शिवाजी पार्कचा श्रेयस अय्यर तर विराटच्या ‘नक्शे कदम पर’ चाललाय!

२७ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


बऱ्याच गोंधळानंतर फायनली टीम इंडियाला टीमला चौथ्या क्रमांकावर खेळणारा बॅट्समन सापडलाय. मुंबईचा श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी २० मॅचमधे असा काही खेळलाय की त्यानं विराट कोहलीचं टेन्शनच संपवून टाकलंय. विराटसारखाच सावधपणे खेळण्याचा त्याचा पवित्रा चौथ्या नंबरच्या बॅट्समनसाठी एकदम परफेक्ट आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने मायदेशात झालेल्या दोन मालिकेत मिडल ऑर्डरवर खेळणाऱ्या बॅट्समनच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. दरवेळी टॉप आर्डरवरचे बॅट्समन मॅच जिंकून देऊ शकत नाहीत. त्यामुळे मिडल ऑर्डरवरच्या बॅट्समननेही जबाबदारी घ्यावी, असंही त्यानं म्हटलं होतं.

आता ही जबाबदारी श्रेयस अय्यर या खेळाडूनं आपल्या खांद्यावर घेतल्याचं गेल्या दोन मॅचमधून दाखवून दिलंय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी - २० मॅचमधे मिडल ऑर्डर बॅटिंगची धुरा समर्थपणे सांभाळत त्यानं भारताला मॅच जिंकून दिली. त्यामुळे विराटला बऱ्याच शोधानंतर चौथ्या क्रमांकाचा परफेक्ट बॅट्समन सापडलाय.

चौथ्या क्रमांकाची दीर्घ प्रतीक्षा संपली

भारताला युवराज सिंगनंतर चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करत संपूर्ण मॅचवर नियंत्रण मिळवणारा बॅट्समन मिळालाच नव्हता. या क्रमांकावर टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने बऱ्याच जणांना आजमावून बघितलं. पण या क्रमांकावर फार काळ कुणी टिकलं नाही.

२०१९ मधे वर्ल्डकपवेळीही याच चौथ्या क्रमांकाच्या जागेवरुन वाद निर्माण झाला होता. टीम मॅनेजमेंटने त्याआधीचं दीड वर्ष अंबाती रायुडूला या क्रमांकावर संधी दिली होती. पण ऐन वर्ल्डकपच्या तोंडावर त्याला डच्चू देत थ्री डायमेंशनल खेळाडू अशी उपाधी असणाऱ्या विजय शंकरच्या हातात वर्ल्डकपचं तिकीट ठेवलं. यामुळे नाराज झालेल्या अंबाती रायुडूने निवड समितीवर जोरदार टीका केली.

आश्चर्य म्हणजे वर्ल्डकपमधे पहिल्यांदा चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करायची संधी मिळाली ती टीममधे तिसरा सलामीवीर म्हणून आलेल्या लोकेश राहुलला. नंतर शिखर धवनला दुखापत झाल्याने लोकेश राहुलला मॅचची ओपनिंगच करावी लागली हा भाग वेगळा.

हेही वाचाः भारतामुळेच जगभरात मंदी, असं आयएमएफच्या गीता गोपीनाथ का म्हणाल्या?

श्रेयसच्या डोक्यात हवा गेली का?

रायडूबरोबरच श्रेयस अय्यर या तरुण बॅट्समननेही संधी न मिळाल्याने टीम मॅनेजमेंटच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला चौथ्या क्रमांकावर फारशी संधी न देता टीममधून वगळण्यात आलं. त्याच्या म्हणण्याची त्यावेळी फारशी चर्चा झाली नाही. बऱ्याच जणांना श्रेयसच्या डोक्यात दिल्ली डेअर डेविल्सचा सर्वात तरुण कॅप्टन असल्याची हवा गेलीय, असं म्हटलं गेलं. पण, त्याचं उत्तर काळानं दिलंय.

बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय. अवघ्या सहा महिन्यात श्रेयसने आपण म्हणणं पटवून देत मिळालेल्या संधींचं सोनं करण्याचा सपाटाच लावलाय. आता भारताने टी - २० वर्ल्डकपसाठी आपली टीमबांधणी सुरु केलीय. यावेळी विराटने आता नव्या खेळाडूंनी धुरा हातात घेत जबाबदारीने खेळ करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या अपेक्षापूर्तीची सुरवात चौथ्या क्रमांकावर जम बसवत केलीय.

सुरवातीला श्रेयसच्या खेळीत सातत्य नव्हतं. त्याचप्रमाणे तो शेवटपर्यंत खेळून मॅच जिंकून देऊ शकतो का याबाबत शंका उपस्थित होत होती. पण, गेल्या दोन सिरिजमधे टीममधले टॉप ऑर्डरचे खेळाडू लवकर आऊट झाल्यानंतर मॅचची सुत्रं आपल्या हातात घेत त्याने मॅच जिंकून दिलीय. त्यामुळे विराटला हवा असणारा चौथ्या क्रमांकाचा साथीदार मिळाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

हा तर शिवाजी पार्कचा पठ्ठ्या!

श्रेयस अय्यर हा मुंबईचा. हा खडूस बॅट्समन शोधलाय तो प्रविण आमरे यांनी. आमरेंनी टीम इंडियाला अजिंक्य रहाणे, रॉबिन उथप्पा सारखे तगडे बॅट्लमन मिळवून दिले होते. श्रेयस १२ वर्षाचा असतानाच त्यांनी त्याची प्रतिभा ओळखली. श्रेयसचे मित्र त्याची बॅटिंग पाहून सुरवातीला त्याला वीरेंद्र सेहवाग म्हणायचे.

श्रेयसने आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी जास्त वेळ घेतला नाही. पहिल्याच रणजी ट्रॉफी हंगामात म्हणजे २०१४-१५ मधे पदार्पणातच दोन शतकांसह त्याने ८०९ रन्स काढले होते. त्यानंतर २०१५-१६ च्या रणजी हंगामात १३२१ रन्स काढले. एकाच रणजी हंगामात १३०० रन्स काढणारा इतिहासातला तो दुसरा खेळाडू ठरला. यावरुन त्याची रन्सची भूक लक्षात येते. यामुळे त्याच्यासाठी आयपीयएलची दारं उघडली गेली.

आयपीएलमधेही त्याने लगेचच यशाला गवसणी घालण्यास सुरवात केली. पहिल्याच हंगामात त्याने ५०० च्या जवळपास रन्स केल्या. दिल्ली डेअरडेविल्सच्या टीम मॅनेजमेंटचा त्याच्यावर विश्वास वाढत गेल्यामुळेच त्याला त्यांनी रिटेन केलं. २०१८ ला अवघ्या २३ व्या वर्षी तो दिल्ली डेअरडेविल्सचा कॅप्टन झाला. कधीही प्ले ऑफचं तोंड न पाहिलेल्या टीमला तो पहिल्यांदाच प्ले ऑफमधे घेऊन गेला.

हेही वाचाः संविधान निर्मात्यांना माहीत होतं, देशात विध्वंस करू पाहणारी शक्तीही आहे : रघुराम राजन

आंतरराष्ट्रीय स्तरावर लागला ब्रेक

ज्या पद्धतीने रणजी आणि आयपीएलमधे श्रेयस वेगाने यशाची शिखरं चढत होता. त्यावरुन तो आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतही वेगानं पुढे जाईल असं वाटलेलं. २०१७ला विराट कोहलीचा बदली खेळाडू म्हणून टेस्ट मॅच टीममधे त्याला जागा स्थान मिळाली. पण पदार्पण करण्याची संधी काही मिळाली नाही. त्यानंतर २०१७लाच टी - २० आणि वनडे मॅचमधे त्यानी एंट्री घेतली. तिथेही त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. पर्यायाने कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. २०१७ ला टी-२० आणि वनडेत पदार्पण करणाऱ्या श्रेयसने २०२० उजडेपर्यंत फक्त १३ वनडे आणि १८ टी - २० मॅच खेळल्यात. 

