ठाकरे-आंबेडकर १०० वर्षांपूर्वी एकत्र का आले होते?

१८ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


प्रबोधनकार ठाकरेंच्या स्मृतिदिनी, २० नोव्हेंबरला prabodhankar.com या वेबसाईटचं रिलॉन्चिंग उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शिवाजी मंदिर, दादर इथं होतंय. समतेच्या लढाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे या दोन दिग्गजांमधे स्नेहाचं नातं आहे. या वेबसाईटच्या रिलॉन्चिगच्या निमित्तानं ठाकरे-आंबेडकर या ऋणानुबंधाला उजाळा मिळतोय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केशव सीताराम ठाकरे. घटनाकार आणि प्रबोधनकार. दोघेही समकालीन. दोघेही दादरकर. एकमेकांशी ते किमान चाळीसेक वर्ष तरी संपर्कात असावेत. दोघांचाही वैचारिक पाया सारखाच होता. महात्मा जोतिबा फुलेंना दोघांनीही आपलं गुरू मानलं होतं. भगवान बुद्ध दोघांचीही प्रेरणा होते. राजर्षी शाहू महाराज हे दोघांच्याही पाठीशी आदरपूर्वक उभे होते.

हेही वाचा: तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

दोघांचं समान ध्येय

बाबासाहेबांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले होते. प्रबोधनकार हे पांढरपेशा सीकेपी जातीत जन्मलेले असूनही त्यांना ब्राम्हणेतर म्हणून जातिभेदाचे फटके बसले होते. तरीही दोघे जातिव्यवस्थेविरुद्ध अत्यंत धडाडीने लढले.

दोघेही ज्ञानयोगी. वाचनाचा दोघांनाही प्रचंड नाद. इतिहास, तत्त्वज्ञानासह अनेक विषयांचा दोघांचाही व्यासंग मोठा. दोघांनीही या व्यासंगाच्या आधारे ब्राह्मणी वर्चस्वाला हादरे दिले आणि बहुजनांची न्यूनगंडातून सुटका करण्याचं महत्त्वाचं काम केलं.

फक्त समाजसुधारक म्हणूनच नाही तर पत्रकार, लेखक आणि वक्ते म्हणून दोघांचाही महाराष्ट्रभर दरारा होता. दोघांचीही लेखणी तिखट होती. बाबासाहेबांनी काही देवतांवर केलेली टीका काही वर्षांपूर्वी वादाचा विषय बनली होती. पण प्रबोधनकारांनी देव आणि देवळांवर केलेले प्रहार त्याच्याही पुढे आहेत.

बाबासाहेबांविषयीचा जिव्हाळा

प्रबोधनकारांनी आपल्या लिखाणात बाबासाहेबांविषयी अनेकदा अत्यंत आदरपूर्वक लिहिलं आहेच. बाबासाहेबांनीही एक इतिहास संशोधक म्हणून प्रबोधनकारांच्या लेखनाचे उतारे आपल्या साहित्यात संदर्भ म्हणून दिलेले आहेत. गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, रावबहाद्दूर सी.के बोले, श्रीधरपंत टिळक, दिनकरराव जवळकर, ज्ञानदेव घोलप अशी दोघांच्या कॉमन मित्रांची यादी खूप मोठी आहे.

दोघांच्या संदर्भातला एक महत्त्वाचा संदर्भ १९२३च्या निवडणुकांचा आहे. तेव्हा प्रबोधनकार साताऱ्यात होते. निवडणुकांमधे ब्राह्मणेतर आणि बहुजन समाजाच्या नावाने अस्पृश्यांना गृहित धरायला त्यांनी विरोध केला. त्यांनी `प्रबोधन`मधे त्यावर लेखही लिहिला, `अस्पृश्यांनो स्पृश्यांपासून सावध राहा!` याचा परिणाम म्हणून प्रबोधनकारांनी साताऱ्यात बसवलेलं `प्रबोधन`चं बस्तान उद्ध्वस्त झालं. स्पष्ट सांगायचं तर त्यानंतर प्रबोधन आणि प्रबोधनकारही देशोधडीला लागले. पण माणगाव परिषदेत छत्रपती शाहूंनी मांडलेल्या भूमिकेचा वारसा सांगत त्यांनी ते हसत हसत स्वीकारलं.

