पण टीममधे टिकून काम केलं तर एक यशस्वी कार्यक्रम उभा केला जाऊ शकतो, असं मला वाटतं. टीमवर्क ही तैवानमधली प्रत्यारोपण कार्यक्रमाच्या यशाची गुरुकिल्ली होती. त्यांच्या टीमवर्कला सलाम करावा वाटला. आपणही भारतात अशीच टीम उभी करायची, असं मी मनोमन ठरवलं.

हेही वाचा : कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

एकीकडे भीती, दुसरीकडे शुभेच्छा

कोरोना वायरस थंड वातावरणात राहतो. तो गरम वातावरणात टिकत नाही. त्यामुळे भारतात हा वायरस पसरणार नाही, असं तिथले काही फेलो म्हणत होते. ते ऐकून थोडा वेळ मनात समाधान वाटायचं. पण पुन्हा थोड्या वेळानं कोरोनाविषयी मनात नाना विचार येत होते. त्यातच चीनमधे वुहान शहर बंद केलंय. लोकांना घरात कोंडून ठेवलंय. तिथं किती मृत्यू होतायत, यावर झालेल्या चर्चा तसंच मीडियातून मिळालेली माहिती यामुळे भीती खूप वाढत होती.

कधी एकदा आपण घरी पोचतो असं वाटत होतं. तिकडे भारतात माझी बायको आणि मुलं घाबरली होती. मी सुखरूप परत यावं यासाठी प्रार्थना करत होती. बुधवारच्या दिवसात उरलेली काम पूर्ण केली आणि डॉ चेन यांच्याशी थोडं बोलणं केलं. त्यांनी डीवाय पाटील हॉस्पिटल आणि चँग गुंग मेमोरियल हॉस्पिटल प्रत्यारोपण विभाग यांच्यात तयार केलेल्या संमती पत्रकावर सही केली. मला काही प्रोटोकॉल्स हवे होते, तेही दिले. मला चांगला आणि यशस्वी प्रत्यारोपण कार्यक्रम चालू करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मी इतर काही जणांना भेटलो आणि मायदेशी परतण्याच्या तयारीला लागलो.

मी रेड झोनमधे होतो

१४ तारखेला परत निघालो तेव्हा कधी एकदा मी घरी पोचतो असं झालं होतं. तैवानच्या वास्तव्यात मी तब्येतीची विशेष काळजी घेतली होती. नेहमी मास्क घालायचो. कामाव्यतिरिक्त कुठंही बाहेर गेलो नाही. थोडक्यात विलगीकरणाचा अनुभव जगलो होतो. पण तरीही भारतात परतल्यावर मला काय करावं लागेल? तैवान वेगळं राष्ट्र असलं तरी जागतिक आरोग्य संघटना त्याला चीनचा भाग मानत असल्यानं तैवान रेड झोनमधे येत होता. 

भारत सरकारनं काही निर्बंध लावले किंवा विलगीकरण करायचं ठरवलं तर काय होईल? प्रवासात मोठ्या प्रमाणात वायरसची लागण होते, पॅनडेमिक या हॉलिवूड सिनेमात दाखवल्याप्रमाणे एक सहप्रवासी बाधित असेल तर इतरांनाही तो बाधित करू शकतो? आपल्याला अशी बाधा तर होणार नाही ना? असे अनेक विचार मनात येत होते.

कोरोनाची भीषणता मनात साठली 

कॅउशुंग एअरपोर्टवर पहिल्यासारखीच परिस्थिती होती. एकूणएक लोकांच्या चेहऱ्यावर मास्क होते. सारखी अनाउन्समेंट चालू होती. बँकॉकमधे आल्यावर थोडं समाधान वाटलं. तिथं मला ५ तास घालवायचे होते. बँकॉक एअरपोर्टवर विनाकारण फिरून स्वतःला एक्सपोज करण्यापेक्षा मी एका निवांत जागी बसून राहिलो. रात्री दहाला बँकॉकवरून आमच्या विमानाने भारताकडे झेप घेतली. माझ्यासोबत अनेक भारतीय विमानात होते. त्यामुळे थोडं बरं वाटलं.

रात्री दीडच्या सुमारास मी मुंबईत पोचलो विमानतळावर सगळ्यांचं स्कॅनिंग चालू होतं. विलगीकरणाबाबत अद्याप काही सूचना नव्हत्या. त्यामुळे मनात समाधान होतं. केरळमधे कोरोनाच्या वायरसने धडक दिली होती. चीनमधे थैमान घातलेल्या आणि संपूर्ण चीनला आपल्या विळख्यात घेणाऱ्या वायरसची भीषणता या तैवान दौऱ्यात मनात ठसली होती.

हेही वाचा : 

जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय