पीएस विनोदराज: बालमजुरी ते ऑस्करपर्यंतचा प्रवास

२४ डिसेंबर २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


तमिळ दिग्दर्शक पीएस विनोदराज यांचा कुळांगल हा पहिलाच सिनेमा थेट ऑस्करवारीपर्यंत पोचला. ३३ वर्षांच्या विनोदराज यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. हा सिनेमा म्हणजे त्याच्या लहान बहिणीच्या आयुष्याची चित्तरकथा. पण त्याचवेळी तो आजूबाजूचं सामाजिक वास्तव मांडतो. विनोदराज यांचं आयुष्यही तसंच होतं. बालमजूर ते दिग्दर्शक आणि थेट ऑस्करपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षानं भरलेला आहे.

तमिळ सिनेसृष्टी हा दक्षिण भारतातला एक मोठा उद्योग आहे. तमिळ सिनेमांमधलं संगीत, तिथलं कल्चर, जबरदस्त स्टारकास्ट, सिनेमाची उत्कृष्ट मांडणी आणि बिग बजेट असं सगळंच इथल्या सिनेमात पहायला मिळतं. तिथल्या कलाकारांना मिळणारं मानधन हा मीडिया, सोशल मीडियाच्या दृष्टीने कायमच चर्चेचा विषय असतो.

जगभरात कॉलीवूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सिनेसृष्टीनं संगीतकार ईलैराजा, ए. आर. रहमान, दिग्दर्शक मणीरत्नम, सुपरस्टार रजनीकांत, कमल हसन, शिवाजी गणेशन, एमजीआर, जोसेफ विजय ही अशी बरीच मोठी नावं भारतीय सिनेसृष्टीला दिली. एमजीआर, करुणानिधी, जयललिता असे तमिळ सिनेमातले चेहरे तमिळनाडूच्या राजकीय पटलावर नेते म्हणून यशस्वी ठरले.

या सिनेसृष्टीतले कलाकार आपल्या ठाम भूमिकांसाठी कायम चर्चेत असतात. ही भूमिका त्यांच्या सिनेमांमधून दिसत राहते. मारी सेल्वराज, पा. रंजिथ, राजू मुरुगन असे तमिळ दिग्दर्शक ही भूमिका ठामपणे मांडतायत. असंच तमिळ सिनेसृष्टीतले एक नवं नाव म्हणजे दिग्दर्शक पीएस विनोदराज. अवघ्या ३३ वर्षांच्या विनोदराज यांच्या सिनेमाला थेट ऑस्करवारी घडलीय.

घरच्या जबाबदारीसाठी बालमजुरी

तमिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातल्या मेलूरच्या खेड्यात विनोदराज यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती फार बेताची होती. वडलांना दारूचं व्यसन होतं. या व्यसनामुळे त्यांच्या वडलांचं निधन झालं. तेव्हा विनोदराज चौथीत होते. वडलांच्या निधनामुळे वयाच्या ९ व्या वर्षी त्यांच्यावर घरची जबाबदारी आल्याचं त्यांनी 'फिल्म कंपॅनियन' या वेबसाईटच्या मुलाखतीत म्हटलंय.

वडील गेले आणि त्यांचं शिक्षण बंद झालं. मदुराईमधे त्यांना फुलं विकावी लागली. त्या पैशातून जे काही मिळायचं त्यातून ते कुटुंबाचं पोट भरायचे. या काळात त्यांनी प्रचंड गरिबी आणि भुकेचे चटके अनुभवले. रोजीरोटीसाठी त्यांना नकळत्या वयात शहरच्या शहरं पालथी घालावी लागली. पुढे तिरुपूर भागात त्यांनी आपलं कुटुंब आणलं. इथल्याच एका कापड कारखान्यात त्यांनी बालमजूर म्हणून काम केलं. इथलं सगळं जग त्यांना हादरवून गेलं.

अगदी लहान वयात त्यांच्या बहिणीचं लग्न झालं होतं. तिच्या नवऱ्याला दारूचं व्यसन होतं. रोज होणारी मारझोड, शारीरिक छळ अशा गोष्टींना कंटाळून ती माहेरी यायची. या सगळ्या गोष्टी विनोदराज यांच्या कानावर पडायच्या. एकदा नवऱ्यानं मारल्यामुळे आपल्या २ वर्षांच्या मुलाला कंबरेवर घेऊन १३ किलोमीटरचं अंतर पायी चालत ती माहेरी आली होती. अशा प्रसंगांमुळे विनोदराज अस्वस्थ व्हायचे.

हेही वाचा: दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो!

डीवीडीच्या दुकानात सिनेमांशी गट्टी

पुढे चेन्नईतल्या एका डीवीडीच्या दुकानात सेल्सपर्सन म्हणून त्यांना काम मिळालं. वेळ मिळेल तसं ते सिनेमा पाहू लागले. हळूहळू त्यांची जागतिक सिनेमाशी ओळख झाली. या डीवीडीच्या दुकानात सिनेमातल्या अनेक कलाकारांचा राबता असायचा. विनोदराज त्यांच्याशी संवाद साधायचे. इथंच त्यांची सिनेमा क्षेत्रातल्या अनेकांशी ओळख झाल्याचं त्यांनी 'फिल्म कंपॅनियन'ला म्हटलंय.

डीवीडीच्या दुकानात त्यांची किशोर नावाच्या मित्राशी खास गट्टी जमली. त्यांना वाचनाची आवडही निर्माण झाली. थोडंफार जमेल तसं शिकलेही. या काळात इराणी सिनेदिग्दर्शक माजिद माजिदी आणि अमेरिकन सिनेदिग्दर्शक स्टॅनले कुब्रिक यांच्या सिनेमांनी त्यांना प्रभावित केलं. त्यांचा सिनेमाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. हळूहळू सिनेमा, शॉर्टफिल्मविषयीचं त्यांचं ज्ञान वाढू लागलं. पुढे किशोर या मित्राला त्यांनी शॉर्टफिल्मसाठी मदत केली.

याच काळात अनेक नव्या लेखकांच्या भेटी होऊ लागल्या. त्यांनीही शॉर्टफिल्म बनवायला सुरवात केली. दुसरीकडे विनोदराज यांच्या निर्मात्यांसोबतच्या ओळखीही वाढत होत्या. २०१४ला तमिळ सिनेदिग्दर्शक ए. सर्गुनम यांनी मंजप्पै फिल्मची निर्मिती केली होती. त्यावेळी विनोदराज त्यांच्या संपर्कात आले. त्यांना काम मिळालं.

४० जणांच्या टीमसोबत सिनेमा

डीवीडीच्या दुकानात काम करताना वाढलेल्या ओळखींचा त्यांना फायदा होऊ लागला. सिनेमेटोग्राफर होणं हे त्यांचं सुरवातीचं स्वप्न होतं. पुढे ए. सर्गुनम यांच्या सिनेमांमधे त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या. सिने निर्माते आणि दिग्दर्शक एन. राघवन यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी कामाला सुरवात केली. तर मनल मागुडी या नाट्यसंस्थेसोबतही त्यांनी दोन नाटकांमधे काम केलं.

याच काळात एका विषयावर स्क्रिप्ट लिहायलाचं काम सुरू झालं. ही स्क्रिप्ट त्यांच्या पुढे येऊ घातलेल्या त्यांच्या पहिल्याच कुळांगल सिनेमाची होती. ती स्क्रिप्ट जगभरात त्यांना ओळख मिळवून देईल असं त्यावेळी त्यांना वाटलंही नसेल. सुप्रसिद्ध तमिळ अभिनेत्री नयनतारा आणि पटकथा, लेखक, दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांनी कुळांगलच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला.

विनोदराज यांच्या जन्मगावाच्या जवळ असलेल्या अरिट्टापट्टी गावात सेट उभारला गेला. २०१९ला कडाक्याच्या उन्हात सिनेमाचं चित्रीकरण चालू झालं. प्रचंड उन्हामुळे कॅमेरेही तापायचे पण सिनेमाचं काम चालू राहिलं असं विनोदराज यांनी पीटीआयच्या एका छोटेखानी मुलाखतीत म्हटलंय. या सिनेमासाठी अवघ्या ४० जणांची टीम काम करत होती. सिनेमाला थिएटरमधे शो मिळाले नाहीच तर तो आपण ज्या गावात शुटींग केली. ज्या मातीची ही गोष्ट आहे तिथंच दाखवू हे त्यांनी मनाशी पक्क केलं होतं.

हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

बहिणीची चित्तरकथा ऑस्करवारीला

पीएस विनोदराज यांनी कुळांगल सिनेमाचं स्वतः दिग्दर्शन केलंय. कुळांगलची ऑक्टोबरमधे १४ भारतीय भाषांमधल्या सिनेमांधून थेट ऑस्करवारीसाठी निवड करण्यात आली होती. सरदार उधम सिंग, मंडेला, गोदावरी, कारखानिसांची वारी, शेरशाह अशा बड्या सिनेमांना त्याने मागे टाकलं होतं. या कुळांगलची कथा पीएस विनोदराज यांच्या बहिणीचं आयुष्य चितारते.

कुळांगलचा अर्थ खडे. यामधे गणपती, त्याचा मुलगा वेलू, बायको शांती अशी मुख्य पात्रं आहेत. गणपती अचानक एकदा काहीतरी शोधत शोधत थेट आपला मुलगा वेलूच्या शाळेत पोचतो. तिथून ते दोघंही शांतीच्या माहेरी जातात. दोघं पोचेपर्यंत शांती माघारी आपल्या घरी आलेली असते. असं एकदाच नाही तर अनेकदा होत राहतं.

गणपतीनं व्यसनाधीन असणं हे शांतीच्या माहेरी जाण्याचं खरं कारण. पण त्यामागे शोषणाचा एक पदर आहे. लक्ष्मी काही पहिल्यांदा माहेरी जात नाही. आणि गणपती आणि वेलूही प्रत्येकवेळी हेच करतात. त्या प्रत्येक फेरीला एकेक खडा वेलू तोंडात ठेवून आणतो आणि घरातल्या एका कोपऱ्यात ठेवतो. तोंडात लाळ तयार होण्यासाठी वेलूला खडा वापरावा लागणं आणि खड्यासारखंचं प्रत्येकवेळी तिच्या आईला बाजूला पडावं लागणं यातून कुळांगलचा खरा अर्थ सापडत जातो.

गणपती, वेलू यांच्या प्रवासा दरम्यान येणाऱ्या छोट्या छोट्या फ्रेम आजूबाजूच्या दुष्काळाची दाहकता दाखवतात. हे सगळं चितारताना कौटुंबिक हिंसाचार, पुरुषप्रधान मानसिकतेतून शांतीचं होणारं शोषण असं सगळं वास्तवही विनोदराज यांनी या सिनेमातून मांडलंय.

कौतुक संघर्ष आणि आडवळणांचं

कुळांगल या पहिल्याच सिनेमानं विनोदराज यांना मोठं यश मिळवून दिलं. कथेतल्या खरेपणामुळे हे शक्य झालं. आपला खरा-खुरा संघर्ष मांडायचं सिनेमा हे माध्यम होतं असं विनोदराज यांना वाटतंय. त्यांच्याकडे बिग बजेट नसेलही पण कथेत खरेपणा होता. त्यांचा संघर्ष, आलेले अनुभव या सगळ्याच्या मुळाशी असल्यामुळे त्यांचा सिनेमा मनाला भिडू शकला.

घरातल्या परिस्थितीमुळे करायला लागलेली बालमजुरी ते ऑस्करवारीपर्यंत पोचलेला दिग्दर्शक हा त्यांचा प्रवास आडवळणांचा राहिला. त्यामुळेच तो साधासोपा नव्हता. त्यात दुःख, वेदना सगळं काही होतं. पण भक्कमपणे पुन्हा उभं राहण्याची इच्छाशक्तीही होती. त्यातही अस्सलपणा होता. तोच त्यांच्या सिनेमाचा विषय बनला. त्यामुळेच विनोदराज यांच्या पहिल्याच सिनेमाची एण्ट्री दणक्यात झाली.

कुळांगलची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय. ऑस्करसोबत जगभरातल्या अनेक फिल्म फेस्टिवलमधे या सिनेमानं आपल्या आशय, विषय आणि मांडणीने छाप पाडली. रॉटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमधे कुळांगलला टायगर अवॉर्ड मिळाला. खरंतर हे यश विनोदराज यांच्या संघर्षाचं आणि आडवळणांच्या प्रवासाचं आहे.

हेही वाचा: 

फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?

सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!