`साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी`, असं उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाचं वर्णन होतंय. त्याचं कारण आहे, तेर हे गाव. उस्मानाबाद शहरापासून वीसेक किलोमीटर अंतरावरचं संत गोरा कुंभारांचं हे गाव हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरांचा वारसा घेऊन उभं आहे. त्यामुळे एक वेगळा अनुभव घेण्यासाठी थोडी वाकडी वाट करून तेरला जावंच लागेल.
किती गुंतवळ असते ना भूत आणि वर्तमानाची? कधी तरी एखादं टोक सापडतं. ‘हाती आलं की सारं’, असं वाटू लागतं. पण नंतर कळतं, चुकीचं टोक होतं आपल्या हातात. तेर, तगर किंवा तगरपूर या गावाचं हे असं होतं.
लातूरच्या राजस्थान विद्यालयात चटर्जी नावाचे मुख्याध्यापक होते. एक युरोपीय अभ्यासक त्यांच्याकडं आला. त्यांना घेऊन ते उस्मानाबादजवळच्या तेर या गावी आले. तोपर्यंत गोरोबाकाकांच्या म्हणजे संत गोरोबा कुंभार यांच्या गावी काही जुन्या वास्तू आणि खापरं सापडतात, हे बहुतेकांना माहीत होतं. रामलिंगअप्पा लामतुरेंच्या परिचयातल्या एकानं त्यांना पाठवलं होतं. ते गेले जुन्या वस्तू सापडतात त्या भागात.
कितीतरी वस्तू पडलेल्या होत्या. जणू इतिहासच विखरून पडलेला. त्यातल्या काही वस्तू त्या विदेशी माणसानं स्वतःच्या रुमालानं पुसल्या. त्यानं तिथं बसकणच मारली. रामलिंगअप्पा लामतुरे हे सारं बारकाईनं पाहत होते. त्यांनी चटर्जींना विचारलं, ‘एवढा काय अभ्यास करतो हा माणूस?’ त्यावर त्या विदेशी माणसांनं सांगितलं ‘ही खापरं म्हणजे फक्त गोरोबाकाकांच्या चमत्काराचा भाग नाही. त्यापेक्षा यात खूप काही आहे.’
रामलिंगअप्पा तसा हुशार माणूस. त्यांनी या सगळ्या वस्तू गोळा करायच्या ठरवल्या. त्यांची संख्या एवढी होती की, त्या गोळा करण्यासाठी लामतुरे यांनी शेतातल्या गड्याला कामाला लावलं. रोज नवी वस्तू समोर यायची. मग एके दिवशी अशा वस्तू आणून देणाऱ्यांना धान्य किंवा पैसे दिले जातील, अशी दवंडीच त्यांनी गावात दिली. आणि लोक या वस्तू आणून देऊ लागले. एकेक वस्तू म्हणजे इतिहासातलं एक-एक पान. तेरच्या रामलिंग लामतुरे संग्रहालयाच्या स्थापनेची ही गोष्ट. अस्ताव्यस्त पडून असलेल्या आपल्या इतिहासाचे नवे पैलू कळत होते. इतिहास हा असा गोळा होतो.
हेही वाचा : संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो
उस्मानाबाद ते तेर हा तसा १८ किलोमीटरचा प्रवास. हा प्रवास करत असताना आठवणीत होती ‘पेरिप्लस ऑफ द युरोथ्रियन सी’चा अनामिक लेखक, टॉलेमी, पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातले इतिहासाचे अभ्यासक, ‘हिंदू’ कादंबरीतलं पात्र खंडेराव, तेरचा अभ्यास खऱ्या अर्थानं मांडणारे रा. श्री. मोरवंचीकर, रामचंद्र चिंतामण ढेरे, प्रभाकर देव, अलीकडेच उत्खननामधे व्यस्त असणाऱ्या माया पाटील अशी कितीतरी नावं. इतिहासाची मांडणी नवनव्या पुराव्यासह करणारी. धागा अडीच हजार वर्ष मागे नेणारी.
तेरचा समृद्ध परिसर. त्या नव्या वैभवशाली खुणा आता लपून गेलेल्या. गाडल्या गेलेल्या. काय-काय लपून बसलं असेल काय माहीत? पण जे सापडलं तेही जाणिवा समृद्ध करणारं आहे. सातवाहनांच्या काळातल्या गावांना एक लाकडी तटबंदी असते, असं बहुतेक पुरातत्त्व विभागाचे अभ्यासक सांगतात. अशी तेर गावातली तटबंदी शोधण्यात आता अभ्यासकांना यश आलंय.
सातवाहनांचा हा प्रदेश संपन्न होता. शत्रू तसे नव्हते. त्यामुळं आक्रमणं झालीच तर ती हिंस्र पशू करतील अशी भीती असे. त्यांना आवरता यावं म्हणून लाकडी तटबंदी असावी. तेरमधे केलेल्या अलीकडच्या उत्खननामधे तांदळाचे दाणेही आढळलेत. जळालेले दाणे कसे असतील, तसं त्याचं स्वरूप. खापरे आणि धान्य त्यांचं वय लपवत नाहीत, असं म्हणतात. अन्नधान्याचं वय कसं काढल जात असेल?
त्यासाठी ‘सी-१४’ नावाची एक चाचणी केली जाते. मानवी किंवा वनस्पतींशी जवळीक नसलेले धान्य अल्युमिनियमच्या तुकड्यावर एकत्र करायचं आणि त्यावर ही चाचणी करायची. कलकत्ता, मुंबई, दिल्ली इथं अशा प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा आहेत. अशा प्रकारच्या वैज्ञानिक चाचण्यांतून सातवाहन काळातलं राहणीमान आता पुढं येऊ लागलंय. पूर्वी गहू, ज्वारी असं धान्य पुराविद्या शाखेतल्या अभ्यासकांना आढळून आलं होतं. आता मराठवाड्यात तांदूळ होता हेही समोर आलंय.
दुसऱ्या शतकापासून दुष्काळाशी झगडत असणाऱ्या या भागात तांदूळ होता. याचा अर्थ पाणी कमी होतं गेलं, तशी या भागातली संपन्नता कमी होत गेली असावी. पुरातत्त्वज्ञ माया पाटील यांचे याबाबतचं मत विचार करायला लावणारं आहे. भूकंप आणि पाण्याची कमतरता या दोन गोष्टींमुळं ही संपन्नता कमी झाली असावी आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर व्यापारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या भूभागाची कालौघात अधोगती झाली असावी असं त्या म्हणतात. या त्यांच्या म्हणण्याला अलीकडच्या काळातल्या किल्लारीच्या भूकंपानं पुष्टी मिळते.
संत गोराबाकाका कुंभार नसते तर कदाचित तेरमधल्या खापरांकडे आपण वेगळ्या नजरेनं पाहिलं असतं का? माहीत नाही. पण त्यांनी बनवलेली मातीची भांडी सर्वत्र असावीत आणि त्यांच्या संतपणाच्या चमत्काराचा भाग म्हणून जनसामान्यांनी इतिहासातल्या वैभवाकडे दुर्लक्ष केलं असण्याची शक्यता अधिक आहे.
किती प्रकारची मातीची भांडी असावीत तेरमधे? काळी-तांबडी, तांबड्या झलईची, मगॅरीयन भांडी आढळली. वाडगे, लोटे, गडवे, पराती अशा कितीतरी वस्तू आजही जनत केल्यात. तांबड्या झिलईची भांडी तेरमधे सापडली तशीच ती दक्षिण अरिकमेडूच्या किनारपट्टीवरही सापडल्याचे उल्लेख रा. श्री. मोरवंचीकर नेहमी करतात. या भांड्यावर कुंभार त्यांच्या नावाचे किंवा श्रेणीचे ठसे उमटवत. या भांड्यांवर सुंदर नक्षीही असते. अशी भांडी रोममधेही सापडली. तेरमधे रोम व्यापाऱ्यांची एक वसाहत असल्याचंही सांगितलं जातं.
केवळ भांडीच नाही तर तेरमधे पूर्वी बांगड्यांचा कारखानाही असावा, असं मानलं जातं. विविध प्रकारच्या बांगड्या मिळतात. गुजरातहून शंख आणून तो योग्य आकारात कापून बांगड्या केल्या जात असाव्यात. त्यावर नक्षी असे. परिपूर्ण गोल कापता आले नाहीत असे शंख एकमेकांना तारेनं जोडूनही बांगड्या केल्या जात.
८-९ सेंटीमीटरच्या व्यासाच्या बांगड्याही तेरमधे आहेत. काळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्यांही अलीकडच्याच उत्खननामधे दिसून आल्यात. हे एक मोठं जग आहे. आध्यात्मिक अंगाने विचार करत आपण हा इतिहास काहीसा वळचणीला टाकतो आहोत का, असा प्रश्न सहज मनात डोकावून जातो. पण असा प्रश्नच मुळात चूक. असंही इतिहास नुसता मिरवायचचा की त्यातून धडा घेऊन मानवी जीवन अधिक समृद्ध करायचं, याचं भान काही मोजक्या व्यक्तींमधेच असतं.
हेही वाचा : साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?
तेर नक्की कोणाचं? सातवाहनांचं की गोरोबाकाकांचं? सातवाहनांच्या तेरमधे अनेक संदर्भ समाजजीवनाचे. त्यातला एक मातृदेवतांशी संबंधित. हे सातवाहनकालीन शिल्प. अशा अनेक मूर्त्या तेर, भोकरदन, पैठणमधे आढळतात. लज्जागौरी या नावानं रा. चिं. ढेरे यांनी लिहिलेल्या पुस्तकामधे या शिल्पाचा परिपूर्ण अभ्यास मांडण्यात आलाय. शिल्पाची पाठ जमिनीला लावलेली. गुडघे संभोगाच्या सुलभतेसाठी वर मांड्यांजवळ घेतलेले. योनीप्रदेश स्पष्ट दिसेल असे. शिरोभागी कमल. शिरोभागी हात. काही शिल्पांमधे ते दिसतही नाहीत.
कटीभोवती मणीमेखला, पायात वाळे अशा प्रकारच्या अनेक मूर्त्या अजूनही उत्खननामधे सापडतात. काय असेल याचा अर्थ? जननप्रक्रियेबाबतची उत्सुकता मानवी मनात सततची. त्यामुळं त्यांच्या पूजेची पद्धत असावी. अशा मूर्ती पदकावर कोरलेल्या आढळतात. त्या पदकांना छिद्र असते. जेणेकरून ती गळ्यात घालून मिरवता येतील. नेवासे, नागार्जूनकोंडा, माहुरझरी, उत्तरप्रदेशातील भीटा इथंही या मूर्त्या सापडल्यात. युरोप, इजिप्त आणि जावामधेही अशा प्रकारच्या मूर्त्या सापडल्यात. याचा अर्थ अपत्यप्राप्तीसाठी अशा प्रकारच्या मूर्तीची पूजा होत असावी. तुळजापूरमधल्या मातंगी देवी किंवा भूदेवीचा संबंध मातृदेवतांशी जोडला गेलेला असल्याचं ढेरे यांनी त्यांच्या अभ्यासातून दाखवून दिलंय.
याच काळातल सापडलेलं मद्याचं कूपही समाजजीवनात छंद सांगण्यास पुरेसं ठरतं. ऍम्फोरा म्हणतात याला. चारफूट उंची. निमुळतं बूड. मानेला दोन्ही बाजूंनी मुठी. तिपाईवर ठेवता येईल, अशी रचना. त्याकाळी प्रामुख्यानं रोमन मद्य आयात केलं जात. याचा अर्थ एवढी संपन्नता होती की, या कालखंडातल्या व्यापाऱ्यांनी लेणी उभी करायलाही आर्थिक मदत केली असावी. सांचीच्या स्तुपाला मदत करण्याइतपत या भागातले व्यापारी श्रीमंत होते.
केवळ तेर नव्हे तर भोगवर्धन म्हणजे आत्ताचं भोकरदन, पित्तनगल्प म्हणजे आत्ताचं पितळखोरा हेसुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं केंद्र होतं. तेर, पैठण, भोकरदन ते रोम असा व्यापार चाले. भलूकच्छ म्हणजे आजचं भडोज, कलियान म्हणजे आजचं कल्याण असा व्यापारी मार्ग होता. मणी, हस्तदंती, मूर्ती, कापड, तेल याचा व्यापार तेर, भोगवर्धन मार्गे दक्षिणेत धन्यकटकाशी जोडलेला होता. तलम कापडाची बाजारपेठ प्रसिद्ध होती. कल्याण आणि नालासोपारा बंदरातून व्यापार होत असे.
इसवीसन पूर्व पहिल्या शतकातला हा प्रवास कमालीचा समृद्ध अनुभव म्हणता येईल. या व्यापारामधे हस्तिदंतीमूर्तीला कमालीचं महत्त्व होतं. फण्या, कुपी अशा वस्तू तर होत्याच. शिवाय कर्णकुंडलं, घोड्याच्या साजासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचाही समावेश होता.
एका हस्तिदंती मूर्तीची चर्चा नेहमी होते. १२.५ सेमी उंचीची ही मूर्ती कमालीची आकर्षक आहे. उभा चेहरा, उत्तान उरोज, आकर्षक नेत्र असणाऱ्या स्त्रीने उजव्या हाताने कर्णफुलांना हात लावला आहे. डाव्या हातानं वस्त्राचा सोगा वर उचलून धरला आहे. वस्त्र परिधान केलेली पारदर्शक मूर्ती बघताना हरखून गेलं नाही तरच नवल. नीलवर्णी घारे डोळ्याच्या अशा मूर्ती आणल्या जात. याचा अर्थ कला आणि सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत व्यापाराची गती होती.
या काळातलं विज्ञानही प्रगत होतं का? ‘हो’ असं म्हणायला वाव आहे. कारण तरंगणारी वीट ही काही गोरोबाकाकांच्या कालखंडातली नाही. पण वीट तरंगते कशी? गहू आणि तांदळाचा भुसा घालून वीट बनवली असल्यानं आत सछिद्रता तयार होते. ती हवा वीट पाण्यावर तरंगायला मदत करते. पण या विज्ञानाची कथा रामसेतूत वापरली असल्यानं या विटा जणू रामायण काळातल्या आहेत, असं सहजपणे सांगितलं जातं आणि त्यावर कोणाचाही विश्वास बसतो. कला, संस्कृती, बांधकाम विषयक तंत्रज्ञान असं बरंच काही इथं होतं. परिणामी एक समृद्ध कालखंड या भागात होता. तो भूकंपामुळं आणि दुष्काळामुळं पुढं रसातळाला गेला.
विपुल केशसंभार आणि अनेक पेडांच्या वेण्या हे सातवाहनकाळातील केशभूषेचं वैशिष्ट्य. तेरमधे सापडणाऱ्या मूर्त्या तशा गोबऱ्या गालाच्या आहेत. पसरट नाक, खालचा ओठ मोठा अशा अनेक मूर्त्या सापडतात. शिल्पातून त्या काळातलं समाजजीवन कसं असावं, याचा अंदाज बांधता येतो. भारतातल्या सार्थवाहपथावर म्हणजे व्यापारी मार्गावर बौद्ध भिक्खूसाठी वर्षावास उभारले होते. याच निवासांमधे व्यापारी थांबत. तेरच्या, भोकरदन, नेवासा या सर्व बाजारपेठांभोवती लेणी कोरल्यात. अगदी उस्मानाबाद, औरंगाबाद शहरामधेही काही लेणी आहेत. उस्मानाबादची अर्धवट असली तरी तिथं असं केंद्र असावं, असं वाटत होतं.
तेरचा इतिहास केवळ या वस्तूंमधे शिल्लक नाही. आजही गावात महादेवाची सत्तरपेक्षा अधिक छोटी-मोठी मंदिरं असतील. सर्वसाधारणपणे महादेवाची पिंड एकाच दिशेला असते. पण तेरमधील महादेव मंदिराच्या पिंडी सर्व दिशेनं आहेत. स्तूप आणि विहार आहेत. जैनांमधे तीर्थक्षेत्र म्हणून तेरला मान्यता आहे. सर्व धर्मातल्या व्यक्तींचा वावर इथं होता, अशा खुणा गावभर विखुरल्या आहेत.
एक संपन्न नदी जशी आटत गेली तसं तेरचं वैभव कमी होत गेलं. पुढं हा इतिहास मागे पडला आणि नंतर आध्यात्मिक नेतृत्वाची धुरा तेरमधे होती. अन्यथा थापटी मारून संतांचं डोकं नीट आहे का, अशी लोककथा टिकली कशी असती? तत्त्वज्ञानाच्या पातळीवर नीती-अनीतीच्या चौकटी ठरवण्याचा काळ म्हणून वारकरी संप्रदायाकडे पाहिलं जातं. नाथ संप्रदायाचा उदय आणि त्याच व्यापकतेतून आलेली भक्ती जपणाऱ्या गोरोबाकाकांचे मोजकेच अभंग उपलब्ध असले तरी त्यांना थापटी मारून ते तत्त्वज्ञान तपासण्याचा अधिकार होता.
हेही वाचा : लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?
तेरच्या प्रवासात सारं काही आठवत होतं. आताही तेर काही केंद्रस्थानी नाही, असं नाही. नव्या राजकीय चौकटीमधे डॉ. पद्मसिंग पाटील यांनी मोठ्या पदांवर काम केलंय. त्यामुळं तेरमधे कितीवेळा जावं लागलं, हे मोजलं नाही. पण बाहुबली अशी प्रतिमा असणाऱ्या तेर या डॉ. पद्मसिंह यांच्या गावी विरोधी पक्षातल्या व्यक्तींची सभा होणं याला एक वेगळंच महत्त्व असे.
तेरच्या जवळ गोवर्धनवाडीमधे पवन राजे निंबाळकरांचं घर होतं. त्यांचा खून झाला. त्यानंतरही अनेकदा तेरच्या परिसरात फिरताना इथल्या अनेक लोकांशी संपर्क आला. त्या काळचं वैभव वगैरे संकल्पनांवर विश्वास बसणार नाही एवढी अनास्था इथं आजही आहे. गोरोबा काकांच्या दर्शनाला जायचं. फार तर वारीमधे जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, इतकीच इच्छा असणारे बहुतेक जण. याच परिसरात नंतर एक साखर कारखाना झाला. त्यामुळं काही दिवस समृद्धीचे होते. पण दुष्काळ येत गेला तसा ऊस कमी होत गेला. आजही तेर आणि या गावाचा भवताल मोठा अभ्यासण्यासारखा आहे.
पण तेर हे सदासर्वकाळ केंद्रस्थानी राहिलेलं गाव आहे. कधी सातवाहनांचं म्हणून, कधी गोरोबा काकांचं गाव म्हणून तर कधी पद्मसिंग यांचं म्हणून. राज्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय या गावातून पूर्वी होत. अनेक वर्ष हीच स्थिती कायम होती. अजूनही त्यात फार बदल झालेत, असं नाही. उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाबतीतले अनेक निर्णय आजही याच गावाच्या भोवताली ठरतात. आज घडीला तेर तसं छोटसं असलं तरी त्याचा इतिहास जरी नीट मांडला तरी बरंच काही होईल.
हेही वाचा :
सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन
आनंद कुंभारः एक क्लार्क शिलालेख अभ्यासक बनतो त्याची गोष्ट
नयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान
वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी वार्षिक रिंगणच्या संत गोरा कुंभार अंकासाठी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित भाग.)