प्रबोधनकारांच्या या भूमिकेतून त्यांचा बाबासाहेबांविषयीचा विश्वास लख्ख दिसतो. ती भूमिक अशी होती, ‘तुमच्या भाग्याने तुम्हाला डॉ. आंबेडकरांसारखा तरणाजवान तुमच्या हाडारक्तांमासाचा पुढारी लाभला असताना, तु्म्ही आमच्यासारख्यांच्या मागे का लागावे? अहो, मेंढ्यांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा. लांडगा चालेल का? आंबेडकरच तुमचं कल्याण करणार. बाकीचे आम्ही सारे बाजूचे पोहणारे.’ आजही बेरजेच्या राजकारणाच्या नावाने दलित मतांना आणि नेत्यांना वापरण्यात येतंय. त्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं आहे.

हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

दोन महत्त्वाच्या लढाया

दोघांनी मिळून दादरमधे एक खूप महत्त्वाची लढाई लढली होती, ती होती सार्वजनिक गणपती उत्सवाची. वर्ष होतं १९२६. टिळक ब्रिजच्या जवळ आणि दादर सार्वजनिक वाचनालयाच्या मागच्या बाजूला रिकाम्या मैदानात सार्वजनिक गणपतीचा मंडप होता. दलिताच्या हातून गणपतीची पूजा करायची असा निर्धार बाबासाहेबांच्या नेतृत्वात दादरच्या बहुजन तरुणांनी केला होता. त्यात प्रबोधनकारांचीही साथ होती.

गणपतीच्या पहिल्याच दिवशी या कार्यकर्त्यांनी मंडपाला गराडा घातला. मंडळाचे उच्चजातीय पदाधिकारी टाळाटाळ करत होते. दुपारी बारा वाजता प्रबोधनकार गर्जले, तीन वाजेपर्यंत जर अस्पृश्याच्या हातून गणपतीची पूजा झाली नाही, तर गणपतीची मूर्ती फोडून टाकेन. त्यानंतर कुत्र्याचं शेपूट सरळ झालं. बाबासाहेबांचे एक कार्यकर्ते मडकेबुवा यांनी  स्पर्श केलेलं गुलाबाचं फूल गणपतीवर वाहण्यात आलं. परळ चौकाला याच मडकेबुवांचं नाव देण्यात आलं आहे.

पण यानंतर तो गणेशोत्सव बंद पडला. त्याचा आळ प्रबोधनकारांवर आला. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक नवरात्रौत्सवाची सुरवात केली. जसे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात लोकमान्यांनी केली तसंच मराठी पद्धतीच्या सार्वजनिक नवरात्रौत्सवाची स्थापना करण्याचं श्रेय प्रबोधनकारांकडे जातं. बाबासाहेब या बंडखोरीत सोबत होतेच. विशेष म्हणजे हा उत्सव सुरु करण्याची भूमिका मांडणारं एक आवाहन तेव्हा `प्रबोधन`मधे नाही, तर बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारतमधे छापून आलं होतं. त्यावर प्रबोधनकारांची सही होती.

बहुजनवादाच्या संस्काराचं मूळ

खांडके बिल्डिंगमधेच प्रबोधनकारांनी स्वाध्यायाश्रमाची स्थापना केली. या संस्थेच्या तरुणांनी अनेक भाषणांचं आयोजन केलं. पुस्तकं छापली शिवाय हुंड्याच्या विरोधात रान उठवलं. पुढे प्रबोधनकार प्रबोधनच्या वाढीसाठी सातारा आणि पुण्याला गेले. तेव्हा बहुजनवादाचे संस्कार झालेले कार्यकर्ते बाबासाहेबांबरोबर गेले. बाबासाहेबांच्या चरित्रात टिपणीस, चित्रे, चिटणीस अशी कायस्थांची आडनावं अनेकांना बुचकळ्यात पाडतात. त्यामागे प्रबोधनकारांनी केलेली मशागत आहे.

जुन्या जमान्यातले पत्रकार श्री.शं. नवरे यांनी १६ जानेवारी १९६५च्या महाराष्ट्र टाइम्समधे लिहिलंय, `आपल्या समाज सुधारणेच्या प्रचारासाठी कार्यकर्ते तयार करण्याचे उद्देशाने श्री. ठाकरे यांनी दादर येथे स्वाध्यायाश्रम नावाची संस्था बरीच वर्षे चालवली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या समाज समता संघाला निष्ठावंत कार्यकर्ते पुरविण्याचे काम मुख्यतः याच संस्थेने केले.`

महाडच्या सत्याग्रहाला पाठिंबा देणारा अस्पृश्यांचा मेळावा परळच्या दामोदर हॉलमधे भरला होता. त्यात प्रबोधनकारांनी अस्पृश्यांच्या हातचं पाणी पिऊन आपण कर्ते सुधारक असल्याचं सिद्ध केलं होतं, असा एक संदर्भही बाबासाहेबांच्या चरित्रात सापडतो.

प्रबोधनकार पुण्यात असतानाही त्यांनी ब्राम्हणेतर आंदोलनाला उभारी आणण्यात हातभार लावला होता. तेव्हा श्रीधरपंत आणि रामभाऊ या लोकमान्य टिळकांच्या मुलांनी केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांच्या सहकार्याने गायकवाड वाड्यातल्या गणपतीसमोर अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम ठेवला. गायकवाड वाड्यातच समता सैनिक संघाची स्थापना करून बाबासाहेब आणि इतर दलित नेत्यांबरोबर सहभोजन घडवलं होतं. या सगळ्या योजना रचल्या गेल्या त्या प्रबोधनच्या कचेरीत.

हेही वाचा: नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?

बाबासाहेबांच्या बाजूने प्रबोधनकार

बाबासाहेबांनी बुद्ध धर्मात केलेल्या सामूहिक धर्मांतराविषयी आजही बोलके हिंदुत्ववादी त्यांना दोषी मानतात. मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही, असं त्यांनी पहिल्यांदा मांडलं तेव्हा प्रबोधनकारांनी साप्ताहिक संदेशमधे लेख लिहून हिंदुत्ववाद्यांच्या या टीकेचा समाचार घेतला आहे.

ते लिहितात, `हिंदू संघटना व्हावी, अशी माझी कितीही प्रामाणिक विवंचना असली तरी चालू हिंदू संघटनेच्या आणि हिंदू महासभेच्या धांगडधिंग्यावर माझा मुळीच विश्वास नाही. कारण तेथील कार्यकर्त्यांच्या हेतू नि तळमळीबद्दलच मी साशंक होण्याइतकी कारणे मजजवळ आहेत. डॉ. आंबेडकरांपुढे नाकदुऱ्या काढण्यासाठी डॉ. कूर्तकोटी शंकराचार्यापासून तो थेट बॅ. सावरकरांपर्यंत कोणी कितीही खऱ्याखोट्या तळमळीची शिकस्त केली, तरी त्यांच्या प्रयत्नांना भिक्षुकी जीर्णमताच्या पाषाण तटबंदीपुढे हारच खावी लागेल. सारा हिंदुसमाज ब्राम्हण नी ब्राम्हणेतर, भिक्षुकशाहीच्या करंट्या धर्मकल्पनेचा गुलाम बनलेला. मूठभर शहरी सुधारक म्हणजे हिंदूसमाज नव्हे आणि त्यांची बहुजनसमाजाला दाद किंवा पर्वा मुळीच नसते.`

महाराष्ट्रासाठी ठामपणे उभे

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रबोधनकार शेलारमामाच्या आवेशात आघाडीवर होते. त्यादरम्यान चर्चगेटजवळच्या लव कोर्ट बंगल्यात त्यांची बाबासाहेबांशी शेवटची भेट झाली. तेव्हा बाबासाहेबांनी प्रबोधनकारांना सांगितलं की जोपर्यंत सगळे विरोधी पक्ष एकत्र येत नाहीत, तोवर काँग्रेस संयुक्त महाराष्ट्र देणार नाही. शिवाय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन जिब्राल्टरसारखा तुमच्यासोबत उभा राहील, असं आश्वासनही दिलं.

प्रबोधनकारांनी आंबेडकरांसोबत झालेली ही मुलाखत `नवाकाळ`मधे छापून आणली. त्यानंतर जादूची कांडी फिरली. सगळे मतभेद बाजुला सारून विरोधी पक्ष एकत्र झाले. संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. या लढ्यातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. ठाकरे-आंबेडकर या नात्यानं साधारणतः १०० वर्षापूर्वी साधलेल्या या ऐक्यानं घडवलेला इतिहास महाराष्ट्रानं अनुभवला आहे. आज आसपास जे काही घडतंय ते पाहता, त्या एकीची आज पुन्हा एकदा गरज निर्माण झालीय, हे कोणीही नाकारू शकणार नाही.

हेही वाचा: 

उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतले सहा मुद्दे

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

आयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे

(मार्मिकच्या ताज्या अंकात आलेल्या लेखाचा संपादित भाग)