बहुदा याचमुळे त्याने वर्ल्डकपदरम्यान निवड समितीवर पुरेशी संधी न दिल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्याची प्रथम श्रेणी आणि आयपीएल कारकीर्द तुलनेने कमी वेळात चांगली फुलली होती. अखेर २०१९-२० च्या दरम्यान निवड समितीनं त्याला चांगली संधी देणं सुरु केलं. श्रेयसनेही त्या संधीचं सोनं करुन दाखवलं. 

आता श्रेयस चौथ्या क्रमांकावर दीर्घ काळासाठी स्थिरावेल असा विश्वास वाटतो. तब्बल दोन वर्षानंतर तो भारतीय टीममधे स्थिरावत आहे. त्यामुळे त्याचे मुंबईकर चाहते आणि प्रशिक्षक प्रविण आमरे सुखावले असतील.

विराटच्या पावलावर पाऊल

श्रेयस अय्यरला त्याचे बालपणीचे मित्र वीरेंद्र सेहवाग म्हणत असले तरी श्रेयसमधे विराटची झलक दिसते. तो विराटचे शॉट कॉपी करत नसला तरी त्याच्या बॅटिंग स्टेटमेंटमधे विराटची झलक जाणवते. विराटप्रमाणेच उगाच वेडेवाकडे फटके मारण्यापेक्षा श्रेयस क्रिकेटिंग शॉट्सवर भर देतो. ही त्याची स्टाईल चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनसाठी योग्य आहे. तो बॅटिंगला येईल तेव्हा दोन प्रकारची परिस्थिती असू शकते. एकतर टॉप ऑर्डरमधले सगळे खेळाडू ढासळले असतील किंवा दुसरं विशेषतः शेवटच्या १० ते १५ ओवर्समधे त्याला खेळावं लागेल. या दोन्ही परिस्थितीत बॅटिंग करण्यासाठी लागणारे कसब त्याच्याकडे असल्याचं त्याने मागील काही मॅचमधे दाखवून दिलंय. 

विराट आणि श्रेयस बॅटिंग करतात त्यावेळी दोघांमधेही बॉलरवर वर्चस्व गाजवण्यासाठी एक सुप्त स्पर्धा सुरु असल्याचा भास होतो. हा भास येत्या काळात भारतीय क्रिकेटसाठी खास ठरण्याची शक्यता आहे. कारण या स्पर्धेमुळे टीम इंडियात अजून एक मॅच एकहाती जिंकून देणारा मॅचविनर तयार होणार आहे. श्रेयस विराटच्या पावलावर पाऊल टाकतोय. विराट कोहलीने फार कमी वयात आयपीएल टीमची धूरा आपल्या हातात घेतली. त्याप्रमाणे श्रेयसनेही घेतली. आता मॅच फिनिश करण्याच्या बाबतीतही श्रेयस विराटच्या 'नक्शे कदम पर' चालताना दिसतोय.

पण श्रेयस अय्यरला अजून बराच मोठा पल्ला गाठायचाय. विराट बॅटिंग करतो त्यावेळी तो गॅप लिलया काढतो. श्रेयसकडे गॅप काढण्याइतका सफाईदारपणा दिसत नाही. याबरोबर श्रेयस चोरट्या धावा घेताना आपल्या पार्टनरला कॉल देताना गडबडतो. यावर त्याला काम करावं लागेल. समोरचा चांगला फलंदाजी करणारा फलंदाज चुकीच्या कॉलमुळे मोक्याच्या क्षणी आऊट झाला तर त्याच्या इतकी वाईट आणि आत्मघातकी दुसरी गोष्ट नाही. विराट आपल्या फिल्डिंगवर मेहनत घेतो. श्रेयसनेही तशी मेहनत घेतली तर तो एक तिन्ही फॉरमॅटमधील परिपूर्ण आणि उच्च दर्जाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू होईल यात शंका नाही.

हेही वाचाः 

केंद्राच्या कायद्याला राज्य सरकार आव्हान देऊ शकतं का?

मुंबईचा श्रेयस अय्यर टीम इंडियात चौथ्या नंबरची जागा घेईल?

वेस्ट इंडिजची 'त्रिमूर्ती' टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधे धडकी भरवणार!

महान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीचा चीड आणणारा भारतीय इतिहास

सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा